Sunday, December 9, 2018

मित्र हो -हो नमस्कार - लिंक क्लिक करून आपले मत मला द्यावे ही विनंती.

Pl.vote me for -
Hello, I feel very happy to announce that I have been nominated by StoryMirror for Author of the Year Awards - 2018. Now I need your support to win the title. 
Please visit this link : https://awards.storymirror.com/marathi/vote/. Go to my name (Names have been arranged alphabetically) and click on vote button. 
You will have to login to StoryMirror to vote for me. Please Vote!

मित्र हो -हो नमस्कार - लिंक क्लिक करून आपले मत मला द्यावे ही विनंती.

स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे- पुणे.
९८५०१७७३४२ 

चंदर - बाल कादंबरी - क्रमश : भाग -२ रा .

#चंदर (बाल कुमार कादंबरी )- भाग-२ 
----------------------------------------------------------
प्रकरण -२ रे 
---------------------------
"माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे ".,  रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय ", ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
एखादा माणूस त्याला म्हणायचा -
"ए चंदर , काय करायची  रं तुला शाळा न फाळा !, जा की चुपचाप ढोरं वळायला ..!
हे असलं बोलणे ऐकून चन्दरचा चेहेरा रडवेला होऊन जायचा .
बापूच्या बरोबर शेताकडे जाणे त्याने सोडून दिले, दुसऱ्या गावाला शाळेसाठी जाणाऱ्या पोरांना तो बस थांबायची त्या फाट्या पर्यंत सोडायला जाऊ लागला .
चालता चालता एखाद्या पोराच्या दप्तर घेऊन ,त्यातले पुस्तक तो काढून घेत त्या मुलाला विचारायचा - हे चित्र कशाचे हाय ? , त्याच्या खाली काय काय लिवलाय ते सांग की मला .
चंदरची  अशी भुणभुण ऐकून पोरं कंटाळून म्हणायची ..
ए चंदर - तुला काय करायची रे शाळा ? ,शेतात जा , तिथे लई काम पडलय तुझ्यासाठी , शेणाचे गोळे करीत बसं..!
पोरांचे हे शब्द ऐकून चंदरला खूप वाईट वाटायचे . 
आपण शाळेसाठी एवढा जीव तोडतोय ; पण ते कुणाला खरे का वाटत नाही ? हा प्रश्न त्याला भंडावून सोडायचा .

"गावातील पोरांनी जनावरांना घेऊन माळावर जायचे " , हीच गोष्ट जणू साऱ्यांना कळत होती. त्याच्याशिवाय पोरांना दुसर काही पाहिजे ", हे मानायला कुणी तयारच नव्हते.

फाट्यावर जाऊन बस येई पर्यंत चंदर थांबायचा , पोरांना शाळेसाठी घेऊन जाणाऱ्या त्या गाडी कडे डोळे भरून पाहत राहायचा. या गोष्टीचा जणू नादच लागला .

आपण मात्र अजून गावातच आहोत, आपल्याला कुणी शाळेत जाऊ देत नाही , "अजून तू लहान आहेस ", असे बोलून गप्प बसवतात . ही आठवलं की चंदरला अधिकच वाईट वाटायचे.
घरात आलेल्या चंदर कडे पाहून आई त्याला म्हणाली -
अरे चंदर , तुझ्या डोळ्यात पाणी कशापायी आलं रे ?, कुणी काही बोललं का तुला ?
आईने विचारले, पण चंदर मात्र चुपचाप बसून राहिला, तेंव्हा मात्र आईला त्याच्या नाराज होण्याचं कारण कळून आलं .
इतका वेळ बाहेर गेलेला बापू घरी आला . चंदर जवळ बसत तो म्हणाला -
"चंदर काय झालं रे तुला ? , असं गप का बसलास एक्या जागी हां ?
" बापू , मी शाळेत जायाचं म्हटल्यावर, समदेजण मला हस्त्याती  पुना वर म्हणत्यात - चंदर - तू फक्त ढोरं घेऊन जा माळावर.

हे ऐकून बापूने चंदरच्या आईला म्हटले -
 गिरजे -
या येड्या पोराला कसं उमजत न्हाई; ह्याच्यासाठी शाळा नाही गावात. आणि याच्या डोक्यात तर शाळेचं खूळ पक्कं बसलय .

गिरीजा मात्र आपल्या पोराला म्हणाली -
"चंदर, कुणी कायी बी म्हणू दे,!, तू ध्यान नग देऊ देऊस कुणाकडे, गावात शाळा सुरु झाल्यावर अदुगर तुला पाठवू आम्ही शाळेत  !, मग तर झालं ?
या खुलाशावर चंदरने समाधानाने मान डोलावली. मग गप्पा करीत त्याचे जेवण झाले. अंगणात टाकलेल्या बाजेवर पडल्या बरोबर चंदर पेंगू लागला .
चंदरला झोप लागलेली पाहून गिरीजा बापूला म्हणाली -
"धनी , या पोराच्या मनाचा मला तर काही ठाव लागत नाही, जवा पाहावं तवा शाळा शाळा "करीत असतो.
आपल्यासारख्या आडाण्याच्या पोटी कशाला जल्म्ला ह्यो ?, दुसऱ्याच्या पोटी जल्माला असता तर शाळा शिकलं असतं हे पोरगं . !.

झोपी गेलेल्या चंदरच्या पाठीवरून हात फिरवीत बापू गिरिजेला सांगू लागला -
" अस काय बी बोलू नगस  ! , आपलं नशीब चांगलं असलं पाहिजे तवाच ह्यो चंदर या घरात जल्मला बग  !,
ह्या चंदरचं सगळचं लई न्यारं हाय , बाकी पोरा सारखे काही अवगुण ह्याच्यात दिसत न्हाईत  !,
हे बघ गिरिजे , आपल्या गावात जर शाळा सुरु झाली ना , तर , चंदरच्या शाळेच्या आड आपण दोघांनी बी यायचं न्हाई . !

