Monday, July 16, 2018

ललित लेख.# पाऊसवेळ - अरुण वि.देशपांडे

ललित लेख.
----------------------
# पाऊसवेळ
- अरुण वि.देशपांडे
------------------------------------------
आपल्या अत्यंत आवडीच्या मित्रांची यादी करण्याचे ठरवले तर ,बहुतेक सगळ्यांच्या यादीत "आवडता मित्र -हा बहुमान  पावसाला नक्की मिळेल.
पावसाची नि आपली भेट होते ती त्याच्या सोबत चिंब चिंब भिजून जाण्याने.
हे मनोसक्तपणाने पावसातले भिजणे आयुष्यातील वळणा वळणावर असते.

बालपणीच्या दिवसात " ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ", असे म्हणत पावसाशी मस्त गट्टी होते.
शाळेला जाता- येता पावसाने गाठल्यावर  डोक्यावर दप्तर धरीत रमत गमत भिजत घरी येण्याची मजा काही औरच असते..
पावसाच्या वाहत्या पाण्यात कागदाची होडी सोडून तिच्या सोबत उडया मारीत अंगणात जणू "धारा- नृत्य ",सुरु होते,

रिमझिम रिमझिम पाऊस पडे सारखा",
पावसाची सोबत करणारे गाणे आठवत पाऊस बघणे खूप मनोरम असते..
अविरत कोसळे पाऊस बाहेर ,आत ही
तसाच अविरत..तो ..
अजुनी......कोसळे......!

विरहाच्या क्षणी पाऊसधारा जणू भावधारा होऊन सोबत करतात. 
" रिमझिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात,
प्रियावीण उदास वाटे रात ",
विरह, दुरावा, मिलन, असे खूप काही मनातले सांगावे असा जिवाभावाचा सखा असतो हा पाऊस .

पावसाच्या धारा चालू आहेत , नजरे समोर पावसात भिजून तृप्त झालेली धरणी पाहतांना मनात एक सुखद अशी भावना दाटून येते  .टेरेस मध्ये खुर्ची टाकून बसावे , हातातल्या प्लेट मध्ये गरमा - गरम भजी ",सोबत  कोफी किंवा चहा रसिकांच्या आनंदाची ही परमावधी असते असे म्हणणे वागे ठरणार नाही.
मनास आनंद अनुभूति देणारी अशी ही पाऊसवेळ " अनुभवण्याचा मोह आवरणे कठीणच असते.

पावसाचे हे स्वप्नरंजक रूप ठीक आहे , पण अलीकडच्या अनेक वर्षाचा मागोवा घेण्याचे ठरवले तर असे जाणवते की पावसाचे वेळापत्रक बदलून गेलेले आहे ,जून मध्ये येणारा पाउस मध्येच गायब होतो तो थेट जुलै मध्ये उगवतो ,या बिन-पावसाच्या दिवसात सगळीकडे पावसाची पुन्हा आतुरतेने वाट पाहिली जाते .आणि वरुणराजा प्रसन्न होऊन बरसू लागला की ..त्याला कसे आवरावे कळत  नाही .

पाउस -वेळ ही खरी महत्वाची असते ती शेतकरी -बांधवासाठी . पाउस -प्रसन्न झाला की बळीराजा सुखावतो , अलीकडे मात्र पाऊस नावाचा आपला मित्र अत्यंत  बेहिशोबी आणि बेभरोसी होत चालला आहे . गावाकडची आर्थिक गणितं या पावसावर अवलंबून असतात . हाता-तोंडाशी आलेला घास ,,हिरावून घेणारा पाउस अलीकडच्या काही पावसाळ्यात आपल्याला तडाखे देऊन जातो , सगळे आडाखे चुकून गेल्यामुळे बळीराजाच्या मनावर किती नि कसे आघात होत असतील , याची कल्पना येणार नाही. निसर्गाची उफराटी करणी बघा .अजिबात पाउस न झाल्यामुळे , कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ तर त्याच वेळी दुसरीकडे ढगफुटी सारखा पाउस पडून वाताहात होते.डोळ्या देखत सगळं काही वाहून जातांना पहावे लागते ,अति वृष्टी मुळे ओला दुष्काळ ओढवतो , निदान यात जनावरांच्या चाऱ्याची तरी फिकीर नसते , पिण्याचे पाणी उपलब्ध होते .. तरी पण ,काही त्रास चुकत नाहीत हेच खरे 

पावसाला म्हणावे लागते ..अरे बाबा - इतका ही नको कोसळू की आमचे जीवन ,जीवनाची कमाई नजरे देखत पाण्यात वाहून जावी ,,! हे पाहणे खूप वेदनादायक आहे.  नागरी-जीवनात आजकाल पाउस हाहा:कार माजवतो, सर्वप्रकारची हानी होते , ही अशी "पाऊस-वेळ " कुणावरच येऊ नये ,त्यासाठी खबरदारी घेऊन अगोदरच उपाय योजना करून हे टाळता येणार नाही का ?
या प्रश्नाचे उत्तर आहे - मनात असले तर खूप काही नक्कीच करता येते .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ललित लेख.
## काहीबाही असेच काही 
# पाऊसवेळ
- अरुण वि.देशपांडे- पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
(साप्ता. चपराक -पुणे. अंकात प्रकाशित लेख.)