Monday, December 9, 2019

कविता -सांगावा सखीचा

कविता - सांगावा सखीचा
-----------------------------------
सांगावा सखे मिळाला
जीव भेटीस आतुरला
वाटे कधी पाहीन तुला
निघालो बघ भेटायला
तू गेलीस तिकडे अन
जीव व्याकुळला इकडे
जो भेटे तो मज विचारे
असे काय झालं रे तुला
दिवस जाई कसा बसा
रात्र एकटी मोठी वाटे
भकास आकाशात या
चंद्र एक अकेला वाटे
आसुसला जीव तुझा
जाणीव मजला आहे
निघालो तुज भेटाया
अधीरता मनी ग दाटे
--------------------------------------
कविता- सांगावा सखीचा
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
--------------------------------------
(प्रकाशित-दै.संचार-सोलापूर)

कविता - कोजागिरी

कोजागिरी
--------------------------
पौर्णिमा अश्विनी
चांदण्या गगनी
चमचमती रात्री
कोजागिरीच्या
मैफिली साजऱ्या
स्वरांत गुंफल्या
मस्त चांदण्यात
कोजागिरीच्या
हळुवार वारे
उल्हासित सारे
चांदण्यात या
कोजागिरीच्या
आकाशी निरभ्र
रात्र रुपेरी असे
पूर्णचंद्र भरात
कोजागिरीचा
---------------------------------
कोजागिरी
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
------------- ------------------

कविता -गाठी भेटी

कविता -गाठी- भेटी ….
--------------------------------------
शब्दरूपात भेटता कुणी
आनंद मनापासूनचा होतो
होत नाहीत भेटी समक्ष फार
असा तर आनंद घेता येतो …
वाढवला आपणच खरे तर
व्याप सारा हा भोवताली
भेटत नाही कुणी आता कसे ?
जीवा कासावीस वरखाली .
वाढली केव्हा कधी कुंपणे
स्व-" ची स्वतःच्या भोवताली
नाही लक्ष दिले याकडे आधी
आता का होतोय जीव वरखाली ?
वेळ आहे हाती अजुनी खूप
खुप काही छान करता येते
हात मैत्रीचा करू या पुन्हा पुढे
छान मैत्री नक्कीच करता येते …
----------------------------------------------
कविता - गाठी- भेटी ….
-अरुण वि. देशपांडे - पुणे .
--------------------------------------------

चारोळी - एकरूप

एकरूप
-----------------------------
राधा झालीसे एकरूप
दिसे डोळा कृष्णरूप
तशीच बासुरी नि सूर
आकारे नादब्रह्मरूप
-----------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
---------------------------------

कविता - माझे आजोळ

माझे आजोळ
---------------------
माझे आजोळ
माणसे इथली
त्यांचा एकोपा
मायेचा हा खोपा
आजोळी खरा
अखंड आहे
आजी-आबांच्या
मायेचा झरा
सुट्टीचे दिवस
आजोळी जाणे
मौज मजेचे ते
मस्त दिवस
अजुनी वाटे
व्हावे छोटे
जावे पुन्हा
माझ्या आजोळी
------------------------------------
कविता- माझे आजोळ
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-------------------------------------

कविता - सद्गुरुंचा धावा ||

कविता - सद्गुरूंचा धावा …
------------------------------------
करुणा मनात साठली
चिंता मनात ही दाटली
सावरण्या आता आम्हाला
सद्गुरू धावा हो धावा …
आर्थिक मोहजालात या
मन खोल खोल रुतले
काढा यास बाहेर तुम्ही
सद्गुरू धावा हो धावा …
तुझे माझे ,माझे ना कुणाचे
भांडण हे ऐहिक सुखांचे
गुंता अवघा सोडवण्यास
सद्गुरू धावा हो धावा …
---------------------------------------
कविता - सद्गुरूंचा धावा …
-अरुण वि.देशपांडे - पुणे.

कविता - दिव्य अमृतवाणी - गुरुवाणी ||

दिव्य अमृतवाणी - गुरुवाणी ।।
---------------------------------------------
केली विनवणी । श्री गुरुचरणी ।
दिव्य गुरुवाणी । कानी पडो ।।
उपदेश बोल । आत गेले खोल ।
मन गोल गोल । स्थिरावले। ।।
कान उघाडणी । करी गुरुवाणी ।
ही अमृतवाणी । खरोखरी ।।
घडता दर्शन । हे अंतर मन ।
किती विलक्षण । बदलले ।।
--------------------------------------------------
दिव्य अमृतवाणी -गुरुवाणी ।।
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-------------------------------------

कविता - दत्त गुरु हो श्रीदत्तगुरू

दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु
----------------------------
दत्तगुरू हो श्रीदत्तगुरू
नित्य नेमे हे नाम स्मरू ।।
हे करू की ते पण करू
ऐनवेळी काहीच न करू
मनास्थिती अशी नका करू
मनशक्ती द्या तुम्हीच गुरू
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु ।।
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरू
सद्गुरू स्वरूप नित्य स्मरू
स्वामी समर्थरुप दर्शन
दर्शन आम्ही नित्य करू ।।
दत्तगुरू हो श्रीदत्तगुरू
नित्य नेमे तुम्हास स्मरू
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु ।।
----------------------------------------
दत्तगुरु हो श्रीदत्तगुरु
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-----------------------------------------