गाढ झोपेत  असलेल्या चंदरच्या गालाचा मुका घेत गिरीजा म्हणाली -
"व्हाय धनी , तुमी जस्स म्हणाल तस्सच मी करीन. माज्या चंदरला खूप खूप शिकवू या आपण .
मग , चंदरच्याच शाळेचा विचार करीत करीत  बापू आणि गिरीजा केंव्हा तरी झोपी गेले .

सकाळी चंदर उठला , गिरीजा रोजच त्याच्या अगोदर उठायची , तिची कामं सुरु व्हायची .सडा- सारवण करून झाल्यामुळे घर कसे लक्ख दिसत होते. समोरच्या अंगणातली झाडझूड केली होती .

कोपऱ्या -कोपऱ्यात छान फुल झाडी लावलेली होती. त्यातले एक टप्पोर -लाल गुलाबाचे झाड स्वतहा चंदर ने लावलेले होते, ह्या झाडाला तो आठवणीनी पाणी द्यायचा .
दात घासीत घाशीत चंदर गुलाबाच्या झाडाजवळ आला , लाल गुलाबाचे फुल दाखवीत तो म्हणाला -
आये , गुलाब म्हणजे साऱ्या फुलांचा राजा असतो " ! 
गिरीजा त्याचे हे सांगणे कौतुकाने ऐकत होती.

शेताकडे जाण्यासाठी बापू निघालाच होता, एव्हढ्यात वाड्यावरचा गडी , घरात येत म्हणाला -
बापू, मालकांचा निरोप हाय तुज्यासाठी , अर्जंट निघायचं बघ आणि हो , तुज्यासंग चंदरला बी घेऊन ये ", असे मालकांनी सांगितलाय .'!

हे वाक्य  चंदर च्या कानात शिरले तसा तो पटकन बाहेर आला अन म्हणाला ,
बापू, थांब जरा , अंघुळ करून मी बी तुज्यासंग आलोच .
बापू आणि चंदर वाड्यावर आले. बैठकी समोर उभे राहिले.रावसाहेब आधीच येऊन बसलेले होते , त्यांच्या शेजारी बसलेला माणूस मात्र ओळखीचा नव्हता .
"नवे गुरुजी तर आले नसतील हे ? ",
कल्पनेने चंदरच्या छातीत धड धड होणे सुरु झाले होते .

बापूला बसण्याची खुण करीत रावसाहेब म्हणाले -,
बापू , हे आहेत आपले नवे गुरुजी , आता त्यांची व्यवस्था पहाण्याच काम तुझे असणार आहे . सगळं ठाकठीक आहे की नाही हे तू रोजच पहायचं आहे  !.

 नव्या गुरुजीकडे पाहतांना चंदर मनात म्हणत होता -
"हे गुरुजी तर लई लहान दिसतंय की , ह्यांच्या हातून शाळा कशी सुरु होईल बापा ?

त्याचवेळी चंदर कडे बोट दाखवीत रावसाहेबमालक  गुरुजींना सांगू लागले -

"गुरुजी - या गावातला  तयार असलेला तुमचा एकमेव विद्यार्थी म्हणजे आमचा हा चंदर.
तुमची शाळा कधीही सुरु करा , त्या अगोदर हा चंदर विद्यार्थी म्हणून तुमची कवाची
वाट पाहतो आहे.

रावसाहेब अशी ओळख करून देत असतांना - चंदरने नव्या गुरुजींना वाकून नमस्कार केला .
ते पाहून रावसाहेबांना त्याचे मोठे कौतुक वाटले, ते म्हणाले -
वा रे ,शाबास चंदर - शाळेत न जाता , कुठं शिकला रे तू एवढ ?
काही न बोलता चंदर चुपचाप कोपऱ्यात उभा होता .

रावसाहेब बापूला सांगू लागले -
"बापू , आपल्या पंचायतीच्या बाजूच्या दोन खोल्या रिकाम्या करून घ्यायच्या आणि गुरुजींना द्यायच्या , त्यांना काही समान -सुमान लागले तर ते वाड्यावर येऊन घेऊन जायचं .
समजल का सगळं ?

रावसाहेबांनी सांगितलेलं सर्व समजलं -म्हणत बापूने मान डोलावली आणि गुरुजींना म्हणाला -
चला गुरुजी , तुमच्या घराकडे जाऊ या, आता तुमच्यासाठी सामान लावायला पाहिजे.",

गुरुजी आणि बापू ,त्यांच्या मागेमागे चंदर चालत होता . त्याच्या चेहेऱ्यावर आज एक वेगळाच आनंद दिसत होता . देवाने त्याची प्रार्थना ऐकूनच गुरुजींना पाठवल असाव .
आता शाळा सुरु होणार हे नक्की , पण, कवा होतीय कुणास ठाऊक ?
चंदरची उत्सुकता जास्तच वाढत चालली होती .
सकाळच्या वेळी गावात चाल-पहल दिसत होती. शेतावर जाणाऱ्या गडी- माणसांची लगबग सुरु झाली होती . याच बरोबरीला - घरासमोरच्या ओट्यावर बसून सकाळच्या उन्हात चहाच्या बरोबर वायफळ गप्पा करीत बसलेली मंडळी मोठ्या फुरसती मध्ये होती
 .
एखाद्या घरातून आलेला न्याहरीच्या भाकरी भाजण्याचा खरपूस वास नाकात शिरून गुदगुल्या करीत होता त्या सोबत हिरव्या मिरच्याचा ठेचा ",त्याचा खमंग वास तोंडाला पाणी सोडीत होता .
दारासमोर उभ्या असलेल्या रिकाम्या बैल-गाडीत बसून बारकी-बारकी पोरं चिपाड -काड्या जमवून गाडी-गाडीचा खेळ खेळत  होती. आणि गाडीच्या जोताला बांधून ठेवलेली बैल जोडी  समोर पडलेल्या चिपाडाचा रवंथ करून करून कंटाळून गेली होती .आता त्यांची शेताकडे जाण्याची वेळ झालेली होती .

