Monday, January 14, 2019

नवी लघुकथा - आबा माफ करा हो मला ! ले- अरुण वि.देशपांडे

दै.सत्य -सह्याद्री -सातारा -रविवार साहित्य पुरवणी -दि.१३-०१-२०१९ .अंकात प्रकाशित
-------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा -
आबा माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------
आबा येऊ का आत ?
हो, परवानगी घेऊनच येते आहे पहिल्यांदा ,
तुम्ही म्हणाल , हे काय नवं खूळ परवानगीचं ?
तसे नाही आबा , तुम्ही रागावलात त्या दिवशी माझ्यावर ..
म्हणालात , येऊ नको पुन्हा माझ्याकडे ",
आलीस तर ..परवानगी घेऊनच ये ..मग आज येतांना 
- येऊ का आत ? आबा 
असे विचारले तुम्हाला  ....

त्या दिवशी काय बिनसलं होतं माझं , कुणास ठाऊक ?
सगळा राग मी माझ्या कुहूराणीवर काढला ,
बिचारी एवढी छोटीशी पोरगी - तिला कळेचना .आपली आई 
असे का रागावली आहे अचानक ..
माझा आवाज आणि कुहुराणीचे रडणे तुमच्या कानावर आले  ,
आणि तुम्ही आमच्या घरात आलात ..
कुहुरांणीला जवळ घेतले , तिला शांत करीत समजावले ..
मग मला म्हणलात ..
तुला एक कळतंय का ?
ती केवळ लहान आहे..म्हणून तुला काही प्रतिउत्तर देऊ शकली नाही ,
पण ,तू तर मोठी आहेस, समजदार आहेस , तिची आई आहेस..
मग ..असे वागून ,बोलून तू काय मिळवले ?
मुलीला दुखावलेस ..हे बरोबर नाही..खूप चुकीचे वागलीस ..

तुम्हा आजच्या आई-बाबांना ..धड पालक  होता येत नाही आणि आई-बाबा होणे 
तर मुळीच जमत नाही ..
अगोदर स्वतहा चांगले आई-बाबा होण्याचा प्रयत्न करा ..मग शिकवा पोरांना ..!

डोकं शांत झालं , मन शांत झाल ..मग ,तुमचे बोलणे आठवले ..
आबा ..खूप खजील झाल्या सारख वाट्य मला ..
म्हणून तर ..तुमच्याशी बोलायला आले आहे ..ऐकून घ्या प्लीज...

आबा ..तसे तर आपण एकमेकाचे कुणीच नाही , पण बघा ना ,
शेजारी झालोत ,आणि सहवासाने नाते जुळले ..
माझ्या मुलांनी तुम्हाला प्रेमाने आणि हक्काने ..
ज्या दिवसापासून तुम्हाला  " आमचे आबा " म्हटले ..
त्या दिवसापासून ..तुम्ही सगळ्या सोसायटीचे आबा " झालात ..
लहानच मुलं काय, आम्ही मोठी माणसे सुद्धा तुम्हाला 
"आमचे आबा म्हणू लागलो ..

तुम्ही आपल्या वागण्याने , बोलण्याने सगळ्यांना आपलेसे केले ,
हे नाते प्रेमाचे आहे , मैत्रीचे आहे, विश्वासाचे आहे ..
खरं सांगू का आबा - आमच्यासाठी खूप छान अनुभव आहे हा ..

आम्ही आमच्याच कोशात स्वतःला अडकून घेतलय ..सर्वांची आमचे स्नेह-बंध 
तुटले आहेत , माणसे दुरावली आहेत .आमची .
याचे काहीच दुखः आम्हाला होत नाहीत 
इतके आम्ही कोरड्या मनाची माणसे झालो आहोत ..

पण आमच्या या स्वभावाला , आमच्या वागण्याला तुम्हीच वठणीवर आणण्याचा 
प्रयत्न केलात , आमच्या मुलांना तुम्ही आपले मानलेत  ,आम्हाला आपले मानलेत ",
आपापल्या आई-बाबांना फक्त सुट्टीच्या दिवशी भेटणार्या आमच्या मुलांना तुमच्यासारख्या 
वडीलधार्या माणसाकडून काळजी , माया , म्हणजे काय असते हे कळू लागले ..

आबा तुम्हाला तर माहितीच आहे की -
आजकाल आहे ती नाती ..मानायची नाहीत ,"  नात्यांना जोडून ठेवणे दूरच ,
ती तोडता कशी येतील ?'हे डावपेच लढवण्यात गुंतून गेलीय आजची पिढी ,
आपली माणसे परकी करून टाकायची ..आणि परक्यांना -आपले मानायचे ..!
आजच्या नात्यांची अशी दयनीय अवस्था होऊन बसलीय ...!

अशा वेळी आम्हाला तुम्ही भेटलात आबा ..
तुमची गरज आहे आम्हाला , तुमचा आधार , तुमचे शब्द आम्हाला सैरभैर होऊ देणार नाहीत .
याची खात्री आहे आम्हाला ..
आबा ,तुम्ही जीवन अनुभवलंय , माणसाना आजमावून पाहिलंय ..
आम्ही तर अजून कच्ची मडकी आहोत .. आम्हाला थापट्या मारून पक्के घडवा हो..

