Monday, April 23, 2018

-आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २३ - बीबीके सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .
-----------------------------------------------------------------------
परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या वैयक्तिक जीवनात , नोकरीच्या म्हणजे बँकेतील कार्यालयीन जीवनात , आणि साहित्यिक म्हणून वावरतांना नित्यनेमाने खूप काही घडत असे , हे सर्वच दिवस उत्साहाने भरलेले होते ..रोज काही नवे घडे .ज्याने मनास उमेदीचे नवे बळ मिळत असे.
परभणीच्या साहित्यिक जगतात वडीलधार्या मंडळींचे मोलाचे मार्गदर्शन मला नेहमीच मिळत गेले , त्यांचे प्रेमाचे शब्द मला घडवीत होते ..त्यातूनच आजचा मी आहे" अशी  माझी भावना आहे.

१९९८- १९९९ .दरम्यानची ही एक स्मरण- कथा आहे, वीस वर्ष होत आली  आहेत आता या प्रसंगाला , पण आठवणीच्या रूपाने मनात अजून जशाचा तसा आहे हा प्रसंग  ,
१९९८  या वर्षा पर्यंत माझे ..१.कुरूप रंग , २.रंग तरंग , ३,नवर्यांची चाळ( विनोदी कथा )  असे तीन कथा - संग्रह प्रकाशित झालेले होते . या नंतर एक नव्या कथा संग्रहाची तयारी सुरु केली होती ..त्याच वेळी संग्रहाची प्रकाशन तारीख ठरवली होती .."बी.रघुनाथ स्मृतिदिन - दि. ०७ सप्टेंबर, वर्ष होते १९९९ . प्रकाशक ही मिळाले होते .संजय सप्लायर्स (प्रकाशन ) पुणे .
कथा -संग्रहाचे नाव होते  "अनुपमा ", 
या संग्रहाला एका कथा - लेखकाची प्रस्तावना घायची "अशी माझ्या मनात खूप इच्छा होती , असे साहित्यिक बाहेरगावचे कशाला ? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारून त्यावर उपाय शोधला , आपल्या परभणीच्या साहित्यिक परिवारातील एका जेष्ठ साहित्यिकांना विचारू या , त्यांचा होकार सहज मिळेल 'अशी खात्री होती.

त्या दिवसात एकदा औरंगाबादला जाण्यासाठी मी परभणी रेल्वे स्टेशनवर आलेलो होतो , वीस वर्षापूर्वी परभणी स्टेशनवर येणाऱ्या रेल- गाड्यांची संख्या तशी मोजकीच होती ..,आणि वेळेवर येणे " हा नियम तेंव्हा तितका कडक नव्हता असे आता आठवते . वेळापत्रकानुसार गाडी येणे " तशी एक नवलाची गोष्ट "असे " , असे म्हटले तरी चालण्यासारखे होते , अशा वातावरणात एक घंटा देरीसे चलनेवाली गाडी " अजून किती उशिरा येते ? या काळजीत असतांना ,माझ्या सोबत रेल- गाडीची वाट पहाणाऱ्यात  एका स्नेह्याची भर पडली होती ..

माझ्या बाजूला उभे होते .मराठवाड्यातील विनोदी  कथा लेखन करणाऱ्या मोजक्याच साहित्यिकात  ज्यांचा उल्लेख केला जात असे ते .प्रा.भास्कर कुलकर्णीसर. ज्यांना त्यांचा परभणी-  मित्र परिवार ..बीबीके या नावाने ही बोलवत असे .
त्यांनापाहून मला अतिशय आनंद झाला होता ..कारण माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवण्याचा योग मोठ्या अनपेक्षितपणे माझ्या वाटयाला आला होता.. 

