Thursday, May 25, 2023

श्रीगजानन विजय काव्यांजली-काव्यपुष्प-१

जय गजानन- ।। नव्या लेखन उपक्रमाचा आरंभ श्रीगुरूपुष्य-योगावर " २५-०५-२०२३ करीत आहे- ।। गण गण गणात बोते ।। श्रीगजाननविजय काव्यांजली अध्याय पहिला--काव्यपुष्प-१ ----------------------------------------- श्रीकुलदेवता,कुलदेवी,इष्टदेवतांचे स्मरण श्रीसद्गुरूंना करितो विनम्र अभिवादन ।। श्रीगजानन विजय ग्रंथ हा महान थोर श्रीगजानन लीलांचे आहे प्रासादिक सार यथामती वर्णीन हो मी सारे कवितेतून लेखणी होई धन्य ही,मना आनंद अपार ।। १ ।। श्रीगजानन माऊली चरणी नित्य नमन संतकवी श्रीदासगणूंना मनोभावे स्मरुन श्रीगजानन काव्यांजली काव्यपुष्पे ही नित्य नेमे क्रमशः करीन गुरूचरणी अर्पण ।। २ ।। तेवीस फेब्रुवारी अठराशे अठयाहत्तर साली शके अठराशाभीतरी माघ "वद्य सप्तमी" या दिवशी पहिल्यांदा शेगावात दिसली महापुरुष आधुनिक संत श्रीगजानन माऊली ।।३ ।। आले कुठून हे, असती कोण? करी तर्क नाना शेगावीचे बंकटलाल,कुलकर्णी दामोदर दोघांनी पाहिले योगीपुरुषा- श्रीस्वामीगजाननांना, विप्र देविदासाच्या घरासमोरून जाताना ।। ४ ।। कवी अरुणदासावरी गजानन कृपा झाली सद्गुरूचरणी काव्यसेवा ही सुरू झाली ।। ---------------------------------------- श्रीगजाननविजय काव्यांजली -अध्याय पहिला , -काव्यपुष्प -१ कवी अरुणदास "- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 -----------------------------------------

