Thursday, February 3, 2022

लघुकथा - बस्तान

लघुकथा - बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे ------------------------ या ऑफिसची "नवी- बॉस म्हणून "तिच्या प्रवेशाचा पहिला दिवस ", तिला इथे येऊन आता सहा महिने होत आले तरी अजून लख्ख आठवत असतो. प्रमोशन वगैरे चाकोरीतुन ती बॉस झालेली नव्हती, तर आधीच्या जॉबला सोडचिट्ठी देत अधिक पॅकेज देणाऱ्या या कंपनीची ऑफर स्वीकारून ती इथे आली होती. या कंपनीने त्यांच्या ऑल लेडीजस्टाफ असलेल्या ऑफिसयुनिटची बॉस म्हणून नेमणूक करतांना तिला म्हटले- "करिअर चॅलेंज " म्हणून या ऑफिसची जबाबदारी तुम्हास देत आहोत, सो प्रुव्ह ईट ! नव्या दमाच्या उत्साहाने तिने" हसत हसत हे चॅलेंज स्वीकारले , आणि या ऑफिसमध्ये आलेली आतापर्यंतची सर्वात तरुण बॉस" होण्याचा बहुमान पटकावला. अत्याधुनिक कॉर्पोरेट ऑफिस, इथला सारा माहौल भारी होता, चकचकीत ,झगमगीत आणि स्मार्टनेस ठासून भरलेले हे ऑफिस , यापुढे ती बॉस असलेले तिचेऑफिस असणार होते. हे सगळं वातावरण तिच्या मनातल्या करिअरिस्ट बॉसला सुखावणारे होते. दिवसभरातून तीन-चार वेळा केबिनच्या बाहेर येत मोठ्या वर्किंगहॉलमध्ये बसलेल्या शंभरएक स्टाफला नजरेखालून घालत असायची. स्वतःच्या कल्पनेने तिने अनेक बदल घडवून आणले, हे नवे बदल आणतांना कुणी कुरकुर केली नाही की ,दबक्या आवाजात विरोध केला नव्हता. तिने केलेल्या चेंजला मिळालेला रिस्पॉन्स, आणि नव्या बदलांचे" प्लस आऊटपूट"पाहून नव्या बॉसचे कौतुक झाले. स्वतःभवती गिरक्या घेणाऱ्या खुर्चीत बसून ,सगळ्यांच्या नजरा आणि चेहेरे आठवीत ती स्वतःशी म्हणायची- एक ना एक दिवस , या सगळ्यांना मी इझिली पॉकेटमध्ये टाकीन. पण , आता सहा महिने झाले तरी अजून तिच्या मना प्रमाणे ती इथे स्वतःची पकड बसवू शकली नव्हती " याची खंत तिला अस्वस्थ करीत असायची . त्याचे कारण, या ऑफिसमध्ये आल्यापासूनच तिला जाणवले होते. स्टाफबद्दल कळत गेले, या सगळ्यात- तिला एक खटकली, जी खटकली ती या ऑफिसमधील सर्वात सिनियर स्टाफ होती. बॉस म्हणून तिने केलेल्या चेंजेसला यश मिळवून देण्यात याच सिनियर कांचनमॅडमचा मोठा वाटा आहे", ही लपून न राहणारी गोष्ट नव्या बॉसच्या पचनी पडत नव्हती. या कांचनमॅडमबद्दल तिखटमीठ लावून सांगणारा म्हणाला होता- बॉस, ही आपणहून कधी तुमच्याकडे येणार नाही की फिरकणार नाही . तिच्या अनुभवाच्या जोरावर ती सिस्टीम, प्रोसिजर अशा सगळ्या गोष्टी "कम्प्युटर क्लिक "स्पीडने सांगू शकते ",सगळं ऑफिस कोळून प्याली आहे ती. कैक बॉस, उन्हाळे-पावसाळे पहावेत तसे पाहिलेले आहेत हिने "। न्यूकमर बॉसला भारी पडणारी आहे ही". सगळा स्टाफ हिचा खुप रिस्पेक्ट करतो, ती देखील सगळ्यांशी छान वागते हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे बघा. बॉस- बच के रेहना इससे.!" नव्या