कविता - एकाकी -एकटे

कविता -एकाकी- एकटे
--------------------------------------
एकाकी -एकटे असे कधी
माणसाने कधीच पडू नये
जोडत राहावीत माणसे सदा
आहेत त्या माणसांना सोडू नये
दिलेत ना शब्द बोलण्यासाठी
मनात कोंडून त्यांना ठेवू नये
क्षण क्षण जगण्यातला,जगावा
जगणे व्यर्थ गेले, असे वाटू नये
खितपत पडलेत भवताली एकटे
स्वतःला एकाकी एकटे समजू नये
आहोत नशीबवान खरेच आपण
करावी सोबत, आनंद घालवू नये
-------------------------------------------
कविता- एकाकी- एकटे
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------------------

Monday, May 20, 2019

फुलांच्या चारोळ्या


फुलांच्या चारोळ्या
---------------------------
१.
गुलाब
----------
रूप रंग छटा ,या किती तरी
लाल, पिवळा, काळा ,केशरी,
पांढरा ,गुलाबी, सारेच गुलाब
बागेत साऱ्या यांचाच रुबाब
--------------------------------------
२.
निशिगंध
--------------
नाजूक आकर्षक
मोहक गंधसुगंध
वाटत फिरे सुगंध
मित्र हा निशिगंध ...।
----------------------------
३.
मोगरा
-----------------
पांढराशुभ्र मोगरा
पाहुनी खुलतो चेहेरा
भुरळ घालीतो रसिका
मोगऱ्याचा सुरेख गजरा...!
-------------------------------------
४.
अबोली
---------------
विविध रंगातली
रंगीबिरंगी बोली
नाजूक पाकळी
गोडुली अबोली
---------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
---------------------------------

फुलांच्या चारोळ्या-
१.
गुलमोहर
---------------
कडक उन्हात
उभा दिमाखदार
लालकेशरी फुले
गुलमोहर बहारदार ।
----------------------------
२.
चमेली
-------------
नाजूक नाजूक
अलबेली नवेली
सर्वाची लाडली
आहे ही चमेली
----------------------
३.
पारिजात
---------------
नारंगी देठ सफेद फुल
पाहताक्षणी पडते भूल
अंगणात उभा पारिजात
पहाटे टाकतो फुलांचा सडा
-------------------------------
४.
झेंडू
--------
इटुकले पिटुकले लाल झेंडू
पिवळे धम्मक मोठे झेंडू
सणासुदीला मान यांचा
दारी शोभे माळेतले झेंडू
--------------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
-------------------------------------