अशा सकाळच्या वेळी  रस्त्याने जाणऱ्या बापू आणि गुरुजीकडे पहाणारे कुजबुजू लागले -
" नवा मास्तर आलेला दिसतोय की..
काय उजेड पाडणार ते दिसेल की ..
पर मी म्हणतो- शाळा पाहिजेच कशा पायी ?
पोरं शाळात गेल्यावर कामं कुणी करायची ?
असे एक ना दोन आवाज -तिथून जाणाऱ्या गुरुजींच्या ,बापूच्या आणि चंदरच्या कानावर पडत होते .

हे ऐकून - या गावात शाळा सुरु करणे " , हे आपण समजलो तेव्हढी सोपी गोष्ट नाहीये " याचा अंदाज पहिल्याच दिवशी येऊ लागला .
गुरुजी मनाशी विचार करू लागले - काहीही होवो , शाळा तर सुरु करायचीच .
त्यांनी मागे वळून पाहिले ..त्यांचा एकमेव विद्यार्थी .चंदर -
एखाद्या कोकरा सारखा उड्या मारीत त्यांच्या मागे मागे येत होता ...!
------------------------------------------------------------------------------------
क्रमश " पुढे सुरु ....
चंदर- बालकुमार कादंबरी(१९९७)
ले-  अरुण वि.देशपांडे
---------------------------------------------------- -----

Wednesday, December 5, 2018

क्रमश: चंदर (बाल कुमार कादंबरी )- प्रकरण - १ ले .

क्रमश : -  चंदर- (बाल कुमार कादंबरी )
प्रकरण - १ ले 
---------------------------------
अंगणात बसलेला चंदर काड्या जमवून त्याची बैल-गाडी करीत होता . त्याचे वडील- बापू वाड्याकडे  निघाले आहेत हे पाहून आपला खेळ थांबवीत तो म्हणाला..
" बापू, मी येतो की तुज्या संग वाड्यात , एकट्याला निस्त बसून लई कंटाळा येतो बघ...!
चंदरच्या रडवेल्या चेहेऱ्याकडे पाहून बापू म्हणाला-
बर बापा, चल , पण तिथे चुपचाप बसून रहायचं .
रस्त्याने जातांना शाळेकडे जाणाऱ्या पोरांना पाहून चंदर म्हणाला -,
बापू , मी मोठा झालो , आता मला शाळात पाठिव की , मी घरी थांबणार नाही ,सांगून ठेवतो तुला !
चंदरची समजूत घालीत बापू म्हणाला ,
आर चंदर , तू तर लहान हायीस  रं, आपल्या गावात शाळा तरी आहे का ? ही पोरं पायी-पायी चालत चालत दुसऱ्या गावातल्या शाळेत जातात , हे ठावं नाही का तुला ?

मग, काय झालं ? मी बी जातो की त्यांच्या संग, चंदरचा उत्साह कमी होत नव्हता .
बारक्या चंदरकडे पाहून बापू मनाशी म्हणत होता,- 
शिकन्याचं एवढं वेड या पोराच्या मनात कसं काय आहे ? कळतच नाही ! 
शाळेत जातो असंच म्हणत रहाताय !
आपल्या घरात तर समदा अडाण्याचा बाजार, त्यात ह्यो ज्ञानेश्वर आला म्हणायचं की काय ? शेतावर राबणाऱ्या आपल्या सारख्या गडी -माणसाने पोराला शिकवायचं कुठून ?
त्यासाठी लागणारा पै-पैसा कसा येणार आपल्या जवळ ?
आपले मालक जे धान्यधुन्य देतात त्यावर आपलं घर चालतंय, तवा या चंदर ला शिकवायचं ? कसं जमायचं हे ?

देवा , माज्या पोराच्या मनात शिकायचं आहे, तवा तूच एक हायस आमच्या सारख्या गरिबांचा वाली.
विचारांच्या नादात बापू वाड्यासमोर आला . आतमध्ये जाऊन बैठकीत बसणं बरं दिसलं नसतं . बिनकामाचं कुणी येऊन बसलेलं मालकांना आवडतं नसायचं .
बापूने चंदरच्या हाताला धरून आत नेले, बैठकीत भरपूर माणसे बसलेली दिसत होती . एका कोपऱ्यात चंदर आणि बापू उभे राहिले .

वाड्यावरची बैठक म्हणजे सगळ्या गावासाठीची निवाड्याची जागा. एक वेळ चावडीवरच्या बैठकीत काही समेट होणार नाही ,पण मालकांच्या बैठकीत मात्र सगळा तिढा चटकन सुटायचा. 
आजही काही विशेष होतं म्हणून बैठक भरून गेलेली दिसत होती. 
बसलेल्यांना उद्देशून रावसाहेब म्हणू लागले -
"मंडळी , एका चांगल्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तुम्हाला इथं बोलावून घेतलय. "आपल्या गावात शाळा नाही ", ही बाब माझ्या मनाला डाचत आहे.
आपल्या गावच्या पोरांना दुसऱ्या गावाला पायी चालत जावे लागते, पोरांना किती त्रास होतो आहे, हे सर्वांना माहितच आहे.

हे सर्व लक्षात घेऊन पुढील वर्षापासून आपल्या गावात शाळा सुरु व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे . त्यासाठी लागणारी सर्व ती मदत गावकऱ्यांनी करावी अशी माझी विनंती आहे.

बैठीकीत असलेल्या चार शहाण्या-सुरत्या माणसांनी रावसाहेबांची ही कल्पना लगेच उचलून धरली. गावकऱ्यांच्या मनात आल्यावर गावाचे काम कसे आडून राहणार ?

शाळेसाठी लागेल ती मदत करण्याचे सर्वांनी मोठ्या आनंदाने कबुल केले . सारा गावं आता आपल्या पाठीशी असणार हे कळून आल्यामुळे रावसाहेबांना फार समाधान वाटत होते.