त्या दिवशी बीबीके सर औरंगाबादला  निघाले होते , मी पण औरंगाबाद पर्यंत आहे म्हटल्यावर त्यांना बरे वाटले 
एक तासा पेक्षा अधिक उशीर न लावता त्या दिवशी आमची रेलगाडी आली .
गर्दीतून वाट काढीत बसण्यासाठी जागा मिळवणे " हे प्रवासी -कौशल्य परभणीकरांना उपजतच लाभेली देणगी आहे ,त्यामुळे आम्हाला बसण्यास जागा लगेच मिळवता आली.
गप्पा सहजपणे सुरु झाल्या  साहित्यिक घडामोडींवर सरांचे लक्ष असते ." हे त्यंच्या बोलण्यातून जाणवत होते .ते .म्हणाले .तुमच्या सारख्या नव्या साहित्यिक मित्राशी बोलून ,नवी माहिती तरी मिळेल आम्हाला .
 . आम्ही गेल्या पिढीतले म्हणजे जेष्ठ साहित्यिक झालो , कुणे असे म्हणू लागले की आम्हाला उगीचच भीती वाटते हो देशपांडे ,-
 वाटते -  यापुढे आपल्याला  मान्यवर उपस्थित म्हणून खुर्चीवर बसवले जाईल , काय सांगावे -  आजकाल कशाचा भरवसा नाही राहिला बघा , तुम्हाला म्हणून सांगितले..
नाही हो सर , असे काही होणार नाही , कथा लेखन ते ही .विनोदी ..तुम्ही अगदी निष्ठेने हा लेखन प्रकार लिहिता आहात , याकडे कसे दुर्लक्ष करता येईल ? तुमच्या मनात असे विचार ही येऊ नयेत असे मला वाटते.
थोड्या वेळाने मी त्यांना म्हणालो .. सर , मी एक कथा लेखक आहे, माझा विनोदी कथा संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे ",
त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी देत म्हटले .तुमच्या लेखनाकडे माझे लक्ष आहेच अरुणराव , बँकेतला माणूस लेखन करतो याचे कौतुक आहे मला . सरांच्या या कौतुकांच्या शब्दाने मी भारावून गेलो , सर, एक विनंती आहे आणि इच्छा सुद्धा , ती तुम्ही पूर्ण करावी ..,
सर म्हणाले ..आधी सांगा तर खर , मग ठरवू .काय करायचे ते .
लगेच मी म्हणालो .., असे काही करू नका सर, मला माझ्या नव्या कथा संग्रहासाठी तुमची प्रस्तावना हवी आहे,
 एका विनोदी कथा लेखकाची प्रस्तावना गंभीर कथांच्या संग्रहाला असावी " हे माझी कल्पना सरांना ऐकून पटली नसावी अशी भीती मनात होती ...पण, सर म्हणाले .. , मी तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो ,काळजी करू नका .
अरुणराव, बाहेरगावचे मोठे मोठे साहित्यिक तुमच्या ओळखीचे असतांना , तुम्ही मलाच कसे काय विचारताय ? हे मात्र विचारतो तुम्हाला ..
सर, तो प्रश्नच नाही .. माझ्या नित्य परिचयाच्या वडीलधार्या साहित्यिकाची प्रस्तावना घ्यायची  हे मी मनोमन ठरवले होते ..,हे पक्के झाल्यावर  तुमच्याशिवाय अन्य कुणाचाही विचार केला नाही ,त्यांमुळे अनेकांना विचारून शेवटी तुमच्याकडे आलो असे मुळीच नाहीये .फक्त आणि फक्त तुम्हालाच या संदर्भात बोलतो आहे मी.
माझ्या सांगण्यातला खरेपणा सरंना जाणवला असेल , ते म्हणाले..
ठीक  आहे , तुमच्या कथांची फाईल माझ्याकडे आणून द्या ,वाचून प्रस्तावना देतो.
सरांच्या या एका वाक्याने माझा तो प्रवास सार्थकी लागल्याचे समाधान मनाशी बाळगून ,दोन चार दिवसांनी मी परभणीला परतलो.
लगेच माझ्या नव्या संग्रहाच्या कथा अनुक्रमणिके नुसार लावून .१५ कथांची फाईल घेऊन सरांच्या शास्त्रीनगर येथील घरी गेलो . अत्यंत भक्तिभावाने ती फाईल श्री गुरुचरणी ठेवतो आहे अशी भावना त्यावेळी माझ्या मनात होती .सरांचे त्या वेळी दिवाळी अंकासाठीचे कथा लेखन चालू होते , त्यांच्या लेखनात अडथला आणला कि काय ? ही माझी भीती सरांनी ओळखली असावी .म्हणाले ..
असे अवघडून बसू नका , आपल्या परभणीला मोकळं वातावरण आहे ,बाहेरच्या सारखं नाही इथे, ही फार चांगली गोष्ट आहे अरुणराव.
हो सर , हे मात्र खरे  आहे , आपल्या परभणी सारखे साहित्यिक वातावरण बाहेर कुठेच नाहीये " असे बाहेरगावाहून आलेले आपले साहित्यिक मित्र सांगत असतात..
सरांना फाईल देत म्हटले ..केंव्हा येऊ मी प्रस्त्वाना घेण्यसाठी ? लास्ट-वीक मध्ये प्रकाशकांना पोंचली पाहिजे .बाकी सगळं तयार आहे .
सर म्हणाले .१५ तारखेला या तुम्ही आणि प्रस्तावना घेऊन जा .
विनोदी कथा लेखक प्रा.भास्कर कुलकर्णी यांनी बरोबर १५ दिवसांनी त्यांची प्रस्तावना मला दिली , अतिशय अनुरूप अशी प्रस्त्वाना सरांनी लिहिली होती . या प्रस्तावनेतील निवडक ओळी .ब्लर्ब " वर सुद्धा छापल्या .
त्यातील मोजक्या ओळी इथे देण्याचा मोह टाळणे कठीण आहे..
" अरुण वि.देशपांडे यांच्या कथा मानवी जीवनाच्या निरनिराळ्या संघर्षाचा शोध घेणाऱ्या आणि विविध भूमिकातून माणसे कसे जीवन जगतात याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत.
" नियतीशरण जीवन हे या संग्रहातील कथांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणवे लागेल .आकर्षक आणि लक्षवेधी कथा वाचकांच्या पसंतीस उतरतील असा विस्वास वाटतो .
त्यांच्या साहित्य प्रवासास आशीर्वाद व हार्दिक शुभेच्छा.
- प्रा.भास्कर कुलकर्णी 
" क्षितीज ", शास्त्रीनगर ,
परभणी .