Tuesday, May 7, 2019

लेख- असं जमलं आमचं


अक्षय -तृतीया -आमच्या लग्नाचा ४3 वा वाढदिवस त्यानिमित्ताने.
लेख-
# असं_  जमलं _ आमचं ..!
-ले- अरुण वि.देशपांडे --पुणे.
-----------------------------------------------------------------
मित्रहो - नमस्कार ,
आज अक्षय-तृतीया ",आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
-आज आमच्या लग्नाचा तिथीनुसार वाढदिवस आहे.
आमच जमल्यानंतर ,लग्न लागले त्यादिवशीची तिथी होती  "अक्षय-तृतीया  -"
..आणि तारीख होती ..०२ मे- १९७६ .
आज अक्षय तृतीया तिथी - दि.०७ मे- -२०१९.. या तिथीनुसार आमचा सहजीवन -प्रवास हा आता ४३वर्षांचा होऊन ४४व्या वर्षाचा शुभारंभ होतो आहे.
मित्र हो - १९७२ साली मी कॉमर्स शाखेचा पदवीधारक झालो .आणि मराठवाड्यात स्टेट  बँक ऑफ हैद्राबाद  शाखा - वजिराबाद  नांदेड येथे- दि. २७ फेब्रुवारी -१९७३ ला टायपिस्ट-क्लर्क म्हणून रुजू झालो. माझे वडील  (कै).विठ्ठलराव -व्ही .एच .देशपांडे -जे अख्या बँकेत "बाप्पा  देशपांडे "या नावाने परिचित होते ..ते या काळात परळी-वैजनाथ शाखेचे मनेजर होते, त्यावेळी बँकेतले वातावरण आणि कार्यालयीन  संबंध अगदी नातेवाईक असल्यासारखे  म्हणजे घरच्या सारखे असायचे.सर्वांना एकमेकांच्या पारिवारिक स्थितीची  आणि परीस्थ्तीची कल्पना असे.फार मोठा मानसिक आधार आणि माणसांची सोबत असण्याचा तो काळ होता.
परळीच्या मनेजर साहेबांचा मुलगा लग्नाळू आहे " ही गोष्ट आजूबाजूच्या शाखांमधून बँकेच्या सर्क्युलर सारखी पसरलेली  होती..त्यामुळे , वडिलांचा , "बँकेतील वेळ बँकेच्या कामाच्या इतकाच -कधी कधी थोडा जास्तच  वेळ -मुलासाठी आलेल्या  -प्रपोजल पहाण्यात जाऊ लागला ..आणि त्या भरात त्यांनी स्वतःचेच एक सर्क्युलर -व ऑफिस ऑर्डर काढली ..
त्यात त्यांच्या कडक वागण्याच्या स्टाईल झटका होता- "आमचे चिरंजीव नुकतेच बंकेत लागले आहेत ..हे जरी खरे असले तरी ..
"लग्नाची जबाबदारी ते सांभळू शकतील असे अजून तरी  " त्यांच्या वागण्यातून आम्हास जाणवत नाही ..सबब- त्यांचे उरकून टाकणे " असे घाई करणे आम्हासी अजिबात मंजूर नाही  त्यांच्या  लग्न-कार्य संबंधी .विचार करणे "तूर्तास ३ वर्षतरी संभवत नाही ..! मध्येच काही ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
हा खलिता रीतसर साऱ्या " दख्खनी - इलाख्यात वितरित झाला " आणि जिकडे तिकडे सामसूम झाली.
थोडक्यात  आता थेट -१९७६ पर्यंत ,मी "अभय-अरण्यात" राहणार होतो हे निश्चित झाले. वडिलांच्या या आदेशाने मातोश्री सरकार नाराज झाल्या .पण..बोलून दाखवून उपयोग नाही..हा त्यांचा स्वानुभव गाठीशी होता ..त्यात पुन्हा .."आपले कार्टे -बापाच्या वळणावर गेले आहे ",..एकदा नाही म्हणजे -नाही ..हमारा घोडा ऐसा ही चलेगा "..एकूण ..आमची स्वारी  प्रचंड खुश आणि मातोश्री आणि त्यांचे निकटवर्ती नाराज ..असे चित्र स्पष्ट झाले.
मधली ही दोन -तीन वर्ष फारच झकास गेले बघा ..मी कधी एकटा-आहे " असा  भकास भाव मनात कधी नसे.
बँकेत आणि बँके नंतरचा वेळ मस्त पिक्चर पहाणे ,हॉटेल मध्ये मित्रांच्या सोबत बसून चकाट्या पिटणे अशा गोष्टीत जात असे. माझ्या स्वभावातली एक मायनस बाजू सांगितली पाहिजे .
.मी होतो  दिवसात त्या एक
मस्त मनमौजी -फुल-पाखरू .
कधीच  नाही भिर -भिरलो
इकडे तिकडे शोधीत पाखरू ....||
१९७५ मध्ये वडिलांची बदली -उदगीर ला झाली .आणि हेड ऑफिस मध्यला काळजी-वाहू काकांनी माझी बदली
अंबाजोगाई हुन..उदगीर पासून २० कि,मी असलेल्या .बिदर- जिल्ह्यातल्या .कमालनगर या गावी केली आणि सांगितले .जा तिकडे .आणि उदगीरला राहून अपडाऊन कर...झालं...ओबे द ऑर्डर ...
मी निघालो  नव्या गावी..नाव-
कमाल नगर..-कर्नाटक -महाराष्ट्र - राज्य  बोर्डर वरचे पहिले गाव ..बिदर तिथून ५०-६० कि.मी .असावे.
या कमालनगर गावातले लोक -कर्नाटकी लहेजा मध्ये मराठी बोलत असत ..हिंदी मध्ये पण बोलणे असायचे...मला कानडी भाषेचा ओ की ठो...कळत नाही हे समजल्यावर  .ती प्रेमळ आणि साधी माणसे त्यांच्या कानडी टोनच्या मराठी मध्ये बोलत असतं.
