Sunday, November 1, 2015

एक कविता ..!

एक कविता …!
-अरुण वि . देशपांडे
-------------------------------------------------
काय सांगायचे कसे सांगायचे ?
घुटमळते मन सांगण्यासाठी
शोधात ते मग निघते शब्दांच्या
मदत करती जे कवितेसाठी …!

कविता जणू एक सखी जिवलग
सारखी मनात ती डोकावते
अस्वथ मनास समजावते छान
बळ देई कविता जगण्यासाठी …!

कविता जाणीव देते एक नवी
माणूस असुदे  मनात नेहमी
कर विचार या माणसांचा तु रे
तुझी कविता असावी त्याच्यासाठी …!
-------------------------------------------------------------
एक कविता ।!
-अरुण वि. देशपांडे .
----------------------------------------------------------------------

Friday, October 2, 2015

कविता - मन हे ...!

कविता - मन हे ...!
-अरुण वि .देशपांडे .
----------------------------------------------------------
धुक्यात हरवलेल्या वाटा
शोधिते शोधिते मन वेडे 
क्षितिजा पर्यंत वाटा असती
धावते तिथ पर्यंत वेडे .....!
निळ्याशार निरभ्र अंबरी
मनपाखरू फिरे भिरभिरी
सायंकाळी संधिप्रकाशात
फिरे माघारी मग मन वेडे ...!
पहाटेच्या कोवळ्या उन्हात
होई पुन्हा रोज ताजेतवाने
विसरुनी कालची निराशा
मन भिडे जीवनास नव्याने ....!
------------------------------------------------------------
कविता - मन हे ...!
-अरुण वि .देशपांडे -पुणे..
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------

कविता - इथे ...!

कविता - इथे ...!
-अरुण वि .देशपांडे .
--------------------------------------------------
मन थिजले भावना गोठल्या
आपलेपणाचा बर्फ आत इथे 
वितळणार आता काहीच नाही
नजरेत फक्त गारठा इथे ...!
मित्र सोबती ना राहिले इथे
सावल्या त्यांच्या त्या बेभरोसी
निसरडे झाले ते हमरस्ते
सरळ सध्या वाट्या लुप्त इथे ...!
बातमी - पत्र वर्तमानाचे आता
भयकारी भाविष्य चाहूल देते
स्थिरता ना उरली जगण्यात
अंदाज ना काय घडेल उद्या इथे ?
---------------------------------------------
कविता - इथे ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
---------------------------------------------------

कविता - वाटचाल ही ...!

_कविता- वाटचाल ही..!
_अरूण वि.देशपांडे.
______________________________
कितीक योजने चालुन झाले अंतर सारे
परी आणिक आहे करणे वाटचाल पुढची
उगवती हर एक नवी पहाट ही रोजची
भरते उमेद नवविश्वासाच्या वाटचालीची
थकल्या भागल्या जीवा आधार देण्यास
शितल चांदणे देती तारे सारे आकाशाची
बदलो कितीदाही दुनिया नजरे समोरची
ईच्छा मनात कणखर वाट पूर्ण करण्याची!
_______________________________
कविता_ वाटचाल ही..!
_ अरूण वि .देशपांडे
_______________________________

कविता - भाव मनीचे ..!

कविता - भाव मनीचे …!
-अरुण वि  देशपांडे .
-----------------------------------------------
जुळवाजुळवी ती शब्दांची
सोपी असते ?, मुळीच नाही
असेल समजदार समोरचा
अशी खात्री देता येत नाही…!

सांगणे तसे सारेच कुणा
कधी रडगाणे ना ठरावे
काय सांगावे ,नि काय नाही
हे ज्याचे त्यानेच ठरवावे …!

बोजड अपेक्षांचे ओझे ते
आत साठवणे बिनकामी
समोरच्या मनात प्रतिमा
नसावी कधी ती कुचकामी …!

भाव भावना व्यक्त करणे
ओढ असते हरेक मनाची
आठवणी असतात याच्या
गुंतवणूक हो हीच मनाची …!
------------------------------------
 कविता - भाव मनीचे …!
-अरुण वि  देशपांडे .
----------------------------------------

Monday, September 7, 2015

कविता - अटळ हे जगणे ..!