मित्रहो बीबीके  उर्फ प्रा.भास्कर कुलकर्णी सरांच्या आशीर्वादाने माझे साहित्य लेखनाचे क्षितीज आता तर या इंटरनेटवर खरोखरच विस्तारत जाते आहे. .

सरांच्या शास्त्रीनगरच्या घरी  अनेक वेळा मी गेलो आहे , साहित्य विषयक गप्पा करीत त्यांच्यातील लेखक अनुभवला आहे . अनेक साहित्य संमेलनात त्यांचा कथा कथन सत्रात सहभाग हा ठरलेला असे. मी माझे कथा कथन पहिल्यांदा सादर केले ते  वसमतला झालेल्या पहिल्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनात . 
या संमेलनाचे अध्यक्ष होते कथाकार प्रा. तू.शं,कुलकर्णी सर.

या समेलनात झालेल्या  कथा-कथन सत्रात प्रा.भास्कर कुलकर्णीसरांनी देखील त्यांची विनोदी कथा सादर  केली होती. सरांच्या बरोबर माझा असाच आणखी एक सहभाग योग - आखाडा बाळापुर ला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील कथा -कथन कार्यकमात आला .

प्रा.भास्कर कुलकर्णीच्या विनोदी कथा लेखनाचे विश्व एका अर्थाने मर्यादित होते .  आपल्या अवतीभवतीच्या सध्या -सरळ आणि मानवी प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा वाचकांना भावणार्या होत्या "भाम्पास " नावाची व्यक्ती -रेखा त्यांच्या कथेचे मध्यवर्ती पात्र असे. सरांचे हे विनोदी लेखन मनाला एक वेगळा आनंद देणारे होते.असे मी आवर्जून म्हणेन.

सरांचे अचानक जाणे ", हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धक्का होता , एका अबोल मनोवृत्तीच्या सृजनशील साहित्यिक व्यक्तीमात्वाचे जाणे साहित्यिक क्षेत्राला  मोठीच हानी पोन्च्व्णारे  होते.

