Tuesday, January 30, 2018

साप्ता.चपराक - अंक दि.२९-०१-२०१८ -कव्हर -स्टोरीचा बहुमान मिळालेला लेख

साप्ता.चपराक-पुणे .अंक दि.२९-०१-२०१८ - कव्हर स्टोरी "चा बहुमान मिळालेला लेख.

लेख - ५० वर्षानंतर -श्री गुरुजनांची अविस्मरणीय दर्शन-भेट .
ले- अरुण वि.देशपांडे 
-------------------------------------------------------------------------------------------
१९६५ ते १९६७ म्हणजे बरोबर ५० वर्षापूर्वी . , परभणीहून वडिलांची हैद्राबाद बँकेच्या गन फौंड्री.या मुख्य शाखेत बदली झाली आणि आमचा परिवार हैद्राबाद या मोठ्या शहरात आला .
 सुलतानबाजार - बडीचावडी जवळ , ..हेल्थ -लीगच्या बाजूला .अरविंद गाजरे यांचे घर हा आमचा निव्वास पत्ता झाला , हेल्थ -लीग "ही   लोकप्रिय असणारी व्यायामशाळा आणि आजच्या भाषेत म्हण्याचे तर "क्रीडा -संकुल ,आमच्या घराला लागून होते ,ही आमच्या घराची ठळक अशी खुण होती.  हैद्राबाद मधील प्रसिद्ध मराठी शाळा आणि कोलेज "विवेक वर्धिनी " हे त्या संस्थेचे नाव , बाहेरगावाहून बदली होऊन आलेल्या आमच्या सारख्या मुलांना या शाळेत प्रवेश सहजा साहजी मिळत नसे ..त्यामुळे आमच्यासाठी जवळच असलेले सरकारी हायस्कूल काचीगुडा " सोयीचे होते ,
दहावी आणि -अकरावी "  ही दोन वर्षे मी हैदराबादच्या सरकारी हायस्कूल काचीगुडा ..या शाळेत होतो , 
या काचीगुडा -हायस्कूल मध्ये ५ भाषांमधून  शिकवले जात असे  उर्दू, तेलगु , तामिळ ,हिंदी आणि मराठी .

टेन्थ- डी , आणि एलेवेन्थ - ई " यांच्या तुकड्या  यात दोन्ही वर्षी ४०-४५ विद्यार्थी असावेत असे आता आठवते आम्हाला शिकवणारे शिक्षक .. जानराव देशपांडे , मधुकरराव गीराटे, पोहनेरकर , पुरोषोत्तमराव देशपांडे , गजानन लोके, काशीकर , लक्ष्मीकांत तोडेवाले , महाबळेश्वरकर बाई , बाम बाई ..ही नावे स्मरणात आहेत. 

२००९ मध्ये म्हणजे ४२ वर्षांच्या प्रदीर्घ काळा नंतर  ..अचानकपणे .कळाले की आमच्या त्यावेळच्या  एच एस सी " वर्गात असलेले आम्ही ५-६ मित्र  .पुण्यात स्थायिक झालेलो आहोत .. हा शोध लागल्या नंतर आम्ही नियामित भेटू लागलो ...
पुण्यात सध्या आम्ही सहाजण वास्तव्यास आहोत ..रवी जोशी -औंध , हरीश काशीकर - टिंगरे नगर , प्रदीप तुंगार - पौड रोड -कोथरूड , हे तिघे जन .डिफेन्स सर्विस मधून सेवानिवृत्त झालेले मित्र , हेमंत देशपांडे - सिंहगड रोड.हा डहाणूकर कोलोनितल्या कमिन्स मध्ये होता , चिंचवड मध्ये असणारा अशोक दळवी - बीएसएनएल मध्ये होता , आणि सुभाष काळे व मी -आम्ही दोघे जन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मधून रिटायर झालोत.

 आमच्या एच एस सी झाल्याचे वर्ष आणि , आमच्या मैत्रीची पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे साक्ष होते.ते वर्ष -२०१७ . 
अशाच एका भेटीत .. आमचा क्लासमेट आणि त्यावेळचा मोनीटर असणारा दिगंबर गवाणे पुण्यात आला ..त्याच गप्पात ठरवले गेले आणि पक्के झाले की जानेवारी महिन्यात आपण त्यावेळचे वर्गमित्र एकत्र येऊन आपल्या शाळेच्या आठवणी जागवू या ..

आणि त्या प्रमाणे ५-६-७  जानेवारी २०१८ ला आमचा छोटेखानी मेळावा हैद्राबाद मुक्कामी संपन्न झाला 
हैदराबादचे स्थानिक मित्र - श्रीधर देशपांडे , विनोद रानडे , बाल मोहन दास , श्रीकांत नाईक , श्रीकांत कुलकर्णी , सुर्यकांत जोशी , सुर्यकांत पाठक ,हे मित्र आम्हाला येऊन मिळाले  .
 दिगंबर गवाणे यांनी आमच्या पाहुणचाराची चोख व्यवस्था केली, आणि आमची पुनर्भेट झकास साजरी केली 
या भेटीचे मुख्य प्रयोजन होते ..आम्हाला ज्यांनी शिकवले अशा गुरूंना -सरांना समक्ष भेटणे ..आमची इच्छा ..मित्र -श्रीधर देशपांडे -दिगंबर गवाणे या मित्रांनी पूर्ण केली .खूप शोध घेऊन ..त्यांनी श्री.पाठक सर, आणि बीजगणित शिकवणारे काशीकर  सर यांचे पत्ते  आणि फोन नंबर मिळवले ..त्यांच्या या चिकाटीचे आणि परिश्रमाचे कौतुक करावे तितके कमीच आहे .
हैदराबादच्या दोन टोकाच्या दोन उपनगरात पाठक गुरुजी आणि काशीकर गुरुजी रहातात .एकाच दिवशी दोन्ही भेटी शक्य नव्हत्या ..मग आम्ही अगोदर पाठक गुरुजी ..वय वर्षे -८४ , यांच्या घरी गेलोत , ५ जानेवारीला संकष्टी -चतुर्थी होती ..दुपारी एक वाजता आम्ही पाठक  सरांच्या घरी गेलो त्यावेळी सरांची पूजा चालू होती ..त्यांनी या या -बसा बसा असे हातांनी खुणावले ..पूजे नंतर त्यांच्या सोबत आम्ही सर्वांनी आरती केली 

थोड्यावेळाने .. .मग पाठक सरांनी आमचे परिचय करून घेतले ..इतक्या वर्षानंतर त्यांचे माजी विद्यार्थी आठवणीने आवर्जून भेटण्यास येतात ..याचे त्यांना खूप अप्रूप वाटले, समाधान वाटले , शाल-श्रीफळ -मिठाई देऊन सरांचे "श्री गुरु-पूजन केले ", सरांच्या कुटुंबीयांनी आम्ही सरांच्या केलेल्या बहुमानाब्द्द्ल आमचे कौतुक केले . पदस्पर्श करून आम्ही एकेकाने सरांचे दर्शन घेतले त्यावेळी सरांनी आशीवार्द्पर -कल्याणकारक असे संस्कृतवचन म्हणीत आशीर्वाद दिले , आमच्या पाठीवरून फिरलेला त्यांचा हात, आणि उच्चारलेले आशीर्वाद स्तोत्र ..कानात आणि मनात साठवत आम्ही त्यांच्या घरून  परतलो .
दुसरे दिवशी - अगोदर आम्ही सध्या आय.टी क्षेत्रातल्या उमेदवारासाठी श्रद्धास्थान म्हणून प्रसिध्द झालेल्या चीलकुर-बालाजी दर्शनास गेलो .. ज्यांना परदेशी नोकरीसाठी ,शिक्षणासाठी व्हिसा मिळावा अशी इच्छा असते ..असे इच्छुक इथे येऊन श्री बालाजी चरणी आपली इच्छा संकल्प सोडतात .. अशा इच्छुक भक्तांची संख्या रोज शेकडोनी वाढते आहे.. श्री बालाजी आपली इच्छा पूर्ण करतो " ,याची प्रचीती येत असल्यामुळे .."आता  "व्हिसा -बालाजी " या नावाने सध्या चीलकुर-बालाजी प्रसिद्ध झालेला आहे..
दर्शन घेऊन आम्ही १२-१५ जन पन्नास किलो मीटर अंतरावर असलेल्या हैद्राबाद मधील दुसर्या एका उपनगरात गेलो , इथे श्री.काशिकार सर रहातात , "मोठ्या उत्सुकतेने सर आमची वाट पाहत आहेत " असे त्यांच्या मुलाने मेसेज केला ..
मोठ्या टाऊनशिप मध्ये काशीकर सर आपल्या मुलाकडे वास्तव्यास आलेले होते , मधूनच ते चारमिनार जवळ असलेल्या "शालीबंडा " एरियात असलेल्या त्यांच्या जुन्या घरी जाऊन राहतात ,इथे त्यांचे जुना गोतावळा आहे.