Thursday, February 3, 2022

लघुकथा - बस्तान

लघुकथा - बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे ------------------------ या ऑफिसची "नवी- बॉस म्हणून "तिच्या प्रवेशाचा पहिला दिवस ", तिला इथे येऊन आता सहा महिने होत आले तरी अजून लख्ख आठवत असतो. प्रमोशन वगैरे चाकोरीतुन ती बॉस झालेली नव्हती, तर आधीच्या जॉबला सोडचिट्ठी देत अधिक पॅकेज देणाऱ्या या कंपनीची ऑफर स्वीकारून ती इथे आली होती. या कंपनीने त्यांच्या ऑल लेडीजस्टाफ असलेल्या ऑफिसयुनिटची बॉस म्हणून नेमणूक करतांना तिला म्हटले- "करिअर चॅलेंज " म्हणून या ऑफिसची जबाबदारी तुम्हास देत आहोत, सो प्रुव्ह ईट ! नव्या दमाच्या उत्साहाने तिने" हसत हसत हे चॅलेंज स्वीकारले , आणि या ऑफिसमध्ये आलेली आतापर्यंतची सर्वात तरुण बॉस" होण्याचा बहुमान पटकावला. अत्याधुनिक कॉर्पोरेट ऑफिस, इथला सारा माहौल भारी होता, चकचकीत ,झगमगीत आणि स्मार्टनेस ठासून भरलेले हे ऑफिस , यापुढे ती बॉस असलेले तिचेऑफिस असणार होते. हे सगळं वातावरण तिच्या मनातल्या करिअरिस्ट बॉसला सुखावणारे होते. दिवसभरातून तीन-चार वेळा केबिनच्या बाहेर येत मोठ्या वर्किंगहॉलमध्ये बसलेल्या शंभरएक स्टाफला नजरेखालून घालत असायची. स्वतःच्या कल्पनेने तिने अनेक बदल घडवून आणले, हे नवे बदल आणतांना कुणी कुरकुर केली नाही की ,दबक्या आवाजात विरोध केला नव्हता. तिने केलेल्या चेंजला मिळालेला रिस्पॉन्स, आणि नव्या बदलांचे" प्लस आऊटपूट"पाहून नव्या बॉसचे कौतुक झाले. स्वतःभवती गिरक्या घेणाऱ्या खुर्चीत बसून ,सगळ्यांच्या नजरा आणि चेहेरे आठवीत ती स्वतःशी म्हणायची- एक ना एक दिवस , या सगळ्यांना मी इझिली पॉकेटमध्ये टाकीन. पण , आता सहा महिने झाले तरी अजून तिच्या मना प्रमाणे ती इथे स्वतःची पकड बसवू शकली नव्हती " याची खंत तिला अस्वस्थ करीत असायची . त्याचे कारण, या ऑफिसमध्ये आल्यापासूनच तिला जाणवले होते. स्टाफबद्दल कळत गेले, या सगळ्यात- तिला एक खटकली, जी खटकली ती या ऑफिसमधील सर्वात सिनियर स्टाफ होती. बॉस म्हणून तिने केलेल्या चेंजेसला यश मिळवून देण्यात याच सिनियर कांचनमॅडमचा मोठा वाटा आहे", ही लपून न राहणारी गोष्ट नव्या बॉसच्या पचनी पडत नव्हती. या कांचनमॅडमबद्दल तिखटमीठ लावून सांगणारा म्हणाला होता- बॉस, ही आपणहून कधी तुमच्याकडे येणार नाही की फिरकणार नाही . तिच्या अनुभवाच्या जोरावर ती सिस्टीम, प्रोसिजर अशा सगळ्या गोष्टी "कम्प्युटर क्लिक "स्पीडने सांगू शकते ",सगळं ऑफिस कोळून प्याली आहे ती. कैक बॉस, उन्हाळे-पावसाळे पहावेत तसे पाहिलेले आहेत हिने "। न्यूकमर बॉसला भारी पडणारी आहे ही". सगळा स्टाफ हिचा खुप रिस्पेक्ट करतो, ती देखील सगळ्यांशी छान वागते हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे बघा. बॉस- बच के रेहना इससे.!" नव्या बॉसला तिच्या नव्या चमच्याने अलर्ट माहिती तत्परतेने केबिनमध्ये येऊन सांगितली होती. याचा परिणाम एकच झाला - नव्या बॉसने तिला न आवडलेल्या या सिनियरलेडी कांचन मॅडमला दूरच ठेवले. या कांचनमॅडम वागण्यात चोख, कामात त्यापेक्षाही अधिक चोख होत्या. त्यांच्याशी पंगा घेणे सोपे नाहीये " ! बॉसला तिच्या इनर-माईंडने सूचक इशारा दिला होता, आणि तो ऐकणे "आपल्याच हिताचे आहे ", हे तिने मान्य केले होते. बॉसने केबिनमध्ये बोलावले तर कांचन मॅडम क्षणात समोर उभ्या असत आणि काम झाले की क्षणात बाहेर पडत. ईतर विषयावर , त्यातल्या त्यात ऑफिस गॉसिपिंग " हे विषय कांचनमॅडमला वर्ज्य होते. एकदा बॉस म्हणालीच- कामा व्यतिरिक्तही तुम्ही माझ्याशी बोलायला हरकत नाही. कांचनमॅडम ,तुम्ही सिनियर आहात, तुमच्या कडून मला ऑफिसमधले अपडेट्स मिळत राहिले तर या पुढे मी माझे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकेन. स्टाफ रिलेटेड " काही सांगत चला तुम्ही, कोण कसा आहे, काय बोलतो, काय सांगतो", येऊ द्या तुमच्या मार्फत माझ्या पर्यंत ! तुमच्या मदतीचा खूप उपयोग होईल मला. कांचनमॅडमला याचा अंदाजआधीपासूनच आलेला असावा- त्या म्हणाल्या- बॉस, गॉसिप आधारित कोणतीही माहिती, चर्चा, याबद्दल आधीही मी कुणा बॉसला काही शेअरिंग केलेले नाही, आणि आता तुमचीही निराशा करणार, याबद्दल सो सॉरी ! एक सूचना नक्की करीन - "बॉस म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने स्वतः सगळे जाणवून घ्यावे, किती खरे, किती खोटे पारखून घ्यावे " , कुणाच्या ऐकीव माहितीवरून कुणाबद्दल कधी अनुकूल-प्रतिकूल मत बनवू नये " ! माझ्याबद्दल तुमच्या कानावर आलेले आहेच,त्यावर विश्वास न ठेवता माझ्या कामावर विश्वास ठेवा ! दुसऱ्या क्षणी कांचनमॅडम बाहेर येऊन कामात गढून गेल्या. त्यानंतर बॉसने या सिनियर मॅडम विषयी मनात अढी ठेवीत " तिला नकोशीच्या यादीत टाकून दिले. आताशा केबिनच्या बाहेर उभी रहात बॉस तिच्याकडे काहीच न बोलता पहात रहाते- कांचनमॅडम मात्र त्यांच्या नजरेतून बॉसला शांतपणे म्हणत असतात- बॉस - येऊन काही दिवसच झालेत, आणि तू मला ठरवून दुर्लक्षित करते आहेस . इतकं किरकोळीत नको काढू मला.! तू हुशार, स्मार्ट, बुद्धिमान बॉस नक्कीच आहेस, पण, तितकीच नवखी नि अनुनभवी आहेस. हीच तुझी मोठी मर्यादा आहे, याची जाणीव असू दे. तू आज बॉस आहेस, उद्या नसशील , मी इथेच आहे, इथेच असणार आहे. "अनुभवाचा सन्मान केल्याशिवाय तुझे बस्तान इथेच काय, कुठेच बसणे कठीण आहे. न बोलता खूप सांगणाऱ्या या नजरेचा सामना करणे अशक्य झाले आणि बॉसने आत जात केबिनच्या दरवाजा खाडकन बंद करून घेतला . -------------------------------- लघुकथा- बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 ---------------------------------

Sunday, June 14, 2020

लेख -व्यक्ती आणि साहित्यिक -अरुण वि.देशपांडे . परिचय ले- आदित्य अ.जाधव

#शब्दसृष्टी_समीक्षा_व_रसग्रहण
#आदित्य_अ_जाधव
#व्यक्ती_परिचय
#लेखक-कवी-बालसाहित्यिक-समीक्षक
#अरुण_वि_देशपांडे
********

आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली.
असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्या बद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.
मूळ परभणीचे असलेले देशपांडेकाका सेवानिवृत्ती नंतर  २००६ पासून आता पुणेकर झाले आहेत, बावधन -पुणे येथे ते वास्तव्यास आहेत.