दरम्यान .कमाल नगर शाखेत  .".एक उत्तम स्थळ -आहे सध्याला ,चला  पाहून तर घेऊ, जमलं तर जाऊ पुढे . पोरगा पाहायला -. काय होतंय व्हो ..नशिबाच्या गाठी ..काय माहिती ?  काही सांगता येत असत का? 
असे ठरवून   उत्सुकतेपोटी येणार्या मान्यवरांची संख्या दिवसे दिवस वाढू लागली .
सहाजिकच माझे मनेजर साहेब म्हणाले - देखो बाबू..तुम इन सब को..उदगीर का पता दे दो, फिर बडे लोग .सोचेंगे ..तुम इसमे ना पडो...
"लडकी -वडकी -को देखने के टाईम पर तुम सोचना ..तब तक..इधर काम करो..
.
तरी पण कमाल -नगर मधल्या समाजिक-सेवेकरी मंडळीं मला  मोठ्या चिकाटीने  "बिदर-ला घेऊन जायचे आणि त्यामुळे  अखेर " स्थळ-दर्शन घडण्याचा योग आलाच . गम्मत अशी की-
यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे  उपवर कन्या आणि वरवरचे वधू - संशोधन मोहिमेवर असलेला मी.. अशा दोघांना याचे काहीच गांभीर्य नव्हते. तिने चहा दिला- तो मी घेतला ",फिनिश.....असे हे ओमफस कांदा-पोहे .प्रोग्राम होत होते...
इकडे मुकामी उदगीर निवासस्थानी ..मातोश्री यांचा मनसुबा मात्र दिवेसेदिवस अधिकच मजबूत होत होता ,त्यांचा हा निर्धार दृढ होण्यास ..कारण झाले ..माझ्या वडिलांच्या माविशींचे येणे ..या आज्जीबाई  आल्या ..आणि मातोश्रींनी त्यांना जे सोयीचे शब्द वाटले.त्या शब्दात ..माझ्या पिताश्री बद्दल आणि माझ्या पोरकटपणाबद्दल ..गाऱ्हाणे" मांडले..
इथेच मातोश्रींनी लढाई जिंकली..
एका रविवारी "  दादीजी की अदालत मध्ये - आम्ही बाप-लेक "उभे राहिलो" आणि आज्जी जे म्हणतील त प्रत्येक शब्दावर मान डोलवत राहिलो. परिणामी.. आज्जींनी त्यांच्या चंची तून एक यादी काढून वडिलांच्या हातात देत म्हटले -- विठ्ठल ..ही  आपल्या परभणीकडची चांगली, माझ्या ओळखीची स्थळं आहेत.
याच्यातून पोरगी पहायची..पसंत पडली की ..या पोराचं उरकून टाकायचं ..समजलं ?
वडीलच ज्यांच्या समोर काही बोलू शकले नाही ..त्या थोर आज्जी-माउलीच्या समोर मी अजाण-पामर काय बोलणार..
दरम्यान १९७६ च्या पहिल्या महिन्यापासून अनेक स्थळं येत होती..पत्रिका जुळत नाहीत म्हणून ..मुलगी पाहायला जाणे "हा योग नव्हता.. आणि कमालनगरकर कडच्या कानडी स्थळांच्या गराड्यातून सुटावे याची धडपड व्यर्थ होत होती..त्यामुळे लागोपाठचे रविवार वाया गेल्या मुळे .आलेला सगळा राग .मी मातोश्री जवळ व्यक्त करीत असे.
.१९७६ -चा मार्च महिना - शनिवारी कमाल-नगर हून मी आलेलो ,आणि मातोश्री म्हणाल्या.. जरा अज्जीशी बोल ..
चहाचा कप हातात .मी आज्जे समोर .
.हे बघ.. उद्या तुला हिंगोलीला जाऊन याचे आहे ..,
आजी पण डायरेक्ट हुकुम..जाऊन येतोस का वगेरे काही नाही..असो.
हिंगोलीचे बसोले घराणे..मोठा परिवार आहे, माणसं माझ्या नात्यातील आहे.. आणि मुलगी आपल्या घराला शोभणारी आहे. आता तू असे कर ..
तू परभणीला जा .वेणूबाई -कडे (माझी आत्या )- तिथे यशवंतला -आणि कांताला सोबत म्हणून घे .आणि हिंगोलीला जाऊन मुलगी पाहून या. बाकीचं आम्ही बघू..-समजला ना ?
आज्जींनी सांगितल्या प्रमाणे -हिंगोलीला अर्जंट कॉल लावला गेला ..रविवार -७ मार्च १९७६ .मुलगी पहाणे "हा कार्यक्रम ठरवला गेला ,या सगळ्या कार्यक्रमाला माझी संमती आहे का ".? . असा प्रश्न माझ्या पालकांना पडण्याचा तो काळ नव्हता हो....
रविवारी सकाळी ६ वाजताच्या उदगीर-जिंतूर बसने मी निघालो..राणी-सावरगाव .हे गाव त्या .रस्त्यातला मोठा स्टोप..
११ वाजता चहासाठी बस थांबली .आणि निघायच्या वेळी पंचर ---झाल्याचे लक्षात आल्यामुळे .तिथेच थांबली..
.४० वर्षापूर्वी..मधल्या आड-मार्गावरून जाणर्या गाड्यांची आणि प्रवाशांची हालत अशावेळी कशी होत असे आता इथे सांगणे शक्य नाही.. असो किमान २ तास इथेच..जाणार हे निश्चित झाले.
राणी-सावरगाव हे गाव   "  माहूरच्या देवीचे एक स्थान -आहे" .इथे देवी दर्शन योग उत्तम असतो. असे सगळ्यांनी सांगितले .इतर पासिंजर सोबत मी पणआमच्या कुल- देवीचे दर्शन घेतले ..
आई- अंबाबाई - "आज संध्याकाळी सुद्धा "देवी-दर्शन योग आहे", कृपा करावी ,अशी आटोपशीर प्राथना आणि साकडे घाऊन झाले.
बहाराल , डायवर साहेबंनी परभणीला गाडी याव्स्थित नेली हे बेस्ट झाले.