जमलेली मंडळी निघून गेल्यावर ,
समोर उभ्या असलेल्या बापूला ते म्हणाले , बापू  "उद्या गावातील प्रत्येक घरात जायचं ,आणि शाळेबद्दल सांगायचं, आपापल्या पोरांना शाळेत पाठवलं पाहिजे हे देखील सांगायचे ", 
रावसाहेबांचा निरोप घेऊन बापू आणि चंदर घराकडे निघाले .. चंदरच्या चेहेऱ्यावर आनंद नाचत होता .. तो म्हणाला -,
बापू , आता आपल्या गावातच शाळा सुरु होणार की , तुला विचारायची बी गरज न्हाई , मी माझा आपला शाळेत जाईन "..!

चंदरच्या पाठीवर हात ठेवीत बापू म्हणाला ,-
चंदर -तू लई खुशीत हायस , पर, आपल्या गावातील मंडळींचं तुला तुला ठावं न्हाई , आरं, आपल्या गावात शाळा येईल हे खरं , पर
त्यात बसाया पोरं तर आली पायजेत की न्हाई ?
का बरं ? कशापायी येणार न्हाईत पोरं ?
चंदरने घाबराघुबरा होऊन बापूला विचारले .
हे बघ - चंदर - आरं, शेतात कामं कराया पोरं हाताशी लागतात की , अन गायी, म्हशी , शेळ्या -मेंढरे चरायला कुणी रं जायचं माळावर ?
पोरं जर शाळत जाऊन बसली तर कामं कोण करणार ? आई-बापाचा समदा खोळम्बाच हुईल की !.
बापूचा खुलासा ऐकल्यावर चंदर म्हणाला , बापू ,तू तर आताच समद्या गोष्टींचा नन्नाचा पाढा लावला की रं. ते काही न्हाई ,
आता मालकांनी सांगितल्या प्रमानं आपण साऱ्यांच्या घरी जाऊन सांगू, मग ठरीव की सगळं .
बरं बापा, होऊ दे तुज्या मनासारखं ,
चंदरची समजूत घालीत बापू आपल्या घरात शिरला .

भल्या पहाटेच चंदरची झोप झाली होती .काल रात्रभर त्याच्या सपनात शाळाच येत होती , तवा झोप
कशी लागणार ?
चंदर, आईला म्हणाला -
आये , न्याहारी दे अदुगर,
आज लई काम हाय माज्या मागं ,
चंदरच्या गडबडीकडे कौतुकाने पहात आई त्याला म्हणाली ..
आग बाई - अस कोनचं काम लागलंय रे बाबा तुज्यामाग ? सांग तरी मला ,
दुध-भाकरीचा कुस्करा खातखात चंदर आईला सांगू लागला -
आये , काल रावसाहेबांनी मला आणि आपल्या बापूला एक मोठ्ठं काम सांगितलय , गावातल्या समद्यांच्या घरी जाऊन मालकांचा निरोप द्यायचा की , आपल्या गावातच आता शाळा सुरु होणार आहे , तरी आपापल्या पोरांना शाळेत पाठवा ! ,
न्याहरी आटोपून लगेच बापू आणि चंदर रावसाहेबांनी सांगितलेल्या कामगिरीवर निघाले . सकाळच्या वेळी घरातून प्रत्येकजण दिवसभराच्या कामाला लागण्याच्या तयारीत होते. कुणाला शेताकडे जाण्याची घाई होती तर कुणाला काही तरी कामासाठी म्हणून मोठ्या शहरात जायचं होत .
प्रत्येक घरात जाऊन बापू त्यांना रावसाहेब मालकांचा निरोप सांगत होता . शाळेची बातमी एकूण सर्वांना आनंद होत होता. पण आपल्या पोराला शाळेत पाठवतो " हे मात्र कुणीच कबुल करीत नव्हते .
"अदुगर शाळा सुरु तर होऊ द्या, मग ठरवू की , आमच्या पोराला शाळात पाठवायचं की नाही . हा असा एकच निरोप सगळ्या घरातून मिळत होता .
सकाळी मोठ्या आनंदाने घराबाहेर पडलेल्या चंदरचा चेहेरा हे सगळ एकूण आता पार उतरून गेला होता . त्याच्या बापूचा अंदाजच शेवटी खरा ठरला होता . 
"गावातल्या मंडळीच काही खरं नाही चंदर , शाळेच नुस्त बोलतील, पण करणार काहीच नाही."!

गावात येणारी शाळा यामुळे जर आलीच नाही तर ?
आपल्याला मग शाळेत जायला मिळणार नाही." , 
या कल्पनेने चंदरच्या डोळ्यात पाणी जमा झालयं ", हे बापूला दिसत होतं .

सगळ्या गावात सांगून झाल्यावर , बापू आणि चंदर रावसाहेबांच्या वाड्यावर आले.  आत आल्यावर , त्यांनी विचारले -
काय बापू , विचारलेस का रे सगळ्यांना ? सगळीजण खुश झाली असतील नाही ?
काय उत्तर द्यावे ? 
हाच प्रश्न बापूला पडला होता , खाली मान घालून तो चुपचाप उभा राहिला . मग , त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या चंदरला त्यांनी विचारले ,
चंदर , तू होतास ना रे बापू बरोबर , तूच सांग , काय म्हणाले गावातले लोक ?
मालक - तुमचा निरोप आम्ही समद्यांना सांगितला . शाळा सुरु होणार म्हणून सारे खुश हायेत , 
पोरांना शाळेत पाठवायचं , ते नंतर ठरवू , असे म्हणले सारेजण .
हे सारे  ऐकून रावसाहेब गंभीर झाले . 

