Monday, December 31, 2018

#चंदर - (बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग- ११ वा.

#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग -११ वा 
-----------------------------------------------------------------------------
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा,
त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता.
कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,"त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी 
परीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते .
"या बातमीने त्याच्या मनावर मोठाच आघात केला . चंदरला सरांनी फार मोठा भावनिक आधार दिला होता , त्याला योग्य मार्गदर्शन 
करणाऱ्या सरांचा सहवास आता मध्येच संपणार होता ", ही त्याच्या दृष्टीने फार वाईट गोप्ष्टी होती.

त्याला भेटल्यावर त्या दिवशी -सर बोलतांना म्हणाले - "चंदर , तुझ्या पदवी परीक्षेच्या वेळी, आणि नंतरच्या निकालासाठी  मी इथे नसणार.
पण मनाने नेहमी मी तुझ्याजवळच असेन ". वाडीसारख्या आडवळणाच्या गावातून आलेला एक गरीब मुलगा ", म्हणून तू पहिल्यांदा मला 
भेटलास , त्यावेळी मला वाटले , " हा काय शिकणार आहे ? ",राहील चार दिवस आणि अभ्यासाचा कंटाळा करून जाईल गावाकडे परत ",
पण ,असे झाले नाही .
चंदर , माझा अंदाज तू पार खोटा ठरवलास ", याचा मला फार आनंद वाटतो . तुझ्या मनात असलेली शिकण्याची तीव्र इच्छा ", मला जाणवत गेली,
तुझ्यातला एक जिद्दी विद्यार्थी मला जवळून पहायला मिळाला . मी माझ्या कुवतीप्रमाणे जमेल तसे सर्वप्रकारे सहकार्य केले, ते करतांना माझ्या 
मनात एकच भावना होती, ती म्हणजे तुझ्या सारख्या गरजू मुलाला मी मदत करतो आहे, जी पुढे नक्कीच सार्थकी लागणार आहे ",
यापुढे ही सतत तुझी आठवण येईल मला ."

सरांचे हे बोलणे ऐकून घेत चंदर म्हणाला -
" सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं , त्याची परतफेड कोरड्या शब्दात मी करू शकत नाही. एक नक्की - तुम्ही जर मला आधार दिला नसता तर 
हा चंदर इथपर्यंत पोंचू शकला नसता ."
सरांनी चंदरच्या पाठीवरून हात फिरवला , त्या स्पर्शाने ,चंदरच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू ओघळत राहिले ".
काही महिन्यानंतर , नोकरी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी चंदरचे सर  हे शहर सोडून आपल्या गावी रहाण्यासाठी म्हणून निघून गेले. त्यांच्या  जाण्याने 
"आपल्या जीवनात एक मोठी पोकळीच निर्माण झाली आहे " , हे त्याला जाणवत होते.

परीक्षेचे विचार मनात येत ", त्यावेळी चंदर ला वाटे , " ही परीक्षा आपल्या एकट्याची परीक्षा नाही, तर, ही परीक्षा बापूच्या गरिबीची होती ,"
गीरीजेच्या त्यागाची होती , रावसाहेबांच्या प्रेमाची ही परीक्षा होती . " .चांगल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून जगणाऱ्या गुरुजींच्या ध्येयवादी आयुष्याची ही 
परीक्षा होती ". या सर्वासाठीच्या असणाऱ्या परीक्षेत आपण पास झालेच पाहिजे तरच ,आतापर्यंतच्या आपल्या वाटचालीला काही अर्थ राहील ".

परीक्षा सुरु झाली , प्रत्येक पेपरा आपण चांगल्या प्रकारे सोडवला आहे " असे चंदरला वाटत होते. बघता बघता परीक्षा संपली , त्यानंतर उद्या तो 
वाडीला परतणार होता. खोलीवर आलेल्या चंदरच्या डोळ्यासमोर या शहरात तो पहिल्यांदा आला तो दिवस उभा रहात होता -
"चौथीच्या परीक्षादेण्यासठी म्हणून चंदर गुरुजींच्या बरोबर आला , आणि त्यानंतर याच शहरात कॉलेजमध्ये जायला मिळेल ", असे वाटले नव्हते .
हे सारे घडले ते केवळ -
रावसाहेबांच्या उदारपणा मुळे, त्यांच्या मनाच्या श्रीमंतीमुळे ", आणि त्यांनी गुरुजींना वाडीत आणले नसते तर ? 
,आजचा चंदर घडलाच नसता .
खरेच - गुरुजी वाडीत आलेच नसते तर ? 
वाडी कधीच बदलली नसती. लोक तसेच राहिले असते .
पंढरी , गणेश - व्यंकटी  यांचे आयुष्य जनावरांना चरायला घेऊन जाण्यातच संपले असते. अशा विचारातच चंदरला झोप लागली होती.

दुसऱ्या दिवशी चंदर गावी परतला , आता अभ्यासाची भीती नव्हती . आई-बापूंच्या बरोबर राहण्याचा आनंद तो घेणार होता. प्रत्येक भेटणारा त्याला 
विचारीत होता - चंदर, आता पुढे काय करणार आहेस ? 
या प्रश्नाला .. निकाल लागल्यावर ठरवू की ,अजून विचार केला नाही काहीच ,हे उत्तर देऊ लागला.
आणि कधी त्याला वाटे की -
निकाल जर चांगला लागला नाही तर ? 
कल्पनेनेच चंदर ची छाती धडधड करू लागे. सर्वांच्या अपेक्षांच्या नजरा चंदरवर होत्या , त्याच्या गुरुजींना तर 
चंदरकडून चांगला निकाल हवा होता. तर रावसाहेबांना वाटायचे .चंदर हाच गावातील पहिला पदवीधर होणार आहे.".
या अपेक्षा जाणवून चंदर ला मात्र स्वतहाच्या निकालाची भीतीवाटू लागली. दर दिवस उत्सुकतेचा उजाडत  होता.

त्यादिशी रावसाहेब शहरातून परतले ते मोठ्या आनंदात. आल्याबरोबर त्यांनी माणूस पाठवून 
गुरुजींना, वहिनींना , बापूला - गिरिजेला  आणि चंदरला 
वाड्यावर बोलावून घेतले , गावातील इतर माणसे ही  जमा झाली.

बैठीकीत सारेजण जमा झाले . रावसाहेबांनी चंदरला बोलावून स्वतहाच्या बाजूला बसवून घेतले . आणि ते सर्वांना सांगू लागले -
सारे जीवाचे कान करून ही बातमी ऐका मंडळी - 
"आपला चंदर पदवी परीक्षा फक्त पासच झालेला नाही , तर "तो विद्यापीठातून पहिला आला आहे ", कुलपतींचे सुवर्ण-पदक ", त्याने पटकावले आहे."
हे पहा चंदरला विद्यापीठाकडून आलेले हे पत्र " !

सऱ्या पंचक्रोशीत असे यश आज पर्यंत कुणाला मिळवता आले नव्हते ".
चंदरला प्रेमाने घट्ट धरीत रावसाहेब म्हणाले -
चंदर ,आज मलाच नव्हे तर साऱ्या वाडीला ,आजूबाजूच्या लहान मोठ्या गावांना तुझा अभिमान वाटतो आहे..

हे सर्व ऐकून ,पाहून चंदरच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धाराच सुरु झाल्या. "एवढे भव्य यश मिळेल याची त्याला कल्पना नव्हती ,अपेक्षाही नव्हती . हे यश 
म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाचे फळ होते ".

बापू आणि गिरिजा हे सगळं पाहून हरवून गेले होते. गिरीजेच्या डोळ्या समोर अजून ही शाळेचा हट्ट करणारा तिचा छोटुला - चंदर दिसत होता.
शेवटी - गुरुजी म्हणाले..
"चंदर , आपण सारेजण पदवीदान समारंभाला जाऊ या. तुझे कौतुक पहाण्याची संधी आम्ही मुळीच सोडणार नाही.

आणि ज्या दिवशी पदवी-समारंभ पार पडणार होता.. त्या दिवशी..
स्वतहा -रावसाहेब , गुरुजी , बापू आणि चंदर ", असे चौघेजण विद्यापीठात हजार राहण्यासाठी निघाले ......
 क्रमशा " : पुढे सुरु...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग -११ वा   
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------

Friday, December 28, 2018

चंदर- (बाल कादंबरी)-क्रमशः भाग-१० वा


#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग-१० वा
-------------------------------------------------------------------------------
सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल ", या अटीवर चंदर या कामावर हजर झाला .
आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे", अशा स्वरूपाचे काम ",हे जास्त जिकीरीचे काम नाही ,
. या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल ", गुरुजींची हे सांगणे
चंदरला योग्य वाटून गेले..

रोज ठरलेल्या वेळेत येऊन चंदर काम करू लागला . काही दिवस गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कडून इतरही कामे करून
घेण्यास सुरुवात केली . तसे तर त्यांच्या दवाखान्यात अनेक नोकर होते , त्यातून एखादा गैरहजर राहिला तर त्यादिवशी त्याचे काम चंदरला करावे लागत असे.,
मात्र या जादा कामाच्या  बदल्यात एक ही पैसा मिळत नव्हता.
या दवाखान्यात येणारे सगळे पेशंट श्रीमंत होते . काहीही झालेले नसतांना काल्पनिक आजाराने हे श्रीमंत लोक दवाखान्यात दाखल होत असायचे .
"पैश्याच्या जोरावर वाट्टेल तशी कामे करून घेतांना,  या लोकांना काही वाटत नसायचे. अशा लोकांच्या पलंगावरच्या चादरी बदलणे, खोली साफसुफ करणे " ही कामे डॉक्टर
चंदरला सांगत असायचे .

कॉलेजमधून निघण्यास उशीर झाला की दवाखान्यात येण्यास उशीर होते असे, त्यावेळी सगळ्या लोकांच्या समोर डॉक्टर चंदरला वाट्टेल तसे बोलायचे.
कधीकधी त्याला वाटायचे, द्यावं हे काम सोडून, जसं होईल तसं पाहून घेऊ , पण पैशाची अडचण आल्यावर आपले कसे होईल ? या एका विचाराने चंदरला  नोकरी
सोडता येत नव्हती.

एके दिवशी बापू आणि गिरीजा चंदरकडे आले. बापू म्हणाला - गावाकडं लई दवा-पाणी केल , काय बी फरक पडना, आता तुज्या डॉक्टरला दाखवू , इलाज करू , तवाच ,
तुज्या आईचं दुखणे कमी होईल बघ !,

आईची अवस्था पाहून चंदरचे मन गलबलून गेले . आपण मोठे व्हावे म्हणून आईने किती कष्ट करावे ?  शेवटी आजारी पडली, तरी मेहनत करण्यासाठी , तिचे मन तयार
आहे , पण आता थकलेल शरीर मात्र साथ देत नव्हतं .
बापूला आणि आईला घेऊन चंदर दवाखान्यात आला , आईच्या आजाराबद्दल त्याने डॉक्टरांना सांगितले , म्हणाला - सर, तुम्ही उपचार केले तर , माझी आई  नक्की बरी
होईल.