आत्याबाईकडे माझ्या येण्याची वाट पहात होते.. वेळेचा पार बोजवारा उडाला होता.आता हिंगोलीला जाऊन पुन्हा परभणीला  रात्री पोंचणे गरजेचे..सोमवारी ज्याचे त्याला ऑफिस होते..आणि त्यावेळी बस खूप कमी होत्या.
निघतांना अत्याबाईने मला .."  वेंधळेपणा करू नको, आणि दाखवू पण नको " ही लक्षवेधी सूचना केली.
माझे दोन्ही आत्येभाऊ म्हणाले .अरे..आपण तिघेच कसे..तीन तिघाडा काम-बिघाडा "असे होईल रे बाबा ..
मनात मी म्हणालो..होऊ  दे ना ..मस्त रविवार सोडून हे काय लागलाय माझ्या मागे.मात्र  उघडपणे ..काहीच म्हणालो नाही.
आत्या म्हणाल्या   जावईबापू पण सोबत असू द्या , जाणता माणूस असलेला बरा  . नाही तर ..ते सोयरे म्हणायचे.पोरांचा कारभार नुसता .असे नको ऐकायला .
अखेरीस ..अस्मादिक  आणि सोबत .२ आत्येभाऊ आणि आत्येबाहीनीचे यजमान ..असे आम्ही चौघेजण हिंगोलीस गमन करिते जाहलो.
त्यावेळी रात्री ९ ची वेळ म्हणजे  शेवटची गाडी सुटण्याची वेळ .नंतर थेट दुसरे दिवशी सकाळी ..नो वे ..
या वेळेत सगळा झालच पाहिजे होते.
आम्ही संध्याकाळचे  ५ वाजता परभणीहून निघालो..साधी लाल डब्बा  बस.. डायवरच्या मर्जीने  ७.३० पर्यंत पोंचली.
हिंगोली माझ्या साठी नवीन होते ..सोबत भावजी होते ..आम्ही जाणार होतो त्या बसोले -परिवारात  त्यांचा जुना परिचय होता ..
पण.या भाऊजींनी .बस मध्ये ..या "मुली बद्दल .काही म्हणजे काही सुद्धा एक शब्दात पण सांगितले नव्हते..!
आम्ही घरात प्रवेशलो.. मुलीचे दोन्ही  आजोबा -"  आईचे वडील, वडिलांचे वडील ." या जेष्ठांनी स्वगत केले ..इतक्या मोठ्या व्यक्ती समोर आम्ही गप्प बसलो."
आजोबांनी मुलीस ..बोलावले... आम्हाला ते म्हणाले.. विचार हो..काय ते..त्या आवाजात "जास्त चौकशी नाय करायची . "असा गर्भित इशारा आहे !असे उगीचच वाटून गेले  ..
माझे लक्ष.. समोरच्या घड्याळाकडे होते ..आमच्या हातात फक्त पाऊण तास वेळ होता ..यात पहाणे ,बोलणे,काही दिल्यास खाणे  नसता ' चहा पिऊन बससाठी पाळणे" असा भरगच्च कार्यक्रम होता.
समोर बसलेल्या मुलीकडे पाहिले ..नाव विचारले ..उत्तर आले..मीनाक्षी...
बस ..त्या नजरेच्या जाळ्यात कसा अडकलो ते त्यादिवसा पासून आज पर्यंत कळालेले नाही.
त्यादिवशी  उधर की हलत"   भी सेम टू सेम झाली होती.. " हे नंतर लिक झाले.. की- या बाईसाहेबांनी डालडा  तुपात करायचा  शिरा. " चुकून .चांगल्या लोणकढी तुपात बनवला होता  "
.असो.. या बाईसाहेबांनी पोटात आणि मनात एकाच वेळी शिरण्यात यश मिळवले हे नक्की.
चांगल्या तुपातला शिरा .भरपेट .मनोसक्त चापून.. आम्ही बससाठी निघालो ..मुलीचे आजोबा आमच्या सोबत येत म्हणत होते ..आता तुमचा निर्णय जो काही असेल  तो..घरी गेल्यावर मोठ्यांना सांगा..म्हणजे कळेल ..उशीर मात्र लावू नका ..म्हणजे .आम्ही मोकळे ....
अहो आजोबा ..मुलगी पसंत आहे.. आत्ताच सांगतो मी ...घरून मोठ्यांचा होकार रीतसर येईल .
आजोबांचा तो समाधानी चेहेरा  आज ही जसाच्या तसा आठवतोय.
घरी गेल्या वर माझ्या होकाराने आनंदी-आनंद झाला  , लगेच ..गुड-फ्राय डे "च्या सुट्टीला मुलगी उदगीरला सर्वांना पाहता यावी म्हणून आली ..तिची चक्कर वाया गेली नाही..त्याच दिवशी..बोलाचाली .आणि शाल-अंगठी .हा कार्यक्रम..
आणि बरोब्बर १ महिन्यांनी ..२ मे-१९७६ रोजी.. हिंगोलीस.. बसोलेची मीनाक्षी.. देशपांडे परिवारातील मीनाक्षी झाली.
आज २०१९ ची अक्षय तृतीया ..४३वर्ष पूर्ण झालीत ..तिच्या समोर पसंती दर्शक मान डोलली .ती आजतागायत तिच्या इशार्या प्रमाणे डोलते आहे  आता सवयीने  यापुढे ती अशीच छान डोलत राहणार आहे हे नक्की.
मी लेखक-कवी  झाल्यापासून म्हणजे  गेली ३५ वर्ष पारिवारिक एरिया तिच्या अधिपत्याखाली  आहे..मी सेवेतून आणि पारिवारिक झ्मेल्यातून  निवृत्त झालोय ..
आता नेत्रा ,यथार्थ आणि अगस्त्य या नातवांची ती लाडकी आज्जी झाली आहे. या बालकांच्या सोबत  आज्जीबाई माझ्या सारख्या अजाण-आबाला तितक्याच मायेने संभाळत असते .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख-
असं_ जमलं _ आमचं
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, March 27, 2019