कविता - अटळ हे जगणे …!
-अरुण वि . देशपांडे .
-------------------------------------------------------------------
होते जरी  घालमेल  रोजच  या जीवाची
अटळ जगणे आम्हासी  जगावे लागत आहे   ।।

दुसऱ्या दुनियेत  मात्र सदा आलबेल आहे
नाही नाही त्या गोष्टींना बघावे लागत आहे  ।।

स्व: वर लुब्ध झालेल्या लब्ध -प्रतिष्ठितांचे
जगणे बेगडी तरी ते पहावे लागत आहे  .        ।।

चाड नाही उरली जगात मूल्यवान नीतींची
संस्कार फुले पायदळी  पहावी लागत आहे.      ।।

तुंबड्या  भरण्याची तृष्णा भागत नाही तरी
दिसेल ते लुटणाऱ्याना  पहावे लागत आहे .     ।।

लढण्याची जिद्द विरोधात जे बाळगुनी आहे
सोबत्या अभावी पीछेहाट पहावी लागत आहे.      ।।

माणूस हा  जणू एक सरडा ,नित्य रंग बदली
चक्रावणारे रूप  निमूट पाहावे लागत आहे.          ।।

आहे बिकट जरी सारे ,मन आशावादी आहे
अटळ जगणे सारे जगावे लागत आहे  .             ।।
------------------------------------------------------------------------------------
कविता - अटळ हे जगणे …!
-अरुण वि . देशपांडे
-------------------------------------------------------------

Saturday, June 27, 2015

कविता - नशिबास वेळ हो मिळेना ..!

कविता - , नशिबास वेळ हो मिळेना ....!
-अरुण वि. देशपांडे -पुणे .
---------------------------------------------------------------------------------------------
वेदना -दुख: यातनांची रात्र सरता सरेना
भोग असे हे नशिबात का माझ्या ? काही कळेना  ||

मान्य आहे  मजला .सुख- दुखः या जीवनाच्या बाजू
सुख दाखविते  वाकुल्या ,दुखः  ते पळता पळेना     ||

अंधार असतो म्हणे ,  आपला पाहुणा हा रात्रीचा
बसला इथेच हा ,सकाळ  झाली कधी ? ते कळेना      ||

येईल अशी एक ,जी असेल पहाट माझ्यासाठी
जीव आला कंठाशी आता , वेळ येण्याची ती जुळेना   ||

का व्यर्थ शोक करिसी असा ,? विचारता कुणी , सांगे
भले करण्या माझे, नशिबास वेळ हो मिळेना ....!    ||
------------------------------------------------------------------------------------------
कविता - , नशिबास वेळ हो मिळेना ....!
-अरुण वि. देशपांडे -पुणे .
---------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, June 3, 2015

आजच्या - ०३ जून -२०१५ - दिव्य -मराठी -किड्स -कॉर्नर.-मध्ये प्रकाशित बाल-कविता ---------- - कठीण समयी ..!-

रसिक-मित्र हो -नमस्कार
आजच्या - ०३ जून -२०१५ -
दिव्य -मराठी -किड्स -कॉर्नर.-मध्ये प्रकाशित बाल-कविता
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
बाल-कविता - कठीण समयी ..!-
अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------
गोड बोलण्याने
छान वागण्याने
मित्र होती सारे
सहजपणे ....!

वात दिव्याची ही
सारिते अंधारा
करिते उजेड
भोवताली ...!
मदत अशीही
आपण करावी
असे जो कुणी
अडचणीत ...!
सोबती असावे
कठीण समयी
सुखाचे सोबती
काय कामाचे .?
---------------------------------------------------------------------------------------
बाल-कविता - कठीण समयी ..!-
अरुण वि.देशपांडे -पुणे..
मो- ९८५०१७७३४२ .
-------------------------------------------------------------------------------------

Monday, June 1, 2015

कविता - तिची आठवण ...!

कविता- तिची आठवण..!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------
तिचा सहवास
तिचे गोड शब्द
हीच साठवण
तिची आठवण ….!

सोबत असते
ती माझ्या ,मी तिच्या 
 कुठेही  असते
तिची आठवण …!