त्याचे ऐकून घेतल्यावर डॉक्टर म्हणाले -
" हे बघ चंदर, माझा दवाखाना म्हणजे धर्मशाळा वाटली की काय तुला ? असे फुकटचे पेशंट घेत बसलो तर माझे दिवाळे वाजेल.
तू तुझ्या आईला एखाद्या धर्मदाय हॉस्पिटल मध्ये दाखव , तिथे होईल सगळा फुकट इलाज. !

अहो ,डॉक्टर , मी तुमच्याकडे काम करतोय, त्यापोटी तरी काही करा ! अगदी कळवळून चंदर त्यांच्या बोलला .
त्यावर डॉक्टर म्हणाले -
"मग काय झालं ?, काम करतो म्हणे , फुकट नाही करीत तू काम ,मी पैसे देतो त्या कामाचे . तू जा आता , माझा वेळ घेऊ नकोस, माझे पेशन्ट तपासू दे मला.

या डॉक्टरनी आपल्या पोराला इतकं टाकून बोलाव !' ऐकूनच बापू आणि गिरिजेला वाईट वाटलं , आपला चंदर - गरीब स्वभावाचा आहे , म्हणून काय , त्याच्याशी असे वागाव का ?
काही न बोलता - तिघे ही त्या दवाखान्याच्या बाहेर पडले .

पैश्याच्या धुंदीत या डॉक्टरला माणुसकीचा विसर पडलाय. अशा माणसाकडे राहून  आपले "श्रम व्यर्थ खर्च का करायचे ? आता पुन्हा या दवाखान्याची पायरी चढणे  नाही ",
असे चंदरने ठरवले.
दुसर्या दिवशी चंदरच्या सरांना हे सारी हकीकत कळाली. त्यांनाही डॉक्टरांच्या अशा वागण्याने दुखः झाले. ते म्हणाले -
चंदर , आता चांगले वाटेपर्यंत तुझी आई इथेच राहील. तू काळजी करू नकोस . हा एक डॉक्टर असा वाईट वागला, म्हणून , इतर असेच आहेत ", असे मात्र नाही.

अरे ", समाजाचे भले झाले पाहिजे ", या भावनेने काम करणार्यांनी हे जग भरलेले आहे. अशी पण माणसे आहेत " , म्हणून तर हे जग व्यवस्थित चालले आहे ."
सरांच्या या शब्दांनी चंदरच्या दुखावलेल्या मनावर सरांनी जणू फुंकर घातली होती.
नंतर एका संस्थेच्या दवाखान्यात गिरीजेच्या आजारावर उपचार झाले . दोन महिने दवाखान्यात राहून गिरीजा चांगली बरी झाली . काही दिवसांनी मोठ्या समाधानाने
बापू आणि गिरीजा वाडीला परत गेली.

आईच्या आजारपणात तिच्याकडे लक्ष देण्या मुळे अभ्यासाकडे नाही म्हटले तरी दुर्लक्ष झाले होते . त्याची कसर आता भरपूर अभ्यास करूनच भरून काढावी लागणार होती.

चंदरने अभ्यासाला सुरुवात केली . रात्रीची जागरणे सुरु झाली, अभ्यास करतांना त्याला वाटायचे -
 गरीबाच्या वाट्याला हे दुखः देणारे भोग का येत असावे ?
माझ्यासारखे अजून कितीतरी जण या जगात आहेत , बिचार्यांना राहायला जागा नाही ,खायला अन्न नाही तरी ही मुले उपाशी पोटी राहून सुद्धा मोठ्या जिद्दीने शिकत आहेत.
"जगण्यासाठी माणसाला फक्त पैसाच लागतो का ?
मनाला निराश करणाऱ्या अशा प्रश्नांना झटकून टाकीत चंदर अभ्यास करीत होता.असे करीतच परीक्षा आली, आणि  झाली सुद्धा

परीक्षा देऊन चंदर आता गावाकडे आलेला होता .गुरुजींना भेटण्यासाठी चंदर त्यांच्या घरी आला , दोघे बोलत बसले ..तेंव्हा चंदर म्हणाला -
" गुरुजी , चांगले जगता येण्यासाठी माणसाला फक्त पैसाच आवश्यक असतो का हो ? त्याच्या जवळ भरपूर पैसा असला तर , त्याला कशाचीच गरज पडत नाही का ?

त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देतांना गुरुजी म्हणाले -
चंदर , शहरात राहून तुझ्या मनाचा पक्का समज झालेला दिसतो आहे की , "पैसा म्हणजेच जीवनाचे सर्वस्व आहे " ,
तुझा हा समज फार चुकीचा आहे. जीवनाचे खरे अनुभव अजून तुझ्या वाट्याला यायचे आहेत . तुला सांगतो चंदर ..
"समाधान नावाची गोष्ट ज्याच्याजवळ आहे ", तो खरा सुखी असतो. एखाद्या जवळ गडगंज संपती आहे. खाण्या-पिण्याची कमी नाही, सेवा करण्या साठी
नोकर -चाकर आहेत ", हे सगळ असून "मनाला समाधान नाही , शांती नाही .अशा माणसाच्या जगण्याला काही अर्थ आहे का ?
"शांत झोप लागत नाही ", म्हणून ही माणसे मखमलीच्या गाडीवर सुद्धा बेचैन होऊन देवाची पार्थना करतात,की "देवा मला सुखाची झोप लागू दे..!
चंदर ,अशावेळी या श्रीमंत माणसांना आपल्या सारख्या गरीबांचा हेवा वाटत असतो", हे तुला खरे वाटणार नाही.

हे बघ, आपल्याला उद्याची चिंता नसते , "आजचा दिवस पार पडला ", या समाधानात आपल्याला गाढ झोप लागत असते , आणि " हेच सुख पैसेवाल्यांच्या नशिबी नसते ",
म्हणून हे आयुष्भर दुखी असतात. अरे , किंमती दागिने , काय उपयोगाचे ?

माणुसकी , दुसऱ्या विषयी आपल्या मनात असणारे प्रेम , वाटणारी करुणा , त्याग करण्याची भावना ", हेच आपले खरे दागिने समजावेत. यामुळे तर माणूस खरा श्रीमंत बनतो.,
या वैभवात कधी कमी येत नाही. दुसऱ्यासाठी जगण्यात काय आनंद असतो ? हे कळण्यासाठी स्वतहाचे जगणे विसरावे लागत असते .

चंदर - एक लक्षात ठेव , खोट्या रुपाला कधी भुलू नये, आपल्या मनाचा संयम ढळू देऊ नये, तू असे वागल्यास तुझ्या मनाची द्विधा अवस्था होणार नाही.
"आपले जीवन म्हणजे सुख-दुखांचा, -उनपावसाचा खेळ आहे " ....

क्रमशा : पुढे सुरु .....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग-१० वा 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------








Tuesday, December 25, 2018

#चंदर- (बालकुमार कादंबरी)- क्रमश: भाग- ९ वा


#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग - ९ वा 
----------------------------------------------------------------------
बारावीच्या निकालानंतर चंदरचे कॉलेज सुरु झाले. शाळेच्या कामानिमित्ताने गुरुजी शहरात आले ,तेंव्हा चंदरचे कॉलेज त्यांनी पाहिले.
चंदर म्हणाला - " गुरुजी , हे शिकणे आपल्याला परवडणारे नाही. पुढचा सारा खर्च कसा झेपणार ?
त्याच्या प्रश्नाला उत्तर देत गुरुजी म्हणाले -
चंदर , प्रश्न खरोखरच अवघड आहे. ज्यांची पात्रता नसते ", ते पैशाच्या जोरावर शिकून मोठे होतात . गरीब विद्यार्थी मात्र त्याच्या अंगात 
असलेल्या गुणवत्तेवर सुद्धा केवळ पैशाच्या अभावी काही करू शकत नाही. "हे कटू सत्य आहे.

पदवी शिक्षणासाठी आता सुरुवात होणार होती. रावसाहेबांच्या ओळखी मुळे एका संस्थेच्या मोफत वसतिगृहात चंदरच्या रहाण्याची सोय होऊ शकली .
त्यानंतर चंदरने वकीलसाहेबांचे घर सोडले . चंदरला निरोप देतांना बाईसाहेब म्हणाल्या -
चंदर - तुला आम्ही ओळखू शकलो नाही. सामन्य नोकरासारखं राबवून घेतलं , चार-चौघांच्या समोर तुझा अपमानही झाला , पण तू कधीच आम्हाला 
उलट उत्तर दिले नाहीस. तुझं मन एवढं मोठं कसं ?
यावर चंदर म्हणाला -
" बाईसाहेब , गरिबी सगळं शहाणपण शिकवते माणसाला , तुम्ही मला आश्रय दिला, माझ्या पोटात चार घास गेले , ते तुम्ही खाण्यास दिल्यामुळे,
मला मिळालेले हे यश म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत . " या घरातील माणसांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. "
चंदरला निरोप देतांना त्याघरातील सर्वांची मने भरून आली. " सहवास घडला की या सहवासानेच माणूस ओळखता  येतो हे खोटे नाही ".

गुरुजींच्या सुचनेप्रमाणे चंदरने  विज्ञान- शाखेला प्रवेश घेतला. चंदर वसतिगृहात रहायला आला . शेकडो मुले रहात असलेल्या त्या गर्दीत चंदर 
सहजपणे मिसळून गेला. नाना -स्वभावाची मुले तिथे होती. 
सारी मुले गरीब घरातलीच  होती. खेड्यातून आलेली ही मुले "शिकून मोठे होण्याची स्वप्ने पहात होती
 "शहरातले वातावरण मनाला भुरळ घालणारे असते, मन भरकटून जाण्यास कोणते ही निमित्त पुरते , अशावेळी मन ताब्यात 
ठेवण्यास फार  कठीण जाते. अशा या वातावरणात अनेक मुले अभ्यास सोडून इतर गोष्टीत रमत असायची.

नव्या मित्रांच्या सहवासात चंदरचे नेवे जीवन सुरु झाले. या मुलांच्या बरोबर जुळवून घेतांना अनेकदा त्याला त्रास होत असायचा. या मुलांच्या 
सोबत रहायचे म्हणजे त्यांच्या म्हणायाप्रमाणे वागावे लागे , नाही वागले तर , मग , पोरं त्रास द्यायची. खाण्या-पिण्यात दिवस घालवणे , अभ्यास सोडून 
सिनेमा पहाणे , चकाट्या पिटत बसने , असले उद्योग आपल्याला परवडणारे नाहीत " , हे चंदर ला जाणवत होते.यातून ही तो अभ्यासाला बसलाच तर ,
हे पोरं मध्ये मध्ये येऊन त्याला अभ्यास करू देत नव्हती.
" हा त्रास कुणाला सांगायची  भीती होती. आणि वसतिगृह सोडून दुसरीकडे जाण्याची सोय नव्हती.त्यामुळे आहे त्या परिस्थितीत कसेतरी रहावेच 
लागणार आहे " , हे चंदरला कळून चुकले होते.