या लेखाच्या निमिताने बीबीके सरांच्या चिरंजीव यांना  एक सुचवावेसे वाटते की. प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या साहित्याचा ब्लोग तयार करून इंटरनेट वरील वाचकांना प्रा.भास्कर कुलकर्णी या विनोदी कथा लेखकाचे साहित्यिक कार्य नव्या पिढीसाठी उपलब्ध करून द्यावे . सरांच्या वाण्ग्मयीन कार्याची   दखल घेतली जाईल ,
प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या स्मृतीस व साहित्यिक लेखन कार्यास हे शब्दरूप अभिवादन अर्पण करतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------

Saturday, April 21, 2018

लेखमाला -आठवणीतल गाव- परभणी , लेख- २२ वा. "कवी - नारायण बोरूळकर ..!

लेखमाला 
-आठवणीतल गाव- परभणी ,
 लेख- २२ वा. 
"कवी - नारायण बोरूळकर   ..!
-----------------------------------------------------------
आठवणीचे क्षण , सहवासातले दिवस , मनात कायमचे साठवलेले असतात , ज्यांच्या सोबत असे काही प्रसंग आपण शेअर केलेलं असतात की ते अविस्मरणीय असे झालेले असतात . अशी माणसे, अश्या व्यक्ती आपल्या मनात चिरंतन स्वरूपात वास करीत असतात . 
मित्र हो, समान आवडी आणि विचार जुळून आले की आपले एख्य्द्या व्यक्तीशी खूप छान जमते ,आपला गुड फ्रेंड  असलेला इतरांशी तितक्याच मोकळेपणाने वागेल " असे पण नसते , याला व्यक्ती तितक्या प्रकृती  "असे म्हणून सोडून देणेच  चांगले असते" अशी धारणा माझ्या मनाची अगदी पहिल्या पासूनची बनत गेलेली आहे.

परभणीच्या माझ्या वास्तव्यात .वैयक्तिक आणि नोकरीच्या आयुष्य पेक्षा माझ्या साहित्यिक जगात खूप मोठी हलचल असे , घर आणि बँके पेक्षा ..साहित्य, लेखन, आणि साहित्य उपक्रम यांनी मला सतत सक्रीय ठेवले ..त्यामुळे ३०-३५ वर्षे होऊन गेलीत पण अजून ही मी परभणीचे साहित्यिक विश्व आणि त्यातल्या माझ्या मित्रांना विसरू शकत नाही हेच खरे.

परभणीच्या साहित्यिक वर्तुळात .त्यावेळी .वयाने आणि साहित्यिक अधिकाराने जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक स्नेही होते, समवयस्क मित्रांची मोठीच फळी होती , तर तरुण वयात उत्तम लेखनाने वेधक कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांची संख्या देखील खूप  होती. ही सर्व मंडळी माझे मित्र म्हणूनच परिचित होते . जे नित्य नेमाने भेटत ,ते अधिकच जवळचे वाटणारे "हे साहजिक होते 

अशाच एक जवळच्या मित्राचे स्मरण आजच्या लेख निमित्ताने करावेसे वाटते आहे..
१९९०-९२ च्या दरम्यान मराठवाडा रविवार पुरवणीतून .परभणीतील साहित्यिक मित्रांची व्यक्ती-चित्रण ..ही लेखमाला मी लिहिली होती .. या लेखमालेतील ..एक लेख होता .."राजस सुकुमार " या शीर्षकाचा ..
हे शीर्षक वाचून जुन्या मित्रांना चटकन  नक्कीच आठवण होईल ..
त्या सुकमार मित्राचे नाव . "कवी - नारायण बोरूळकर   ..! 
  .
सरकारी कार्यालयात नोकरीत असणारे " नारायण बोरूळकर   ..! . मनाने नखशिखांत कवी " होते . गोरेपान , छोटीशी मूर्ती ,आणि चेहेर्यावर - कायम संकोच , "मी कसा बोलू, ?, भिडस्तपणा इतका की..त्यांच्या या स्वभावाने -   नारायण बोरूळकर   ..!  या व्यक्तीने स्वतःतील कलावंताला  नेहमीच मागे मागे राहू दिले , एक अनाकलनीय संकोच या माणसाच्या मनात का आणि कशामुळे आहे ? कधीच कळाले नाही.

