Tuesday, May 6, 2014

कविता- माहेर...!

कविता-  माहेर…!
-अरुण वि. देशपांडे - पुणे .
------------------------------------------------------------------------
माहेराचे घर
आहे मोठे छान
झाले जरी मोठी
इथे होते  लहान ….!

दारी उभी असे
वाट पाहे माय
पोर  माझी तिला
दुधावरली साय …….!

आईचे हो घर
सुखाचे गोकुळ
माहेराच मन
मायेच मोहोळ ….!

मुक्कम  सरतो
जीव होतो जड
डोळा काठां पाणी
मनी धड धड ……. !

मनी हूर हूर
होते  आठवण
मन पाखरास
दिसते माहेर ……। !
--------------------------------------------------------------------
कविता - माहेर …!
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
--------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय - मनाच्या अंगणात.


रसिक हो-
माझे नवे पुस्तक -
मनाच्या अंगणात "-(ललित लेख)
त्याचा परिचर करून दिलाय -कवी- सुभाष काळे यांनी.
---------------------------------------------------------------------------------------------
मनाचे अंतरंग उलगडणारे ललित -लेखन -
"मनाच्या अंगणात …।!
-------------------------------------------------------------------
लेखक-कवी- समीक्षक -बाल-साहित्यकार अशी ओळख असलेल्या
अरुण वि.देशपांडे , यांचे नवे पुस्तक- मनाच्या अंगणात "- नुकतेच वाचले.
२२ लेख असलेले हे लेखन "मन" या संकल्पने भोवती आहे असे जाणवते .

जगातील एकजात सर्वच व्यक्ती नव्हे तर व्यक्तिमत्वाच जनक असलेला
अत्यंत सुक्ष्मातीसुक्ष्म, निराकार , पण ब्रह्मांडात कुठेही ,केव्न्हाही विहार
करण्याची क्षमता असणारा आणि केवळ दोन अक्षरी लहानसे नामाभिधान
धारण केलेला शब्द- "मन".
आपल्या मनाला ", विविध परिमाण , अनेक पैलू आणि-कंगोरे असल्याने
"हे असे मन- "अंगण "- या संकल्पनेत कसे मावेल ? किंबहुना मनाचे अंगण -
मनाला पुरेसे होईल का ?
या जिज्ञासेने "मनाच्या अंगणात"-हे पुस्तक वाचण्यास घेतले .
अत्यंत गूढ विषयाच
आपल्या परीने सखोल चिंतन करून लेखक -अरुण वि.देशपांडे , "मन", या निरा
पण वास्तवात अस्तित्व असलेल्या सत्याशी तादात्म्य पावलेले आहेत आणि वाचकांनाही याची
प्रचीती देण्यात बरयाच अंशी यशस्वी झाले आहेत ", असे म्हणावेसे वाटते.

माणसाचे मन अत्यंत संवेदनशील असण्याकरिता प्रेम, नातेसंबंध , मैत्री ",
निमित्ताने संबंध येणाऱ्या व्यक्तींमध्ये दोष-शोधन " न करता त्यांचा आहे त्या
गुण-विविधते सहित स्वीकार करणे किती व्यापक आणि अक्षय आनंदाचा सोहळा
असतो", याचे विश्लेषण कमालीचे सुंदर ,तसेच वाचकास अंतर्मुख होण्यास आणि
आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करते .

या ललित-लेख संग्रहात एकूण २२ लेख आहेत- पैकी काही लेख-शीर्षके …
"मन-एक मित्र आपुला ", "निरोगी मनाचे रहस्य " , हे बंध नात्यांचे ",
घराचे घरपण ", मैत्री -एक चिंतन ", आपले भाव-विश्व ", इ…. .
या पुस्तकातील शेवटच्या काही लेखांच्या बद्दल असे म्हणावेसे वाटते की ,
बदलेल्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवन-शैलीचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण
टिपले आहे .हे करतांना सर्व पातळीवरचा बदल " , हा स्वीकारायला हवा ही
अनिवार्यता जाचक न वाटता स्वागतार्ह कशी करता येईल याचे अनेक मार्ग
सोदाहरण दिले आहेत.

आपल्यात आणि आपल्या मनात बदल घडवणे हे सहजसुलभ नाही" असे
लेखकाने प्रांजळपणे कबूल केलेले असले तरी "हतबलतेचा , असहायतेचा किंवा निराशेचा
सूर कुठे ही आळवलेला नाही ." उलटपक्षी अत्यंत गंभीर अवस्थेतून मार्ग काढीत असलेली
कुटुंब-व्यवस्था , विवाह-संस्था आणि पद्धती " , संस्कार-मुल्यांचा ह्रास " यावर मूलगामी
चिंतन मांडले आहे.

विषयाचा समारोप करतांना लेखक अध्यात्मिक पातळी वरून अत्यंत मौलिक सूचना
करतो " दुक्ख देणाऱ्या अपेक्षा ठेवल्या नाहीत तर मनास सुख देता येऊ शकते.",किंबहुना
ते मिळते .-फक्त याचे अनुभूती घेता आली पाहिजे " असे सांगत शेवटच्या लेखात
व्यक्त केलेल्या मनोगतावर संत श्री ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे आशय-शिंपण केले आहे".

"मनाच्या अंगणात " या संग्रहातील लेखनाच्या निमित्ताने लेखक -अरुण वि..देशपांडे
यांनी मनाच्या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे ",
या बद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन
पुस्तक-परिचय -
---------------------------------------
सुभाष काळे - पुणे
संपर्क -९८९०४४१५९९
----------------------------------------
मनाच्या अंगणात -
-अरुण वि.देशपांडे .
संपर्क - ९८५०१७७३४२
पृ- १०४, मुल्य - रु..१२५/-
प्रकाशक - ज्ञान प्रकाशन- वितरण ,
१०७५ - सदाशिव पेठ -पुणे .
संपर्क - ९८२२२८०४२४ .
-----------------------------------------------------------------------------------