डोळ्यातून बोले
ओठातून खुले
रूप तिचे हेच
तिची आठवण …!

आधार देणे ते
आधार घेणे हे
हात हाती देणे
तिची आठवण...!
-------------------------------------------------------
कविता - तिची आठवण …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------

Monday, May 18, 2015

कविता- जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ..!

कविता -  जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ..!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------
जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते
दिवस ढळतो असाच  ,रात्र तशीच सरते …!

मुक्त हस्ते अमापसे निसर्गाचे देणे असते
माणूस हावरट  ,ओरबाडणे चालू असते
जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते …
दिवस ढळतो असाच ,रात्र तशीच सरते …!

अंदाधुंद कारभार ,व्यवहार फसवे सारे ते
फायद्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार ते
भान विसरुनी जाते यात सारे ,काही न कळते
दिवस ढळतो  असाच  ,रात्र तशीच सरते …!

लाभले  आयुष्य कशासाठी ?, काय आपण करतो ,?
विचार कुणी याचा करता , वेडा तो मग ठरतो
सुखाच्या कल्पना भ्रामक , मनात कुणी रंगवतो
मन रमते यात सहज  ,बाकी सारे विसरते ।!

जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते
दिवस ढळतो असाच  ,रात्र तशीच सरते …!
------------------------------------------------------------------------------------------------------------
कविता - जीवनातले ऋतुचक्र हे रोज नव्याने येते ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, May 15, 2015

कविता - माणसाची ...!

कविता - माणसाची …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------------
माणसे भेटती रोजला  नित्य नव्या रुपात इथे
नाना कळा त्यांच्यात , आहेत तऱ्हा तितक्याच इथे ..।। १ ।।

कुणी भोळा-कुणी गाभोळा, हर गोष्टीवरती डोळा
धेपी गुळाच्या पाहुनी ,लगेच होती हे सारे गोळा  ।। २ ।।

सफाईदार बोलणे , रुबाबदार यांचे दिसणे
क्षणात भुलती भोळे जन , पाहुनी  रूप देखणे   ।। ३ ।।

साध्या मनाच्या माणसाची इथे हो असते परीक्षा
सराईत सदा सलामत , साध्याच्या नशिबी शिक्षा  ।।४ ।।

स्वार्थात गोडी असे मोठी ,माणसा आंधळा करते
चांगले तर कधी घडत नाही , वाईट ते सारे घडते   ।। ५ ।।
---------------------------------------------------------------------------------------
कविता - माणसाची …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------------------------

Thursday, May 14, 2015

लेख- मन-मित्र आपुला.

लेख -
मन एक मित्र आपुला ..!
(मनाच्या अंगणात -लेख-संग्रहातून )
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-----------------------------------------------------------------------------
"आपले मन "- आपला मित्र असते .त्याच्या बरोबरच संवाद  आपल्यासाठी हितकारक असतो. यालाच मनाचा -"आतला आवाज " म्हणतात . "मनाचा कौल घेऊन निर्णय घेणारी मंडळी घाई-घाईने निर्णय घेतातच असे नाही . "निर्णयक्षमता " ही बुद्धी आणि भावना "यांचे मिश्रण असते.  म्हणजेच -"मन" या दोन्हीवर अवलंबून असते का ? हा कुतूहलाचा प्रश्न आहे.

आपल्या मनास समजावणे , त्याला जे-जे  वाटते ", सगळेच काही नेहमी बरोबर असते असेही नाही, मग अशा वेळी मनास खरेच काही समजत नाही .पण, अशा वेळी " "मन रे , तू काहे ना धीर धरे ?..!  असे त्याला विचारून अगर समजावून काही उपयोग होत नाही ,याचे कारण -"चंचल मन" ,त्याची अवस्था पाहून ,आपली अवस्था मोठी विचित्र झालेली असते.