रस्त्याने जाताना येतांना  अचानकच - समोरून त्यांच्या लहानश्या लुनावर हळू स्पीडमध्ये येणारे नारायणराव दिसायचे . ते न थांबता -न बोलता सरळ पुढे गेले असे कधीच व्हयाचे नाही .रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीवर आम्ही समोर समोर बसून बोलायचो .

..त्यांचे बोलणे होई पर्यंतचा आमचा वेळ फक्त त्यांच्यासाठीचा असायचा .  ते .भेटायचे तेंव्हा हातात हात घेऊन बोलत , तो स्पर्श कधी कधी खूप उदासवाणा वाटणारा असे, त्यांच्या शब्दात एक भिजलेपण जाणवत असे, आणि डोळे नि:शब्द नि डबडबलेले , मग समजून घायचे .या नाजूक कवीला व्यावहारिक जगातील कुणा रुक्ष आणि कोरड्या मनाच्या माणसाने विनाकारणच दुखावलेले आहे...

"कवी - नारायण बोरूळकर   ..!  ..मराठवाड्यात सर्वपरिचित होते ..त्यांचा कवी-मित्र परिवार खूप मोठा होता . रविवार साहित्य पुरवणी , मासिके , दिवाळी अंक ..यातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असत ..कधी कधी त्यांची कविता प्रकाशित झालेल्या अंकात माझे साहित्य प्रकाशित झालेले असे ..हा आनंद त्यांच्या सोबत साजरा करतांना ..मी म्हणायचो ..
"आज  "कवी - नारायण बोरूळकर   ..! " यांचे सोबत ..माझी कविता , आहे ..
.वा नारायणराव आज हम खुश.
त्यांना ही अशी दाद खूप आवडत असे .. एकदम दिलखुलास हसून नारायणराव मान डोलावत .

फिक्या रंगाचा फुल बाह्यांचा खिसेवाला बुशकोट , अंगात  फीट बसणारी  डार्क रंगाची प्यांट , अशा रंगसंगतीचे ड्रेस गोर्यापान नारायणराव बोरुलकरांना खूप शुभून दिसत असत , सुरुवातीला सायकलवर ते फिरत असत , नतर त्यांच्याकडे लुना आली ..तरी त्यांच्या ..नाजूक व्यक्तिमत्वाला भरधाव जातांना कधी पाहिले नाही.

देविदास कुलकर्णी , मोहन मु.कुलकर्णी .यांच्यामुळे मला "कवी - नारायण बोरूळकर  यांचा  सहवास घडला  नारायण बोरुलकर यांना आपल्या  "देविदास" चे खूप कौतुक होते . नरहर कुरुंदकर सर, डॉ.प्रभाकर मांडे सर म्हणजे "कवी - नारायण बोरूळकर यांचे श्रद्धा -स्थान होते..

९१ व्या - अ.भा.मराठी साहित्य सम्मेलन बडोदाचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीकांत देशमुख नव्वदच्या दशकात परभणीला होते ..देशमुख साहेबांनी काही विशेष उपक्रमासाठी म्हणून खास नारायण बोरुलकरयांची निवड करून  त्यांच्यावर माहिती संपादन करण्याचे ,संकलन करण्याचे कार्य सोपवले होते ,आणि साक्षरता विषयक मासिकाच्या संपादक - मंडळात  "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांचा समावेश केला "असे आठवते .
 या  कार्यकालात .. "कवी - नारायण बोरूळकर   .मनाने आतून मोहरून आले आहेत असे आम्हाला जाणवत होते " जणू त्यांच्या क्षमतेची खरी कदर झाली  आहे ", अशी त्यांची भावना झाली होती.या दिवसातील त्यांचा आनंदी आणि समाधानी चेहेरा मी कधीच विसरू शकत नाही.