कॉलेजमध्ये वर्गात शिकवतांना- अनेक सरांच्या नजरेने -
हुशार चंदरला बरोबर टिपले होते.अनेकवेळा सरांचे मार्गदर्शन मिळू लागले . कधीकधी तो सरांच्या बरोबर अभ्यासा बद्दल चर्चा करू लागला होता.
" एक बुद्धिमान विद्यार्थी ", म्हणून चंदरला सारे कॉलेज ओळखू लागले. त्यातच वसतिगृहाचे प्रमुख असलेल्या सरांच्या कानावर " 
टारगट मुले चंदरला त्रास देत असतात " या गोष्टी आल्या .
, या नंतर  सरांनी स्वतहाच्या बंगल्याच्या बाजूला असलेली एक रिकामी खोली चंदरला राहण्यास दिली. चंदरच्या मागचा सारा त्रास 
आता संपला होता. या खोलीवर वर्गात शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करतांना कुणाचा त्रास होणार नव्हता ..

होळीच्या दिवशी ",वसतिगृहातील मुलांनी गावात जाऊन गोंधळ घातला", या प्रकारात चंदरचा सहभाग नव्हता , परंतु सगळ्या मुलांच्या बरोबर  त्याचेही 
नाव प्राचार्यापर्यंत गेले. शिस्त-भंग केल्याबद्दल या मुलांना शिक्षा होणार ", अशी चर्चा सुरु झाली. अपराध न करता चंदरलाही शिक्षा होणार आहे " ,
हे कळाल्यावर वसतिगृहाचे सर ", प्राचार्यांना भेटून म्हणाले -,
सर, चंदरचा या प्रकारात सहभाग नाही. त्याचे नाव विनाकारण सर्व मुलांच्या बरोबर यात आलेले आहे. या हुशार मुलाला आपण शिक्षा करू नये ", अशी 
विनंती मी आपल्याला करतो आहे.
सरांच्या या विनंतीचा विचार करून प्राचार्यांनी चंदरला शिक्षेतून वगळले. या प्रसंगामुळे  वसतिगृहाचे - सर ,आणि चंदर एकमेकांच्या खूप जवळ आले .

एकदा असेच बोलत असतांना चंदर म्हणाला -
सर, या प्रकारातून तुम्हाला माझ्या बद्दल काय वाटले ?
सर सांगू लागले - 
" चंदर , तू आज ज्या परिस्थितीचा सामना करतो आहेस, मी देखील या मधून गेलेलो आहे. वाट्याला आलेली गरिबी  आणि गरीब स्वभावा मुळे" मला नेहमी 
त्रास सहन करावा लागला . अशा ही परिस्थितीत मी माझे धैर्य मात्र कधीच खचू दिले नाही . प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यात आपले कौशल्य पणाला 
लागत असते हे मला शिकण्यास मिळाले.
चंदर , मी देखील तुझ्यासारखाच गरीब घरातला . आई-बापांनी पोटाला चिमटा घेऊन मला शिकवलं ", माझ्यासाठी त्यांनी किती आणि काय सहन केलेय ",
याची जाणीव माझ्या मनात कायम आहे.

चंदर - या अफाट दुनियेत मी एकच शिकलो , प्रत्येकाशी माणुसकीने वागायचे . जाती-पातीचे खूळ माझ्या डोक्यात कधी शिरले नाही.
माझ्या गुरुजींनी मला शिकवला तो माणुसकीचा धर्म , जातीच्या भिंती कधीच उभ्या राहिल्या नाहीत.
मला जो भेटला , त्याला मी फक्त माणूस मानला , तो कोण आहे ?, हे विचारीत नाही.
चंदर - माणसाने माणुसकी हा धर्म मानला पाहिजे , बंधू भावना , एकोप्याची जाणीव " या गोष्टीच मानवाच्या उध्दार करणाऱ्या आहेत ", 
"आपल्या जवळ जे देण्या सारखे आहे " , ते आपण मोकळ्या मनाने दुसऱ्याला देण्यात फार आनंद असतो. "जगाला प्रेम अर्पावे " , सानेगुरुजींची ही शिकवण 
मी आयुष्भर जपत रहाणार आहे.

"आपल्या जीवाचे कान करून सरांचा एकेक शब्द " आपल्या मनात साठवून ठेवावा, असे चंदरला वाटत होते. " खोटे मुखवटे लावून जगणाऱ्या लोकांच्या गराड्यात
 सरांसारखे सच्च्या भावनेने जगणारे अनेकजण असतील , अशा माणसांच्या जगण्याला खरा अर्थ आहे 
चंदरच्या विचारांना एक नवी दिशा देण्याचे काम सरांनी केले होते, सभोवतालचे गढूळ वातावरण पाहून मनाला मरगळ येते , जीवन निराशामय वाटते, पण ,
सरांसारखे व्यक्तिमत्व भेटते , त्यावेळी सारी निराशा झटक्यात दूर जाते आणि "जीवनात खूप चांगले आहे "- या आशेने जगण्याला नवीन उत्साह येतो.

कॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात "प्रथम-श्रेणीचे गुण ",मिळालेले पाहून 
चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते. 

क्रमश : पुढे सुरु ....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश : भाग - ९ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो -9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Sunday, December 23, 2018

#चंदर-(बालकुमार कादंबरी)-क्रमशः भाग - ८ वा.


# चंदर -(बालकुमार कादंबरी )- भाग-८ वा
------------------------------------------------------------------
चैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती.
 त्यांना स्वतः:चे दिवस आठवले,
"या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, "विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात
तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..! "

शहरातील एका वकीलमित्राकडे चंदरच्या रहाण्याची सोय करण्याचे ठरले. गुरुजी त्याला म्हणाले -
" हे बघ चंदर , आपण गरजू आहोत, तेंव्हा तडजोडी कराव्या लागतील. माझ्या या मित्राच्या घरी राहून तुला घरातील सर्व कामे करावी
लागतील, यामुळे तुझा प्रश्न तरी सुटेल , हे निश्चित  !.
या अटी मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ", हे चंदरला कळत होते , बापूला जास्त पैसे पाठवणे नेहमी कसे जमणार ?
तेंव्हा शिकवणीसाठी आणि पुस्तकांसाठी लागणाऱ्या पैशासाठी श्रम करावे लागणार ..!

गुरुजी सांगू लागले -
"चंदर , "कमवा आणि शिका " , या प्रमाणे तू स्वतःच्या पायावर उभा राहून शिकून दाखव.!
यासाठी परिश्रम करावे लागतील, अपमानाचे प्रसंग ही तुझ्यावर येतील पण घाबरायचे नाही. आपण श्रीमंत नाहीत आणि या जगात पैशाच्या
आधाराशिवाय जगणे कठीण आहे.
संकटांशी सामन करीत ,प्रतिकूल परिस्थितीशी झगडत  तुला मार्ग काढायचा आहे. कठोर परीश्रामाशिवाय
पर्याय नाही " ,हे नेहमी लक्षात ठेवून वाग , तुला अपयश येणार नाही.

गुरुजींच्या वकील मित्राकडे येऊन चंदरला आता बरेच दिवस झालेले होते. या प्रत्येक दिवसात गुरुजींनी केलेल्या सूचनेप्रमाणे चंदरने आपली वागणूक ठेवली होती.

वकीलसाहेब सांगतील त्याप्रमाणे चंदर घरातली सगळी कामे करीत होता. एव्हढयाने वकीलसाहेब थांबत नव्हते,त्यांच्या ओफिसातील कामे
देखील चंदरला करावी लागत होती. वकिलीन बाईंचे जग तर तर बोलून चालून श्रीमंतांचे ,त्यांच्या जवळ फक्त पैसेवाल्यांना किंमत होती.
चंदर सारख्या गरीब मुलाला आपण पोसतो आहोत ",म्हणजे फार उपकारी आहोत ",ही भावना त्यांच्या बोलण्यात नेहमी जाणवायची.
त्यांच्या मते  "यांचे हे समाजकार्य फार महत्वाचे आहे आणि मी ते करते ", इतरांना ही गोष्ट त्या मोठ्या गर्वाने सांगायच्या.
बारावीचा निकाल लागे पर्यंत त्यांच्या घराच्या दृष्टीने चंदर म्हणजे "पैशाने नाडलेला एक गरीब आणि सामन्य मुलगा,
खेड्यातून आलेल्या या
पोराला काय समजणार ? एक आश्रित म्हणून चंदर आपल्या घरात राहतो ", हीच त्यांची नजर होती.
त्यादिवशी मात्र अगदी चमत्कार झाला. मोलकरीण आली नाही, त्या दिवशी न सांगता चंदरने भांडी घासली पाहिजेत ", धुणी धुतली पाहिजे ",
असा नियमच वकीलीनबाईंनी केला होता , या नियमाप्रमाणे भांडी घासून झाल्यावर चंदर बंगल्याच्या आवारात कपडे वाळत घालीत होता.

 वर्तमानपत्रात बारावीचा निकाल जाहीर झालेला होता . गुणवंत विद्यार्थ्यांची यादी आणि सोबत त्यांचे फोटो झळकत होते.
या यादीत चंदरचे नाव आणि फोटो पाहून वकीलसाहेब आश्चर्याने थक्कच झाले , एव्हढ्यात स्वतहा प्राचार्य आणि इतर मंडळी वकील साहेबांच्या
घरी चंदरच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी आले.

वकीलसाहेबांच्या ऑफिसात सारीजण बसली, वकिलीनबाई बाहेर येऊन बसल्या, चंदरच्या यशाबद्दल कळताच त्यांच्या मनाला धक्काच बसला.
नंतर मात्र , "चंदरला सामान्य समजून त्याच्याकडून कामे करून घेतली " याची त्यांना आता लाज वाटत होती.
वकील साहेबांनी सर्वांना पेढे दिले, चंदरचे अभिनंदन करून सारेजण निघून गेले.
बैठकीत वकीलसाहेब, चंदर आणि बाईसाहेब असे तिघे बसलेले होते.
बाईसाहेब म्हणाल्या -
"चंदर , कम्माल केलीस बरं तू , दिवसभर कोलेज  आणि घरी आल्यावर आमची कामं, एवढं करून तू तुझा अभ्यास केव्हा केलास रे ?
नाही तर आमची पोरं ,नुसती चैन करायला पाहिजे , अभ्यास नाहीच.

चंदर , तू मात्र खरा विद्यार्थी शोभतोस. मध्माशांसारखी चिकाटी आहे तुझ्याजवळ. !
चंदरच्या यशाने वकिलीणबाईंना खरोखर आनंद झाला होता.

वकीलसाहेब म्हणाले -
हे बघा - यापुढे चंदरला आपल्या घरातील कोणतेही काम सांगायचे नाही. त्याच्या अभ्यासाकडे आता मी स्वतहा लक्ष देणार आहे .एक होतकरू
विद्यार्थी आपल्या घरात आहे " , याची जाणीव आपल्याला उशिराच झाली .यापुढे मात्र असे होणार नाही. चंदरसाठी काही करण्यातच आपली
समाजसेवा होईल.

"बारावीचा निकाल लागल्यावर चंदर पहिल्यांदाच गावाकडे आलेला होता. "तो आला आहे " , ही बातमी कळताच प्रत्येकजण त्याच्या घरी आलेला ,एकच गर्दी जमली.
चंदर सारखे यश या पंचक्रोशीत कुण्या विद्यार्थ्याला मिळाले नव्हते.
" गीरीजेचे शब्द खरे ठरत होते.-
ती नेहमी म्हणे- मजा चंदर म्हणजे ज्ञानेश्वर हाय , तुमी बघत रहा, लई शिकणार हाय चंदर .