"सांगू की नको ? ", बोलू की नको ? " , "मला नाही जमले तर ?" , मला लोक हसले तर ? ", याला काय वाटेल ? ", त्याला काय वाटेल ? " , अशा नकारात्मक गोष्टीत अडकून बसण्य पेक्षा हाती घेतलेले कार्य पूर्ण करावी हेच उत्तम असते. जास्तीत जास्त काय होईल ? - आपले कार्य पूर्ण होईल--किंवा होणार नाही., ते चांगले जमेल किंवा जमणार नाही ", याशिवाय वेगळे असे दुसरे काही होणार नाही . तेंव्हा मनापासून परिश्रम करणे हेच आपले काम असते,त्या साठी आपण मनाला आणि स्वतःला कार्यरत ठेवणे उत्तम.

आपले मन -एक साक्षीदार असते. आपण कधी त्याच्या कला -कलाने वागतो, कधी त्याच्या विरुद्ध वागतो "- अशा वेळी आपल्या मनात द्वंद्व  सुरु होते  "ऐकावे जनांचे- करावे मनाचे "- असे असले तरी ,आपल्याच मनापासून आपण काही लपवू नये . मनाला फसवले नाही या प्रामणिकपणाचा आनंद तर घेता येतो आयुष्यभर .
"गाठणे तळ मनाचा
  कार्य अवघे कठीण
   निर्धार अंतरी माझ्या
   शोधात निघालो माझ्या ...!

संतसंग आणि सत्संग " या दोन गोष्टींचा लाभ झाला तर आपल्या मनाचा कायापालट होऊन जातो .त्यासाठी आपल्याला "श्रीगुरू " भेटावा लागतो. श्री सद्गुरू चरणी निष्ठा ठेवून कार्य करीत राहावे.. मित्र हो- "मन समजून घेणे - ते उमजणे " म्हणजेच आपल्या भवतालीच्या - सहवासातील माणसांची खरी ओळख  पटण्यासारखे  आहे. माणसातला माणूस समजून घेण्यात आयुष्याचे सार्थक असते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख -
मन एक मित्र आपुला ..!
(मनाच्या अंगणात -लेख-संग्रहातून )
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, May 8, 2015

ढाळू नकोस ….!

कुसुमाकर मासिक -मे-२०१५ अंकात प्रकाशित कविता
-----------------------------------------------------------------------------
ढाळू नकोस ….!
----------------------------------------
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?

ये भानावर तर जराशी तुही आता
स्वतःचा विचार करणार कधी ?
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
फसवणे हा एक खेळ सोपा इथला
कोण तरला ,कोण बुडला ,हिशेब ना कधी
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
केले प्रेम मनापासुनी ज्याच्यावरती
त्याचेच नव्हते प्रेम तुझ्यावरती
बहारीचा वसंत गेला ,उजाड झाले कधी ?
जगणे आहे तुजला ,चुकणार नाही कधी ।
ढाळू नकोस अनमोल आसवांना अशी
आठवेल तुला ,तुझे चुकले काय ,नि कधी ?
-------------------------------------------------------
कविता -ढाळू नकोस …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------

संदुक आणि गाठोडे ...!

संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------
पाण्यात साखर टाकली की ..ती हळुवारपणे विरघळून जाते..अगदी तसेच ..जुन्या  आठवणीत आपले मन अलगदपणे विरघळून जाते...ते हळवे क्षण , आठवणीत घट्ट रुतून बसलेली वर्ष ..त्या वर्षातले दिवस , हे सगळे आपण अगदी जीवापाड सांभाळून ठेवलेले असते ..मनाच्या संदुकात ..

.सन्दुक ...! जुन्या  पिढीने आणि आता जेष्ठ झालेल्या मंडळींनी पाहिलेली  एक उपयोगी वस्तू.. दर्शनी स्वरूप - धातूची एक मजबूत पेटी ..पण आपले मन यात इतके गुंतून गेलेले असते की ..या संदुकात ..असंख्य बहुमोल आठवणी ..साठवलेल्या असतात .कधी मोकळ्या तर कधी कुलुपबंद,कधी सगळ्यांशी शेअर करण्या सारख्या तर कधी एकांती - एकटयाने..हळुवार मनाने .डोळ्यातील थेंबांनी ,मनाशी साधलेला संवाद ...या आठवणीशी निगडीत असतो.