त्यांचा लेखक परिचय करुन देताना सांगावं वाटतं कि, त्यांचा साहित्यप्रवास हा १९८३-१९८४ पासून सुरु झाला.
आणि आजही तितक्याच उत्स्फूर्ततेने, त्यांचे लेखन सातत्याने चालू आहे. तब्बल 37 वर्षापासून चालू असलेले लेखन, , . असे हे एक प्रेरणादायी लेखक, कवी व्यक्तिमत्व. नवोदितांना कायम मार्गदर्शन करणारे.

नवोदित लेखक वा कवी यांच्या साहित्याला एक मूर्त स्वरूप देऊन, त्यांचं काही साहित्य पुस्तक स्वरूपात आणून ती जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या बजावली आहे. आणि ते बजावत राहतील यात शंकाच नाही. 

आजपावेतो साहित्य सेवा करत असताना त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, अनुवाद अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिखाण करून, एकूण चौपन्न  पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे हे साहित्य प्रिंटपुस्तकं स्वरूपात आणि  ई- बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. 

त्यांनी बालसाहित्यामध्ये 'समीक्षा लेखन' देखील केलं आहे. त्यांच्या या लेखनाविषयी थोडे सविस्तर सांगतो जे महत्वाचे वाटावे असेच आहे.
त्यांच्या समीक्षा ग्रंथाचे -शिर्षक आहे-
" बालसाहित्य मराठवाड्याचे : नवे स्वरूप-नव्या वाटा".
 या ग्रंथास महाराष्ट्र राज्य शासनाचा २००८-२००९ चा 'दि.के.बेडेकर स्मृती-बाल साहित्य समीक्षा ' पुरस्कार देखील प्राप्त आहे जो केवळ बालसाहित्य समीक्षासाठीच दिला जातो.
 १३७ पुस्तकांचा परिचय या संदर्भ ग्रंथात केला आहे. ज्यामध्ये २८ कादंबऱ्या, ३५ बालकथासंग्रह, ४८ बालगीतसंग्रह, १७ बालनाट्य-एकांकिका आणि ९ विज्ञान व ललितविषयक लेखन अशा वेगवेगळ्या तब्बल १३७ पुस्तकांचा परिचय करुन दिला आहे. 
बालसाहित्य अभयसकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक व संदर्भ ग्रंथ म्हणून याची उपयुक्तता ठरली आहे यात शंकाच नाही. 
अरुण वि.देशपांडे यांचे कथा, कविता, कादंबरी,विनोदी लेखन, ललित लेखन व अध्यात्मिक लेखन
आणि 
बालकथा, बालकवितां, ललित, बालकादंबरी
असे सर्व प्रकारचे लेखन प्रिंट मीडियातून तर होतच असते, त्यांच्याबद्दल विशेष कौतुकाने
सांगेन की-
२०११ पासून त्यांनी इंटरनेटवर लेखन करण्यास सुरुवात केली, आणि त्यांच्या लेखनाची हे दुसरे पर्व अधिक जोमाने सुरू आहे.
ई-पेपर, ई-मासिके, ई-दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य सतत प्रकाशित होत असते.
फेसबुकवरील नामवंत साहित्यिक समूहात त्यांचा लक्षणीय सहभाग असतो.
ई-साहित्य साठी सध्या आघाडीवर असलेल्या
प्रतिलिपी मराठी, स्टोरी मिरर, मातृभारती मराठी, इन्स्टाग्राम, yourquote .in
या वेबसाईटवर ते निमंत्रित साहित्यिक म्हणून लेखन करीत आहेत.

स्वतःचे लेखन तर ते करतात .त्यात काही विशेष नाही,
विशेष हे आहे की- ते सोबतच्या साहित्यिक मित्रांच्या साहित्या बद्दल मोठ्या आस्थेने लिहीत असतात, 
पुस्तक परिचय-समीक्षण "हा त्यांच्या आवडीचा लेखन प्रकार आहे,  त्यासाठी अक्षरमित्र" हा त्यांचा
पुस्तक-परिचय करून देणारा ब्लॉग आहे.