गुरुजींना चंदरच्या या यशाने मोठा आनंद झाला . ते म्हणत होते- गावात राहून हा पोरगा वाया गेला असता, गुरे- ढोरे वळता वळता याचे आयुष्य
बरबाद झाले असते .
म्हणतात ना , की चांगल्या गोष्टी होण्यासाठी निमित्त लागत असते , त्याप्रमाणे ही पोरं माझ्या हाताला लागली . मी माझ्या कुवती प्रमाणे यांना
घडवलं , आज माझ्या प्रयत्नांना चंदरच्या परिश्रमाने चांगले यश आलं.

क्रमश : पुढे सुरु .....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
# चंदर -(बालकुमार कादंबरी )- भाग-८ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------








Thursday, December 20, 2018

चंदर - {बालकुमार कादंबरी ) -क्रमश : भाग -७ वा .

चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश: भाग-७ वा 
--------------------------------------------------------------------
आज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता .
याला कारण ही तसेच होते. गावातील पोरांना घेऊन गुरुजी शहराकडे निघाले होते. उद्या तिथे बोर्डाची परीक्षा सुरु होणार होती , त्यासाठी अगोदर तिथे 
पोचणे आवश्यक होते . सारी मुलं रावसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेली होती.
मुलांना आशीर्वाद देतांना रावसाहेब म्हणाले -
" इतके दिवस आपल्या गावातली मोठ्याघरची पोरं ,त्यांना शहरात जाऊन , तिथे राहून शिकता आले . पण आजची गोष्ट वेगळी आहे .आज निघालेली पोरं 
गरीब आई-बापाची आहेत , ज्यांना शाळा म्हणजे काय ?, हे माहिती नव्हते , अशा घरातली पोरं परीक्षा देण्यासाठी जात आहेत ", ही खरी आनंदाची गोष्ट आहे.
"माझ्या बाळानो , यशस्वी व्हा. ! ",

"चंदर , पंढरी , गणेश , शालीकराम आणि व्यंकटी " अशा पाच जणांना गुरुजींनी निवडले होते. गुरुजी आणि पोरं गाडीत बसले. . बापू आणि गिरीजा गाडी जवळ उभे होते.
आपली आई पदराने डोळे पुसत आहे ", हे चंदरला दिसत होते.
गुरुजी म्हणाले - वेशीजवळच्या मारुतीला नमस्कार करून पुढे निघायचं , आपल्या ग्राम-देवतेला विसरायचं नाही बरं का ! ,
आमच्या ध्यानात हाय की गुरुजी !, असे म्हणत पोरांनी मना डोलावल्या .
दोन-तीन तासाच्या प्रवासा नंतर शहर -गाव आले. गावातून आलेली गाडी सरळ मोंढा-बाजाराच्या आवारात थांबली . रावसाहेबांच्या व्यापारीमित्राच्या आडत -दुकानच्या मागे 
असलेल्या खोल्यामध्ये गुरुजींची आणि पोरांच्या उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रावसाहेबांच्या सुचनेनुसार सगळी व्यवस्था अगदी चोखपणे केलेली दिसत होती.
लहानशा वाडीत वाढलेली ही पोरं शहरात दिसणार्या झगमगाटकडे  तोंडात बोटं घालून पहात होती .रस्त्यावरून पाळणार्या मोटारी , फटफटी, सायकली या सगळ्या गोष्टींना पाहून त्या जादूच्या 
खेळण्या सारख्या वाटत होत्या . इकडून -तिकडे फिरणाऱ्या वाहनांना कुणी जादूची किल्ली देऊन रस्त्यावर सोडलं की काय ? असेच जणू त्या पोरांना वाटत असावे.

गुरुजी परीक्षा केंद्रावर आले, केंद्र- प्रमुखांना  शिक्षणाधिकारी साहेबांनी दिलेले परीक्षेचे परवानगी -पत्र त्यांनी दाखवले . गुरुजींच्या कामाची महती या केंद्र-प्रमुखांच्या कानापर्यंत 
आलेली होतीच . दूर असलेल्या वाडीसारख्या गावात राहून गुरुजी करीत असलेल्या कामाचे त्यांना कौतुक वाटत होते.
आजच्या काळात शिक्षणाची होत असलेली परवड पाहून हताश न होता मोठ्या उमेदीने काम करणारे गुरुजी सगळ्यापेक्षा वेगळे वाटत होते . केंद्र-प्रमुखांनी गुरुजींना सर्व 
सहकार्याचे आश्वासन दिले , काहीच अडचण येणार नाही ", हे सांगितले , तेंव्हा निश्चिंत मनाने गुरुजी मुकामाच्या ठिकाणी परतले .

वर्ष-सहा महिन्यापूर्वी या पोरांना शाळा म्हणजे काय ? हे माहिती नव्हते , पुस्तकात काय असते हे कळत नव्हते.. अशी ही मुले उद्या परीक्षा देणार होती . 
गुरुजींना वाटले -
"खरी परीक्षा तर आपली आहे ", या पोरांसाठी आपण जी मेहनत घेतली आहे..त्याची खरी कसोटी ..म्हणजे मुलांची ही परीक्षा . या परीक्षेत आपण पास झालेच पाहिजे .
रात्रीचे जेवण झाल्यावर गुरुजी आणि पोरं परीक्षेब्द्द्लच बोलत होती. त्यांची तयारी कशी आहे ? ,हे पहावे म्हणून पुन्हा एकदा गुरुजीनी नमुना प्रश्न-पत्रिका सोडवण्यास सांगितले.
चंदर , गणेश आणि पंढरीने सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिली , तर शालिकराम आणि व्यंकटी या दोघांनी लिहिलेली उत्तरं समाधानकारक आहेत ", हे गुरुजीनी पाहिले .

सकाळ झाली, पेपर सुरु होण्याच्या एक तास अगोदर मुलांना घेऊन गुरुजी परीक्षा केंद्रावर येऊन पोंचले होते. परीक्षा -केंद्रावर पोरांची आणि पालकांची गर्दी दिसत होती . आपला 
नंबर कोणत्या खोलीत आहे ?, हे पाहण्याची घाई प्रत्येकाला झालेली होती . गर्दीतल्या मुलांकडे चंदर पहात होता. त्याच्यापेक्षा लहान असणारी पोरं त्याला खूप हुशार आहेत हे 
दिसत होते, शहरात वाढलेल्या त्या पोरांमध्ये एक प्रकारचा सफाईदारपणा होता., धीटपणाने ती पोरं सगळीकडे वावरत होती, एकमेकांशी बोलत होती .
चंदर , पंढरी आणि गणेश यांचा नंबर एकाच वर्गात आलेला होता तर व्यंकटी आणि शालिकराम या दोघांचा नंबर बाजूला असलेल्या वर्गात होता. गुरुजींनी प्रत्येकाला त्यांच्या 
बेंच जवळ नेऊन बसवले.
ते म्हणाले- अगोदर पेपर वाचायचा, प्रश्न समजून घायचा,जो  सोपा वाटेल तो अगोदर सोडवायचा. कठीण वाटणारा प्रश्न नतर सोडवा !, अजिबात घाबरून जायचे नाही..!
पोरांना सूचना देऊन गुरुजी वर्गाच्या बाहेर येऊन बसले.

बाकावर बसलेल्या चंदरची छाती धडधड करीत होती. त्याच्या हाताला घाम फुटला  होता .थरथरी सुटलेल्या हाताकडे पाहून चंदर वाटले, "खुरपीने काम केलेल्या हातात आज पेन आले "!
ही देवाचीच कृपा म्हणायची .
प्रश्न-पत्रिका वाटल्या गेल्या , साऱ्या वर्गात एकदम शांतता पसरली. अधीऱ्या मनाने सारी मुले हातातला पेपर वाचीत होती. कोणता प्रश्न अवघड , कोणता प्रश्न सोपा ?,हे मनाशी 
ठरवत होती.
चंदरने हातातली प्रश्न-पत्रिका वाचून काढली, हे प्रश्न आपण लिहू शकतो , याची उत्तरे आपल्याला येतात ", हे त्याला जाणवले ,तशी त्याच्या छातीची धडधड थांबली. सोपे प्रश्न 
अगोदर सोडवायचे ", गुरुजींची सूचना आठवली आणि त्याने पेपर लिहायला सुरुवात केली.
त्या दिवशी रात्री गुरुजीनी प्रश्न-पत्रिका समोर ठेवून प्रत्येकाची चौकशी केली. चंदर , गणेश आणि व्यंकटी ने सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवले होते. पंढरी आणि शालिकराम या दोघांचा 
एकेक प्रश्नच लिहायचा राहिला होता. तरी पण काळजीचे कारण नव्हते. गुरुजींना पोरांच्या यशाब्द्द्लची खात्री वाढली . नंतर मात्र सर्व व्यवस्थित पार पडले . अभ्यासाच्या नादात परीक्षा 
कधी संपली हे कळलेच नाही. परीक्षा संपवून सारेजण गावाकडे परतले.

गुरुजींनी परीक्षेचा सगळा वृतांत रावसाहेबांना सांगितला, ते ऐकून पोरांचा निकाल व्यवस्थित लागणार ", याची कल्पना त्यांना आली. ते म्हणाले -
गुरुजी - आता आपल्याला शाळेच्या तयारीला लागले पाहिजे. शाळेला परवानगी मिळाल्याचे पत्र आजच आले आहे.विद्यार्थी मिळाल्यास सातवी पर्यंतची शाळा आपल्याला सुरु 
करता येणार आहे. प्रत्येक वर्गाची एकेक तुकडी म्हटली तरी चार-पाचशे मुले सहज शाळेत येतील. त्यासाठी इतर शिक्षकांच्या नेमणुका कराव्या लागणार होत्या . हे सर्व काम 
स्वतः: रावसाहेब करणार त्यामुळे या गोष्टींची काळजी गुरुजींना करावी लागणार नव्हती.
आठ दिवसांनी गुरुजींनी चंदर , व्यंकटी ,गणेश आणि शालिकराम यांना बोलावून घेतले. ते म्हणाले - पोरांनो - आपली शाळा सुरु होणार आहे पण तुमच्यासाठी ही शाळा नाही,
तुम्ही बोर्डाची परीक्षा पास झालात तर मी एकदम सातवीच्या वर्गाची तयारी करून घेणार आहे. तुम्ही वेळेवर शाळेत गेला असतात तर आज आठवीत शिकला असता आणि जर उद्या 
पाचवीच्या वर्गात बसलात तर ,नवी बारकी पोरं हसतील तुम्हाला ..! 

" त्या दिवशी - अगदी भल्या पहाटे गुरुजींच्या बोलण्याचा आवाज चंदरच्या कानावर पडला .तसा तो बाहेर आला ..
अंगणातल्या बाजेवर बापू आणि गुरुजी बसले होते. बापूच्या शेजारी उभी असलेली गिरीजा पदराने डोळे पुशीत आहे " , हे पाहून चंदरच्या पोटात धस्स्च झाले .
गुरुजींनी कोणती बातमी सांगितली ?,
समोर चंदरला आलेला पाहून बापू म्हणाला , चंदर  , अदुगर गुरुजींच्या पाया पड बाबा , "तू पास झालास हे सांगायलाच गुरुजी आलेत की रं !