काशीकर सरांनी  आमच्या लोकल मित्रांना .जुने संदर्भ दिल्यावर ओळखले ..आणि खूप आनंद व्यक्त केला , आमच्याशी बोलतांना ते जुन्या आठवणीत हरवून गेले , ते म्हणाले -
जीवनात सर्व गोष्टी आनंदाने सहन करा ,शांतपणे सगळ्या गोष्टींना सामोरे जात सामना करा ..दुख्हाची तीव्रता कमी वाटेल ..अनुभवाचे बोल सांगत असतांना  सरांच्या चेहेर्यावर उमटलेले  भाव म्हणजे त्यांच्या आयुष्य प्रवासाचे गंभीर दर्शन होते ,
सरांना अभिवादन करतांना आम्ही खूप भारावून गेलोत ,काय नि कसे बोलावे ? कारण मन भरून आलेले आहे हे जाणवत होते , काशीकर सरांचे .चिरंजीव , सुनबाई आणि दोन नातू ..निशब्द होऊन आम्ही विद्यार्थ्यांनी सरांचा केलेला सत्कार पहात होते , त्या सर्वांच्या नजरेत आमच्याबद्दल आपलेपणा दिसत होता.

भावना तर मनात असतातच , त्या कृत्द्न्तेने व्यक्त करण्याचे राहू देऊ नये , हे सुवर्ण-क्षण अनुभवणे नशिबात असावे लागते हे ही तितकेच खरे ...
पहा ना - पाठक सर, ८५ वर्षे , काशीकर सर ८३ वर्षांचे .आम्ही त्यांचे १२-१५ विद्यार्थी ..पन्नास वर्षानंतर त्यांना भेटायला गेलेलो , आम्ही सारेजण  +६५ वयोगटातील . हे सगळच विलक्षण अनुभवलंय आम्ही .

मित्रा - दिगंबर गवाणे , श्रीधर देशपांडे .आणि हैद्राबादी मित्रांनो - आम्हाला तुमच्या सारखे मित्र आहेत " ही आमच्यासाठी खूप  अभिमानाची गोष्ट आहे.
लेखा सोबत असलेला ग्रुप फोटो श्री.काशीकर सर यांच्या सोबतचा आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख - ५० वर्षानंतर -श्री गुरुजनांची अविस्मरणीय दर्शन-भेट .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतलं गाव -परभणी . लेख -१७ वा - साहित्यिक -कलावंत -बँक कर्मचारी ..!

लेखमाला -आठवणीतलं गाव -परभणी .
 लेख -१७ वा - 
साहित्यिक -कलावंत -बँक कर्मचारी ..!
----------------------------------------------------------
परभणी शहरात बहुतेक सर्व नामवंत बँकेच्या शाखा कार्यरत आहेत  हैद्राबाद बँकेच्या परभणी मुख्य शाखेत सर्व बँकांचे आपसातील होणार्या व्यवहारासाठी एक स्वतंत्र विभाग होता ..त्याला क्लीयारिंग  हाऊस " असे म्हणत ,मी २००३-च्या दरम्यान  मुख्य शाखेत काम करीत असतांना अनेक वेळा क्लीयारिंग हाऊस  मधली वर्दळ पाहत असे .. त्यावेळच्या क्लीयारिंग शेड्यूल लिस्ट वर मेंबर असलेल्या बँक आणि त्यांच्या शाखांची संख्या अंदाजे २०-२५  असल्याचे आठवते ,
१०.३० म्हणजे बँक कामकाज सुरु होण्याची वेळ , कोणत्याही बँकेत जा..कस्टमर ने भरलेली बँक दिसत असे ,हे सगळे पाहून वाटायचे  रुक्ष आकड्याच्या जगात वावरणारे बँक कर्मचारी .यांना बेरीज, आणि गणित , नोटांची मोजणी ,कर्ज आणि ठेवी ..अर्जदार आणि कर्जदार .याशिवाय दुसरे काही करण्यास वेळच मिळत नसेल ,

पण असे मुळीच नव्हते ..उलट या ८०- ९०  च्या दशकात ..म्हणजे मी परभणीला असण्याच्या काळात ..परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सहभाग कार्याने प्रभाव पाडणारी अनेक व्यक्ती विविध बँकेत-शाखेत कार्यरत होत्या ,आजच्या लेखात अशाच काही मित्रांची आठवणी सांगाव्याश्या वाटतात . परभणीच्या  नव्या पिढीला माझ्या आठवणी नक्कीच  आवडतील 

आज यातील बहुतेक कर्मचारी  बँक -सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि आता  जेष्ठ साहित्यिक व कलावंत म्हणून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत 
त्या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया परभणी शाखेत - - रेणू पाचपोर ,हे कार्यरत असणारे लेखक-कवी ..
 कविता , ललित लेखन या साहित्य प्रकारात प्रभावी कामगिरी करून साहित्य लेखन क्षेत्रातले  एक ठळक नाव राहिलेले आहे . यांच्या साहित्यास शासनाचे राज्य पुरस्कार प्राप्त  कविसंमेलनात निमंत्रित कवी असल्यामुळे नामवंत संस्थांच्या व्यासपीठावरून कविता सादर करण्यात आघाडीवर असत. परभणीतील साहित्यिक उपक्रमाच्या निमित्ताने आमच्या नियमित संवाद-भेटी होत ..परभणी वास्तव्यात  ..यांचे बहुतेक सर्व साहित्य माझ्या वाचनात येत असे.. अलीकडे दिवाळी अंकातून कवितेमुळे भेट होते ....परभणीतील माझ्या साहित्यिक -मित्र यादीतले मोठे व प्रसिध्द म्हणून  कवी-लेखक रेणू पाचपोर हे नाव कायम आहे.

याच इंडिया बँकेत ..आणखी एक लेखक आहेत  बा.बा.कोटम्बें.., नियमित संपर्कात असणारे कोटम्बे आपल्या लेखनात कायम व्यस्त असतात , कथा आणि कादंबरी, आणि ललित लेखन हे कोटम्बे यांचे साहित्य लेखन प्रकार आहेत , सहज सुंदर लेखन शैली ,ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही भाषा त्यांच्या  लेखनात आहेत ..
 आजच्या काळात महत्वाचे साहित्यिक व बँक कर्मचारी म्हणून बा.बा.कोटम्बे प्रसिद्ध आहेत.

इंडिया बँकेतील एक सर्व परिचित कलावंत व्यक्तिमत्व ..रंगभूमी वरील जेष्ठ कलावंत ..दिग्दर्शक विजय करभाजन 
आपल्या कार्याने सर्वोतोदूर लौकिक प्राप्त करून  नाट्य-क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.विभागीय नाट्यस्पर्धा ,  विजय करभाजन - आणि परभणीचे नाटक " म्हणजे आमच्या काळात सगळीकडे  पुरस्कार मिळवणारे एक फेमस नाव झाले होते ..
शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपले योगदान देणारे माझे मित्र .श्रीकांत देशपांडे , हसतमुख तबला वादक शशांक शहाणे,  संगीत विषयक कार्यक्रमात आवर्जून या दोन मित्रांना मी आवर्जून भेटत असे.