फेसबुक वरील अनेक कवी-,कवयित्री, लेखक
यांच्या साहित्यकृतींना देशपांडे काकांनी लिहिलेली प्रस्तावना लाभलेली आहे,
मित्रांनो-
 माझ्या आरंभ' या पहिल्या कवितासंग्रहाची 
प्रस्तावना" , अरुण देशपांडे काकांनीच लिहिली आहे.
त्यांच्या सर्वच साहित्यकृतींचे उल्लेख करता येणे शक्य नाही, पण अलीकडच्या वर्षात त्यांचे विपुल असे ई-बुक्स प्रकाशित झालेत त्याबद्दल
सांगतो-
लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक-  अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य -

--------------------------------------------------
मोठ्यासाठी-     
---------------------------------------- 
१. प्रिंट बुक्स -  १७ 

२. ई-बुक्स -       ९
-------------------------------------
बुक्स -            २६
-----------------------------
बाल मित्रांसाठी -
 -------------------------              
१.प्रिंट -बुक्स = २१ ,                 
२.  ई-बुक्स =     ७ 
---------------------------------------------------बुक्स-              २८
-----------------------------------------------
एकूण बुक्स -प्रिंट बुक्स - ३८
                   ई-बुक्स-    १६
--------------------------------------------
एकूण पुस्तके -               ५४
----------------------------------------------
यातील  - ई बुक स्वरूपातले साहित्य
एक माहिती- 
एकूण ई-बुक्स -१६
----------------------------------
मोठ्यांसाठीची ई बुक्स- ११
बालमित्रांसाठी ई बुक्स - ०९
---------------------------------------
- ई- कथा संग्रह - २.
----------------------------------------------
१. शो पीस , २. झुळूक 
-------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले
. ई-बुक- कविता -संग्रह - ९
--------------------------------------------------
१.मनभावन- ई- कविता संग्रह,  २०१४
२.स्नेहबंध - ई- चारोळी संग्रह-   २०१५,
३.सहेलीच्या कविता - ई- संग्रह-  २०१६,
४.मानस पूजा - ई- भक्ती कविता  २०१६
५.माझ्या कविता ई-कवितासंग्रह  २०१८
६. हळवी फुंकर
७. ए सुंदर अस्मानी परी (२०१९)
८. नवदुर्गा दर्शन-नवरात्र कविता- २०१९
९.घनमेघ - कविता संग्रह -२०१९
-------------------------------------------------
...२....
 प्रकाशित बाल-साहित्य- ई- बुक्स - ७.
------------------------------------------------
ई-बाल कथा संग्रह - २.
-------------------------------
१. समजुतीच्या गोष्टी ,
 २. निधीची गोष्ट 
--------------------------------------------------
प्रकाशित-
ई-बाल-कविता संग्रह - ५ 
------------------------------------
१.पियुचे स्वप्न - ई- कविता संग्रह- २०१३,
२..टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३. गोड गोड चिकोबा  -ई-बाल कविता - २०१६ 
४. गाेड गाेड गाणी - कविता ई- कविता संग्रह-२०१६
५.. पिकनिक - ई- बाल कविता - २०१८ 
--------------------------------------------------

असे हे अरुण काका आपल्या पेजसाठी नियमित लेखन सहभाग करणार आहे.

त्यांच्या लेखनास शुभेच्छा देतो.

मित्रांनो तुम्ही त्यांना जरूर बोला

 त्यासाठी संपर्क-

अरुण वि.देशपांडे- पुणे.
संपर्क- मो- ९८५०१७७३४२
emel - arunvdeshpande@gmail.com

------------

परिचय-लेखक-

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४;
दि-१४-०९-२०१८,पुणे;
वेळ-०२:११मि,दु;
(शब्दसृष्टी समीक्षा व रसग्रहण)

Friday, April 24, 2020

लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक- अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य - माहिती

रसिक वाचक मित्रहो -
लेखक -कवी-बाल साहित्यिक-समीक्षक-  अरुण वि. देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य -
 एकूण - ५४ पुस्तके प्रकशित
--------------------------------------------------
मोठ्यासाठी-   
----------------------------------------
१. प्रिंट बुक्स -  १७ 
२. ई-बुक्स -       ९
-------------------------------------
बुक्स -            २६
-----------------------------
बाल मित्रांसाठी -
 -------------------------             
१.प्रिंट -बुक्स = २१ ,               
२.  ई-बुक्स =     ७
---------------------------------------------------बुक्स-              २८
-----------------------------------------------
एकूण बुक्स -प्रिंट बुक्स - ३८
                   ई-बुक्स-    १६
-----------------------------------------------
यात- मोठ्यांसाठी --
प्रिंट -पुस्तके -१७
----------------------------------------------------------
१.कथा-संग्रह   - ७.
----------------------------------
 १. कुरूप रंग , २.रंग तरंग , ३, अनुपमा ,
४. रंग फसवे , ५. रंगपंचीविशी , ६. नवऱ्यांची चाळ- (विनोदी कथा ),
  ७. दिवस बदलतात तेंव्हा ,
ललित लेख संग्रह :  १.
१.  मनाच्या अंगणात
३.नव -साक्षर साठी    - ४ पुस्तके.
४. समीक्षा - २
----------------------------
१. संतकवी दासगणू वांग्मय-दर्शन (आस्वाद- समीक्षा )
२. बाल-साहित्य मराठवाड्याचे - नवे स्वरूप- नव्या वाटा .
(बाल-साहित्याचा २००८-०९ चा बालसाहित्य समीक्षेचा राज्य-पुरस्कार).,
- ई- कथा संग्रह - २.
----------------------------------------------
१. शो पीस , २. झुळूक
-------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले कविता संग्रह खालील प्रमाणे-  १२
-------------------------------------------------------------
पुस्तक रुपात- कविता संग्रह- ३
------------------------------------------
१.गाणेदिवाणे,-  २००३,
२.मन डाेह -   २०११
३ शरण समर्था जाऊ-  २०१५
--------------------------------------------------
. ई-बुक- कविता -संग्रह - ९
--------------------------------------------------
१.मनभावन- ई- कविता संग्रह,  २०१४
२.स्नेहबंध - ई- चारोळी संग्रह-   २०१५,
३.सहेलीच्या कविता - ई- संग्रह-  २०१६,
४.मानस पूजा - ई- भक्ती कविता  २०१६
५.माझ्या कविता ई-कवितासंग्रह  २०१८
६. हळवी फुंकर
७. ए सुंदर अस्मानी परी (२०१९)
८. नवदुर्गा दर्शन-नवरात्र कविता- २०१९
९.घनमेघ - कविता संग्रह -२०१९
-------------------------------------------------
...२....
 प्रकाशित बाल-साहित्य- पुस्तके - एकूण- २८
प्रिंट बुक्स - २१ , ई- बुक्स - ७.
--------------------------------------------------
१. बाल-कथा - संग्रह - ९
--------------------------------------------------
१.बागुलबुवा , २, स्वाव-लंबन,
३,पप्पू आणि गणु ढोल्या ,
४.सायलीची गोष्ट ,५. बालवीर पप्पू आणि इतर गोष्टी ,६, मोन्या ,
७. गीरीबाबांची गोष्ट. ८, सोहमची  गोष्ट .९. रेणूची गोष्ट.
---------------------------------------------------------------------------
२.बाल- कादंबरी - ४
----------------------------
१. चंदर , २. बंटी ,३. फुलपाखरू ,
४ -पप्पूची पत्र ,
३.व्यक्तिचित्रणे :-    १. पप्पूचा अल्बम .
४.चरित्र : १. संस्कार -मूर्ती - सानेगुरुजी ,