चंदरने गुरुजींच्या पायावर डोके टेकवले. त्याला उठवीत गुरुजी म्हणाले -
चंदर , अरे तुम्ही पाच ही जण पास झालात. तू आणि पंढरी पहिल्या वर्गात तर गणेश , व्यंकटी  आणि शालिकराम हे तिघेजण दुसऱ्या वर्गात पास झाले . आपल्या शाळेचा निकाल 
शंभर टक्के " लागलाय ..!
एव्हढ्यात तिथे रावसाहेब  आणि इतर काही मंडळी चंदरच्या घरी आली ,स्वतः: रावसाहेब आपल्या पोराचे कवतिक करायला आलेले आहेत " , हे जाणवून बापूचे मन भरून आले.
रावसाहेब  स्वतः या मुलांच्या यशाबद्दल गावभर पेढे वाटीत होते. गुरुजी , बापू आणि गिरीजा यांच्या हातावर त्यांनी पेढे ठेवला , स्वतहाच्या हाताने चंदर ला पेढा खाऊ घातला
त्यांच्या  मनाचा हा मोठेपणा पाहून गुरुजींना आनंद होत होता. शाळेचे खरे श्रेय तर रावसाहेबांना दिले पाहिजे, आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत.

रावसाहेब सांगू लागले - 
गुरुजी , केवळ तुमच्या मुळे या गरीब घरच्या पोरांना हा आनंदाचा दिवस दिसला आहे. तुम्ही भेटला नसता तर ही पोरं आज ही डोंगर माळ्यावर गुरं चरायला 
घेऊन जातांना दिसली असती., शेतात राबतांना दिसली असती.पैसेवाल्या पोरांनी शिकण्यात काही नवल नाही , शिकण्याची खरी गरज या पोरांना आहे. गुरुजी , तुमच्या हातात ही 
पोरं पडली , आता मात्र त्यांच्या आयुष्याचे कल्याण होणार आहे ", यात शंका नाही.

गुरुजी या स्तुतीने भारावून गेले . ते म्हणाले -
रावसाहेब , मी फक्त निमित्त आहे . खरा मोठेपणा तुमच्या मनाचा आहे. तुम्ही आमच्या पाठीशी आहात, म्हणून हे करता येतंय . तुमच्या परीक्षेत मी पास झालो ", याचाच आनंद मला 
होतो आहे. रावसाहेब आणि गुरुजीकडे चंदर पहात होता -
 त्याच्या मनात विचार सुरु होते ..
"हे यश आपल्या एकट्याचे नाही . यात आपल्या बापूचा , आणि आईचा  फार मोठा वाटा आहे. गुरुजींच्या प्रयत्ना मुळे हे जमले . त्यांच्या सारखा योग्य  गुरु भेटला ", म्हणून आपली ही 
परीक्षेची घडी निभावली आहे.
"आनंदाचे अश्रू लपवणे चंदरला अवघड जात आहे " ,गुरुजी मोठ्या समाधानाने त्याच्याकडे पहात होते .......!

क्रमश : पुढे सुरु .....
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चंदर -(बालकुमार कादंबरी )- क्रमश: भाग-७ वा -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Monday, December 17, 2018

#क्रमशः चंदर (बालकुमार कादंबरी)- भाग - ६ वा.


# चंदर -(बालकुमार कादंबरी )- भाग- ६ वा .
----------------------------------------------------------------------
गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की
"चांगल्या सवयी कशा असतात ? " ,
 हे आपल्याला कळून येते .

हटवादी माणूस  जसे दुसऱ्याचे काहीही ऐकून न घेता आपलचं ते खरे " , असे वागत असतो , "वाईट सवयींचे असेच असते ",
अंगातल्या वाईट सवयींना दूर करणे फार अवघड असते. "आळस, कंटाळा , अजागळ पणा "या सवयी अंगात असल्यावर माणसाला पुढे जाण्याचे रस्तेच बंद होतात.

दुसऱ्याशी व्यवस्थित बोलणे, कुणावर अवलंबून न रहाता स्वत:हाचे काम स्वतः करणे, , वेळेचे महत्व ओळखून काम पूर्ण करणे, फालतू कामात 
वेळ न घालवता, चांगल्या गोष्टीत वेळ घालवणे " या गोष्टी गुरुजींच्या सहवासात चंदर शिकत होते.
गावातील माणसांचे वागणे तो पहात होता. शेतावरुन आलं की , दोन-चार जणांचं टोळकं घरापुढच्या ओट्यावर बसून , नाही तर चावडी जवळ बसून बिड्या फुंकत बसत ,
 वायफळ गपा करण्यात त्यांची रात्र सरून जायची. " या वाया गेलेल्या वेळेची किंमत त्यांना कळत नव्हती. 
कारण "वेळेची किंमत 
न करणार्यांना ' वेळ ही कधी क्षमा करत नाही.". 
आणि या लोकांना हे असे कुणी शिकवत नव्हत, आपणहून समजून येणे त्यांच्या डोक्यात येणे शक्य नव्हते.

" चांगला मित्र भेटणे, चांगला गुरु भेटणे " या गोष्टी योगायोगाच्या नसून आपल्या नशिबातच असाव्या लागतात.. सकाळी लवकर उठणाऱ्या गुरुजींच्या पाठोपाठ चंदर उठत होता.

आपले शरीर, आपले मन ", निरोगी आणि स्वस्थ  ठेवायचे असेल तर त्यासाठी जमेल तेव्हढा व्यायाम केला पाहिजे . " गेली अनेक वर्षे हा नियम गुरुजी अगदी 
कसोशीने पाळत होते.
त्यांची ही सवय चंदर ने आपोआप उचलली. " घर स्वच्छ ठेवणे , सारे सामान व्यवस्थित ठेवणे , पिण्यासाठी ताजे पाणी भरून ठेवणे " अशी कामं 
करण्यात चंदरचे मन रमत होते.

स्वतः: स्वंयपाक करणाऱ्या गुरुजींनी चंदरला हे हळूहळू शिकवण्यास सुरुवात केली तेंव्हा "स्वतः: च्या हाताने तयार केलेल्या अन्नाची चव खुप वेगळी लागते 
हे चंदरला जाणवत होते. " जसा आहार तसे विचार ", या म्हणीची सत्यता पटवून देतांना गुरुजी सांगायचे- " 
ताजे-साधे-सकस अन्न खाणाऱ्याचे मन देखील 
 साधे-सरळ -सात्विक होत असते.
-आणि जे दिसेल ते खाणाऱ्याचे मन चंचल होते. ",तामसी स्वभावाच्या माणसाच्या आहारात तेज-आणि मसालेदार पदार्थ असतात असे पाहायला मितात.
"अशा शिकवणीतून चंदर घडत होता. उत्तम कारागिराच्या हातात दगड जरी दिला, तरी, शेवटी त्याच्या कुशल हाताने घडवली जाते ती "एक सुंदर आणि सुबक मूर्ती ",.

चंदरच्या कोवळ्या मनावर असे संस्कार गुरुजींच्या सहवासात होऊ लागले.
" योग्य असा गुरु भेटला म्हणजे " शिष्याच्या जीवनाचे सार्थक होत असते ". चंदरला हे गुरुजी भेटले आणि ज्ञानाचा दीप चंदरच्या हृदयात लावला गेला. या दिव्याच्या 
मंगल प्रकाशाने चंदरच्या मनातील अंधारमय जीवन आता उजळून निघणार होते.

अधाश्या सारखा " चंदर, एकेक गोष्ट शिकण्यास उत्सुक आहे, त्याच्या बुद्धीची झेप फार मोठी आहे " ,हे आता गुरुजींनी चांगलेच जाणले होते - ते म्हणायचे -
"चंदर - ज्ञान म्हणजे महासागर आहे, या महासागरातून आपल्याला एक मोती जरी वेचता आला तरी आपण स्वतः:ला धान्य समजावे ", 
"विद्या म्हणजे सर्वश्रेठ धन आहे ! 
ज्याच्या संचयाने माणसाला कीर्ती मिळते, या धनाचा कितीही साठा केला तरी तो कमीच आहे. ",
विद्या शिकल्याने माणसात विनय येतो ", विनयशीलता हा गुण व्यक्तीचे भूषण असते ", अशा स्वभावाने सारे जग जिंकता येते .
"ज्ञानी आणि विनयी माणूस सर्वांच्या आदरास पात्र होत असतो. "
आपल्या जवळचे सारे ज्ञान-भांडार मुक्त हाताने चंदरला देत होते आणि चंदरही हे सारे विचार आपल्या मनावर कोरून ठेवीत होता.

गुरुजींच्या शिकवण्यात वेगळीच जादू होती. त्यांनी शिकवलेले प्रत्येक पाठ विद्यार्थ्यांच्या पक्के लक्षात रहात होते. मराठी, इतिहास , भूगोल ", ज्ञानाचे प्रचंड भांडार चंदर आणि मुलांच्या समोर खुले होऊ लागले होते.
गणितातील बेरीज- वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही मंडळी चंदरला जवळच्या मित्रा सारखी वाटू लागली.

गुरुजींच्या खोलीवरची वर्दळ आता खूप वाढली होती. गुरुजींच्या जवळ रहाणारा चंदर आता खूप खूप हुशार झाला आहे ", हे लक्षात येऊ लागल्या मुळे ",आपल्याही पोराने 
असेच शिकावे ", असे वाटणाऱ्या आई-बापांची संख्या वाढू लागली. दोन-चार महिन्यांच्या काळातच पाच-पंचवीस पोरं गुरुजींच्या समोर बसून काही-ना काही 
शिकत आहेत हे सगळ्यांना पहायला मिळू लागले.

रावसाहेबांची फेरी अधून-मधून होत असायची. पुस्तकात रंगून गेलेली मुले पाहून त्यांना आनंद वाटायचा. "पुढच्या वर्षी आपल्या गावात शाळा सुरु होण्यात आता अडचण  
निर्माण होणार नाही " या बद्दलची खात्री पटली.  कशाची ही अपेक्षा न ठेवता दुसर्या साठी सदैव काही चांगले वागणाऱ्या पैकी "रावसाहेब होते ".

चौथीच्या वर्गाची परीक्षा देता येईल अशी तयारी गुरुजींनी काही मुलांच्याकडून करून घेतली, इतके दिवस या मुलांना केवळ शाळा नव्हती म्हणून शिकता आलेले नव्हते ",
या पोरांची पात्रता खूप मोठी आहे ", हे गुरुजींना जाणवत होते. 

एक दिवस तर गुरुजींनी या पोरांची परीक्षाच घेऊन पाहिली. पेपरमधले सर्व प्रश्न या पोरांना सोडवता आले आहेत ",
 हे पाहून गुरुजींनी निर्णय घेऊन टाकला -
"आता या पोरांना घेऊन तालुक्याच्या गावी जायचे, बोर्डाच्या परीक्षेला बसवायचे. पाहू तर खरे - यश मिळते की नाही ?

असे ठरवून एक दिवस, गुरुजी आणि स्वतः: रावसाहेब तालुक्याच्या गावी आले. ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी शिक्षण-अधिकारी साहेबांची भेट घेतली -
" गावातील परिस्थितीचे वर्णन गुरुजींनी केले, येणाऱ्या सर्व अडचणी साहेबांच्या समोर मांडल्या. साहेबांना गुरुजींच्या शब्दातली कळ कळ आणि तळमळ जाणवली असावी .