- कथा आणि ललित लेखन करणारे मंगेश उदगीरकर हे महाराष्ट्र बँकेत कार्यरत होते , साहित्य बरोबर बँक कर्मचारी संघटनेतील एक प्रभावी कार्यकर्ते ही त्यांची आणखी एक ठळक ओळख , परभणी मुख्य शाखेच्या गेट समोर शहरातील बँक कर्मचारी निदर्शनं करीत ..त्यावेळी एआयबीईए- झिंदाबाद " अशा गर्जना -घोषणा देणारे कॉम्रेड -मंगेश उदगीरकर मला अजून आठवतात . 

आम्ही दोघे जरी वेगवेगळ्या बँकेत  होतो ..तरी ..परभणी वास्तव्यात मला सर्वात जास्त साहित्य-सहवास घडलय  तो मंगेश उदगीरकर या हरहुन्नरी व्यक्तीचा .. त्या काळात आमचे लेखन एकमेकांच्या प्रोत्साहनाने होत असे ..परभणीत संपन्न झालेल्या सर्वच साहित्य संमेलन  आयोजनात मंगेश उदगीरकर यांच्या सोबतचा कार्यकर्ता म्हणून मी असे. मसाप परभणी आणि अक्षर प्रतिष्ठा -परभणी या दोन्ही संस्था कार्यात मंगेश उदगीरकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.. परभणी पीपल्स बँकेच्या परिसरात साहित्य संमेलन संदर्भात चर्चा आणि बैठकी होत असत , त्यावेळी मंगेश उदगीरकर  सोबत आम्ही  मित्रांनी मस्त "गप्पाष्टक " रंगवले आहे .खरेच ते दिवस कधीही विसरले जाणारे नाहीत.

महाराष्ट्र बँकेतील एक सर्वपरिचित आदरणीय असे व्यक्तिमत्व -  .अध्यात्म आणि संत वांग्मय अभ्यासक आणि , उत्तम कीर्तनकार म्हणून ख्यातीप्रात असे माधवराव आजेगावकर ,  , संतकवी दासगणू महाराज वांग्मय दर्शन " हे माझे संत-साहित्य लेखन पुस्तक रूपाने आले ते माधवराव अजेगावकर यांच्या मित्र-कृपेच्या योगाने ..या निमित्ताने माधवराव यांच्या प्रतिभेचे अलौकिक असे दर्शन अनेकवेळा घडण्याचा योग माझ्या वाट्याला आला , माझ्या लेखन-प्रवासातील हा एक बहुमोल असा पुण्यकारक भाग्ययोग आहे असे म्हणावेसे वाटते.

आमच्या हैद्राबाद बँकेत ..नाट्य-कलावंत गिरीश कऱ्हाडे हे प्रसिध्द नाव , 
त्यावेळी परभणीला नसलेले पण आता एक परभणीकर साहित्यिक असलेले  तुकाराम खिल्लारे . हे माझे बँकेतील अधिकारी असलेले .सहकारी मित्र .. खिल्लारे यांचे सोबत मी कृषी विद्यापीठ शाखेत काम केले ..त्यांच्या सहवासातील दिवस माझ्या साठी ..काव्य-लेखनाची .कार्यशाळा होती.
आज ही फेसबुक आणि इंटरनेटवर तुकाराम खिलारे कविता विषयक आणि हायकू विषयक असे मोठे वाण्ग्मयीन कार्य करीत आहेत ", मराठीतील एक महत्वाचे हायकू रचनाकार म्हणून त्यांच्या कार्याची व लेखनाची नोंद होते आहे ..हे या निमित्ताने सांगण्यास मला विशेष आनंद वाटतो . तुकराम खिल्लारे सध्या  कार्यरत असलेले बँकेतील  अधिकारी तर आहेतच त्या सोबत कविता क्षेत्रातील एक महत्वाचे कवी आहेत.

कवी म्हणून विशेष प्रसिध्द असलेले उद्धव भयवाल यांनी परभणीच्या हैद्राबाद बँकेत काही वर्षे काम केले ,त्या वर्षात परभणीत झालेल्या अनेक कवी संमेलनात उद्धव भयवाल  यांच्या कवितांनी मोठी बहार उडवून दिली होती , सेवा निवृत्ती  नंतर भयवाल..औरंगाबाद मुक्कामी असून आता  कविता व लेखन क्षेत्रात भरीव अशी लेखन कामगिरी करणारे मराठवाड्यातील जेष्ठ कवी -लेखक आहेत.

परभणी मध्यवर्ती बँकेच्या हेड ऑफिस मध्ये कार्यरत असणारे ..नाट्यकलावंत , वक्ते आणि संत-साहित्य अभ्यासक देविदास वझे यांच्या मैत्रीचा लाभ झाला ..त्याचे निमित्त होते ..आखाडा बाळापुर येथे झालेले मराठवाडा साहित्य सम्मेलन., 
परभणी पीपल्स बँकेत असलेल्या कवयित्री प्रणिता रायखेलकर  ..आता लेखिका आणि कवयित्री आहेत प्रणिता देशपांडे -रायखेलकर या नावाने त्यांचे लेखन फेसबुकवर नियमित वाचण्यात येत असते.

मराठवाडा ग्रामीण बँक आणि देविदास कुलकर्णी ..या नवा शिवाय लेख पूर्ण होऊच शकत नाही . वसमत रोड वरील ग्रामीण बँकेच्या शाखेत देविदास कुलकर्णी शाखाधिकारी होते .. त्यांच्या काळात ही शाखा एक बँक म्हणून आघाडीवर होतीच होती ...
 त्यात भर पडली ती देविदास कुलकर्णी हे स्वतहा एक लेखक आणि कवी असण्याची .. त्यामुळे ग्रामीण बँकेची ही शाखा ..अनेक वेळा साहित्यिक भेटण्याची एक आपलेपणाची जागा झाली .. साहित्य चळवळ  असो, साहित्य लेखन असो , साहित्य विषयक उपक्रम असो ..या संदर्भात येथे ज्या चर्चा होत, कल्पना मांडल्या जात असत .त्या सर्व स्वप्नवत उपक्रमांना प्रत्यक्ष्यात आणण्याची अजोड कामगिरी करून दाखवली ती देविदास कुलकर्णी या कुशल संघटक मित्राने ...
 समेलन आयोजक  , नियोजक , व समेलन नगरी  म्हणजे परभणी " अशी ओळख निर्माण करण्यात देविदास कुलकर्णी यांचे साहित्यिक कार्य मोलाचे आहे .मसाप परभणी..अक्षर प्रतिष्ठा परभणी आणि देविदास कुलकर्णी ..ही नावं एकाच आहेत ..कसे ही घ्या  क्रम तोच असेल. 

याच ग्रामीण बँकेच्या शाखेत .मराठवाड्यातील एक महत्वाच्या कवयित्री कार्यरत होत्या ..वसुधा देव.. परभणीतील या कवयित्रीने आपल्या काव्य लेखनाने ..आजच्या मराठी कवितेत एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे .. सेवा निवृत्ती नंतर ..समक्ष भेटी नाहीत ..पण अधून मधून इंटरनेटवर वसुधा देव यांची भेट होत असते.