कविता - तू एक

साभार -
काव्यानंद प्रतिष्ठानच्या - ई-मासिक  काव्यानंद - मार्च-२०१९ च्या अंकात प्रकाशित 



कविता- 
तू एक
----------------------------
छान वाटले 
भेटता तू एक
दूर जाऊ नको
वेगळी तू एक.........  !

भेट तुझी होणे
गोष्ट साधी नाही
भावले मना असे
कुणी आधी नाही..........!

भावना छान ही
आवडते कुणी
मनात घर एक
करे नवे कुणी...........!

अंतर आहेच
खूप गोष्टींचे
नात्यात नको
यामुळे अंतर............!

कल्पनेतले हे
सुंदर जग न्यारे
मनास लागू नये
वास्तवाचे वारे...........!

कवितेने दिली
भेट अचानक
कविता सुरेख
आहे तूच एक...........!
-----------------------------
कविता - तू एक
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
----------------------------------------

Monday, January 14, 2019

नवी लघुकथा - आबा माफ करा हो मला ! ले- अरुण वि.देशपांडे

दै.सत्य -सह्याद्री -सातारा -रविवार साहित्य पुरवणी -दि.१३-०१-२०१९ .अंकात प्रकाशित
-------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा -
आबा माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------
आबा येऊ का आत ?
हो, परवानगी घेऊनच येते आहे पहिल्यांदा ,
तुम्ही म्हणाल , हे काय नवं खूळ परवानगीचं ?
तसे नाही आबा , तुम्ही रागावलात त्या दिवशी माझ्यावर ..
म्हणालात , येऊ नको पुन्हा माझ्याकडे ",
आलीस तर ..परवानगी घेऊनच ये ..मग आज येतांना 
- येऊ का आत ? आबा 
असे विचारले तुम्हाला  ....

त्या दिवशी काय बिनसलं होतं माझं , कुणास ठाऊक ?
सगळा राग मी माझ्या कुहूराणीवर काढला ,
बिचारी एवढी छोटीशी पोरगी - तिला कळेचना .आपली आई 
असे का रागावली आहे अचानक ..
माझा आवाज आणि कुहुराणीचे रडणे तुमच्या कानावर आले  ,
आणि तुम्ही आमच्या घरात आलात ..
कुहुरांणीला जवळ घेतले , तिला शांत करीत समजावले ..
मग मला म्हणलात ..
तुला एक कळतंय का ?
ती केवळ लहान आहे..म्हणून तुला काही प्रतिउत्तर देऊ शकली नाही ,
पण ,तू तर मोठी आहेस, समजदार आहेस , तिची आई आहेस..
मग ..असे वागून ,बोलून तू काय मिळवले ?
मुलीला दुखावलेस ..हे बरोबर नाही..खूप चुकीचे वागलीस ..

तुम्हा आजच्या आई-बाबांना ..धड पालक  होता येत नाही आणि आई-बाबा होणे 
तर मुळीच जमत नाही ..
अगोदर स्वतहा चांगले आई-बाबा होण्याचा प्रयत्न करा ..मग शिकवा पोरांना ..!

डोकं शांत झालं , मन शांत झाल ..मग ,तुमचे बोलणे आठवले ..
आबा ..खूप खजील झाल्या सारख वाट्य मला ..
म्हणून तर ..तुमच्याशी बोलायला आले आहे ..ऐकून घ्या प्लीज...

आबा ..तसे तर आपण एकमेकाचे कुणीच नाही , पण बघा ना ,
शेजारी झालोत ,आणि सहवासाने नाते जुळले ..
माझ्या मुलांनी तुम्हाला प्रेमाने आणि हक्काने ..
ज्या दिवसापासून तुम्हाला  " आमचे आबा " म्हटले ..
त्या दिवसापासून ..तुम्ही सगळ्या सोसायटीचे आबा " झालात ..
लहानच मुलं काय, आम्ही मोठी माणसे सुद्धा तुम्हाला 
"आमचे आबा म्हणू लागलो ..

तुम्ही आपल्या वागण्याने , बोलण्याने सगळ्यांना आपलेसे केले ,
हे नाते प्रेमाचे आहे , मैत्रीचे आहे, विश्वासाचे आहे ..
खरं सांगू का आबा - आमच्यासाठी खूप छान अनुभव आहे हा ..

आम्ही आमच्याच कोशात स्वतःला अडकून घेतलय ..सर्वांची आमचे स्नेह-बंध 
तुटले आहेत , माणसे दुरावली आहेत .आमची .
याचे काहीच दुखः आम्हाला होत नाहीत 
इतके आम्ही कोरड्या मनाची माणसे झालो आहोत ..

पण आमच्या या स्वभावाला , आमच्या वागण्याला तुम्हीच वठणीवर आणण्याचा 
प्रयत्न केलात , आमच्या मुलांना तुम्ही आपले मानलेत  ,आम्हाला आपले मानलेत ",
आपापल्या आई-बाबांना फक्त सुट्टीच्या दिवशी भेटणार्या आमच्या मुलांना तुमच्यासारख्या 
वडीलधार्या माणसाकडून काळजी , माया , म्हणजे काय असते हे कळू लागले ..

आबा तुम्हाला तर माहितीच आहे की -
आजकाल आहे ती नाती ..मानायची नाहीत ,"  नात्यांना जोडून ठेवणे दूरच ,
ती तोडता कशी येतील ?'हे डावपेच लढवण्यात गुंतून गेलीय आजची पिढी ,
आपली माणसे परकी करून टाकायची ..आणि परक्यांना -आपले मानायचे ..!
आजच्या नात्यांची अशी दयनीय अवस्था होऊन बसलीय ...!