"आजच्या दिवसात परिस्थिती बिघडलेली असतांना हा माणूस आड-वळणाच्या गावात राहून , दुसऱ्यांनी शिकावे ", 
यासाठी धडपडतो आहे "  अशा निस्वार्थ भावनेचे दर्शन 
आजकाल दुर्मिळ झाले आहे.हे जाणवून
 शिक्षणाधिकारी साहेब म्हणाले- 
गुरुजी, तुमच्या सर्व भावना मला समजल्या, तुमचे कार्य अजोड असेच आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या परीक्षेला बसवू शकता "..!
याबाबतीत हवे असणारे सर्व सहकार्य तुम्हाला माझ्या कडून निश्चित मिळेल .
आपल्या प्रयत्नांना एवढे यश मिळेल ", याची कल्पना गुरुजींनी केली नव्हती.
 
रावसाहेबांना खूप आनंद झाला ते म्हणाले -
गुरुजी , तुमच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. शिकण्यापासून माझ्या गावातील पोरं दूर राहिली असती. आज केवळ तुमच्यामुळे या पोरांना शिकायला मिळतंय, आणि यापुढेही 
मिळणार आहे ".

गुरुजी, परीक्षेसाठी जो काही खर्च लागणार असेल , त्याची काळजी तुम्ही करायची नाही . पोरांना व्यवस्थित न्यायचं, परीक्षेला बसवायचं ,हेच फक्त तुम्ही करायचं ..!

पैशाची काळजी अजिबात करायची नाही, त्या साठी मी आहे की ..तुमच्या पाठीशी....!

क्रमश: पुढे सुरु ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश: चंदर (बाल कुमार कादंबरी )- भाग- ६ वा .
ले- अरुण वि.देशपांडे 
९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, December 14, 2018

चंदर - (बालकुमार कादंबरी ) क्रमश : भाग - ५ वा

,#चंदर-  ( बालकुमार कादंबरी)
क्रमश: भाग - ५ वा
---------------------------
आपल्या घरातल्यापेक्षा जास्त वेळ गुरुजींसोबत राहणाऱ्या चंदरच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात खूपच फरक पडल्याचे जाणवत होते.
चंदरबद्दलचं बोलत असताना एक दिवस बापू म्हणाला -
गिरिजे, आपल्या चंदरच कामच लै वेगळ हाय गं, त्याच बोलणं, चालणं पाहून तर वाटतंय, चंदर आपल्या घरातच शोभत नाही ',
हे गुरुजी भेटल्यापासून आपल्या चंदरच डोकं लै चालताय, जसं बंद पडलेलं घड्याळ,  चाबी दिल्यावर पुन्हा सुरु झालंय.

' धनी, मी तर सारखी म्हणत राहाते की,आपला चंदर म्हणजे ज्ञानेशरच हाय, याच्या लहानश्या डोसक्यात लई अक्कल भरलीया !",
चंदर विषयीचे कौतुक गिरिजेच्या शब्दा-शब्दातून व्यक्त होत होते. तिच्या बोलण्यावर मान डोलवत बापू सांगू लागला -
गिरिजे, आपला चंदर हायेच लई हुषार,
गुरुजींनी एकदा का काही सांगितले की याला तर समद एका झटक्यात पाठ बी होऊन जातंय,
मी तर ठरवलंय , चंदरला घरच्या कामाला जुपायचं नाही,त्याला गुरुजींच्या हवाली करून टाकायचं आपण.
बापूच हे बोलणं ऐकून गिरीजा म्हणाली,
" तुमच्या बोलण्याच्या बाहीर मी न्हाई, आता शिकून मोठा होईस्तोवर आपला चंदर ,गुरुजींचा.'

एक दिवस बापू चंदरला म्हणाला-
'तुझ्या गुरुजीला आपल्या घरी घेऊन ये की ",
बापुची ही इच्छा ऐकून चंदरला वाटले,
"आपल्या बापूच्या मनात  शाळेबद्दल राग नाही ,हे किती चांगलं झालय !',

गुरुजींची भेट झाल्यावर चंदर म्हणाला,
" सांजच्या वेळी फिरायला जातांना, आमच्या घरी जायचं का ? बापूंनी बोलावलंय तुम्हाला.
हे ऐकून गुरुजी म्हणाले-
अगदी जरूर जाऊ,
माझं काम आहेच बापूशी, शाळेबद्दल थोडं बोलायचं आहे,
आपण आज जाऊया तुझ्या घराकडे. ! गुरुजींनी कबुल केल्याचा चंदरला आनंद झाला , मग दुपारभर त्याने गुरुजींनी शिकवलेले धडे पाठ केले .
"पहिली-दुसरीच्या पुस्तकातील सगळे धडे चंदरला पाठ होते, त्याची अशी प्रगती पाहून गुरुजींना वाटायचे , " मनाची ओढ ज्या कामात असते  
तेच काम करायला मिळते तेंव्हा त्यात खूप प्रगती होते !  ह्या चंदरच नेमके तेच होते आहे.
"वाडीसारख्या आडवळणाच्या  गावात चंदरच्या रुपात ते एका हिऱ्याला पहात होते. कचऱ्यात असला म्हणून काय झाले ?, 
हिरा हा शेवटी हिराच असतो.",
त्याचे तेज लपून रहात नाही.
चंदरच्या बुद्धीच्या तेजाने गुरुजींना दिपवून टाकले, या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम गुरुजींना करावे लागणार होते.
 "योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो 
पुढे खूप शिकेल. ही जाणीव गुरुजींना झाली . "योग्य शिष्य ",मिळण्यासारखा आनंद एखाद्या गुरूला मोलाचाच असतो. 
चंदरच्या घराकडे जातांना 
गुरुजींच्या मनात हे विचारचक्र सुरूच होते.

गेल्या दोन-चार महिन्यात वातावरणात बराच पडत होता. आता गुरुजींच्या खोलीवर चंदर सोबत इतर अनेक मुले येऊ लागली होती . 
पंढरी, गणेश , प्रकाश , पांडुरंग , व्यंकटी अशी काही पोरं नेमाने खोलीवर येत असणारी .चंदर सारखी फार हुशार नसली तरीही शिकावे , पुढे जावे ही 
जिद्द या पोरांच्या मनामध्ये आहे जाणवत होते.
वेळेवर शाळेत गेली असती तर ही पोरं आज सातवीत किंवा आठवीच्या वर्गाचे विद्यार्थी राहिले असते , आता उशीर झालाय हे खरं असलं ,तरी वेळ 
गेलेली नव्हती. ही गोष्ट गुरुजींना समाधान द्यायची.
आपण या पोरांची तयारी करून घेतली आणि साऱ्यांना एकदम चौथी बोर्डाच्या परीक्षेला बसवले तर ?

ही कल्पना गुरुजीना अचानक सुचली, आणि प्रत्यक्षात ही कल्पना आणण्यास अवघड काही नाही नव्हते . वार्षिक परीक्षेला अजून चार-पाच महिने बाकी होते ,
आणि ही पोरं मेहनतीला मागे हाटणारी नाहीत. , तेंव्हा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे ?"
"झाले तर ही पोरं पासच होतील . नाही झाली तर पुन्हा अभ्यास करता येतो की ", ! आणि ,
ही पोरं खरोखरचं पास झाली तर पुढच्या वर्षी एकदम पाचवी पर्यंत शाळा सुरु करता येईल, म्हणजे या पोरांना बाहेरगावी जायचे कामच पडणार नाही.
सुचलेल्या या कल्पने मुळे गुरुजींच्या मनाला खूप बरे वाटत होते, त्यांच्या मनात उत्साहाला उधाण आले. आता शाळेला विद्यार्थी मिळतील , आपली 
नोकरी चालू राहील. इतक्या दूरगावी आल्याचे चीज होईल.

विचारांच्या नादात गुरुजी चालत राहिले असते पण त्यांना चंदरने थांबवत म्हटले -
गुरुजी , आमचं घर आलं की !,
बापूने गुरुजींचे स्वागत केले . अंगणात बाज टाकलेली होती. गुरुजी बाजेवर बसले, समोर बापू होता, बाजूला चंदर उभा होता.
सामन्य परिस्थितीत राहणाऱ्या शेतकऱ्याचं घर असतं ,तसच बापुचं  घर दिसत होतं.
 चंदर ने पाण्याचा तांब्या गुरुजी समोर ठेवला. ग्लासमध्ये पाणी ओतून घेत, घोटभर पाणी घेऊन गुरुजी म्हणाले -
बापू, सहा महिन्यांनी शाळा सुरु होणार आहे , अजून गावातून मात्र लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीये.
"गुरुजी , तुम्हाला खरं सांगू का ..! आमच्या गावावर भरवसा ठेवून काम करू नका, तुमी आजूबाजूच्या गावातही एक-दोनदा जाऊन या, तुमाला लई पोरं  मिळतील .

गिरीजा चहाचा कप घेऊन आली. चहा ठेवत ती म्हणाली -
"गुरुजी , काय म्हणतो आमचा चंदर ? घरात असला की नुंस्ता  शाळा -शाळाच करीत असतो बगा ह्यो  पोरगा ,
त्याला काही येतं का वो ?

गिरीजा विचारीत होती , तिच्या शब्दात चंदरचे कौतुकच आहे हे गुरुजीना जाणवत होते.
चंदर कडे पाहत गुरुजी म्हणाले ,
"बापू , या गावातील सर्व पोरात हुशार असणारा फक्त एकटा चंदरच आहे.

पुढच्या चार महिन्यासाठी तुम्ही चंदरला माझ्या हवाली करून टाकायचं. चंदरला माझ्या सोबत राहायचं आहे , गावात असून चंदर बाहेरगावी असल्यासारखा समजायचं तुम्ही .

गुरुजींनी असं म्हटल्यावर , आपण काय बोलावं ? हे दोघांना समजेना, क्षणभर दोघेही गप्पच झाले.
ते पाहून चंदर म्हणू लागला -
"आये , गुरुजींच्या घरी राहू दे ना !, मी रोज एक टाईम येऊन तुम्हाला भेटत जाईन. बाहेरगावी गेलो असतो तर काय केलं असतं तुम्ही ?
शेवटी चंदरच्या हट्टापुढे अखेर बापूला
 "होय ", असेच म्हणावे लागले.

बापू म्हणाला - गुरुजी , आता इथचं जेवून जावा , गरीबाची मीठ-भाकरी आहे, ती गोड मानून घ्या.
हे ऐकून गुरुजी म्हणाले - बापू , मी कुठं आहे पैशेवाला , तुमच्यासारखाच मी गरीब माणूस आहे.. अहो, चंदरला तुम्ही आहात ,
गिरीजासारखी माया करणारी आई आहे , मला तर असे कुणीच नव्हतं .
मी वाढलोय ते दुसऱ्याच्या घरी , पानात शिळे तुकडे पडायचे , ते देखील गोड मानून खात होतो मी ,
बापू , खाल्लेल्या अन्नची किमत फार मोठी असते . हे लहानपणा पासून शिकत आलो मी .
मला कुणी परका समजू नका, तुमच्यातलाच एक समजत जा. !
गुरुजी हे बोलत असतांना चंदर मात्र एकटक पणे त्यांच्या चेहेऱ्याकडे पहात होता, आपले गुरुजी लई वेगळ्या मनाचे आहेत , ही कल्पना त्याच्या ठसत होती.