मित्र हो .. इतक्या संपन्न अशा साहित्यिक वातावरणात राहण्याचा योग माझ्या वाटायला आला तो मी परभणीला असल्यामुळे , त्या काळात "  सातत्याने लेखन करणारे विपुल असे लिहिते असणारे लेखक-कवी परभणी शहरात असत " हे आज आठवते तेंव्हा खरेच खूप आनंद वाटत असतो ..माझ्या या सर्व साहित्यिक मित्रांना त्यांच्या लेखन सेवे बद्दलचा माझा हा आठवणीचा नमस्कार.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -आठवणीतलं गाव -परभणी .
 लेख -१७ वा - 
साहित्यिक -कलावंत -बँक कर्मचारी ..!
- अरुण वि.देशपांडे - पुणे.
मो -९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------

Monday, January 22, 2018

लेखमाला - आठवणीतलं गावं -परभणी- लेख-१६ वा - मित्राय नम :

लेखमाला - आठवणीतलं गावं -परभणी 
..लेख- १६ वा - मित्राय नमः  
-------------------------------------------------------------

नमस्कार वाचक मित्रहो ,
परभणी " ही नुसती अक्षरे नाहीत ..तर या  गावाविषयी माझ्याच मनात नव्हे तर अख्या दुनियेत प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे स्थान लाभले आहे ,  या भावना .."दुनिया मे जर्मनी और इंडिया मी परभणी ", या स्लोगन ने यथार्थपणे व्यक्त होतात असे मला वाटते.  अशा या परभणी शहरात १९८६ साला पासून माझ्या आयुष्यातील नव्या पर्वास आरंभ झालेला , या पर्वातील  एका अध्यायाची कहाणी आजच्या लेखात ..
 श्रीराम नगर बद्दल लिहावे तितके कमीच आहे, कारण इथल्या वास्तव्याने माझेच नव्हे तर इथे रहाणार्या सर्वांचे पारिवारिक आणि भावजीवन सर्वार्थाने श्रीमंत झालेले आहे.

त्यावेळी परभणी मेन ऑफिसमध्ये - पी.डी.जोशी उर्फ पुरुषोत्तम जोशी .हे माझी सहकारी मित्र  "कार्यरत होते  ." इतरांच्यासाठी सतत उपयोगी असे  काम करायचे " या ध्यासाने झपाटून गेलेला हा प्रेमळ मनाचा माणूस माझा खूप छान मित्र झाला .बँकेत सेक्शन कोणतेही असो, ..पी.डी.जोशी बँकेत कोणत्याही कोपर्यात कामाच्या ढिगार्यात गढून गेलेलं असोत कस्टमर बरोबर पी.डी.जोशी -सरंना  शोधून काढीत आणि आपले काम जोशी साहेबांनी पटकन केले "म्हणून झाले या आनंदात निघून जात .
, बँकेत लागायच्या आगोदर हे जोशीबुवा शाळेत शिक्षक होते ..त्यामुळे बँकेत सुद्धा त्यांच्या टेबलासमोर समोर जो कुणी येणार .तो लगेच आणि आपोआप या जोशी सरांचा शिष्य होऊन जायचा ...त्यामुळे ..काय सांगू, किती सांगू हे प्रश्न त्यांना पडायचे , या उलट कसे सांगू ? असा किरकोळ प्रश्न त्यांना कधी पडत नसे 
मला खूप आवडलेला जोशी सरांचा स्वभाव तो म्हणजे - "त्यांची मनापासूनची तळमळ असायची .ती सर्वाप्रती कल्याणाची .. या भावनेतून सगळ्यांशी भरभरून बोलणारे , खूप मनापसून समजावून सांगणारे पी.डी.जोशी ,सर्वप्रिय व्यक्ती माझे आवडते व्यक्तिमत्व .
कृषी विकास शाखेत मी काम करीत असतांना , रामकृष्णनगर मधल्या बँक कॉलोनीत वडिलांच्या घरात राहत होतो , त्याच वर्षात म्हणजे  १९८७ सालामध्ये  सहकारी मित्रांचे होम लोन कर्ज घेण्याचे प्रकल्प सुरु असायचे ..त्यात याच  पी.डी.जोशी या मित्राने एक दिवस सकाळीच माझ्या घरी येऊन मला सांगितले -हे बघ - काय सांगतो ते ऐकून घे ,माझे  हौसिंग लोन साठीचे प्रपोजल तयार करण्याचे काम सुरु केले आहे ते तयार झाले की  ,  प्रपोजल घेऊन झोनल ऑफिसला मी स्वतः घेऊन जाणार आहे.. , तू सुद्धा तुझे होम लोन प्रपोजल तयार केलेस तर मी माझ्या सोबत घेऊन जाईन, लाग तयारीला ..
आता माझ्या बाबतीत सांगायचे तर ..घाई -गर्दीत काम आणि माझ्या कमी वेगाचे ..गणित ..जुळणे कठीणच होते , पण हा पुरषोत्तम जोशी "नावाचा चिकाटीच्या मित्राला टाळणे त्यापेक्षा अवघड होते ..यात भरीस  भर  त्यांने माझे प्रपोजल तयार होण्यास वेळ मिळावा म्हणून त्याचे जाणे २ दिवस पुढे ढकलून देत ..गंभीर धमकी दिली ..बघ..मी तुझ्यासाठी रजा पण टाकलीय ..आता बोला ..!

अशा कठीण समयी आणखी एक मित्र ..अभय कोकीळ ..माझ्या मदतीला धावला ..तो म्हणाला ..तुझ्या हातून हे काम झाले तर आत्ताच होईल , नंतर तुझा भरोसा नाही मला ...एकूणच माझ्या मित्रांनी मला पुरते ओळखून घेतलेले होते हे काय कमी नव्हते. आणि आम्ही चक्क लंच रूम मध्ये बैठक मारली .अभय कोकीळ ने मला प्रश्न विचारीत ..माझे सर्व प्रपोजल तयार केले ..,अभय कोकीळ शांत आणि समजंस स्वभावाचा आहे .हे कितीही सत्य असले तरी ,मी त्या दिवशी त्याची कसोटी पाहिली असावी , पण, यात जिंकला अभय कोकीळ , अविचल रहात त्याने माझे होम लोन पेपर्स पूर्ण भरून दिले ,  तो दिवस ,ती वेळ माझ्या नशिबात सर्वात मोठ्या भाग्याची असावी ..कारण .. ४ तासात खरोखरच ..माझे होम लोन प्रपोजल .परफेक्ट रेडी झाले ..

आम्ही हे रेडी प्रपोजल नंतर  या हौसिंग लोन मधले निष्णात .मित्र महोदय ..जी.एस.देशमुख उर्फ -गजाभाऊ देशमुख  यांच्या नजरेखालून घालण्याचा कुलाचार यथासांग पार पडला , त्यांनी ओके ..खेल जम गया ..आगे जाने  दो..,असा ग्रीन सिग्नल दिला ..एकूण आमच्यावर "गजानन प्रसन्न झाले " ,या आनंदात .त्यावेळचे  हंगामी -शाखाधिकारी म्हणून असलेले जेष्ठ सहकारी मित्र - श्री.आबासाहेब वाघमारे .यांच्या समोर सही साठी ठेवले .वाघमारे साहेब मला आधीपासून ओळखत होते .  .मी माझे  होम लोन प्रपोजल  तयार करून समोर ठेवलाय "  यावर ..फक्त ..पी.डी.जोशी , अभय कोकीळ आणि गजाभाऊ देशमुख ..माझ्या सोबत आहेत " म्हणून विस्वास ठेवला आणि  त्यांनी माझ्या होमलोन अर्जावर ..सह्या करून ,शुभेच्छा दिल्या.