मी खूप चुकीचे बोलले ,चुकीचे वागले त्या दिवशी ..मनापासून चूक काबुल करते आबा ..
पुन्हा असे वागणार नाही ..प्रोमीस ..
आबा - माफ करा हो मला  ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा - आबा -माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, January 2, 2019

#चंदर -(बालकुमार कादंबरी)- अंतिम भाग -12 वा


# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक मित्र हो - माझी १९९७ साली प्रकाशित झालेली पहिली बालकुमार कादंबरी , मी क्रमश: सादर केली,
आपण  प्रतिसाद दिलात , खूप धन्यवाद.
ही कादंबरी कशी वाटली ,आपले अभिप्राय जरूर द्यावेत.
सर्वांचे आभार.
अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
----------------------------------------------------------------------------
विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून 
कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते .
आजचा पदवीदान समारंभ ", "प्रमुख पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात होता. आयोजकांची घाई चालू होती. या सगळ्या गडबडीकडे 
चंदर पहात होता. कोपऱ्यात उभ्या असलेल्या चंदरकडे पाहण्यास कुणाला वेळ ही नव्हता . प्रत्येकजण आपल्यातच गुंग झालेला आहे ",हे
चंदरला जाणवत होते.
आजच्या पदवीदान समारंभात कुलपतींचे सुवर्णपदक " चंदरला प्रदान करण्यात येणार होते. मिळवलेली पदवी आणि प्राप्त झालेले यश ",
दोन्ही गोष्टी चंदरला सुंदर स्वप्ना सारख्या वाटत होत्या.
या ज्ञान -मंदिरापर्यंत आपली वाटचाल होईल ", याची त्याने कल्पनाही केली नव्हती. "शाळा नसलेल्या वाडीतून पायपीट करून शहरात 
येऊन शिकावे लागले " "कष्ट केल्यावरच काही मिळत असते ", याची जाणीव चंदरला झाली होती.
रहाण्यासाठी ,जेवण्यासाठी ", किती त्रास सहन करावा लागला ", हे आज आठवतहोते. जुन्या गोष्टींच्या आठवणी चंदरला व्यथित करून 
सोडीत होत्या , ते गेलेले दिवस पुन्हा पुन्हा नजरे समोर येत होते . " कठोर परिश्रमाशिवाय काही साध्य होत नसते ", गुरुजींचे शब्द अजूनही 
त्याच्या कानात घुमत होते.
"आई-बापूचे कष्ट आणि त्यांचे आशीर्वाद ,गुरुजींची प्रेरणा , मोठ्या मालकांचा -रावसाहेबांचा आधार ",या साऱ्या गोष्टी आपल्या पाठीशी 
सदैव होत्या म्हणून आपण पुढे पुढे जाऊ शकलो ,
कुठे आपली छोटीशी वाडी  आणि कुठे हे मोठ्ठे शहर  ", फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आपण इथ पर्यंत आलो . नदी वर जाऊन गाई- म्हशी  धुणारा 
हा चंदर ", आज पदवीधर झालाय ", हे कुणाला खरे वाटेल काय ? चंदर ने स्वतहाला हा प्रश्न विचारला .

एवढ्यात ध्वनिक्षेपकावर कार्यक्रम सुरु होतो आहे ..अशी घोषणा कानावर पडली . उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठ सुशोभित झालेले होते .
आणि निवेदकांनी  सांगण्यास सुरुवात केली - 
"या वर्षीच्या कुलपती- सुवर्ण-पदकाचा मानकरी - त्याचे नाव आहे..चंदर बापू वाडीकर ",
व्यासपीठाच्या पायऱ्यांना स्पर्श करून .मनातल्या मनात अभिवादन करून चंदर व्यासपीठावर आला . माननीय कुलगुरूंनी चंदरच्या हातात 
पदवी-प्रमाणपत्र दिले आणि मग त्याच्या गळ्यात "सुवर्ण -पदक "घातले ", त्याक्षणी सभा-मंडपात असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ",
करून गुणवंत चंदरचे अभिनंदन केले.
गौरव -स्वीकारून चंदर व्यासपीठावरून खाली मंडपात येऊ लागला होता , त्याचवेळी पुढच्या रांगेत बसलेल्या रावसाहेब , गुरुजी आणि बापूकडे 
त्याची नजर गेली , त्याने पाहिले ..की..
बापूच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहात आहेत "आणि मोठे मालक -रावसाहेब आपल्या बापूच्या पाठीवरून हात फिरवीत आहेत. गुरुजींच्या हातातल्या 
उपरण्याने बापू डोळ्यातील आनंदाश्रूंना थांबवत होते."
गळ्यात सुवर्णपदक आणि हातात पदवी-प्रमाण-पत्र घेऊन येणाऱ्या" आपल्या चंदर कडे  बापू भरल्याडोळ्याने पहात होते . "आपला चंदर एव्हढा 
मोठा आणि शहाणा झाला आहे " हे खरेच वाटत नव्हते .
आकाशाकडे पाहून हात जोडीत बापू म्हणत होता - देवा -परमेश्वरा - तुझ्या क्रुपेन हे घडलं रे बाबा ..!