गीरिजेचे मन तिला समजावत होते -
"वेडे , माया कमी कर , या गुरुजींच्या हाताखाली तुझा चंदर राहिला तर , कल्याण त्याचेच होणार आहे !".

जेवण झाल्यावर गुरुजी परत निघतांना म्हणाले - 
बापू, उद्यापासून चंदर माझ्या खोलीवर, माझ्या सोबत राहील. त्याला माझ्याकडे आणून सोडा, आणि यापुढे तुमच्या पोराची काळजी तुम्ही अजिबात करायची नाही.
गुरुजींच्या बोलण्यावर बापू आणि गिरीजा मान डोलवित होती. "आपल्या चंदरचं नवं आयुष्य उद्यापासून सुरु होणार ...
एव्हढच त्यांना कळत होतं ......

क्रमश : पुढे सुरु .......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चंदर (बालकुमार कादंबरी )
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342 
------------------------------------

Thursday, December 13, 2018

चंदर (बालकुमार कादंबरी) - भाग - ४ था


# चंदर -(बालकुमार कादंबरी )- भाग- ४ था .
-----------------------------------------------------------------------
गुरुजी वाड्याकडे निघाले तेंव्हा तिन्हीसांजेची वेळ झालेली होती . डोक्यावर गवताचा भरा , हातात काही भाजीपाला घेऊन येणारी गडी-माणसे ,
त्यांच्या मागेमागे बाया आणि बारकी-सारकी पोरं चालत घराकडे जातांना दिसत होती. 
दिवसभर शेतात राबून थकलेले हे लोक घराच्या ओढीने येत होते. घरी त्यांची वाट पहानाऱ्यांच्या समोर कधी जातो असे त्यांना वाटत होते .
खड-खड आवाज करीत एखादी बैलगाडी समोरून जातांना दिसत होती. त्यातलं बारकं पोरगं कासरा धरून बसलेला पाहून गुरुजींना वाटले, "
 या वयात पोराच्या हातात जर पुस्तक आले असते तर हा पोरगा शिकला असता, पण नशीब बिचाऱ्याच , बसलाय या अडाणी गावात.

चार-दोन घरातून विजेच्या दिव्याचा उजेड, बाकी घरातून कंदिलाचा, अगर मिणमिणत्या चिमण्यांचा पिवळसर उजेड दिसत होता .
रस्त्यावरचा धुराळा हवेत तरंगून साऱ्या गावभर पसरला आहे पाहून गुरुजींनी निराशेने स्वत:चे खांदे उडवीत म्हटले -,
"या गावाचं काही खरं नाही.

रावसाहेबांच्या वाड्यावर ते गेले ,त्यांना पाहून नोकर म्हणाला -
आज मालकांची तब्येत जरा बरी नाही. कसर हाय अंगात , म्हणून पडून आहेत , 
पर गुरुजी , तुमी आल्यावर सांगा , म्हणजे खाली येतो ", असे म्हणालेत मालक.
बैठकीतल्या लोडाला टेकत गुरुजींनी समोर पडलेला पेपर डोळ्यासमोर धरला , मात्र त्यांच्या मनात , रावसाहेबांच्या बरोबर काय बोलायचं ? याची 
जुळवा-जुळव चालू होती.

थोड्याच वेळात रावसाहेब बैठकीत येऊन बसले , गुरुजींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
रावसाहेब गुरुजींना म्हणाले -
कशी काय वाटली आमची वाडी  ?, हाय लहान पर लई गुणाची बरं का आमची वाडी.

त्यावर गुरुजी सांगू लागले - रावसाहेब , सगळं व्यवस्थित लागलायं , तुम्ही माझी काळजी अजिबात करायची नाही.
तुम्ही पाठवलेली माणसं फार चांगल्या स्वभावाची आहेत बरं का.
गुरुजींनी केलेली स्तुती ऐकून रावसाहेब म्हणाले -
ते खरं आहे , पण, त्याचा उपयोग काय ? शेवटी सगळा कारभार आडण्याचा आहे ना !
गुरुजी, अडाण्याचा गाडा, तो कुठवर चालणार ?,मध्येच खडखड करीत तो थांबणारच की ..!

रावसाहेबांच्या बोलण्यात सत्यता होती .पण त्यातून गावाविषयी, गावातल्या लोकांच्या विषयी असलेले प्रेमच व्यक्त होत आहे हे गुरुजींना जाणवत होते
रावसाहेबांसारखा जाणता माणूस गावात असून देखील लोकांना मात्र त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेता येत नव्हता ",
याच गोष्टीचे गुरुजींना वाईट वाटत होते .

गुरुजीकडे पहात रावसाहेब म्हणाले -
तुमचं बस्तान आता नीट बसलयं,एक काळजी मिटली. 
आता आपल्या शाळे बद्दल  तुम्ही काय आणि कसं ठरवलय ते सविस्तर सांगा -

रावसहेब मूळ विषयावर आलेले पाहून गुरुजी सांगू लागले -
" आपली शाळा पुढच्या जून मध्ये सुरु करू या. त्या अगोदर काही कागदोपत्री कारवाई राहिली असेल तर , तुम्ही ती पूर्ण करून टाकावी.
आता आपल्या शाळेच्या जागेबद्दल , तुम्ही मला जी जागा दिली आहे, त्याच्या मागेच मोकळी जागा आहे , त्या जागेत शेड उभारून आपण 
वर्ग सुरु करू शकतो.

रावसाहेब , मला वाटतं की , पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून आपण फक्त पहिलीचा वर्ग सुरु करावा , मग, पुढे एकेक वर्ग आपोआप सुरु होतीलच.
गुरुजींची योजना ऐकून रावसाहेबांनी समाधानाने मान डोलवित म्हटले,
"छान -,छान गुरुजी , अहो, आपल्या शाळे बद्दलची  सगळी कारवाई अगोदरच पूर्ण झालेली आहे. फक्त तुमच्या सारखे गुरुजी आम्हाला भेटत नव्हते ,
म्हणून आमची शाळा सुरु होत नव्हती..

तुम्हाला सांगतो गुरुजी, आजूबाजूच्या गावातून कुणी येण्यास तयार आहे का ?, हेही आम्ही पाहिलं , पण, इथे खेड्यात येण्यास कुणी तयार नाही.
सगळ्यांना शहरातल्या शाळेत नोकरी पाहिजे , आणि , आमची वाडी, ती तर खेड्याहून बत्तर, त्यात अगदी आडवळणाला असणारी ,

आता तुम्हीच सांगा , आम्हाला कोण भेटणार ?
" चांगल्या गोष्टी घडायला अडथळे आले तरी ,उशिरा का होईना त्या मार्गी लागतात , हे मात्र खरं बरं का गुरुजी ..!
रावसाहेब बोलण्याच्या रंगात आहेत हे पाहून गुरुजी फक्त ऐकण्याची भूमिका करू लागले..
गुरुजी , मागच्या खेपेला अचानक आप्ण्णासाहेब भेटतात काय, तुमच्याशी गाठ घालून देतात काय , सगळा योगचं म्हणा ,
अगदी अचानकपणे तुम्ही भेटलात आणि आमची इच्छा पूर्ण झाली.
या वर गुरुजी म्हणाले - 
रावसाहेब , तुमच्या मनात जनकल्याणाची तळ्मळ आहे. तुमची प्रार्थना त्या परमेश्वराला ऐकावी लागली. मी फक्त निमित्त आहे.
हे ऐकून घेत रावसाहेब  म्हणाले -
 गुरुजी , माझ्या वाडीच्या पोरांचं भलं कसं होईल ही काळजी आता तुम्ही करायची. पैशामुळे तुमचं कोणतही काम अडणार नाही. 
आपल्या शाळेचं नाव आम्ही "शारदा विद्यालय " ठेवण्याचं पक्क केलं आहे. तेंव्हा वाडीच्या शारदा विद्यालायाच काम तुम्हाला तुमच्या एकट्याच्या हिम्मतीवर 
करायचं आहे. मी तुमच्या पाठीशी आहेच.
रावसाहेबांचा हा भक्कम आधार , त्यांचे धीर देणारे शब्द ऐकून गुरुजींना वाटले "आपण इथे येण्यात चूक केलेली नाही ..!"

अण्णासाहेबांनी मोठ्या विश्वासाने आपले नावं  सुचवले आहे " , तेंव्हा त्या शब्दांची किंमत आपण ठेवली पाहिजे .
या अण्णासाहेबा  मुळे तर आपण आज स्वतहाच्या पायावर उभे आहोत .
आपल्यासारख्या अनाथ मुलाला आश्रय देऊन अण्णासाहेबांनी मोठं केलं , चार चौघात मनाने उठता -बसता येईल असे शिक्षण दिले.
त्यांच्या या कार्याची आपण भरपाई करण्याची वेळ आता आली आहे.
अण्णासाहेब मुलांना नेहमी म्हणयचे ..
"एष-आरामाचे जीवन म्हणजेच काही जीवन नाही. घरादारा कडे पाठ फिरवून  जगलेल्या अनेक थोर पुरुषांचे आदर्श 
आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतात.
आपल्या जवळ जे ज्ञान आहे , ते दुसर्याला दिलेच पाहिजे.
ज्ञानदाना सारखे दुसरे पुण्य-कार्य नाही.
अण्णासाहेबांनी दिलेली ही शिकवण आपण आचरणात आणायची , हे गुरुजीनी पक्के ठरवले.
रावसाहेब गुरुजींना म्हणाले-
"हे पहा गुरुजी , अगोदर तुम्ही पाच-दहा मुले हुडकून काढा, त्यांची तयारी करून घ्या, अशी मुले तुम्हाला सापडतील असा मला विस्वास आहे.
या बिचार्या मुलांना आतापर्यंत कुणी संधीच दिली नाही.
मग बघा गुरुजी - या मुलांना चौथीच्या परीक्षेला थेट तालुक्यालाच घेऊन जायचं , लगेच आपण सातवी पर्यंतची शाळा इथेच सुरु करू.
अहो , बाजूच्या गावातली पोरं सुद्धा आपल्या वाडीच्याच शाळेत येतात की नाही , ते तुम्हीच पाहाल ..!
रावसाहेबांचा हा उत्साह पाहून गुरुजीना हसू येत होते.या उत्साहासमोर आपला टिकाव लागावा ", अशी प्रार्थना ते करू लागले.

ते म्हणाले - रावसाहेब , उद्यापासून मी पोरांना हुडकण्याची मोहीम सुरु करतो. दोन-चार  दिवसात पुढील अंदाज घेऊन , मगच तुम्हाला भेतो .
आता येऊ मी ?

निरोप घेऊन बाहेर पडणार्या गुरुजी कडे पाहून रावसाहेबांना वाटत होतं की -,
" या दिवसात ही मनापासून कार्य करणारे लोक या जगात आहेत , फक्त आपल्याला त्यांना पाहण्याची नजर यावी लागते .
गुरुजीची निवड बरोबर जमली ", याचे मोठे समाधान त्यांच्या मनाला वाटत होते .