पी.डी.जोशी ..त्याच्या प्रपोजल सोबत माझे प्रपोजल घेऊन झोनल ऑफिसला गेला ..२ फेब्रुवारी - १९८७ या दिवशी ..
आणि परतला - ४ फेब्रुवारी १९८७ ..संध्याकाळी आम्हा दोघांच्या होम लोन -मंजुरीचे पत्र घेऊन मेन ऑफिस मध्ये दाखल झाला  .
पुढे वर्ष २००३ मध्ये मेन ऑफिस परभणीला मी पी.डी.जोशी बरोबर काम केले ..त्याच्या सहवासाचा आनंद घेतला ,
तरी एक गोष्ट तितकीच खरी ..की ..माझे घर ..प्रत्यक्ष्यात आले ते केवळ आणि केवळ ..पी.डी.जोशी आणि अभय कोकीळ या मोठ्या मनाच्या मित्रांमुळे ...
आता माझ्या साठी आणि श्रीरामनगर मधील माझ्या मित्रांसाठी ..माझे नियोजित घर बांधणी " हे काम ..प्रय्तेकासाठी त्याचे घरचे कार्य असल्यासारखे झाले ..मी सोडून ..सगळ्यांना माझ्या घराच्या नकाशाची पूर्ण माहिती झाली ..आणि पुढील कार्यवाही कशी करायची ? हे किती अवघड असते ..याचे क्लास  सुरु झाले.. विद्यार्थी मी एकला , आणि मला सांगणारे अधिकारी -जाणकार .श्रीराम नगर मधले सर्व "घरमालक ".
आयुष्य प्रवासात मला खूप छान मित्र मिळत  गेले आहेत ..त्यांच्या शुभेच्छा ,आशीवाद ,सहकार्य सर्व भरभरून मला मिळाले आहे ..म्हणूनच ..मी माझ्या  वास्तूचे नावं "वरदान " ठेवायचे " हे आधीपासूनच पक्के ठरवून ठेवले होते.
वरदान " कसे आकारास आले, आणि श्रीराम नगर ने आम्हाला कसे घडवले ..हे पुढच्या लेखात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - आठवणीतलं गावं -परभणी 
..लेख- १६ वा - मित्राय नमः  !
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
--------------------------------------------------------------

Monday, January 15, 2018

लेखमाला - आठवणीतलं गावं परभणी -लेख-१५ वा "श्रीरामनगर , कारेगाव रोड ."

लेखमाला - 
आठवणीतलं गाव-परभणी - 
लेख-१५ वा -  श्रीराम नगर ",कारेगाव रोड 
-----------------------------------------------------------------
नमस्कार , मित्र हो ,
नोकरी आणि घर ..दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्याला स्थिरता देणाऱ्या असतात ,  आताची  पिढी जी  65  + किंवा या पेक्षा अधिक वयोगटातील आहे , तुम्ही -आम्ही आणि मी सुद्धा -प्रतिनिधी असलेल्या  पिढीचे आयुष्य तसे एका आखीव मार्गावरूनच गेलेले आहे ,

जसे- शिक्षण , नोकरी , नोकरी लागली की पारिवारिक जबाबदाऱ्या "न सांगता स्वीकारून त्यांना निभावणे ", आणि हे करीत असतांना स्वतःचा संसार  त्यातील जबाबदारी पार पाडण्यात मानसिक शक्ती आणि आर्थिक शक्ती यांचा मेळ साधून सगळं व्यवस्थित निभावणे ..यातच आयुष्याच्ची महत्वाची वर्षे कधी आणि कशी निसटून गेली..हे कळायचे नाही.

मित्रांनो , हा अनुभव कमी-अधिक प्रमाणात सर्वांनी घेतलेला आहे.त्यामुळे स्वतःचे एक छान घर असावे ही स्वप्नवत कल्पना प्रत्यक्ष रुपात येणे " ही मोठी कठीण गोष्ट होती. त्याकाळात नेमक्या या गोष्टीसाठी आम्ही बँकेतले लोक खरेच खूप नशीबवान होतो असे म्हणावे लागेल .. " घर होण्यासाठी जे कर्ज लागयचे ते ..सामन्य लोकांसाठी सोपी गोष्ट नव्हती ..पण, आम्हा  बँक कर्मचार्यांना घरासाठीचे कर्ज होणे ..म्हणजे "अपने घर की तो बात थी ".

ज्यंनी नोकरीतली ५ वर्षे पूर्ण केली त्यांना हौसिंग लोन "मिळणार .अशा अटीचा समावेश असलेले परिपत्रक हेड ऑफिस जारी झाले ..आणि परभणीला आणखी एक बँक कॉलोनी आकारास आली पाहिजे " या मुद्द्य्यावर सहमती झाली ...
वसमत रोड वर असलेल्या  रामकृष्ण नगर -बँक कॉलोनी नंतर ....त्यावेळी कारेगाव रोड या तशा न गजबजलेल्या परिसरात ..८० च्या दशकात .. साधारणपणे १९८५ नंतर ..पाण्याच्या टाकी जवळ .. आमची नवी कॉलोनी उभारण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता ..आमचे श्रीरामनगर गजबजून गेले .  ही "श्रीराम नगर -बँक कॉलोनी "अशी आरंभीची ओळख .काही दिवसच होती ..जरी आम्ही सर्व रहिवाशी बँक कर्मचारी होतो , तरी .त्यातील बँक कॉलोनी हा शब्द प्रयोग ,सवयीने  " न करण्याचे ठरवले "  आणि आमची ही  कॉलोनी आता "श्री राम नगर " या  नावाने सर्व परिचित झाली आहे.

मी परभणीत १९८६ ला आलो ..आणि राहिलो रामकृष्णनगर  बँककॉलोनीत असलेल्या वडिलांच्या  "पंचदीप" या बंगल्यात , इकडे श्रीराम नगर मधले सहकारी स्नेहीजन ..मला ..माझे घर लौकर सुरु  करा आणि स्वतःच्या घरात राहायला या " असा आग्रह करीत .यात त्यांनी आपलेपणाने केलेली दटावणी जास्त असायची .सगळी सोंगे आणता येतात पण "पैश्याचे सोंग आंत येत नसते " जीवनातील एक महत्वाचे सत्य नाकारण्यात काहीच आर्थ नाही ..हे आता इतक्या वर्षांच्या आयुष्य-प्रवासातून शिकण्यास मिळाले आहे.

हे लक्षात घेता ..घर बांधणे , , त्या साठी लोन घेणे " हे पुढे पुढे ढकलण्यात मी माझे दिवस ढकलत असे , पण, असे जास्त दिवस करणे जमणार नाहीये " हे ओळखून .श्रीरामनगर मधील  माझे मित्र -गजानन उर्फ गजाभाऊ देशमुख यांना विनंती केली की.. तुम्हीच हे प्रोज्केत पूर्ण करण्यात मदत करा . गजाभाऊ मला नाही म्हणू शकत नव्हते , आणि त्यांना माझ्या स्वभावाची  चांगलीच जाण होती ",माझी स्लो -स्पीड लक्षात घेत , त्यांनी माझे पालक-मंत्री " होण्याचे मान्य केले .आणि या पुढे आम्ही बोलवू तेंव्हा श्रीरामनगर मध्ये होणारे पारिवारिक समारंभात सामील होत जा " असा हुकुम फर्मावला ,त्या प्रमाणे वागण्याचे मैत्रीपूर्ण  बंधन आमच्यावर होते.

अशा रीतीने रामकृष्ण नगर -वसमत रोड  ते - श्रीराम नगर -कारेगाव्रोड " अशा दोन्ही नगरात आमचे येणे-जाणे सुरु झाले .. श्रीराम नगर मधील सर्वांची घरे बांधून पूर्ण झालेली होती , फक्त मी तेव्हढा राहिली होतो ..या कॉलोनीत रहाणे सहकारी मित्र - परभणी सिटी मध्ये असलेल्या हैद्राबाद बँकेच्या चार शाखेत काम करणारे कर्मचारी होते .

परभणी मेन ऑफिस , एडीबी , नानलपेठ  आणि  एम के व्ही " या चार शाखेत श्रीरामनगर मधील रहिवासी .- ऑफिसर , हेड- क्याशियार , स्पेशल -असिस्टंट, , आणि काशियार -कम -क्लार्क अशा पोस्टवर , विशेष आणि अभिमानास्पद असे सांगायचे झाले तर - श्रीराम नगर मधील हे मित्र आपापल्या शाखे मध्ये अतिशय कुशल कर्मचारी तर होतेच ,प्रभावशाली व्यक्ती देखील होते ..त्यामुळे .लोकल शाखेतील स्टाफ मध्ये श्रीराम नगर मधील स्टाफचा खूप मोठा असा कार्य्प्रभाव होता.ज्याला "वरचष्मा " असेच म्हणता येईल.