लोक -संस्कृती  आणि लोककला " हा "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांच्या पीएचडी चा विषय ..पण त्यांचे हे स्वप्न त्यांची सत्व परीक्षा पहात असे. कधी कौटुंबिक जबाबदारी , कधी नोकरीतील जबाबदारी  ..यात त्यांचे स्वप्न पूर्ण होणे लांबत जाई , त्यवेळी त्यांच्या मनाला खूप त्रास होतोय हे जाणवायचे ..पण ते शब्दातून व्यक्त करण्याचे नेहमीच टाळले . एक चिकाटी , एक जिद्द त्यांच्या मनात होती हे मात्र नक्की .
२००० नंतरच्या वर्षात कार्यालयीन आणि कौटुंबिक व्यस्ततेमुळे माझा   साहित्यिक मित्र-मंडळीत वावर तसा बराच कमी झाला होता .
आणि मग ..२००६ साली तर स्वेच्छा निवृत्ती घेऊन ..मी पुण्यात आलो.. "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांची भेट पुन्हा झालीच नाही ..बातम्या मात्र कानावर येत गेल्या .. त्यात .त्यांची पीएचडी " झाल्याची बातमी सुखद होती. " डॉ- "कवी - नारायण बोरूळकर   ..! कसे छान वाटत होते.

आणि एक दिवस .कळाले ते फार यातना देणारे होते .. आपला राजस सुकुमार कवी -मित्र ..आपले साहित्य - कविता मागे सोडून दूरदेशी निघून  गेला .... . "कवी - नारायण बोरूळकर   ..! तुमची आठवण मनात कविते सारखीच आहे. 

बहुदा गेल्यावर्षीची गोष्ट  असेल ही - ,
सकाळी सकाळी एक फोन आला .नंबर सेव्ह नव्हता .म्हणजे कुणी तरी नवीन आहे ..हे लक्षात आले.
मी -बोलतेय - 
तुमचे मित्र -   "कवी - नारायण बोरूळकर   ..! यांची मुलगी , पुण्यातच असते मी , फेसबुक वर दिसलात तुम्ही , माझ्या बाबांचे खूप जुने मित्र ...,तुम्ही परभणीला यायचे तेंव्हा आम्ही खूप लहान होतो , खूप वर्ष झाली आता या गोष्टीला .
आज माझे लग्न आहे, तुम्ही नक्की या काका ....
फोनवर तर हो म्हणलो .. नाही तरी कसे म्हणू ?
पण .त्या दिवशी बाहेरगावी असल्यामुळे जाता नाही आले ..रुखरुख तसीच आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला 
-आठवणीतल गाव- परभणी ,
 लेख- २२ वा. 
"कवी - नारायण बोरूळकर   ..!
--------------------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतलं गाव - परभणी - लेख - २१ वा - गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग - तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.

लेखमाला -आठवणीतलं  गाव - परभणी -
लेख - २१ वा -
गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग -
तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.
----------------------------------------------------------------------
आठवणीतल्या गावातील अनेक आठवणी .मग कधी त्या व्यक्तीबद्दलच्या असतील , एखद्या वास्तू  बद्दलच्या असतील ,या आठवणींना एक नवा उजाळा देणे आणि मनाला त्या क्षणांची अनुभूती देणे ..हा तसा म्हटला तर मोठाच भावनीक आनंद आहे . प्रस्तुतच्या  लेखनांतून आपल्याला तो घेता येतोय असे मी समजून चालतो आहे.

परभणीचे साहित्य -जगत हे कधीच फक्त परभणी पुरते मर्यादित राहिलेले नाही..त्याने व्यापलेला अवकाश फार मोठा आहे ,अवघे मराठी साहित्य "यात परभणीचे नाव चांगल्या ठळक अक्षरातले आहे ", ही गोष्ट आपल्या मनाला आनंद देणारीच आहे.
१९८५ नंतर माझ्या सारखे अनेक नवोदित साहित्यिक परभणी शहरात वास्तव्यास आले , आणि लगेच इथल्या वातावरणात सहजतेने एकरूप झाले . मराठवाडा साहित्य परिषेद शाखा परभणी ..त्या वेळेसच्या कार्यकारणीत अनेक नवे कार्यकर्ते दाखल झाले . मसाप परभणी नेहमीच उपक्रमशील असते ", हे वाक्य त्यंनी अनेक उपक्रमाचे आयोजन करून सोदाहरण दाखवून दिले .
या कार्यकारिणीतील  एक नव्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ..ही व्यक्ती होती दीपक हवालदार , परभणीच्या त्यावेळेसच्या साहित्यिक घडामोडीत यांचा मोठाच सक्रीय सहभाग आकर्षणाचा विषय झाला होता. साहित्यिक उपक्रम आणि साहित्यिक भेटी गाठी मुळे दीपक हवालदार सर्वांचे चांगले मित्र झाले "हे आश्चर्याचे नव्हते.

