Saturday, September 8, 2018

तरुण भारत -मुंबई .दि.८-९-२०१८ - ललित लेख - निसर्गाचे लोभस रूपं

तरुण भारत मुंबई- ८-९-२०१८ अंकात प्रकाशित .
-------------------------------------------------------------
ललित लेख-
लोभस रूप निसर्गाचे 
------------------------------------
रसिक हो - 
आपल्या भावविश्वात अनेक गोष्टींना खूप महत्वाचे स्थान असते , व्यक्ती, घटना ,प्रसंग अशा स्वरूपात या गोष्टी आपल्या मनात असतात. निसर्ग आणि माणूस यांचे नाते अतिशय आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे आहे . ऋतू -चक्र आणि आपले दिनक्रम यांची सुरेख अशी सांगड आपल्या संकृती आणि परंपरेमध्ये आहे  म्हणूनच आपण निसर्गाशी आणि निसर्ग आपल्याशी एकरूप झालेला आहे .. उन्हाळा सरता -पावसाळ्याची चाहूल लागते ,  आजकालचा तीव्रतम असणारा उन्हाळा आपण सारे अनुभवतो आहोत असा त्रस्त उन्हाळा कधी जातो  आणि मनाला गारवा देणारा , ओलावा देणारा ..वर्षा ऋतू कधी येतो याची वाट पहाण्यात आपण सारेच जणू "चातक पक्षी होऊन जातो.
आजकाल हा पाउस सुद्धा लहरी झालाय , वेळेवर येणारा हा पाउस-सखा ..अचानक दडी मारून बसतो ,  सर्वांच्या तोंडाचे पाणी पळवतो ", एक मात्र खरे की , दीर्घ प्रतीक्षे नंतर आलेला पाउस ..धरती मातेला तृप्त करतो . हिवाई बहरू लागते ..जणू धरणी चे रूप पालटून जाते . श्रावणाचे आगमन होताच ..निसर्गाचे लोभस रुपडे ..मनात साठवण्यासाठी आपण बाहेर पडतो .
भर पावसात ..निसर्ग पाहण्याचा आनंद काही औरच ..सफर म्हणा, सहल म्हणा ..रानोमाळ हिंडून हे सर्व पाहण्याची असोशी प्रत्येकाच्या मनात असते . कुठे ही ,कधी ही जा ..डोळ्याला सुखावणारा निसर्ग मनास एक नवी उर्जा देणारा आहे" ही भावना मनाला जाणवत असते .
डोंगरावरून कोसळणारे धबधबे , भरभरून वाहणाऱ्या नद्या , निसर्ग कुशीत असलेली रम्य अशी सहलीसाठी यावे असे निमंत्रण देणारी पर्यटन स्थळ , या सर्व ठिकाणी निसर्गाची विविध रूप डोळ्यांनी पहावी आणि मनात साठवावी अशीच असतात .
शहरी जीवनमान , शारीरिक आणि मानसिक श्रमाने थकून गेलेला माणूस ..पावसाळ्यात वेळ काढून ..सृष्टीत सुरु झालेला श्रावण -सोहोळा "पहाण्यासाठी आतुरतेने जातो , श्रावणात खुलून आलेला निसर्ग रसिक मनाला अजिबात निराश करीत नाही.
लेखकाला आणि कविमनाला कायम भुरळ घालीत आलेला ऋतू -म्हणजे वर्षा ऋतू ,  या पावसाळ्यात येणारा श्रावण महिना , या महिन्यात असणारे विविध सण, धार्मिक -सोहोळे  जन-सामन्यांच्या दिन-क्रमात आनंद आणणारे असतात . हर एक जण आपापल्या परीने श्रावणाचा आनंद घेत असतो . डोंगर-दर्यातून जाणरे नागमोडी वळणाचे रस्ते , हिरवाईने झाकून गेलेली टेकड्या आणि डोंगर शिखरे .अशा रस्त्याने गाडी चालवत जावे, डोळ्याला सुखावणारा निसर्ग , नजरे समोरचा अप्रतिम  नजारा पहाणे ..हे अनुभवण्याची गोष्ट आहे.
श्रावणातला निसर्ग कसा आगळा वेगळा असतो ..त्याची ही कविता 
कविता - श्रावण गाणी
---------------------------
श्रावणाची ही सारी किमया
वनराणीची फुलली काया ।।
श्रावणसखा हा आला आला
संगे त्याच्या पाऊस रमला ।।
भाऊ श्रावण होऊनी येई
माहेरा लेकी घेऊनी येई ।।
शेतशिवारी श्रावण आला
बळीराजा मनोमन खुलला ।।
नद्या नाले विहीरीला पाणी
धरणीमायेची श्रावण गाणी ।।
------------------------------------------
कविता- श्रावण गाणी
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
---------------------------------------------------
मित्र हो - असा  लोभस निसर्ग , श्रावणातले त्याचे सुंदर ,विलोभनीय रुपडे कायम अनुभवणे आपल्याच हातात आहे, त्यासाठी या निसर्गाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे " ही सामाजिक जबाबदारी आणि आपले कर्तव्य  आपण विसरता  कामा नये ".
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- लोभस रूप निसर्गाचे 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342 
------------------------------------------------------------------------