त्या काळात - परभणी मेन ऑफिस चे हेड क्याशियार म्हणजे - श्री.गिरगावकर " हे चित्र सर्वांच्या मनात कायम असायचे .सुंदर अक्षरात  शांतपणे , काही न बोलता , अजिबात न हासता ,आणि नियमांचे पालन करायला लावणारे श्री.रापतवार , हेड-क्लर्क "आणि स्पेशल -असिस्टंट " कसा असतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे श्री.गजाभाऊ देशमुख , सर्वांच्या काळजीने स्वतहा शीड-शिडीत असलेले योग पारंगत ,आणि कोलोनीच्या बागांचे निसर्ग - रक्षक श्री.गीरीबबा , 
,  लष्करी व्यक्ती वाटणारे रुबादार आणि कर्तव्य-कठोर " असे लेबल ज्यांच्या चेहेर्यावर असते ..पण मनात काही नसणारे  प्रेमळ असे कर्नल -रोड्रिग्ज - म्हणजेच श्री.प्रभाकर पाठक , एक नंबर कुशल - अविनाश मैराळ , श्रीकांत जपे , सोमाणी बंधू , वाईकर काका , जी.टी.कुलकर्णी , रामढवे, आणि इतर , 
ही नावे आणि ते कार्यरत असलेल्या त्यांचा शाखा आज ही आठवून पहा ..या मित्रांच्या कार्य-कुशलतेच्या गोष्टी आवर्जून ऐकण्यास मिळतील.

विमानातून जर फोटो काढला  तर आमच्या श्रीराम नगर मधील मित्रांच्या घरांच्या नकाशा इंग्रजी अक्षर " ई-  E ",
असा दिसेतो .. या -  " E" "  या चित्रातली मोठी उभी रेषा म्हणजे -प्रवेश करतांना लागणारे चार घरे.. यातील ..पहिले - अविनाश मैराळ , दुसरे - "राजस "- अगोदर - हे घर राजू- बी.के. संगारेद्दीकार यांचे होते ..आता श्री.चौधरी यांचे घर आहे.
या दोन घरांच्या समोर ..श्रीराम नगरचे मुख्यालय -आणि .मुखिया - असलेले श्री.अरविंद गिरगावकर यांचे निवास्थान आहे . इथे हर दिनी -मित्र-दरबार भरतो  त्यांच्या बाजूला ..श्रीरामनगर मधील महत्वाचे व्यक्तिमत्व -प्रभाकर पाठक चे घर .....आहे.

मित्रांनो, आताचे ..श्रीरामनगर  नव्या पिढीच्या वास्तव्याने गजबजून गेले आहे. आम्हा सर्व मित्रांचे निवृत्ती -पर्व सुरु झालेले आहे, "आजी-आणि आबा " या भूमिकेत आनंदाने आहोत , नोकरीच्या निमित्ताने आमची मुले -बाळे ज्या ठिकाणी आहेत , त्या ठिकाणी .."मुलांच्या अडचणीच्या वेळी आधार म्हणून जाणे " हा एक कलमी कार्यक्रम बहुतेक सर्वांचा आसतो , 

१९८५ ते हैद्राबाद बँक इतिहास जमा होई पर्यंत -२०१७ ..अशी तीन दशकांचा काल ..म्हणजे ..श्रीराम नगर या पारिवारिक विजय नगराचा  वैभवशाली इतिहास आहे ..या सुवर्ण पानावर किती तरी आठवणी आहेत , प्रसंग आहे , याच श्रीराम नगर मध्ये आम्ही स्थिरावलो , आमच्या मुलांची पिढी घडली , हा  प्रवास खूप रोचक आहे,,भावनिक आहे , एकाच लेखात हे मावणारे नाहीये ,
श्रीरामनगर मध्ये मी कसा आलो..आणि माझे घर ..कसे झाले ..हे पुढच्या लेखात.....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - 
आठवणीतलं गाव-परभणी - 
लेख-१५ वा -  श्रीराम नगर ",कारेगाव रोड ,
- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------

Thursday, January 11, 2018

लेखमाला -आठवणीतील गाव -परभणी - लेख- १४ वा - आठवणी - एसबीएच - कृषी विद्यापीठ शाखा -

लेखमाला -आठवणीतील गाव -परभणी -
लेख- १४ वा -
आठवणी - एसबीएच - कृषी विद्यापीठ शाखा -
-------------------------------------------------------------------------
परभणीत १९८६ साली आल्यावर ..पहिल्यांदा मी काम केले ते नव्या मोंढ्यातील - कृषी विकास शाखेत ..या शाखेत मी १९८६ ते १९९६ असे सलग दहा वर्ष होतो .. नंतर मला स्पेशल असिस्टंट- विशेष सहायक ..या पोस्टवर बढती मिळाली आणि माझी बदली त्यावेळच्या "मराठवाडा कृषी विद्यापीठ - परिसरात असलेल्या हैद्राबाद बँकेच्या - एमकेव्ही- ब्रांच,म्हणजेच  कृषी विद्यापीठ शाखेत झाली..
 अगोदरच्या एडीबी या शाखेत शेतकरी आणि शेती संबंधितकर्ज हे प्रमुख स्वरूपाचे .कामकाज होते...पंचक्रोशीतील गावे आणि तेथील शेतकरी यांच्या पुरते मर्यादित बँकेचे कामकाज होते ..एक अर्थाने बँकेचे हे कस्टमर  हे साधे आणि ग्रामीण परिसरातील होते .
 माझ्यासाठी ही नवी शाखा - म्हणजेच कृषी विद्यापीठ शाखा .सर्वार्थाने वेगळी होती .. इथे कृषी विषयक शैक्षणिक पातळीवर चालणारे कार्य होते ..आणि विद्यापीठ यंत्रणेच्या सर्व आर्थिक व्यवहार पूर्ततेसाठी हैद्राबाद बँकेची ही विशेष अशी अतिशय महत्वाची कार्यरत शाखा आहे " हे या शाखेत आल्यावरच मला समजण्यास सुरुवात झाली.

 , प्राध्यापक , विद्यापीठाच्या विविध कार्यालय आणि विभाग यात असलेले सर्व श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचारी ..असे  सगळे सुशिक्षित आणि उच्च-शिक्षित -कस्टमर ..माझ्या साठी नवीन होते .
शिक्षणासाठी देशातील विविध प्रांतातून आलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी हे देखील बँकेत येणारे आमचे कस्टमर असायचे.
पहिले पाच-सहा वर्ष मी प्रामुख्याने काम केले ते ..विस्तारित सेवा कक्ष - Extension Counter - ईसी काउंटर- या नावाने ओळखले जात असे. अग्रीकल्चर -कोलेजच्या इमारतीत ..आमच्या बँकेचे हे ईसी काउंटर होते.
एक कॅशियर, एक पासिंग ऑफिसर आणि एक क्लार्क , एक प्यून .असा चार जणांचा स्टाफ ..