दीपक हवालदार आणि परिवार हिंगोलीचे रहाणारे ,आणि हिंगोली माझी सासुरवाडीचे गाव ..हवालदार परिवार आणि आमची सासुरवाडी .बसोले परिवार .दोन्ही खूप स्नेह संबंध असलेले परिवार ..त्यामुळे परभणीच्या वास्तव्यात दीपक हवालदार आणि परिवार यांचा सहवास माझ्यासाठी माझ्या बायकोच्या माहेरची माणसे असाच होता. 

दीपक हवालदार यांनी त्यांचे  बी.रघुनाथ प्रकाशन नुकतेच सुरु केले होते ..त्यावेळी त्यांनी प्रकाशित केलेली २-३- पुस्तके चांगलीच चर्चेत होती-
१.आम्ही काबाडाचे धनी - कविता  इंद्रजीत भालेराव ,
२. तफावत - केशव बा. वसेकर 
३. नाटककार बेंडे - व्यक्ती आणि वांग्मय - प्रा.भास्कर कुलकर्णी ,
परभणीकर साहित्यिक यांच्या साठी परभणीत साहित्य संमेलन होणे "हा  एक परिचित साहित्यिक सोहोळा असे.अशातच 
१९९३ या वर्षात आमच्यासाठी  महत्वाची साहित्यिक घटना घडली ..त्याचे श्रेय दीपक हवालदार आणि बी.रघुनाथ प्रकाशन यांनाच आहे अशी माझी भावना आहे. त्याचे असे झाले की..

 परभणीचे साहित्यिक-सुपुत्र बी.रघुनाथ यांचा स्मृती -दिन ०७ सप्टेंबर  या निमित्ताने त्यांच्या ४० व्या स्मृती-दिनी म्हणजे ०७ सप्टेंबर -. १९९३ रोजी दुसरे - परभणी जिल्हा साहित्य सम्मेलन . लोकल परभणीला आयोजित केले गेले 
या साहित्य संमेलनाच्या  निमित्ताने दीपक हवालदार यांनी त्यांच्या बी.रघुनाथ प्रकाशना तर्फे ..३ नव्या लेखकांच्या पुस्तक प्रकाशनची घोषणा  केली ..

हे तीन लेखक .आणि त्यांची पुस्तके -
.१.मंगेश उदगीरकर -ललित लेख- गप्पाष्टक     २.देविदास कुलकर्णी -कथा संग्रह - रानशिन्या , आणि ३ -रा लेखक मी-अरुण वि.देशपांडे - कथासंग्रह - रंग तरंग.
या पुस्तकांची मुखपृष्ठे  चित्रकार सूर्यभान नागभिडे यांनी तयार केली होती.

या पुस्तकांच्या निर्मितीची कथा चित्त-थरारक अशीच आहे ..जणू काल परवाच घडल्या सारखी वाटणारी ..
मंगेश उदगीरकर ,देविदास कुलकर्णी आणि मी ..तीन ही लेखक .आता पुस्तक रुपात प्रकाशित होणार या कल्पनेत ,एका अर्थाने हवेतच होतो . आमच्या तीनही पुस्तकाचे छपाई काम औरंगाबादच्या लेसर कॉम,अविम ऑफसेट, "यांच्याकडे होते ..