"आपल्या प्रयत्नांना सहजासहजी यश मिळणार नाहीये , याची त्यांना कल्पना आली.
मग  ते म्हणाले -
चंदर , तू तरी येणार आहेस की नाही आपल्या शाळेत ?
बघ , तुझ्या एकट्यासाठी आपण आपल्या गावात शाळा सुरु करू या .
रावसाहेबांचे हे शब्द ऐकून चंदरने आनंदाने जागेवरच उडी मारली . "
आपल्या एकट्यासाठी शाळा ? मग तर मजाच मज्जा , मोठ्या खुशीत तो म्हणाला ,
व्हय -व्हय .. मी तर कवा पासून बापूला म्हणतोय की , मला शाळात पाठव, पर ह्यो बापूच न्हाई म्हणतो , मनातलं  मोकळेपणाने सांगून टाकल्यावर चंदरला बरे वाटले .

रावसाहेब म्हणाले - बापू , आता तू मात्र हयगय करायची नाहीस. चंदरला शाळेत पाठवायचं.
 हे ऐकतांना आपल्या बापुची मान नंदी --  बैलासारखी बुगूबूगु डोलत आहे हे पाहून चंदरला खुसूखुसू हसू येत होतं.

मालक म्हणाले- बापू , माझा निरोप आल्यावर वाड्यावर यायचं आणि शाळेच्या तयारीला लागायचं , समजलं ? 
" हो मालक येतो की- ",असे म्हणत , बापू आणि चंदर घराकडे निघाले .

आता चंदर मोठ्या खुशीत होता , त्याच्या डोळ्यासमोर त्याची शाळा दिसत होती , शिकवणारे गुरुजी त्याला दिसत होते. 

चंदर मनाशी प्रार्थना करू लागला..

देवा, माज्या गावात शाळा लवकर येऊ दे ...!
..क्रमशा : पुढे सुरु ...
-----------------------------------------------
चंदर -बालकुमार कादंबरी (१९९७)
-ले- अरुण वि.देशपांडे
-------------------------------------------------------- 

Sunday, November 25, 2018

काहूर दिवाळी अंक-२०१८ -ललित लेख - माझे शाळेचे दिवस.


काहूर दिवाळी अंक-२०१८ -
धन्यवाद -संपादक -मित्र - श्री.शंकर इंगळे - गंगाखेड.
------------------------------------------------------------------------------
ललित लेख -
माझे शाळेचे दिवस.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------

माझे शालेय जीवन  अर्थात विद्यार्थीदशेचा कालखंड ..माझ्या आजच्या आठवणींच्या आधारे सांगायचा आहे हे तसे सोपे मुळीच नाही .  माझ्या आताच्या  शारीरिक आणि मानसिक परिस्थितीचा आलेख तसा काळजीचा नाहीये  .   मी जेष्ठ नागरिकांच्या व्याखेत  सहजतेने बसत असल्या मुळे. वयाच्या ६८ व्या वर्षी शाळेचे दिवस आठवणे .मजकूर दृष्ट्या आठवणे , आणि  ते मांडणे कठीण असले तरी..भावनिक दृष्ट्या  हे खूप  आनंदाचे आहे. या सर्व आठवणी  सुखद अशा बालपणच्या दिवसातल्या आहेत 

माझे वडील स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या बँकेत नोकरीस होते . या काळात मराठवाडा विभाग महारष्ट्रात नव्हता तर हैद्राबाद संस्थांच्या निजामाच्या राजवटीचा एक महत्वाचा भाग होता , अशा  मोगलाई -मराठवाड्यात उर्दू अंमल असल्यामुळे   व्यवहार आणि बोलण्यात उर्दू चा खूप मोठा प्रभाव होता तशी बोली भाषा मराठी होती . १९५० ते १९६० अशी १० वर्ष ते परभणी जिल्ह्यातील -मानवत या गावी होते ,या मानवत गावात माझे शालेय जीवन आरंभ झाले  ते ..१९५६ च्या आसपास ... या वर्षी  " पहिली -जमात मे  मेरा  " दाखिला हो गया ,    " कौनसी  जमात मे  दालने का बच्चे को  ? इतकीच चौकशी केली जात असे , कोणत्या शाळेत शिकतो ? या ऐवजी .कौनसा इस्कुल  ? असे विचारले जाई .
 

मोठ्या श्रीमंत घरातील वा साधारण परिस्थिती असलेल्या घरातील मुले असो ..वा नोकरदार मंडळीची मुल असो या सर्वांची शाळा एकच ..सरकारी इस्कुल .किंवा मदरसा , या शिवाय लहान वयात घोकम - पट्टी "उपायाने उजळणी आणि पाढे पक्के करून  घेणारी  "खानगी शाळा-(खासगी ) , असत या शाळेतील पंतोजी - मास्तर  रुद्रावतार धारण करूनच ,छडी.किंवा फोक " हातात उगारून भेदरलेल्या मुलांच्या कडून .पाढे म्हणवून घेत ..उजळणी करून घेत ..तोंडाने पावकी -निमकी  - अडीचकी  " न दमता म्हणवून घेण्याची पद्धत  छडी-मास्तरांची अत्यंत आवडीचे असे .या मास्तरांनी छडी ने आमच्या  हातावर उमटलेले वळ, पंतोजी मास्तरांनी मुस्काडीत मारल्याची गालावरची पांच बोटाची खुण " घरी आल्यावार आमच्या पालकांना दाखवण्याची पद्धत नव्हती .उलट त्याकाळच्या तमाम तीर्थरूपांचा आमच्या मास्तरांच्या टीचिंग विथ छडी " या  मेथडला " पूर्ण पाठींबा असे.