अशा वेळी आम्हाला तुम्ही भेटलात आबा ..
तुमची गरज आहे आम्हाला , तुमचा आधार , तुमचे शब्द आम्हाला सैरभैर होऊ देणार नाहीत .
याची खात्री आहे आम्हाला ..
आबा ,तुम्ही जीवन अनुभवलंय , माणसाना आजमावून पाहिलंय ..
आम्ही तर अजून कच्ची मडकी आहोत .. आम्हाला थापट्या मारून पक्के घडवा हो..

मी खूप चुकीचे बोलले ,चुकीचे वागले त्या दिवशी ..मनापासून चूक काबुल करते आबा ..
पुन्हा असे वागणार नाही ..प्रोमीस ..
आबा - माफ करा हो मला  ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा - आबा -माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, January 2, 2019

#चंदर -(बालकुमार कादंबरी)- अंतिम भाग -12 वा


# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक मित्र हो - माझी १९९७ साली प्रकाशित झालेली पहिली बालकुमार कादंबरी , मी क्रमश: सादर केली,
आपण  प्रतिसाद दिलात , खूप धन्यवाद.
ही कादंबरी कशी वाटली ,आपले अभिप्राय जरूर द्यावेत.
सर्वांचे आभार.
अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश 
: " अंतिम - भाग- १२ वा -"
----------------------------------------------------------------------------
विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून 
कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते .
आजचा पदवीदान समारंभ ", "प्रमुख पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात होता. आयोजकांची घाई चालू होती. या सगळ्या गडबडीकडे 
चंदर पहात होता. कोपऱ्यात उभ्या असलेल्या चंदरकडे पाहण्यास कुणाला वेळ ही नव्हता . प्रत्येकजण आपल्यातच गुंग झालेला आहे ",हे
चंदरला जाणवत होते.
आजच्या पदवीदान समारंभात कुलपतींचे सुवर्णपदक " चंदरला प्रदान करण्यात येणार होते. मिळवलेली पदवी आणि प्राप्त झालेले यश ",
दोन्ही गोष्टी चंदरला सुंदर स्वप्ना सारख्या वाटत होत्या.
या ज्ञान -मंदिरापर्यंत आपली वाटचाल होईल ", याची त्याने कल्पनाही केली नव्हती. "शाळा नसलेल्या वाडीतून पायपीट करून शहरात 
येऊन शिकावे लागले " "कष्ट केल्यावरच काही मिळत असते ", याची जाणीव चंदरला झाली होती.
रहाण्यासाठी ,जेवण्यासाठी ", किती त्रास सहन करावा लागला ", हे आज आठवतहोते. जुन्या गोष्टींच्या आठवणी चंदरला व्यथित करून 
सोडीत होत्या , ते गेलेले दिवस पुन्हा पुन्हा नजरे समोर येत होते . " कठोर परिश्रमाशिवाय काही साध्य होत नसते ", गुरुजींचे शब्द अजूनही 
त्याच्या कानात घुमत होते.
"आई-बापूचे कष्ट आणि त्यांचे आशीर्वाद ,गुरुजींची प्रेरणा , मोठ्या मालकांचा -रावसाहेबांचा आधार ",या साऱ्या गोष्टी आपल्या पाठीशी 
सदैव होत्या म्हणून आपण पुढे पुढे जाऊ शकलो ,
कुठे आपली छोटीशी वाडी  आणि कुठे हे मोठ्ठे शहर  ", फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आपण इथ पर्यंत आलो . नदी वर जाऊन गाई- म्हशी  धुणारा 
हा चंदर ", आज पदवीधर झालाय ", हे कुणाला खरे वाटेल काय ? चंदर ने स्वतहाला हा प्रश्न विचारला .

एवढ्यात ध्वनिक्षेपकावर कार्यक्रम सुरु होतो आहे ..अशी घोषणा कानावर पडली . उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठ सुशोभित झालेले होते .
आणि निवेदकांनी  सांगण्यास सुरुवात केली - 
"या वर्षीच्या कुलपती- सुवर्ण-पदकाचा मानकरी - त्याचे नाव आहे..चंदर बापू वाडीकर ",
व्यासपीठाच्या पायऱ्यांना स्पर्श करून .मनातल्या मनात अभिवादन करून चंदर व्यासपीठावर आला . माननीय कुलगुरूंनी चंदरच्या हातात 
पदवी-प्रमाणपत्र दिले आणि मग त्याच्या गळ्यात "सुवर्ण -पदक "घातले ", त्याक्षणी सभा-मंडपात असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ",
करून गुणवंत चंदरचे अभिनंदन केले.
गौरव -स्वीकारून चंदर व्यासपीठावरून खाली मंडपात येऊ लागला होता , त्याचवेळी पुढच्या रांगेत बसलेल्या रावसाहेब , गुरुजी आणि बापूकडे 
त्याची नजर गेली , त्याने पाहिले ..की..
बापूच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहात आहेत "आणि मोठे मालक -रावसाहेब आपल्या बापूच्या पाठीवरून हात फिरवीत आहेत. गुरुजींच्या हातातल्या 
उपरण्याने बापू डोळ्यातील आनंदाश्रूंना थांबवत होते."
गळ्यात सुवर्णपदक आणि हातात पदवी-प्रमाण-पत्र घेऊन येणाऱ्या" आपल्या चंदर कडे  बापू भरल्याडोळ्याने पहात होते . "आपला चंदर एव्हढा 
मोठा आणि शहाणा झाला आहे " हे खरेच वाटत नव्हते .
आकाशाकडे पाहून हात जोडीत बापू म्हणत होता - देवा -परमेश्वरा - तुझ्या क्रुपेन हे घडलं रे बाबा ..!