.५  अनुवाद:  १. श्रेष्ठ भारतीय बाल-कथा -(मल्याळी ).
-------------------------------------------------------------------------
६. ई-बाल कथा संग्रह - २.
----------------------------------------------------------------
१. समजुतीच्या गोष्टी ,
 २. निधीची गोष्ट
------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशित झालेले  बाल-कविता संग्रह खालील प्रमाणे -१०
--------------------------------------------------
प्रकाशित बालकविता संग्रह- ५
------------------------------------------------
१.गोड गाेड चिकोबा-  २००३,
२.माझा तिरंगा प्यारा- २००५,
३.धांगडधिंगा माैजमस्ती- २००९,
४.आली आली परीराणी- २०१४,
५ . मस्त फिरू  रे मस्त फिरू - २०१७
*********
ई-बाल-कविता संग्रह - ५
------------------------------------
१.पियुचे स्वप्न - ई- कविता संग्रह- २०१३,
२..टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३. गोड गोड चिकोबा  -ई-बाल कविता - २०१६
४. गाेड गाेड गाणी - कविता ई- कविता संग्रह-२०१६
५.. पिकनिक - ई- बाल कविता - २०१८
--------------------------------------------------
अरुण वि.देशपांडे- पुणे.
संपर्क- मो- ९८५०१७७३४२
emel - arunvdeshpande @gmail.com

Wednesday, April 1, 2020

लेख - वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी ..!

लेख -
वाड्यातले दिवस .
गहिऱ्या  आठवणी  . !
ले- अरुण वि.देशपांडे 
-------------------------------------------------------------------------------------------------
आताचा मी जेष्ठ नागरिक झालो हे सत्य आहेच ,उद्याची सत्तरी खुणावते आहे ,या आधीच्या पिढीतल्या -  सत्तरी "वर्गातल्या 
जेष्ठा इतकी  बेहाल -अवस्था नाहीये.  त्याचे कारण नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचे राहणे, जे आता अंगात आणि मनात 
भिनले आहे, या फायद्यामुळे शरीर आणि मनाने  यंग-सिनियर्स " हे नवे  गौरव -पीस .मोर-पिसासारखे कौतुकाने मिरवता येते आहे,
अशा अनेकात मी आपण आहे हे नि:संकोचंपणे सांगेन. असो.

तर हे सगळे सांगायचे प्रयोजन आहे -ते म्हणजे ..आताच्या वर्तमानात मी फक्त शरीराने असतो पण ,
मनाने मी कायम ..माझ्या गत-दिनाच्या  वैभवात लोळत असतो ,
, तो काळ ,ते दिवस , ती माणसे ..माझ्या अवती-भवती आहेत असा सतत भास होत असतो ..
चला तर माझ्या सोबत ..आज त्या काळात पुन्हा जाऊन , एक छानशी भ्रमंती करून येऊ ....
अगदी माझ्या लहानपणीच्या दिवसापासून सुरु करू या..