तसेच हे ओबडधोबड वाटणारे "गाठोडे ".. यात साठवलेले असते आपले व्याकूळ असे भावविश्व , आयुष्याचचे उन्हाळे-पावसाळे ..मोर पिसा सारखे या गाठोड्या तील .महावास्त्रात निगुतीने घडीत घडी करून ठेवलेल्या असतात. एकेक घडी म्हणजे आपल्या जीवन अनुभवाची कहाणी असते ..एकेक चिंधी .करून कहाणी असते, कधी ती कमावलेल्या क्षणांची असते तर कधी हातातून निसटून गेलेल्या संधीची असते..

निरुपयोगी झालेल्या गोष्टी "आपण टाकून देण्याची तयारी सहजतेने करतो ,पण या सन्दुक ला आणि या गाठोड्याला ", टाकून देण्याचा विचार सुद्धा मनात येणार नाही हे नक्की. काय ?, बरोबर ना ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदुक आणि गाठोडे ......!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------

Sunday, May 3, 2015

बाल -कविता - बाहुली कित्ती छानसी ...!

दै .देशोन्नत्ती --०३मे-१५, रविवार पुरवणीत प्रकाशित
------------------------------------------------------------------
बाहुली कित्ती छानसी …
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------
आईची असे लाडकी
म्हणते ती सारखी
परी ग माझी गोड ही
बाहुली कित्ती छानसी ...!

दादू भारी लाड करी
काही तरी आणतो तो
कामावरून जेव्न्हा
रोज येतो तो घरी ...!

पिंक पिंक ड्रेस माझा
बाबांना आवडे भारी
पाहून मला म्हणती
बाहुली कित्ती छानसी ...!

आजीच्या गावी जाता
गळ्यात तिच्या पडते
आजीच्या डोळ्यातली
माया सारी ती दिसते ...!

फिरायला जाते मी ही
असतात आबा सोबत
त्यांचे मित्र विचारतात
बाहुली कोण छानसी .?...!
-----------------------------------------------------------------------
बाल-कविता -
बाहुली कित्ती छानसी ...!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------

Wednesday, April 29, 2015

कविता - लोभसवाणे रूप तुझे ...!

कविता - लोभसवाणे रूप तुझे …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------
सकाळच्या त्या निरागस प्रहरी
पाहतेस  कोवळ्या ऊन्हाच्या छटा
मी मन भरुनी त्याच वेळी पाहतो 
तुझ्या चेहेऱ्यावरच्या रेशीम बटा...!

हसणे लोभसवाणे शोभते छानसे
गोजिऱ्या गोड चेहेरयावरती तुझ्या
मिस्कीलता तरळते निर्मळशी
 जी नजरेत नेहमी दिसते तुझ्या  ।

 रूपवती श्रीमंत खरी आहेस तू
मी चाहता तुझा एक गरीब खरा
 मेहेरबानी असुदे जरासी तुझी
दुरुनी सही प्रेमाने लक्ष असूदे जरा  …!
------------------------------------------------------------
कविता - लोभसवाणे रूप तुझे …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------

Friday, April 17, 2015

कविता - वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!

कविता - वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------------------
काय माहौल इथला सांगू लोकहो
मेहफिल भरजरी ही सजली सारी
मुखवटे सुंदरसे दिसती चेहेरी
वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!

मनास विसरुनी जगती हे सारे
मृगजला पाठी धावणे यांचे सारे
अफाट धावूनी  थकती किती सारी
वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!

रिझवण्या गात्रास आपल्या येती येथे
कला  अवगत असते सर्वांना सारी
बेमालूम फसवणेही  जमते भारी
वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!
-----------------------------------------------------------------
कविता - वेदनेचे घोट परी रिचविती सारी ….!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------------------

Monday, April 6, 2015

कविता - वाटचाल ...! -अरुण वि.देशपांडे .

कविता - वाटचाल …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------
प्रश्नांचे खड्डे ,समस्यांचे अडथळे
रस्ते नसती त्यात सरळ सगळे
चालणे चुकत नसते ते कुणाचे
बळ द्यावे आपण मना चालण्याचे ….!