गुरुजी वाड्याच्या बाहेर आले तेंव्हा बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. आताच खोलीवर जाऊन काय करणार ?, थोडं फिरून येऊ ,
तेव्हढेच पाय मोकळे होतील, असे म्हणत ते नदीच्या काठावर आले. बसण्याजोगा एक खडक पाहून त्यावर बसत , त्यांनी नदीच्या पाण्यात 
पाय सोडले . नदीच्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने मनाला एकदम छान वाटले .

सभोवताली सगळं शांत वातवरण होतं , घाई नाही , गर्दी नाही , गोंगाट नाही ", त्या निरामय शांतेत गुरुजींच्या मनाला निवांत वाटत होते.
शे-दोनशे घरांची वस्ती असलेल्या चिमुकल्या वाडीत शांतता होती. दिवसभर मेहनत करून थकलेल्या जीवांना वाडीने जणू आपल्या 
उबदार कुशीत घेतले होते .

"आकाशात असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. त्यांचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात पडलेले पाहून एखादी चमकदार रांगोळीच पहातो आहोत 
असे गुरुजींना वाटते होते.
" या अनोळखी गावात आपण फक्त पोट भरणे ", या उद्देशाने आलेलो नाहीत. चंद्राचा प्रकाश घेऊन चमकणार्या या चांदण्या आणि रावसाहेबांचा 
आधार घेऊन या गावात राहण्याचे ठरवणारे आपण , दोघेही सारखेच आहोत.

आज रावसाहेबांनी आपल्या योजना ऐकून घेतांना विस्वास दाखवून, पाठीवर आधाराचा हात ठेवला ", हे किती छान झाले.
गुरुजींच्या मनाला अधिकच उभारी आली. आपण हाती घेतलेले कार्य , सर्वांच्या सहकार्याने पूर्ण व्हावे " अशी प्रार्थना करतांना त्यांनी आकाशातल्या 
देवाकडे पाहिले. शांत -शीतल चांदण्या ,आणि प्रसन्न चांदोबा जणू गुरुजीकडे पाहून हसत होता ..,
त्याला जणू म्हणायचे होते , आमचा आशीर्वाद तूझ्या मागे आहेच.

मोठ्या समाधानाने गुरुजी आपल्या खोली कडे परत फिरले ......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश : पुढे सुरु ...
चंदर - (बाल कुमार कादंबरी ).
ले- अरुण वि.देशपांडे 
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Tuesday, December 11, 2018


# चंदर (बाल कुमार कादंबरी )क्रमशा : भाग-३ रा
-------------------------------------------------------------
पंचायतीचं ऑफिस दिसू लागलं तेंव्हा चंदर म्हणाला ,
गुरुजी , आपली शाळा आली  " !,
मग चंदर त्यांना पंचायती जवळ घेऊन गेला .
बापू त्यांच्या अगोदरच तिथे पोंचलेला होता , त्याच्या सोबत वाड्यावरचे तीन-चार गडी --माणसे आलेली होती.
तीन खोल्या असलेली ही जागा आता या पुढे मात्र "गुरुजीची शाळा ", आणि गुरुजींचे घर ", म्हणून ओळखली जाणार होती .
इतके दिवस या खोल्यांमध्ये शेतीचा माल -टाल  साठवून ठेवलेला असायचा. बी-बियानांची रिकामी पोती, खताच्या पिशव्या ,  फवारणीच्या औषधांचे रिकामे डबे आणि,
असाच कामाचा आणि बिनकामाचा खूप पसारा पडून होता . गडी-माणसांच्या मदतीने बापूने हा सगळा बारदाना आणि पसारा आवरून ठेवण्याचे काम सुरु केले ,नंतर
बाहेर उभ्या असलेल्या बैलगाडीत हे सगळे सामान आणून टाकतांना त्यातील थोडेसे
रिकामे झालेले पोते , आणि पिशव्या असे सामान पुढे काही ना उपयोगात येतील या हिशेबाने ते बाजूला ठेवीत गुरुजी म्हणाले,

बापू - आता पाण्यासाठी एक घागर , आणि एक बकेट आणून द्या ,थोडी भांडी ही लागतील, तसेच जवळच्या किराणा दुकानदाराला सांगून ठेवा , मला जे काही सामान लागेल ते देत जा,
 मी पैसे देत जाईन. एव्हढ करा आता म्हंज आजच्या पुरते सगळं जमल म्हणायचं .
या वर बापू म्हणाला -
"गुरुजी , अवो - आता तर तुमचा संसार सुरु व्हणार, नव्या शाळेचा प्रपंच बी मांडायचं तुम्हाला. तवा कसं व्हणार वो तुमचं ? मला तर घोर लागलाय .
हे ऐकून गुरुजी म्हणाले-
"बापू, आता जसं होईल तसं, एकदा उखळात डोकं तर घातलाय आपणं , तेंव्हा जे होईल ते पाहू ..!
गुरुजी हसत हसत म्हणाले खरे ..
पण मनात मात्र त्यांना खूप काळजी वाटत होती ...
या गावात आपलं ठाक ठीक चालेल की नाही ?
या विचारातच गुरुजी आणि बापूने सोबतच्या गडी -माणसांच्या मदतीने घर नीटआणि व्यवस्थित लावत ,सगळीकडे एकवार पाहून घेतले .
त्यांनी चंदरला विचारले - काय रे , कसं वाटतंय गुरुजींच घर ?
काय उत्तर द्यावे ? चंदरला काही सुचले नाही .. कारण ,
घर इतक छान ,स्वच्छ ठेवता येतं असतं ," ही गोष्टच आज पहिल्यांदा गुरुजी मुळे त्याला कळाली होती .
घराचे तर झाले, मग त्याने मनातला प्रश्न विचारून टाकला -
गुरुजी - आपली शाळा कुठे आहे ?,
त्याचा प्रश्न ऐकून घेत गुरुजी म्हणाले..
अरे बाबा -, आता तर कुठे माझं घर व्यवस्थित लागलाय , थोड्या वेळाने जेवण-खान करून ,आराम करून दुपारी वाड्यावर जाऊ , रावसाहेबांशी बोलतो मी ,
 मग ठरवू की आपल्या शाळे बद्दल .
गुरुजींच्या खुलाशावर चंदरने मान डोलावली. "गुरुजी शाळे बद्दलच काई विसरले नाहीत , लक्षात आहे त्यांच्या , याचे समाधान त्याला जास्त वाटत होते ..

स्वतहाचे जेवण तयार करण्याच्या गडबडीत गुरुजी दिसले तेंव्हा चंदर म्हणाला -
अवो गुरुजी - तुमी कशापायी करता हे सगळं  !, आमच्या घरून आणतो की मी ,
आत्ता जाऊन घेऊन येतो मी , तुमी आता काय बी करू नका .
त्याला थांबवीत गुरुजी म्हणाले , नको , काही आणायचं नाही..
हे बघ चंदर , एक दिवसाचा प्रश्न आहे का हा ?,
आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही ", हे लक्षात ठेवून , आपण वागायचे असते  !.
आणि, मला सगळा स्वयंपाक करता येतो , माझ कोणताही काम अजिबात अडणार नाही , तेंव्हा तू माझ्या खाण्यापिण्याची काळजी अजिबात करायची नाही.!


थोड्यावेळाने ते चंदरला सोबत घेऊन जेवण करण्यास बसले , जेवतांना गुरुजीनी विचारले -
चंदर - ,समजा आपली शाळा सुरु झाली तर , गावातून किती मुलं येतील रे ?" ,
चंदर सांगू लागला - गुरुजी , आमच्या गावातील पोरांना कशाची आलीया शाळा ?
मोठ्या घरची पोरं जातात दुसऱ्या गावच्या शाळेत, आत्ता बस गाडी सुरु झालीय ,
त्या अदूगर पाय पायी चालत जायची ही पोरं शाळेला ..
गुरुजी - आमच्या  पोरांच्या हातात काही नाही , फक्त कामं मात्र हायेत,
 गायी -म्हशीला नदीवर धुवायला न्याच, शेळ्या -बकऱ्या घेऊन डोंगरावर , माळावर जायचं ,हेच आमचं काम हाय नेमीचं,
 शाळेचं नाव सुद्धा कधी घरात निगत नाही..

गुरुजी , "आपल्या गावात जर शाळा असती तर मी बी पाचवीत बसलो असतो ..!

चंदर च्या मनातील शाळे बद्दलची ओढ पाहून आशेचा एक तरी किरण दिसल्याचे समाधान गुरुजींना मिळत होते . "एकाच्या ओढीनी दुसरा नक्कीच शाळेकडे येईल ही कल्पना त्यांच्या मनाला अधिक उत्साह देत होती.

"पुढील जून महिन्यात शाळा सुरु करण्यापूर्वी गावातील लोकांची मने वळवणे अधिक आवशयक आहे गुरुजी " !,
रावसाहेबांचे शब्द चंदरच्या बोलण्यावरून गुरुजींना पटत होते.

अज्ञानचा फार मोठा अंधार या गावावर आणि लोकांच्या मनावर पसरलेला आहे हेच खरे ! ",
आपण समजलो तितके हे काम मुळीच सोपे नाही. या गावासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार, चिकाटीने प्रयत्न करावे लागणार ", याची जाणीव गुरुजींना होऊ लागली.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , आगरकर , साने गुरुजी  या थोर पुरुषांनी आयुष्यभर शिक्षणाचे महत्व लोकांना सांगितले. आपले आयुष्य लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खर्च केले.
अशा या महान पुरुषांचे कार्य ", ही आपली प्रेरणा आहे.

या गावातील ही नवी पहाट जणू गुरुजींना धीर देत म्हणत होती ..
" प्रयत्न कर , धीर सोडायचा नसतो ,
केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे !, समर्थांचे वचन', गुरुजींना आठवत होते.

गुरुजींची मनोदेवता त्यांना म्हणत होती -
"हे माणसा ,तू नव्या कामाला सुरुवात करणार आहेस , इथली माणसं झोपेचं सोंग घेऊन पडलेली आहेत , त्यामुळे खरोखर झोपी गेलेल्यांना जागं करून उठवणे सोपं असते ",
पण, झोपेचं ढोंग करणाऱ्याला जागं करणं अवघड असतं ".

शिक्षणाचं -ज्ञानदानाच कार्य हे पुण्य-कर्म असतं . चांगलं कार्य करणं हे एखाद्या कठोर व्रतासारख असतं , ज्याच फल ही तेवढच रसाळ असतं .

या विचारांनी गुरुजींच्या तरुण मनाला उमेद आली. यापुढे कुठल्याही प्रसंगाने आपल्या निश्चयापासून ढळणे नाही", हे त्यांनी ठरवले .

शेजारी बसलेल्या चंदर कडे पाहून त्यांना वाटले - या पोरामध्ये काही तरी वेगळे असे नक्कीच आहे . या मातीच्या गोळ्याला नेमका आकार आपण दिला तर एक चांगली आकृती आपल्या हातून घडू शकेल.
या एकलव्यासाठी आपण द्रोणाचार्य व्हायचे",

चंदरला घरी जाण्याचे सांगून गुरुजी रावसाहेबांकडे संध्याकाळी जाण्याचे ठरवून , आराम करीत पडले खरे ,
पण मनात हाच विचार सारखा चालू होता की -
शाळेचे कसे होईल ? ....

क्रमशा : पुढे सुरु .......
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चंदर -बाल कुमार कादंबरी (१९९७ )
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे
९८५०१७७३४२