यात मी सर्वात जास्त काम केले ते माझे सहकारी मित्र .श्री.श्यामसुंदर वैद्य , श्री.सुभाष काळे , श्री.रामकृष्ण वाघमारे यांचे बरोबर . यातील श्री.वैद्य आणि वाघमारे ही जोडी या  ईसी काउंटर ला खूप जुनी होती आणि त्यांना त्यावेळच्या बहुतेक सगळ्या कस्टमर लोकांची नावं आणि खाते नंबर तोंडपाठ होती ..अनेक प्राध्यापक , विभाग-प्रमुख , सिनियर सर मंडळी ..ईसी काउंटरच्या आत आल्या बरोबर हे वैद्य साहेब त्यांचे अगदी आपुलकीने स्वागत करीत .आणि त्यांच्या चेकचे पैसे त्वरित देत..
आमचे हे दोन सहकारी मित्र -रामृष्ण वाघमारे आणि शामसुंदर  वैद्य - विद्यापीठा-स्टाफ च्या पगार द्यायच्या  आठवड्यात कितीही वर्क लोड असू द्या .बिलकुल न डगमगता .कामाचा फडशा पाडीत , त्यांचे कार्यकौशल्य अनुकरण करावे असेच होते . मी माझ्या या मित्रांचे नावं .शामसुंदर वैद्य -गोडबोले "असेच ठेवले होते , केवळ या स्वभावाच्या भांडवलावर वैद्य   ईसी काउंटरला  अनेक वर्ष होते .
 घरून बँकेत येतांना .आणि बँकेतून घरी जातांना .विद्यापीठातील कुणी ही परिचित कस्टमर वैद्य साहेबंना त्यांच्या घर पर्यंत आनंदाने सोडीत असे.त्यामुळे या परिसरात शाम्सुन्देर वैद्य यांना स्वतःची गाडी चालवत येण्याचा योग काही आला नाही.
महिन्याच्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी विद्यापीठाला सुट्टी असे ..हे दोन शनिवारी . ईसी काउंटर ला एकदम शांतता असे. कॉलेजमध्ये.कुणीच  नसे ..मागच्या बाजूस असलेल्या आमच्या  ईसी काउंटर मध्ये असलेल्या आम्हा चार स्टाफच्या बोलण्याचा आवाज सुद्धा त्या शांततेत खुप मोठा वाटत असे.
श्री शाम्सुन्देर वैद्य यांची औरंगाबादला बदली झाली , त्यांच्या जागी आलेले श्री .सुनील देशपांडे हे तसे लोकल परभणीचे रहिवासी असलेले मित्र , यांचा खूप मोठा मित्र-परिवार विद्यापीठ परिसरात होता. त्यामुळे माझे परिचय क्षेत्र मोठे होण्यास सुनील देशपांडे यांचे मोठेच योगदान होते.
सुनील देशपांडे यांचे पिताश्री ..ती.एन जी देशपांडे -(महातपुरीकर ) हे  एनजी -सर "या नावाने सर्वपरिचित असणारे व्यक्तिमत्व होते , एनजी सर ..आलेत हे त्यांच्या ऐकू येणाऱ्या आवाजाने कळत असे.
याच ईसी काउंटरला माझे सहकारी -अधिकारी म्हणून माझे कवी -मित्र -श्री तुकाराम खिल्लारे यांचा सहवास लाभला , या सहवासात ..एक कवी आणि त्याचा कविता प्रवास मी खूप जवळून अनुभवला ..आज श्री.तुकाराम खिलारे कविता क्षेत्रातील एक प्रसिध्द आणि मोठे नावं आहे.

हे  ईसी काउंटर ज्या बिल्डींग मध्ये होते त्याच बिल्डींग मध्ये ..विद्यापीठातील डॉ.रावसाहेब चोले यांचे ऑफिस होते , चोले सर एक अत्यंत प्रतिभावंत असे कवी म्हणून प्रसिध्द होते , त्यांना वेळ असेल तेंव्हा ..आमच्या अनेक वेळा साहित्यिक संवाद -भेटी होत असत . त्यांच्या केबिन मध्ये ..नामवंत चित्रकार -कवी -सूर्यभान नागभिडे , आणि हिंदीचे प्राध्यापक आणि कवी - डॉ.मनोहर नलावडे सर ,यांची भेट  होत असे .

 ईसी काउंटर चे काम आटोपून इथे काम करणाऱ्या आम्हाला पुन्हा होम सायन्स कोलेजच्या समोर असलेल्या आमच्या ब्रांच ऑफिसला यावे लागे .कारण रोजच्या कामकाजात  ईसी काउंटर चे व्यवहार हिशेबात धरून मगच दैनंदिन कामाचा ताळमेळ -हिशेब पूर्ण होत असे.

या शाखेतील सर्व स्टाफ स्पीड-वर्क करणारा असा अतिशय कुशल श्रेणीतील होता..कारण विद्यापीठ शाखेत वेळा आणि वेळापत्रक अतिशय चोखपणाने पार पडायची मोठीच जबाबदारी असे. 
सुरुवातीला इथे प्रमुख-रोखपाल - हेड- कॅशियर म्हणून श्री.अरविंद गिरगावकर ,तसेच श्री.दिलीप वैद्य ..या सिनियर स्टाफचा सहवास लाभला .

श्री.नरेंद्र -एन.एस.कुलकर्णी , अविनाश मैराळ , जी.टी.कुलकर्णी , एम.एन.अन्त्वाल , महम्मद अफजल साहेब , अब्दुल हादी, अशी काही नावं अजून आठवणीत आहेत.
सर्वश्री -.भगवान पाडळकर ,बालमुकुंद पुरोहित , टी.एन.चौलवार , सुभाष येवलेकर ,हे मला लाभलेले Branch Manager .
विद्यापीठातील मोठ मोठे अधिकारी , जेष्ठ प्राध्यापक , आणि अनेक विभगातील कर्मचारी या सर्वांशी अनेकवेळा गप्पा आणि बोलणे होण्याचे छान प्रसंग आले  .
शहरापासून दूर असलेला विद्यापीठ परिसार आणि आमची बँक ..आणि त्या दिवसांच्या आठवणी आज १५ वर्षानंतर ही,तिथल्या वातावरणा सारख्या  फ्रेश आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला -आठवणीतील गाव -परभणी -
लेख- १४ वा -
आठवणी - एसबीएच - कृषी विद्यापीठ शाखा -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------

Thursday, January 4, 2018

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी - लेख- १३ वा - माझ्या संस्कार -शाळा - वाचनालय .

लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
 लेख- १३   वा - 
माझ्या संस्कार -शाळा - वाचनालय .
------------------------------------------------------------------------
मित्र हो नमस्कार ,
बघता बघता आपल्या वाचन -सहवासाला तीन महिने होत आहेत , मी लिहिलेले ..तुम्ही आवर्जून वाचता ..तुमचा प्रतिसाद मला लेखन -प्रेरणा देणारा आहे ..हे आवर्जून सांगतो. 
ग्रंथ आणि ग्रंथ -वाचन ..यांचे महत्व  शालेय जीवना पासून मनावर ठसवण्यासाठी प्रयत्न केले जातात  ....तसे पाहिले तर पुस्तकांच्या ..सहवासात आपण आयुष्यभर घडत जातो ..हे वाचन संस्कार ज्या वास्तूत होत असतात ..त्याला ..वाचन मंदिर , वाचनालय असे म्हणतो .
 वाचनाची आवड लागण्यात ..माझ्या गुरुजनांचा मोठा वाटा आहे, तितकाच माझ्या आई-वडिलांचा वाटा आहे ,ज्यांच्या मुले ..लहानपणापासून पुस्तके- मासिके आणि पेपर ..यांच्या माध्यमातून वाचनाची गोडी लागली आणि ती आता आवडीची सवय झालेली आहे. 

पुस्तकांवर मी अनेक कविता लिहिल्या आहेत ..आजच्या लेखासाठी अनुरूप अशी एक छोटीशी कविता देण्याचा मोह आवरत नाही ..या कवितेत .." ग्रंथ -महिमा - वर्णिलेला आहे....जो वाचन संस्कार किती महत्वाचे आहेत हे सांगतो आहे.
|| ग्रंथ -महिमा  ||

गुरु मानावे ग्रंथाना 
संगती त्यांच्या असावे 
न्युनत्व आपुले सारे 
दुरदूर ते सारावे ...!

अक्षरसागर थोर अपार 
नाही कशाचा त्याला पार 
बऱ्या- वाईटाचे सार 
जाणावे ग्रंथा मधुनी ...||

थोर असो वा सान 
मिळवा कधी ही ज्ञान 
ग्रंथ असती सदैव उघडे 
आपणच पडू कधी तोकडे ...!

ग्रंथ -महिमा थोर असा 
किती म्हणून सांगावा 
जावे शरण ग्रंथाना 
अनुभव स्वतः: घ्यावा ...!