काय कुणा मिळावे ? ते कधी मिळावे ?
या शंकेने मनास कधी न शिणवावे
प्रयत्नांती फळ नक्कीच ते मिळते
मनावर आपल्या पक्के ठसवावे ….!
अनुभवी जाणते असती सोबती
ऐकून घ्यावे सार्थ बोल सदा त्यांचे
हेच अनुभव दावी मार्ग सुलभ
ध्येयप्राप्तीच्या खडतर वाटचालीचे ….!
-------------------------------------------------------------------------------------
कविता - वाटचाल …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------------------------------------------------------

Saturday, February 28, 2015

माझाये नवे ई-बुक - " स्नेहबंध - चारोळी संग्रह.


नमस्कार रसिक मित्र हो-
माझ्या या नव्या ई-बुक- "स्नेहबंध -चारोळी संग्रह -Free Copy साठी कृपया तुम्ही तुमचा Email id प्रकाशकांना कळवावा .- netbhaari@gmail.com या मेल आयडी वर.
स्नेहबंध आज येतोय भेटीला
आपली प्रत राखून ठेवा
स्नेहबंध : ई चारोळी संग्रह
कवी : श्री. अरूण देशपांडे ...
See More

Wednesday, February 25, 2015

कविता - जितुके- तितुके ...!

कविता - जितुके- तितुके …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे
-------------------------------------------
सामोरे जाणे भिडणे प्रश्नाला
हेच खरे आव्हान रे मनाला
तू सारे टाळशील  हे जितुके
दूर पळणे सोपे नसे तितुके ….!

भाबड्या मनाने नसते कधी
 लढायची जिंदगीची लढाई
आपली वाटतील जे जितुके
होती  क्षणात परके तितुके ….!

संस्कार जरी देती आपणासी 
भान जीवन  जगण्याचे सदा
अवडंबर नसावे याचे कधी
आचरणी जितक्यास तितुके …!

मिळे आयुष्य एकदाच हे
मनापासुनी ते जगूनी घ्यावे
मिळे रे आपणासी जे जितुके
आनंद देण्या पुरेसे तितुके …!
-------------------------------------------------------------------
कविता - जितुके- तितुके …!
-अरुण वि. देशपांडे -पुणे
-------------------------------------------------------------------------

Friday, February 13, 2015

३६-व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य-श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय.