छोटेसे मानवत गाव मोठे प्रसिध्द गाव होते ..इथली कापड दुकाने लग्नाचा बस्त्त्यासाठी " खूप प्रसिध्द होती , इथे कापूस -बाजार पण खूपच मोठा होता , त्यामुळेच वडिलांची हैद्राबाद बँक महत्वाची होती , बँकेच्या आजूबाजूला व्यापाऱ्यांची दुकानं होती ..समोर मोकळ्या जागेत ..कापसाच्या गाठी पडलेल्या आशयाच्या ..या कापसाच्या आजूबाजूला आम्ही पोरं ..लपंडाव खेळायचो, मोकळ्या केलेल्या कापसाच्या मोकळ्या गाठीवर लोळी- लोळी " खेळायचो . क्याशियारच्या पोराला .सगळीकडे फिरण्याची ,खेळण्याची परमिशन असायची ..कारण बाजारपेठेतील सगळ्या व्यापार्यांचे बँकेशी रोजच काम असायचे .त्यांचे मुनीम लोक मला आणि स्टाफ च्या पोरांना ओळखत  या ओळखीमुळे कॉटन-मार्केट मध्ये संध्यकाळी आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही धिंगाणा ,आरडाओरडा केला तरी कुणी रागवत नसत. मेहनती हमाल-लोक पाहून हसत .खेळा रे खेळा पोरांनो .असेच त्यांच्या हसण्यातून आम्हाला कळायचे 

आमचे पारिवारिक डॉक्टर स्नेही -कुटुंब  होते ..त्यांचा घरी गेलो की त्यांच्या मुलांच्या सोबत आमच्या दवाखाना -दवाखाना हा खेळ खेळायचो .त्यंच्याच दवाखान्यातील औषधी बाटल्या , इंजेक्शनच्या सिरींज , गोड गोळ्या , सिरप या वस्तू असत , आणि आमच्या घरी ही मंडळी आली की आम्ही बँक बँक हा खेळ खेळायचो ..त्या वेळी काही छोटी नाणी ..ढब्बू पैसा -एक पैसा , दोन पैसे ,चवन्नी बंद झाली होती , ही चिल्लर नाणी मिश्र धातूची होती , वापरातून बाद झाल्यामुळे यांची किमत फक्त शून्य ",  मग ही चिल्लर-नाणी ..खोटे पैसे .आमच्या बँक बँक खेळात .खरे पैसे होऊन आमच्या खेळात गम्मत आणीत.
या पैश्यांनी एक मोठा धडा शिकवलाय ..वापरात असाल , उपयोगाचे असाल तो पर्यंतच तुमची किंमत ..निरोपयोगी झालात ..तर फक्त ..शून्य ..अस्तित्व .
या प्राथमिक शाळेतला एक वर्गमित्र ..पुढे अम्बजोगाइला १९६८  साली कॉलेजमध्ये  क्लासमेट म्हणून पुन्हा भेटला .. अलीकडची त्याची भेट सुमारे २५  वर्षापूर्वी झाली . असो.

१९६० साली मानवत जि.परभणी या गावाहून वडिलांची बदली औरंगाबाद ला झाली .आणि लगेच पाच-सहा महिन्यात वैजापूर या तालुक्याच्या गावाला बदली झाली .. १९६३-६४  सालापर्यंत आम्हे वैजापूर या गावी होतो.
. वैजापूर ५४ वर्षापूर्वी सुद्धा एक मोठे तालुका गाव होते , औरंग्बाद -मनमाड रेल्वे रूट वर "रोटेगाव " हे स्टेशन वैजापूर गावासाठीचे रेल्वे स्टेशन . पाचवी ती आठवी " हे माध्यमिक शिक्षण या गावात झाले , पाचवी ते आठवी असे शिक्षण वैजापूरच्या सरकारी शाळेत झाले ..जडण-घडण होण्याच्या या काळात ..अनेक भाडेकरू असलेल्या चाळीत राहतांना अनेक व्यक्ती आणि कुटुंब सहवास घडला ..सामुहिक सहवासाचे बहुमोल संस्कार याच काळात झाले ..एकट्याने रहाणे " म्हणजे मोठीच भयानक शिक्षा " ,हे मनावर पक्के ठसले . 

वैजापूर ला भरणारा नौ -गज बाबा का उर्स " खूप फेमस होता , या निमित्ताने महिना -पंधरा दिवस या  उरूस" परिसरात भटकंती करण्यात खूप मजा येत असे .उरूस सुरु होण्याच्या आदलेदिवशी शहरातून मिरवणूक निघत असे..हा "उरुस का संदल " डोळ्याचे पारणे फेडणारा असे. या मिरवणुकी सोबत शहरातील हबीब ब्यांड  आणि युसुफ चौस ब्यांड ..यांची जुगलबंदी चालायची .एकेका चौकात घंटा-घंटा फिल्मी गाणी अशी काही वाजवत की रेदिओ वरचे गाणे जसेच्या तसे ओठावर  यायचे..
 उरुसाच्या काळात दिवसा दोन नामांकित बिडी कंपन्याच्या मोठ्या सजवलेल्या गाड्या गावभर फिरायच्या .. "कोंबडा छाप बिडीच्या ..ट्रक वर काचेच्या मोठ्या पेटी मध्ये खराखुरा तुर्रेबाज कोंबडा दिसायचा , आणि तो गेला की दुसरी गाडी .."उंट छाप बिडी" असे. " या गाडी समोर खराखुरा उंट .हळू हळू चालत असे. हे  बिडी- जाहिरात वाले ट्रक मधून १० बिड्या असलेले छोटी बंडले उधळीत जात, ट्रक मागे पळत असलेली पब्लिक फुकातल्या बिड्या जमा करीत , वडिलांच्या बँकेतील एक रखवालदार पक्का  बिडी -फुक्या "होत्या , उरूस दिवसात .. काही मुलांच्या सोबत .मी पण बिडी -बंडले अलगद झेलीत ,जमा करायचो .आणि बँकेत जाऊन बिडी -फुक्या वॉचमन ला देऊन टाकायचो . माझे हे सेवा-कार्य ( ?) बिंग फुटले नाही हे नशीब ..नाही तर या उपद्व्यापाब्द्द्ल .तीर्थरूपांनी आमची महापूजा नक्कीच केली असती. 