१९५१ ..ऑगस्ट महिन्याची ०८ तारीख ..अस्मादिक या भूतलावर अवतीर्ण झाले , गावाचे नाव ..वसमतनगर ..माझ्या मातोश्रींच्या 
मावशीचे घर , इथेच त्यावेळी मातोश्रींचा मुक्काम होता ..वसमतनगर .. आधीच्या परभणी जिल्ह्यात असलेले ,सध्या हे गाव 
हिंगोली जिल्ह्यातले एक मोठे तालुक्याचे ठिकाण आहे.
त्यावेळच्या वसमत गावात मोठमोठाले वाडे होते , कार्य -प्रसंगाने या वाड्यात जाणे व्हायचे ,जसे मुंज आणि 
लग्न-कार्य . यातली काही नावे अंधुकशी आठवतात - मेथेकरांचा वाडा , आगलावे -वाडा , कुरुंदकर वकिलांचा वाडा , कात्नेश्वारकर -वाडा ,  
 काळ-परत्वे आता सगळेच बदलून गेले असणार .त्यात  आता तिकडे जाणे नसते त्यामुळे अपडेट नाहीयेत.

माझे मामा अंबादासराव लोहरेकार ,यांचा स्वतःचा  भव्य वाडा - लोह्रेकारांचा वाडा म्हणून प्रसिध्द होता . वाडा -संस्कृतीचा  एक लोभस 
गुण-विशेष मला सांगावासा वाटतो की ..भव्य दरवाजे असलेले हे वाडे ,सर्वांसाठी सदा उघडे असायचे .. एवढ्ध्ये मोठे दरवाजे "कधीही कुणी येवो 
मोकळ्या मनाने येणार्याला वाड्यात सामावून घेत असत .हे दरवाजे उघडतांना कधी  कुरकुरले " असे आठवत नाही .

वाड्याचे मालक देखील ..विशाल मनाचे असायचे ,अशी मोठी माणसे आणि त्यांची  मोठी मने " त्यावेळच्या पिढीतील तरुणाईने नक्कीच अनुभवली आहेत.
जो यायचा तो सगळ्या सोबत अलगद मिसळून जाणार .अशी सर्वसमावेशक संस्कार -संकृती ..दयाळू ,कनवाळू मनाच्या त्या त्या -वाडयाच्या मालकांच्या  सोबतच हळू हळू 
अस्तंगत होत गेल्याचे पाहणारे  दुर्दैवी साक्षीदार आहोत , हे वेदना माझ्या सारखी तुमच्या मनात आहे,याची कल्पना आहे मला.

आमच्या लहानपणीच्या आणि पोरसवदा वयाच्या त्या दिवसात ..उन्हाळ्याची सुट्टी ,आणि नातेवाइकाकडे होणारे लग्न-कार्य ,अशी दुहेरी धमाल असायची.
सगळ्याचं मोठ्या माणसांना समोर दिसेल त्या .पोराला , पोरीला ..काम सांगण्याची परवानगी घायची गरज कधी पडली नाही.. 
पोरांचे लाडच करवून घायचे असे नसे, 
प्रसंगी "एखादे आजोबा अगर आज्जी ..थोतरीत ठेवून द्यायचे ", अशा रागाव्ण्याने कधी कुणाच्या भावना दुखावल्याचे पाहिल्याचे आठवत नाही.

डिग्री -होल्डर होईपर्यंत .म्हणजे १९७२ पर्यंत .वसमतच्या या वाड्यात माझे सुट्टीचे दिवस एखाद्या रम्य स्वप्न-दिवसासारखे गेलेले आहेत .
आम्ही पोर-पोरी मिळून २०-२५ जण नक्कीच जमत असुत , सिनेमे पाहणे , पत्ते खेळणे रात्री गच्चीवर सतरंज्या टाकून ,आकाशातील चांदण्या मोजीत 
गाण्याच्या भेंड्या खेळणे असे चालत असे.

यात एक मोठा आणि महत्वाचा कार्यक्रम असायचा ते पाणी भरणे हा ",त्यासाठी थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन ,याला आड " पण म्हणायचे .
आडवार जाऊन उभे राहून , हातातल्या पोह्र्याने शेंदून घागरी भरणे  ,हे साधे सुधे काम नाहीये. "पाणी भरणे " म्हणजे काय ? आडावर ज्यांनी पाणी भरले आहे 
त्यांनीच हे सागावे 
 हे आड किंवा विहीर वड्या पासून जवळ नसायचे ..आडावर ..उभे राहून पोहरयाने शेंदून घागर भरून देणारे वेगळे ,आणि
आणि विहीर ते वाड्यात .असे रस्त्यात उभे रहात ,हातातल्या भरल्या घागरी या हातातून -त्या हातात  देत जायचे .आणि तीन-तीन तास ..पाण्याचे हौद, टाक्या भरणे 
असे हे काम हसत -खेळत पार पडायचे . आजच्या भाषेतले  "टीम -वर्क ? आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीच आनंदाने करीत होतो. 

या जमा झालेलेल्या  गोतावळ्यात कोण जवळचे आणि कोण लांबचे ? असे संकुचित विचार कुणाच्या मनात आलेनाहीत , हे सगळे आपलेच आहेत."
असे वाटायचे . आता विचार करतांना एक गोष्ट जाणवते की - नक्कीच 
ही जादू बहुदा ..त्यावेळच्या कर्त्या -स्त्रीच्या मनातली आणि बोटातली असावी.. 