आपल्यासाठी एक गौरवपूर्ण असा दिन-विशेष आहे..
त्या निमित्ताने-
३६-व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष्य-श्री.लक्ष्मीकांत देशमुख
यांचा परिचय.
--------------------------------------------------------------------------------------------------
स्नेहश्रीमंत "- श्री.लक्ष्मीकांत देशमुख.- लेखक आणि प्रशासक -अधिकारी.
----------------------------------------------------------------------------------------------
माणसांच्या नशिबात काही श्रेष्ठ असे भाग्यकारक -योग असतात ,ज्यांचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावार आणि जीवनावर होत असतो. असाच एक श्रेष्ठ -भाग्यकारक योग ", माझ्या वाट्यास १९९३ ते १९९६ या तीन-साडेतीन वर्षाच्या काळात आला . परभणीच्या साहित्यिक मित्रांच्या जडण-घडणीला अतिशय महत्वपूर्ण असा हा कालखंड होता. याच दरम्यान श्री.लक्ष्मीकांत देशमुख परभणीला डे.कलेक्टर या पदावर बदलून आले , मसाप -परभणी च्या विविध -कार्याक्रम्न्च्या निमित्ताने त्यांच्याशी परिचय झाला ,ओळख दृढ होत गेली ,आणि आज २२ वर्षे झाली असतील ,त्यांच्याशी असलेल्या स्नेह्बंधाला अधिकच खुमारी आलेली आहे.
परभणीच्या वास्तव्यात देशमुखांनी साहित्यिकांना एकत्र जमवले , कार्याकामंची रेलचेल सुरु झाली होती. शासकीय अधिकारी असलेल्या व्यक्तीचा सहवास लाभण्याचा माझ्या वाट्यास आलेला हा पहिलाच प्रसंग होता.त्यामुळे देशमुख हे "साहेब" आहेत ही संकोची भावना त्यावेळी होती आणि आज ही ती तसीच आहे. मला वाटायचे -त्यांना त्यांचा हा मोकळेपानाचा -दिलदारपणाचा स्वभाव शोभून दिसणारा आहे ", याचा अर्थ असा नाही की- आपण अघळ-पघळपणा दाखवून त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे प्रदर्शन करीत फिरावे. देशमुख तसे मोठे "मनकवडे -मित्र आहेत" ,ते अनेकदा म्हणायचे "अहो आपण मित्र आहोत ,इतके भीडस्तपणे वागू नका " ,पण इतक्या मैत्रीत ही आमच्यात एक "निदान-रेषा ", निदान मी स्वताःपुरती आखून घेतलेली होती .
खूप वर्षांपूर्वी -साहित्य-सूची अंकात -मी त्यंच्यावर एक लेख लिहिला होता "द्वारकेचा राणा "- त्यातल्या प्रमणे ते "कृष्ण -आणि आम्ही सुदामा - अशी माझी स्नेह -भावना व्यक्त केली होती.आजही अशीच भावना माझ्या मनात आहे
नवे-नवे उपक्रम सुचणे आणि ते अंमलात आणल्याशिवाय स्वस्थ न बसणारे देशमुख - इतरांना आपल्या बरोबर कायम कार्यरत ठेवतात "हा त्यांचा " गुण-विशेष " मला फार प्रभावित करून गेलेला आहे. त्यांच्या कार्यकालात त्यांनी -परभणी जिल्हा साक्षरता अभियान समितीची स्थापना केली.. आणि या समितीत लेखक-आणि कलावंत यांना सदस्य म्हून सहभागी करून घेतले , आम्ही नोकरदार -लेखक या बहुमानाने मोहरून गेलो. त्यांनी आम्हा सगळ्या लेखक -मित्रांना साक्षरता -अभियाना साठी लेखन करायला लावले ..
देशमुख साहेब्न्च्या स्वभावात असलेल्या - निर्मल भावनेचा आणि निरपेक्ष -कार्य-पूर्ततेचा " हा आनंद होता , ज्यात आम्ही सहभागी होतो.
खर तर याही पेक्षा खूप अविस्मरणीय असा अनुभव -१९९५ सालचा आहे - ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन - अध्यक्ष्य होते कविवर्य -नारायण सुर्वे . साहित्य संमेलनाच्या आयोजन-इतिहासात परभणीच्या या साहित्य -संमेलनाची एक यशस्वी -संमेलन म्हणून आज ही उल्लेख केला जातो. लक्ष्मीकांत देशमुख या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष्य होते.. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीम-मध्ये .."बाल-मेळावा -कार्यवाह "म्हणून मला कार्य करण्याची संधी मिळाली , आणि आज साहित्यिक म्हणून आणि मराठवाड्यातील बाल-साहित्यात कार्यकर्ता -म्हणून माझी जी ओळख आहे -त्याचे सगळे श्रेय या माझ्या स्नेह्यास आहे..
२००७ ते २००९ या दरम्यान लक्ष्मीकांत देशमुख यांनी "क्रीडा -आयुक्त -पुणे" या पदावर कार्य केले आणि त्यांच्या कार्य-कुशल प्रवासातला एक यशस्वी अध्याल लिहिला गेला. त्यांच्या या कार्यकालात - १. १३ वा - राष्टीर्य युव-महोत्सव आयोजित केला गेला, आणि २००८ मध्ये - "राष्ट्रकुल युवा -क्रीडा स्पर्धा "संपन्न झाल्या , या साठीचे
बालेवाडी -पुणे येथे अद्यावत असे क्रीडा संकुल - एप्रिल -२००७ पासून केवळ २० महिन्यात उभारले गेले
हा कालखंड त्यांच्या साठी मोलाचा ठरावा असाच होता.
१९९६ नंतर परभणीच्या आणि मराठवाड्याच्या बाहेर ही , देशमुखसाहेब्न्च्या भेटी अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात होत असतात , त्यात त्यांच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमास मी आवर्जून हाजीर राहिलो आहे. उदा- साहीर लुधियानवी -बलराज सहानी फाउंडेशन- पुणे यांचा पुरस्कार -त्यांना जाहीर झाला तो कार्यक्रम , ३-रे शाशकीय साहित्य सम्मेलन ऑक्टोबर -२०११ मध्ये पुण्यात झाले - लक्ष्मीकांत देशमुख या साहित्य- संमेलनाचे अध्याक्ष्य होते.
शासकीय सेवेत असतांना कोल्हापूर यथे त्यांनी "बेटी बचाव " हा उपक्रम राबवला ,या उपक्रमाने देशमुख यांच्या सामाजिक -विचारांची आणि जाणीवेच्या कार्याची देशभरातून दाखल घेतली गेली आहे.या उपक्रमाने देशमुखांना एक ओळख मिळाली .त्यांच्या या गौरवपूर्ण कार्याचा एक मित्र म्हणून खूप अभिमान वाटतो.
कलेक्टर - कमिशनर " या खुर्च्या जबाबदारीच्या असतात पण लेखक -,देशमुखांनी या सर्व धबडग्यात - आपले लेखन थांबवलेले नाही .ते सातत्याने विविध आणि विपुल लेखन करीत आहेत .नजीकच्या काळात त्यांचे हे साहित्य पुस्तक - रूपाने येतच रहाणार आहे.
लेखक- कादंबरीकार -कथाकार -म्हणून लेखक- लक्ष्मीकांत देशमुख यांना साहित्यातील प्रतिष्ठा-प्राप्त असे साहित्य -पुरस्कार आणि मान-सन्मान प्राप्त झाले आहेत
त्यांच्या प्रकाशित साहित्याची ही एक झलक -खालील प्रमाणे.-
-------------------------------------------------------------------------------------------------
१. इन्किलाब विरुध्द जिहाद - (२००४ ) राज्यपुरस्कार आणि इतर पुरस्कार प्राप्त कादंबरी
अंधेरनगरी - कादंबरी ( १९९४ ) , ऑकटोपस -(२००६ ) , बखर -(२०११ ) या त्यांच्या बहुचर्चित कादंबर्या आहेत.
२. पाणी .! पाणी ! (२००३ -दु.आ. ) , अग्निपथ -(२०१०) , नंबर वन ( २००८) , अंतरीच्या गूढ गर्भी -(१९९५) , ही त्यांच्या काही कथा- संग्रहाची नावं.आहेत
अशा या माझ्या मित्राच्या साहित्यिक जीवनात एक गौरवाचा क्षण आलेला आहे . १४-१५ फेब्रुवारी- २०१५ , नांदेड येथे संपन्न होणार्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष " म्हणून श्री .लक्ष्मीकांत देशमुख यांची एकमताने निवड झालेली आहे.या बहुमांच्या निमित्ताने आपल्या मित्राबद्दल व्यक्त होण्याची संधी मला मिळते आहे.
श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचे मन:पूर्वक अभिनंदन.आणि साहित्य संमेलनास शुभेच्छा .
स्नेहांकित -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
arunvdeshpande@gmail.com
mo- 9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------
Like ·
·