कोर्ट , तहसील ,पंचायत समिती, मोठा दवाखाना .. यांच्या भोवताली .विशेषता मागच्या बाजूने फिरून ..माचीस डब्या , सिगारेटची रिकामी पाकिटे .गोळा करण्याचा त्यावेळचा पोरांचा आवडता छंद -उद्योग मी पण केला ..पण या सरकारी ओफिसातील लोकांनी मला हा उद्योग करतांना पाहिले .आणि थेट वडिलांना माझ्या उप्द्व्यापाची कहाणी तिखट-मीठ लावून सांगितली , याचा परिणाम ..वडिलांनी या काकालोकांना सरळ परवानगी दिली की. हा पुन्हा तिकडे दिसला तर ..दोन मुस्काडात ठेवून द्या ,. आपोआपच हे क्षेत्र वर्ज्य झाले.
पतंगाच्या दिवसात ..भारी पतंग , भारी मांजा , मांजा करण्यासाठी सिक्रेट फार्मुला " हे कारनामे .मारामारी पर्यंत होणे अटळ होते .ते त्याच पद्धतीने झाले.काटलेल्या  पतंगाचा मांजा गच्चीवर जाऊन लुटूने - .हे कोणत्या ही खजाना -लुटी इतकेच थरारक होते . मांजा करणे .म्हणजे हात आणि बोटे रक्ताळून जायचे .पण मांजा बेस्ट झाल्याच्या खुशीत त्याचे काही वाटायचे नाही.

या गावातील शालेय जीवनात  एक वाचक म्हणून घडलो , शाळेचे वाचनालय , नगरपालिकेचे सार्वजनिक वाचनालय ..ही दोन ठिकाणे माझ्या अतिशय आवडीची होती.वैजापूरचे हे वाचन संस्कार माझ्यातील आजच्या साहित्यिक होण्याची सुरुवात होती  . पाचवी की सहावी या वर्गात असतांना मराठीत एक धडा होता - गोकुळची साक्ष ", याचे शाळेत नाटक सदर झाले .. या नाटकात मी 'सरकारी वकील "झालो होतो , नाटक आणि भूमिका " हे फक्त या निमित्ताने अनुभवले .

आठवी पास झालो आणि वडिलांची बदली .वैजापूरहून आमच्या मूळ गावी - परभणीला झाली .इथल्या मोठ्या नूतन विद्या मंदिर मध्ये नववी च्या वर्गात मी प्रवेश घेतला , हे एकच वर्ष परभणीला शिकलो ..या वर्षात ..शाळेत  झालेल्या प्रत्येक वकृत्व स्पर्धेत मी भाग घेतला .. आपले भाषण इतरांपेक्षा नेहमीच वेगळे पाहिजे ..हा अभ्यास मी या शाळेत शिकलो .

नववी पास झालो आणि वडिलांना प्रमोशन मिळाले - ते  बँक ऑफिसर झाले .आणि पहिली पोस्टिंग हैद्राबाद बँकेच्या हेड ऑफिसला .चक्क हैद्राबादला झाली .ती १९६५ साली .
लहान -लहान गावात वाढलेलो आम्ही एकदम खूप मोठ्या सिटी मध्ये आलो . बदली होऊन आल्यामुळे .हैदराबादच्या  विवेक वर्धिनी "या नामवंत शाळेत आम्हाला प्रवेश मिळणे शक्य नव्हते ,
मग .पाच मिडीयम असलेल्या . गवरमेंट हायस्कूल (boys) काचीगुडा  या शाळेत इयत्ता दहावी (ड ) या वर्गात मी बसलो .आणि १९६७-६८ मध्ये याच शाळेतून HSC पास होऊन बाहेर पडलो

माझे त्यावेळेसच्या वर्गातील ८ मित्र ,आज पुण्यात वास्तव्यास आहोत , २००६ -२००७ मध्ये एका मित्राच्या चौकस-उपद्व्यापा मुले आमचा एकमेकाला शोध लागला ,आणि आम्ही आता २-३- महिन्याला आठवणीने भेटतो. या वर्षीच्या जानेवारी मध्ये आम्ही इथले वर्गमित्र मिळून हैद्राबाद ला गेलो तिथे अजून १०-१५ मित्र  "  शोधा म्हणजे सापडेल " ..स्कीम मुळे सापडले . आम्ही सर्व मित्रांनी शाळेच्या आठवणी जागवल्या .आणि मैत्रीचा सुवर्ण -महोत्सव तिथे चार दिवस  साजरा केला .यात एक दिवस आम्ही आमच्या त्यावेळच्या दोन गुरूंना शोधून काढले ,त्यांच्या घरी जाऊन या गुरूंचे .खरोखर ..गुरु-पूजन केले ", नव्वदीच्या जवळ असलेल्या या गुरूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियाच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू पाहून आम्हाला पण आमचे अश्रू अनावर  झाले होते , या गुरुजना समोर त्यांचे माजी विद्यार्थी जे सगळे ..६५ प्लस वयोगटातील , मोठ्या आदरयुक्त भावाने हात  जोडून उभे होते . आम्ही मित्रांनी केलेला हा उपद्व्याप इतका आनंददायक असेल ",कल्पना केली नव्हती..

पहिली ते .बी.काम होई पर्यंतच्या माझ्या पूर्ण शिक्षण काळात .माझे वडील शाळेत माझ्या शाळेत  किंवा कोलेज मध्ये आले आणि त्यांनी सरांची भेट घेतली ..असे १९५६ ते १९७२ .म्हणजे १६ वर्षात कुठे ही कधी घडले नाही .  

मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि  घट्ट मैत्री "असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले . 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ललित लेख-
माझे शाळेचे दिवस 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------

Tuesday, November 20, 2018

चंमत ग- दिवाळी-अंक २०१८: दिवाळीची मज्जा 

चंमत ग- दिवाळी-अंक २०१८: दिवाळीची मज्जा : आवडे मजला सण दिवाळीचा  दूर करी अंधारा, सण प्रकाशाचा .... दिवाळीची मज्जा अशीपण करू  अशा मित्रांच्या घरी आपण जाऊ   नाही होत ज्या...