रावसाहेब आणि गुरुजी  बसले होते त्या खुर्ची जवळ येऊन चंदर थांबला. खाली वाकून त्याने आधी रावसाहेबांना नमस्कार केला .
चंदरला जवळ घेत  रावसाहेब म्हणाले -
"बेटा चंदर , नाव कमावलं तू. आज सगळ्या गावाला अभिमान वाटावा असं यश तू मिळवले आहेस. मला खूप आनंद झालाय.
हे ऐकून चंदरचे मन समाधानाने काठोकाठ भरून आले. आपल्या गुरुजींच्या पायांना स्पर्श करीत तो म्हणाला -
"गुरुजी , हा आनंदाचा दिवस उजाडला आहे तो केवळ तुमच्यामुळे ".
चंदरच्या पाठीवरून हात फिरवीत -काही न बोलता गुरुजींनी आशीर्वाद दिले. त्यांच्या स्पर्शातून चंदरला गुरुजींच्या मनातील भावना समजल्या .

गावाकडे जाणऱ्या गाडीमध्ये सारेजण बसले. खिडकीतून बाहेरच्या देखाव्याकडे चंदर पहात होता. त्याला त्याचे छोटेसे जग आठवत होते, आणि 
आज त्याचे जग किती बदलून गेले होते. आजच्या आनंदाच्या दिवशी चंदरचे मन त्या दिवसांच्या आठवणीनी भरून येत होते. "जणू कालच घडून 
गेल्या असाव्यात "अशा त्या आठवणी चंदरच्या डोळ्यासमोर येत होत्या.अचानक एका वळणावर बस थांबली ,धक्क्याने चंदर भानावर आला.
त्याने खिडकीबाहेर पाहिले ,

त्याची वाडी आता जवळ आलेली होती. शेजारी बसलेल्या बापू, रावसाहेब आणि गुरुजी कडे त्याने पाहिले ",चंदरच्या गौरवाने -यशाने सारेजण आनंदाने 
तृप्त झाले होते.
गाव आल्यावर सारेजण उतरले , समोर आलेल्या काही जणांनी त्यांना सांगितले .अगोदर शाळेत जायचे आणि मग घराकडे ..
रावसाहेबांनी विचारले - "कार्यक्रम ?आहे तरी काय ?
एकजण म्हणाला - मोठे मालक शाळेत तर चला ,मग आपोआप समजेल की ...
ठीक आहे चला , असे म्हणून..
सारेजण शाळेच्या मैदानवर आले. गावकऱ्यांची चंदरचा सत्कार करण्याचे ठरवले आहे",याचा कुणाला पत्ता लागू दिला नव्हता.

समारंभ सुरु झाला. गुरुजींच्या आणि चंदरच्या यशाबद्दल बोलतांना ,आज सगळ्या गावाला खूप आनंद झालाय असे रावसाहेब म्हणाले,.
हातातला हार ते चंदरच्या गळ्यात घालणार ,तेंव्हा चंदरने त्यांना थांबवले ..आणि  म्हणाला -
"मालक - हा हार आणि हे सुवर्ण-पदक ", तुम्ही तुमच्या हाताने माझ्या गिरीजामायच्या गळ्यात घालावा ", अशी माझी इच्छा आहे . माझे हे यश  आहे 
ते "तिच्या त्यागाचे ,तिच्या वेड्या मायेचे आहे ".
चंदरच्या इच्छेप्रमाणे - रावसाहेबांनी मोठा हार आणि सुवर्णपदक ",गिरीजा -माय च्या गळ्यात घातले ", त्यावेळी सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट केला .
हे पाहतांना गिरीजा आपल्याच मनाला विचारीत होती..
" आपला चंदर एवढा माणूस केवा झाला ?"

गावकर्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलतांना चंदर म्हणाला-
गावकरी मंडळी हो- हे सगळ घडलंय ते फक्त गुरुजींच्या मुळे आणि रावसाहेबांच्या आशीर्वादामुळे ", गुरुजींनी आपल्या वाडीचा कायापालट केलाय आणि 
वाडीला नवे जीवन दिले . त्यांच्या या कार्याची मला परतफेड करायची आहे , तुमच्या साक्षीने ती मी करणार आहे ..ती म्हणजे -
"गुरुजींच्या शाळेतच -शाळेतला गुरुजी होऊन " मी वाडीत रहाणार आहे, कुठेच जाणार नाही.
सारा गाव या शब्दांनी खुश झाला. त्यांचा चंदर "खरोखरी -गुणी चंदर होता.". '
चंदरच्या यशाने सारी वाडी आज मोहरून गेली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------- समाप्त -------------------------------------------------------------------------
# चंदर - (बाल-कुमार कादंबरी )- क्रमश :
: " अंतिम - भाग- १२ वा -"
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------