संमेलन ८-१५ दिवसावर आलेले ,आणि पुस्तकांची प्रगती समक्ष डोळ्याने पहावी , मजकुरात काही दुरुस्ती असेल तर ती समक्ष बसून करवून घेऊ "म्हणून मी आणि मंगेश उदगीरकर असे दोघे औरंगाबादला  गेलो. पुस्तकाचे काम चालू होते त्या ठिकाणी गेलो .. मंगेश आणि देविदास या दोघांच्या  पुस्तकांची स्क्रिप्ट आणि फायनल प्रुफ लगेच सापडली आणि त्यांचे तपासणीचे काम मार्गी लागले ..आमचा हा आनंद जास्त वेळ टिकला नाही.. कारण .नंतर .माझ्या कथा संग्रहाचे काहीच रेकॉर्ड ऑफिस मध्ये सापडले नाही , ..कोने- कोपरे शोधून झाले , 
जो तो एक दुसर्याकडे बोटे दाखवूत म्हणू लागला ..परवा तर होतं की इथं , आमचे तर अवसान गळाले ..शेवटी असे ठरले  की ..काही उपयोग नाही, २ पुस्तके होतील ,त्यांचेच प्रकाशन करू , ३ रे पुस्तक ,काहीच कळत नाही ,द्या सोडून मग.पाहू ..
पण ओफिसातील एक पोरगा म्हणाला ..थांबा ..काल एक सेट  वाचायला म्हणून माझ्या घरी घेऊन गेलो , आज परत आणायचा विसरलो ..ती फाईल  नक्कीच या तिसर्या पुस्तकाची  असणार . त्याचं नाव नाही लक्षात आता..
त्याचे ऐकून इतका वेळ माझा बंद झालेला आवाज ..एकदम खुलून आला ..मोठ्यांने म्हणलो..बाबा रे ..माझच पुस्तक आहे ते ..रंग तरंग ., पळत जा ..रिक्षा कर .आणि लगेच येरे बाबा ...
लगोलग ते प्रोगा ..आमच्यासाठी अक्षर-दूत .आला की परत.. त्याच्या हातात फाईल होती ..

मंगेश ने अधिरतेने फाईल घेत पाहिले ..मोठ्या आनंदात म्हणाला ..अरे अरण्या - तुझीच फाईल ए की बे ..! 
च्यामारी ..सुटलो रे बाबा ..आता काही काळजी नाही .होतंय आपल काम ..लागू दे किती वेळ आता .डोन्ट वरी..
आणि मग मंगेश ने त्याच्या हातातील काळ्या बागेतील सुपारी आणि तंबाखूचा मस्त बार भरला ..आणि थेट संध्याकाळ पर्यंत एक आसन स्थिर चित्त होऊन आम्ही तीन ही पुस्तकाची प्रुफे ओक्के करून टाकली .
झालेले काम पाहून मंगेश म्हणाला ..यंव यंव रे यंव ..मायला आपण लेखकू झालोत की रे ..

त्या दिवशी .परभणीला जाण्यासाठी आम्हाला शिर्डी -करीमनगर ही आंध्र -प्रदेशची सुपर बस मिळाली  खरी ..पण एक ही जागा शिल्लक नव्हती ..त्यामुळे थेट परभणी पर्यंत मी व मंगेशने  गर्दीत उभे राहून तो प्रवास केला ..हे ५-६ तास आम्ही दोघच गाण्याच्या भेंड्या खेळत खेळत परभणीला पोंचलो ..नव्या पुस्तकाच्या आगमनाच्या बातमीने मन सुखावून गेलेले  होते ..त्यामुळे प्रवासाचा शीण ..बिलकुल नाही..असो.

७ सप्टेंबर १९९३ .नटराज नाट्यमंदिर - दुसरे परभणी जिल्हा साहित्य संमेलन ..या संमेलनात  आदरणीय प्राचार्य राम शेवाळकर सरांच्या हस्ते .. गप्पाष्टक - मंगेश उदगीरकर , रानशिन्या - देविदास कुलकर्णी , रंग तरंग - अरुण वि.देशपांडे , अशा तीन लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले ..
दीपक हवालदार आणि बी.रघुनाथ प्रकाशन .ही दोन्ही नावे आमच्या सर्वांच्या मनात कायम आहेत.

मित्र हो ..या सप्टेंबर मध्ये या संमेलन आठवणीस ,आमच्या पुस्तक प्रकाशन आठवणीस २५ वर्ष होतील ..एक गोष्ट आवर्जून सांगेन ..आज ही आम्ही तिघे  ..मंगेश, देविदास आणि मी ..लिहिते साहित्यिक आहोत ..
परभणीच्या साहित्य जगाची आम्हास मिळालेली  अद्भुत देणगी आहे.
पुढच्या लेखात असेच अजून काही....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतलं  गाव - परभणी -
लेख - २१ वा -
गप्पाष्टक , रान शिन्या , रंग तरंग -
तीन पुस्तकांचे प्रकाशन - एक आठवण.
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------