स्वयपाक घरात राबणारे हात अनेक असायचे ..पण या सगळ्यांच्या मनात एकच भावना  असायची . खाणाऱ्याला आनंद झाला पाहिजे.
जेवणात जास्त करून भाकरीच असायची ,तिच्या सोबत ,फोडणीचे खमंग  वरण ,  कांद्याची भरडा भाजी - भाकरी , लोणचे, तक्कू , तेल-चटणी - असे खमंग कालवण 
आलटून पालटून असायचे . शिळ्या भाकरीचा कुस्करा -लोणचे घालून ..दिला जाई ज्याला "पैजणपाल ", म्हणयचे तर शिळ्या पोळीचा खमंग कुस्करा ,तर कधी 
"गुळतूप "घालून केलेला शिळ्या पोळीचा  लाडू दुर्मिळ असला तरी ..अचानकपणे बशीत दिला जात असे.  
तेल-तिखट -मेतकुट -लावून मुरमुरे .असा कच्चा चिवडा ..समोर आला कि बघता बघता फस्त.
आंबे आले की मग या दिवसात ..रस -पोळी .., भज्जी , कुरडई ,असे रसाळ भोजन .
दिल खुश  होण्यास अजून काय हवे असते हो ?

माझे बाल-पण असे अनेक वाड्यात गेलेले आहे .. मानवत , हे गाव परभणी जिल्ह्यातले एक मोठे व्यापरी -गाव म्हणून ओळखले जाते . स्टेट बँक ऑफ हैद्राब्दच्या
मानवत शाखेत  हेड- काशियार म्हणून माझ्या वडिलांनी १९५० ते १९६० असे दहा वर्ष काम केले . व्ही..एच .देशपांडे .या नवा पेक्षा ..बँकेतले "बाप्पा देशपांडे "
याच नावाने त्यांची लाईफ-टाईम सोबत केली.

मानवतच्या वास्तव्यात ली पहिली पाच-सात वर्षे मला आठवत नाहीत .. वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या त्या आठवणी अजून ही केल्या जातात म्हणून 
त्या बर्यापैकी ताज्या आहेत..
मानवतच्या या वाड्याचे मालक .काटकर नावाचा परिवार होता ..आणि या वाड्यात त्यांचे "बालाजी मंदिर होते " खूप मोठ्या प्रशाष्ट वाड्यात अनेक सख्हे -
शेजारी राहायचे . मानवत शहरात .बालाजी -भक्त खूप असावेत ..सकाळ-संध्याकाळ दर्शनाल लोक सतत येत असत . शुक्रवारी खूप गर्दी असे मंदिरात ,
आम्ही पोरं मंदिरात घुटमळत असायचो ..कारण ..शुक्रवारी बालाजीचे भक्त -लोक पेढ्याचा परसाद वाटीत असायचे , हा पेढा ..नामक गोड दोस्त तेव्हापासून 
माझा अगदी लाडका फ्रेंड आहे . येका डब्यात परसादाचे पेढे जमवून ठेवत ..असे. 
आमच्या घराला माडी होती.. वाड्याच्या  मोठ्या दरवाज्याच्या बरोबरवरच  ही खिडकी होती,तसा न तास बाहेर पाहण्यात वेळ जायचा.
 आईचे महिला मंडळ घरी आले की ,त्या खाली .आणि मी माडीवरच्या खिडकीत बसून राहायचो .किती बोलावले तरी बायकात जाऊन 
बसायचे नाही "असे ठरवलेले असे .., खिडकीत अशावेळी माझ्या सोबत माझा लाडका गोड दोस्त..पेढा , असायचा . वेळ असाच जाई.

शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..
वास्तवात वावरतांना दैस्त होते ,
आता पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.

माझे आजोळ ..मामच्या वकिली व्यवसायामुळे  जिंतूर , पण आज्जी राहायची ते गाव जिंतूर जवळचे ..वसा हे छोटेसे गाव. .
माझे मोठे मामा ..पांडुरंगराव वसेकर ..जिंतूर या गावच्या सार्वजनिक जीवनातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते .सत्तर -ऐंशीच्या  दशकात ते सतत 
बारा वर्षे  जिंतूर पालिकेचे अध्यक्ष होते.
पांडुरंगराव वसेकर - बालाजी मंदिरासमोरचा वसेकर वकिलांचा वाडा -जिंतूर ..पोस्टकार्डवरचा पत्ता मला आज ही पाठ आहे.

१९७८ -१९८० ही दोन वर्षे  मी स्टेट बँक हैदराबादच्या जिंतूर शाखेत काम केले . आजोळी -मामाच्या घरीच राहावे अशी मामांची खूप इच्छा होती.
पण नोकरी मुले, येणारे जाणरे , पाह्व्ने -रावले .आले तर " मग मोठ्या ईच्छेने मामच्या परवानगीने समोरच्या गल्लीत असलेल्या ..
यशवंतराव देशपांडे -वकील वाड्यात २ बर्षे राहिलो . मोठ्या दर्वाजात्याच्या पायर्या चढून वाड्याच्या आत आले की .. खाली तीन आणि वर तीन .
असे तीन- तीन खोल्यांचे ब्लॉक होते .. हे सर्व भाडेकरू ..बदली होणार्या नोकरीचे असतील तरच ,या वाड्यातले भाडेकरू होऊ शकायचे.