रावसाहेब आणि गुरुजी  बसले होते त्या खुर्ची जवळ येऊन चंदर थांबला. खाली वाकून त्याने आधी रावसाहेबांना नमस्कार केला .
चंदरला जवळ घेत  रावसाहेब म्हणाले -
"बेटा चंदर , नाव कमावलं तू. आज सगळ्या गावाला अभिमान वाटावा असं यश तू मिळवले आहेस. मला खूप आनंद झालाय.
हे ऐकून चंदरचे मन समाधानाने काठोकाठ भरून आले. आपल्या गुरुजींच्या पायांना स्पर्श करीत तो म्हणाला -
"गुरुजी , हा आनंदाचा दिवस उजाडला आहे तो केवळ तुमच्यामुळे ".
चंदरच्या पाठीवरून हात फिरवीत -काही न बोलता गुरुजींनी आशीर्वाद दिले. त्यांच्या स्पर्शातून चंदरला गुरुजींच्या मनातील भावना समजल्या .

गावाकडे जाणऱ्या गाडीमध्ये सारेजण बसले. खिडकीतून बाहेरच्या देखाव्याकडे चंदर पहात होता. त्याला त्याचे छोटेसे जग आठवत होते, आणि 
आज त्याचे जग किती बदलून गेले होते. आजच्या आनंदाच्या दिवशी चंदरचे मन त्या दिवसांच्या आठवणीनी भरून येत होते. "जणू कालच घडून 
गेल्या असाव्यात "अशा त्या आठवणी चंदरच्या डोळ्यासमोर येत होत्या.अचानक एका वळणावर बस थांबली ,धक्क्याने चंदर भानावर आला.
त्याने खिडकीबाहेर पाहिले ,

त्याची वाडी आता जवळ आलेली होती. शेजारी बसलेल्या बापू, रावसाहेब आणि गुरुजी कडे त्याने पाहिले ",चंदरच्या गौरवाने -यशाने सारेजण आनंदाने 
तृप्त झाले होते.
गाव आल्यावर सारेजण उतरले , समोर आलेल्या काही जणांनी त्यांना सांगितले .अगोदर शाळेत जायचे आणि मग घराकडे ..
रावसाहेबांनी विचारले - "कार्यक्रम ?आहे तरी काय ?
एकजण म्हणाला - मोठे मालक शाळेत तर चला ,मग आपोआप समजेल की ...
ठीक आहे चला , असे म्हणून..
सारेजण शाळेच्या मैदानवर आले. गावकऱ्यांची चंदरचा सत्कार करण्याचे ठरवले आहे",याचा कुणाला पत्ता लागू दिला नव्हता.

समारंभ सुरु झाला. गुरुजींच्या आणि चंदरच्या यशाबद्दल बोलतांना ,आज सगळ्या गावाला खूप आनंद झालाय असे रावसाहेब म्हणाले,.
हातातला हार ते चंदरच्या गळ्यात घालणार ,तेंव्हा चंदरने त्यांना थांबवले ..आणि  म्हणाला -
"मालक - हा हार आणि हे सुवर्ण-पदक ", तुम्ही तुमच्या हाताने माझ्या गिरीजामायच्या गळ्यात घालावा ", अशी माझी इच्छा आहे . माझे हे यश  आहे 
ते "तिच्या त्यागाचे ,तिच्या वेड्या मायेचे आहे ".
चंदरच्या इच्छेप्रमाणे - रावसाहेबांनी मोठा हार आणि सुवर्णपदक ",गिरीजा -माय च्या गळ्यात घातले ", त्यावेळी सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला .
हे पाहतांना गिरीजा आपल्याच मनाला विचारीत होती..
" आपला चंदर एवढा माणूस केवा झाला ?"

गावकर्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलतांना चंदर म्हणाला-
गावकरी मंडळी हो- हे सगळ घडलंय ते फक्त गुरुजींच्या मुळे आणि रावसाहेबांच्या आशीर्वादामुळे ", गुरुजींनी आपल्या वाडीचा कायापालट केलाय आणि 
वाडीला नवे जीवन दिले . त्यांच्या या कार्याची मला परतफेड करायची आहे , तुमच्या साक्षीने ती मी करणार आहे ..ती म्हणजे -
"गुरुजींच्या शाळेतच -शाळेतला गुरुजी होऊन " मी वाडीत रहाणार आहे, कुठेच जाणार नाही.
सारा गाव या शब्दांनी खुश झाला. त्यांचा चंदर "खरोखरी -गुणी चंदर होता.". '
चंदरच्या यशाने सारी वाडी आज मोहरून गेली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------- समाप्त -------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश :
: " अंतिम - भाग- १२ वा -"
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------