बॉसला तिच्या नव्या चमच्याने अलर्ट माहिती तत्परतेने केबिनमध्ये येऊन सांगितली होती. याचा परिणाम एकच झाला - नव्या बॉसने तिला न आवडलेल्या या सिनियरलेडी कांचन मॅडमला दूरच ठेवले. या कांचनमॅडम वागण्यात चोख, कामात त्यापेक्षाही अधिक चोख होत्या. त्यांच्याशी पंगा घेणे सोपे नाहीये " ! बॉसला तिच्या इनर-माईंडने सूचक इशारा दिला होता, आणि तो ऐकणे "आपल्याच हिताचे आहे ", हे तिने मान्य केले होते. बॉसने केबिनमध्ये बोलावले तर कांचन मॅडम क्षणात समोर उभ्या असत आणि काम झाले की क्षणात बाहेर पडत. ईतर विषयावर , त्यातल्या त्यात ऑफिस गॉसिपिंग " हे विषय कांचनमॅडमला वर्ज्य होते. एकदा बॉस म्हणालीच- कामा व्यतिरिक्तही तुम्ही माझ्याशी बोलायला हरकत नाही. कांचनमॅडम ,तुम्ही सिनियर आहात, तुमच्या कडून मला ऑफिसमधले अपडेट्स मिळत राहिले तर या पुढे मी माझे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकेन. स्टाफ रिलेटेड " काही सांगत चला तुम्ही, कोण कसा आहे, काय बोलतो, काय सांगतो", येऊ द्या तुमच्या मार्फत माझ्या पर्यंत ! तुमच्या मदतीचा खूप उपयोग होईल मला. कांचनमॅडमला याचा अंदाजआधीपासूनच आलेला असावा- त्या म्हणाल्या- बॉस, गॉसिप आधारित कोणतीही माहिती, चर्चा, याबद्दल आधीही मी कुणा बॉसला काही शेअरिंग केलेले नाही, आणि आता तुमचीही निराशा करणार, याबद्दल सो सॉरी ! एक सूचना नक्की करीन - "बॉस म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने स्वतः सगळे जाणवून घ्यावे, किती खरे, किती खोटे पारखून घ्यावे " , कुणाच्या ऐकीव माहितीवरून कुणाबद्दल कधी अनुकूल-प्रतिकूल मत बनवू नये " ! माझ्याबद्दल तुमच्या कानावर आलेले आहेच,त्यावर विश्वास न ठेवता माझ्या कामावर विश्वास ठेवा ! दुसऱ्या क्षणी कांचनमॅडम बाहेर येऊन कामात गढून गेल्या. त्यानंतर बॉसने या सिनियर मॅडम विषयी मनात अढी ठेवीत " तिला नकोशीच्या यादीत टाकून दिले. आताशा केबिनच्या बाहेर उभी रहात बॉस तिच्याकडे काहीच न बोलता पहात रहाते- कांचनमॅडम मात्र त्यांच्या नजरेतून बॉसला शांतपणे म्हणत असतात- बॉस - येऊन काही दिवसच झालेत, आणि तू मला ठरवून दुर्लक्षित करते आहेस . इतकं किरकोळीत नको काढू मला.! तू हुशार, स्मार्ट, बुद्धिमान बॉस नक्कीच आहेस, पण, तितकीच नवखी नि अनुनभवी आहेस. हीच तुझी मोठी मर्यादा आहे, याची जाणीव असू दे. तू आज बॉस आहेस, उद्या नसशील , मी इथेच आहे, इथेच असणार आहे. "अनुभवाचा सन्मान केल्याशिवाय तुझे बस्तान इथेच काय, कुठेच बसणे कठीण आहे. न बोलता खूप सांगणाऱ्या या नजरेचा सामना करणे अशक्य झाले आणि बॉसने आत जात केबिनच्या दरवाजा खाडकन बंद करून घेतला . -------------------------------- लघुकथा- बस्तान ले- अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 ---------------------------------