संत-संग आणि सत्संग - अशा दोन्हींचा लाभ ..वाचनातून आपल्याला होत असतो अशी माझी भावना आहे. त्यामुळे हा लाभ प्राप्त करण्याचे ठिकाण म्हणजे - वाचनालय ..हे माझे अत्यंत प्रिय असे ठिकाण आहे...वाचन म्हणजे ..एकाच वेळी ..शब्द-समाधी , भाव -समाधी - आणि ध्यान -समाधी " देऊ शकणारी क्रिया आहे . या साठी वाचनालय ही योग्य जागा आहे . 
आता पर्यंत मी पाहिलेली सर्वात मोठी "लायब्ररी - हैदरबाद येथील - स्टेट लायब्ररी .. ! इथल्या हॉल मध्ये बसून केलेलं वाचन ..त्याला आता पन्नास वर्ष होऊन गेलीत ..पण ती वाचन -समाधी अजून ही मनाला तोच आनंद देत असते.

परभणीला आल्यावर सवयी प्रमाणे ..वाचनालय -शोध घेणे ही गोष्ट केली ..
आणि क्रमाने -- गणेश वाचनालय , न.पा .परभणीचे ..मौलाना आझाद वाचनालय ..ही २ प्रमुख वाचनालये मला आवडली ..आणि उत्तम ग्रंथपाल - पुस्तकांची काळजी घेणारा संदीप पेडगावकर हा मित्र मिळाला ..याला ..ग्रंथ-सखा " म्हणणे अधिक योग्य ठरेल ..
याच गणेश वाचनालयाने .."एक पुस्तक -एक दिवस " हा अभिनव उपक्रम (जो अजून ही चालू आहे ..) सुरु केला आणि उपक्रमातील पुस्तक बद्दल वाचून ..त्यवर वक्ता म्हणून ..तयारी करून कसे बोलवे ..याचे धडे गिरवण्याची संधी आमच्या सारख्या (त्यावेळच्या ..नवोदित ) लेखकांना दिली ..असा  अभ्यास-पूर्वक वाचन सराव .आमच्या कडून करवून घेणाऱ्या ..संदीप पेडगावकर -या मित्राचे आभार मानाने कृत्रिम उपचार ठरेल ..म्हणून त्याचे हे ऋण मनात कायमस्वरूपी ठेवावेत इतके महत्वाचे आहेत.. 
त्यावेळी सुरुवातीला ..संपन्न झालेल्या एक पुस्तक -एक दिवस "या कार्यक्रमात पुस्तक -परिचय ..वक्ता म्हणून गणेश वाचनालयात मला अनेक वेळा व्यक्त होता आले ..त्याचा पुरेपूर लाभ मला ..आता पुण्यात ..आल्यावार ..अनेक ठिकाणी पुस्तकावर लिहितांना आणि बोलतांना होतो आहे..
याचे सारे श्रेय ..संदीप पेडगावकर आणि श्रीकांत उमरीकर या दोन मित्रांचे आहे.

रेनबो कॉम्पुटर - हे श्रीकांत उमरीकर चे ऑफिस .शिवाजी नगर भागात ..मराठवाडा हायस्कूलच्या जवळ होते ..
या ऑफिसात अनेक वेळा श्रीकांत बरोबर पुस्तक आणि वाचन , वाचनालय .या बद्दल आमच गप्पा होत असत , पुस्तक-प्रकाशन हा एक उप विभाग इथे सुरु झालेला होता .. कॉम्पुटर टाइपिंग करणारा ..विनोद राहेरकर ..खूप छान स्वभावाचा मित्र .. माझ्या अनेक पुस्तकांचे डीटीपी ..विनोदने खूप मनापासून केले आहे ..१९९० -२०००  या दहा वर्षात माझी जी पुस्तके प्रकाशित झालीत ..उदा. नवर्यांची चाळ- विनोदी कथा , , संतकवी दासगणू वांग्मय दर्शन , आणि - गाणे दिवाने -कविता संग्रह , गोड गोड चीकोबा - बाल-कविता संग्रह .या पुस्तकांची नावं चटकन आठवतात.

श्रीकांत उमरीकर ने मला निवडक आणि वैचारिक वाचनाची गंभीर वाचन सवय लावली ..त्यामुळे ..वाचन म्हणजे मनोरंजन " हा प्राथमिक उद्देश ..नव्हे ..त्या पुढे जाऊन मानसिक आणि वैचारिक बैठक वाचनाने स्थिर होत असते ",
हे श्रीकांतच्या वाचक -दृष्टिकोनातून मला शिकता आले ..तसे म्हटले तर .आमची स्वभाव -पृकृती भिन्न होती ..असे असून ही साहित्य आणि वाचन आवड "या दोन गोष्टींनी .आम्हाला छान मित्र बनवले आहे ..आमची मैत्री .आज ही नवी आवृत्ती निघालेल्या पुस्तका इतकीच फ्रेश आहे.
शिवाजीनगर इथून श्रीकांतचे ऑफिस नानलपेठ ला शिफ्ट झाले ..आणि इथे सुसंपन्न असे वाचनालय सुरु झाले ..
याचे "शब्द-घर " हे नाव मी सुचवलेले आहे.जे श्रीकांतने मोठ्या मनाने मान्य करून ..या "शब्द-घरात " एक वाचक म्हणून , एक लेखक म्हणून मोठ्या सन्मानाने , हक्काने वावरू दिले . 

असाच आणखी एक मित्र ..वाचनाच्या आणि पुस्तकांच्या आवडीमुळे मला मिळाला ..वयाने लहान असेल , पण ,ते कधीच जाणवू न देता या मित्राशी माझे खूप छान जमत असे...भूषण घोडके .."
गोमटेश एजन्सी " हे पुस्तक वितरण व्यवस्था असलेले परभणीतील महत्वाचे ठिकाण ... 

. -माझ्या बँकेतून ..घरी जाण्याच्या रस्त्य्वारच  ..स्टेडीयम कोम्प्लेक्ष मध्ये भूषणचे पुस्तक दुकान होते.स्कूटर आपोआपच थांबत असे .
त्यांच्याकडे अनेक प्रकाशन संस्थेची नवनवीन पुस्तके नित्य नेमाने वितरणासाठी येत असत , अशा पुस्तकांची काही निवडक लेखक मित्र साठी लायब्ररी आम्ही सुरु करायला लावली ..भूषण आम्हाला आलेल्या पुस्तकातली छान पुस्तके देत असायचा , या मित्रामुळे .मला नामवंत आणि नवोदित अशा लेखक- कवींच्या साहित्यकृती वाचण्यास मिळाल्या ..ज्यामुळे ..माझ्या वाचनाचा परीघ वाढण्यास मदत झाली .. भूषण आणि गोमटेश एजन्सी " ही दोन नावे माझ्या लेखनास योग्य दिशा देणारी दोन महत्वाची नावं आहेत 

२००५ पर्यंत प्रकाशित झालेल्या माझ्या बहुतेक सगळ्याच पुस्तकांच्या प्रती . भूषण घोड्केने आवर्जून त्याच्या वितरण-कार्यात सामावून घेतल्या होत्या ..माझ्या लेखन -सातत्याचे या भूषणला खूप कौतुक होते ..वेळोवेळी तो त्याच्या परिचितांना माझ्या लेखनाबद्दल मोठ्या कौतुकाने सांगतांना मी आनंदाने ते माझ्या कानात आणि मनात साठवून ठेवीत असे. माझे अध्यात्मिक पुस्तक .संतकवी दासगणू वांग्मय दर्शन " शासनमान्य ग्रंथ खरेदी योजनेत " आहे " हे त्याने केलेले माझ्यासाठीचे खूप मोठे काम ..आधी केले मग सांगितले अशा स्वरूपाचे पण ..माझ्या साठी ते  आश्चर्य-गिफ्ट "होते .गोमटेश एजन्सी आणि भूषण ..मित्रा ..माझ्या मनात तुमचे स्थान खूप मोलाचे आहे.
परभणी वास्तव्यात मला काय काय मिळत गेले ..यादी मोठी आहे , या पुढे असेच काही छानसे ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेखमाला - आठवणीतील गाव- परभणी -
 लेख- १३   वा - 
माझ्या संस्कार -शाळा - वाचनालय .
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 


-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------