Saturday, January 17, 2015

कविता - गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!

कविता - गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!
- अरुण वि. देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------------
गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो
वेळ कोणती काळ  कोणता हेही  विसरुनी गेलो ...।।

उषा प्रभातीची तू  मजसाठी  ,स्वागता तुझ्या उठलो
सोनेरी किरणे  लेऊन येता ,मोहरून  मी गेलो
वेळ कोणती काळ  कोणता हेही  विसरुनी गेलो
गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!

सुंदरता अवतरली तुझ्याच रुपात सखये
पाहुनी तुज ,  भान माझे  क्षणात  हरपुनी बसलो
वेळ कोणती काळ  कोणता हेही  विसरुनी गेलो
गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!

हर एक गुणांचे आपल्या व्हावे कौतुकसे  वाटे
 तू प्रिय मजला किती ,हे तुजला  सांगावे  वाटे
ऐकावेस तू मनापासुनी ,सांगण्यास मी बसलो
वेळ कोणती काळ  कोणता हेही  विसरुनी गेलो
गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!

गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो
वेळ कोणती काळ  कोणता हेही  विसरुनी गेलो ...।।
----------------------------------------------------------------------------------------------
कविता - गोडवे तुझ्या रूपाचे सखे गाण्यात रंगून गेलो …!
- अरुण वि. देशपांडे -पुणे.
----------------------------------------------------------------------------------------------