मी  दुहेरी लाभार्थी ..बदली होणारा ,त्यात ..वसेकर वकिलांचा भाचा ..आणि वाडा -मालक वकीलसाहेब .हे पण नात्याने मामाच होते ",गावातील सगळेच 
मान्यवर .मग मोठे व्यापारी , डॉक्टर , मामांचे इतर सहकारी वकील ,आणि त्यांचे परिवार सुधा ..वसेकर वकील - साहेबांच्या बहिणाबाईचे  भाऊ हे नाते 
मनापासून मानायचे . तळणीकर , चारठाणकर , बामानिकर , जिन्तुरकर या परिवारांचे मोठ मोठे वाडे .आणि या सगळ्या परिवाराचा पाहुणचार 
आजोळची घरे म्हणून मी लहानपणी घेतला , नोकरीच्या निमित्ताने होतो  तेव्हा पुहा घेतला 
जिंतूर देखील .मोठमोठ्या वाड्याचे  गाव ..कोमटी समाज .व्यापार करणारा .त्यांना "सावकार "म्हणायचे- 
कोकडवार , वत्तमवार , चीद्रवार अशा अनेक सावकारांचे मोठे मोठे वाडे जिंतूरचे वैभव आहे.
 . नेमगिरी " हे जैन -धर्मियांचे महताव्चे स्थान जिंतूरच्या अगदी जवळ आहे..

वाडे आणि वाडे अशी ज्याची ओळख आहे अशा गंगाखेड गावात ..मी १९८२ ते १९८५ .अशी तीन वर्ष होतो . संत जनाबाईचे हे गाव गोदावरीच्या 
काठी असलेले क्षेत्र आहे..इथले .बालाजी देवस्थान अतिशय प्रसिध्द आहे. तिरुपती बालाजी ..गोंविंदा  असा जयघोष ..नवरात्री मध्ये गंगाखेडला 
मी सलग तीन वर्षे केला . इथल्या देवस्थानात ..देवीचे नवरात्र आणि बालाजीचे नवरात्र असे मोठा उत्सव योग असतो.

गंगेकाठी ..अरुंद गल्ल्या .आणि मोठ्ठाले वाडे .असे दृश्य दिसते.. गोदा घाट, नदी प्रवाह ..संध्याकळी दिसणारे गंगाखेड खरोखर गंगाकाठचे 
तीर्थ -क्षेत्र वाटते. मी ज्या वकील कोलोनीत राहायचो ..त्याला .बंगला म्हण्यान्या पेक्षा .किशनराव चौधरी वकिलांचा वाडा म्हणत असतो.
एका गल्लीत प्रवेशद्वार , तर , परसदार ..मागच्या दुसर्या गल्लीत .असा हा वाडा ..याच्या  मी आजन्म ऋणाईत आहे.
संत जनाबाईच्या क्षेत्र -गंगाखेडला तर १९८४ मध्ये माझ्या लेखन प्रव्सास सुरुवात झाली 
मालक किशनराव चौधरी अतिशय यशस्वी वकील , रसिक मनाचे वकील साहेब उत्तम साहित्यिक - लेखक होते...ते पण मोठ्या आस्थेने 
आमच्या नव्या साहित्यिकात येऊन बसत ...त्यांच्या वाड्यात त्यांच्या सहवासात सलग दोन -अडीच वर्षे ..मी कथा लेखन केलेलं 
ही आठवण ..कधीच न विसरण्यासाठी आहे.

मित्र हो - वाड्या -त राहिलो ते दिवस .या दिवसात मी -कायम 
शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..
वास्तवात वावरतांना पाहिलेले आहेत ,अनुभवलेले आहेत 
आज मात्र  पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
वाड्यातले दिवस -
गहिऱ्या किती या आठवणी !
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------

Monday, December 9, 2019

कविता -सांगावा सखीचा

कविता - सांगावा सखीचा
-----------------------------------
सांगावा सखे मिळाला
जीव भेटीस आतुरला
वाटे कधी पाहीन तुला
निघालो बघ भेटायला
तू गेलीस तिकडे अन
जीव व्याकुळला इकडे
जो भेटे तो मज विचारे
असे काय झालं रे तुला
दिवस जाई कसा बसा
रात्र एकटी मोठी वाटे
भकास आकाशात या
चंद्र एक अकेला वाटे
आसुसला जीव तुझा
जाणीव मजला आहे
निघालो तुज भेटाया
अधीरता मनी ग दाटे
--------------------------------------
कविता- सांगावा सखीचा
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
--------------------------------------
(प्रकाशित-दै.संचार-सोलापूर)

कविता - कोजागिरी

कोजागिरी
--------------------------
पौर्णिमा अश्विनी
चांदण्या गगनी
चमचमती रात्री
कोजागिरीच्या
मैफिली साजऱ्या
स्वरांत गुंफल्या
मस्त चांदण्यात
कोजागिरीच्या
हळुवार वारे
उल्हासित सारे
चांदण्यात या
कोजागिरीच्या
आकाशी निरभ्र
रात्र रुपेरी असे
पूर्णचंद्र भरात
कोजागिरीचा
---------------------------------
कोजागिरी
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
------------- ------------------