Wednesday, November 14, 2018


कविता -गोडुली बाहुली.
----------------------------
अंगणी ती चिमुकली
हसरी गोडुली बाहुली
पैंजण छुम छुम चाले
अंगण रिते रिकामे ते
मग बोबडे बोलू लागे....
सावलीचे झाड सोबती
बोट तिचे धरुनी चाले
मृदुल स्पर्श जादू होता
क्षणात गलबलून जाते....
-------------------------------
कविता- गोडुली बाहुली
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
--------------------------------

Saturday, September 8, 2018

तरुण भारत -मुंबई .दि.८-९-२०१८ - ललित लेख - निसर्गाचे लोभस रूपं

तरुण भारत मुंबई- ८-९-२०१८ अंकात प्रकाशित .
-------------------------------------------------------------
ललित लेख-
लोभस रूप निसर्गाचे 
------------------------------------
रसिक हो - 
आपल्या भावविश्वात अनेक गोष्टींना खूप महत्वाचे स्थान असते , व्यक्ती, घटना ,प्रसंग अशा स्वरूपात या गोष्टी आपल्या मनात असतात. निसर्ग आणि माणूस यांचे नाते अतिशय आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे आहे . ऋतू -चक्र आणि आपले दिनक्रम यांची सुरेख अशी सांगड आपल्या संकृती आणि परंपरेमध्ये आहे  म्हणूनच आपण निसर्गाशी आणि निसर्ग आपल्याशी एकरूप झालेला आहे .. उन्हाळा सरता -पावसाळ्याची चाहूल लागते ,  आजकालचा तीव्रतम असणारा उन्हाळा आपण सारे अनुभवतो आहोत असा त्रस्त उन्हाळा कधी जातो  आणि मनाला गारवा देणारा , ओलावा देणारा ..वर्षा ऋतू कधी येतो याची वाट पहाण्यात आपण सारेच जणू "चातक पक्षी होऊन जातो.
आजकाल हा पाउस सुद्धा लहरी झालाय , वेळेवर येणारा हा पाउस-सखा ..अचानक दडी मारून बसतो ,  सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवतो ", एक मात्र खरे की , दीर्घ प्रतीक्षे नंतर आलेला पाउस ..धरती मातेला तृप्त करतो . हिवाई बहरू लागते ..जणू धरणी चे रूप पालटून जाते . श्रावणाचे आगमन होताच ..निसर्गाचे लोभस रुपडे ..मनात साठवण्यासाठी आपण बाहेर पडतो .
भर पावसात ..निसर्ग पाहण्याचा आनंद काही औरच ..सफर म्हणा, सहल म्हणा ..रानोमाळ हिंडून हे सर्व पाहण्याची असोशी प्रत्येकाच्या मनात असते . कुठे ही ,कधी ही जा ..डोळ्याला सुखावणारा निसर्ग मनास एक नवी उर्जा देणारा आहे" ही भावना मनाला जाणवत असते .
डोंगरावरून कोसळणारे धबधबे , भरभरून वाहणाऱ्या नद्या , निसर्ग कुशीत असलेली रम्य अशी सहलीसाठी यावे असे निमंत्रण देणारी पर्यटन स्थळ , या सर्व ठिकाणी निसर्गाची विविध रूप डोळ्यांनी पहावी आणि मनात साठवावी अशीच असतात .
शहरी जीवनमान , शारीरिक आणि मानसिक श्रमाने थकून गेलेला माणूस ..पावसाळ्यात वेळ काढून ..सृष्टीत सुरु झालेला श्रावण -सोहोळा "पहाण्यासाठी आतुरतेने जातो , श्रावणात खुलून आलेला निसर्ग रसिक मनाला अजिबात निराश करीत नाही.
लेखकाला आणि कविमनाला कायम भुरळ घालीत आलेला ऋतू -म्हणजे वर्षा ऋतू ,  या पावसाळ्यात येणारा श्रावण महिना , या महिन्यात असणारे विविध सण, धार्मिक -सोहोळे  जन-सामन्यांच्या दिन-क्रमात आनंद आणणारे असतात . हर एक जण आपापल्या परीने श्रावणाचा आनंद घेत असतो . डोंगर-दर्यातून जाणरे नागमोडी वळणाचे रस्ते , हिरवाईने झाकून गेलेली टेकड्या आणि डोंगर शिखरे .अशा रस्त्याने गाडी चालवत जावे, डोळ्याला सुखावणारा निसर्ग , नजरे समोरचा अप्रतिम  नजारा पहाणे ..हे अनुभवण्याची गोष्ट आहे.
श्रावणातला निसर्ग कसा आगळा वेगळा असतो ..त्याची ही कविता 
कविता - श्रावण गाणी
---------------------------
श्रावणाची ही सारी किमया
वनराणीची फुलली काया ।।
श्रावणसखा हा आला आला
संगे त्याच्या पाऊस रमला ।।
भाऊ श्रावण होऊनी येई
माहेरा लेकी घेऊनी येई ।।
शेतशिवारी श्रावण आला
बळीराजा मनोमन खुलला ।।
नद्या नाले विहीरीला पाणी
धरणीमायेची श्रावण गाणी ।।
------------------------------------------
कविता- श्रावण गाणी
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
---------------------------------------------------
मित्र हो - असा  लोभस निसर्ग , श्रावणातले त्याचे सुंदर ,विलोभनीय रुपडे कायम अनुभवणे आपल्याच हातात आहे, त्यासाठी या निसर्गाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे " ही सामाजिक जबाबदारी आणि आपले कर्तव्य  आपण विसरता  कामा नये ".
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- लोभस रूप निसर्गाचे 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342 
------------------------------------------------------------------------