Monday, January 14, 2019

नवी लघुकथा - आबा माफ करा हो मला ! ले- अरुण वि.देशपांडे

दै.सत्य -सह्याद्री -सातारा -रविवार साहित्य पुरवणी -दि.१३-०१-२०१९ .अंकात प्रकाशित
-------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा -
आबा माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------
आबा येऊ का आत ?
हो, परवानगी घेऊनच येते आहे पहिल्यांदा ,
तुम्ही म्हणाल , हे काय नवं खूळ परवानगीचं ?
तसे नाही आबा , तुम्ही रागावलात त्या दिवशी माझ्यावर ..
म्हणालात , येऊ नको पुन्हा माझ्याकडे ",
आलीस तर ..परवानगी घेऊनच ये ..मग आज येतांना 
- येऊ का आत ? आबा 
असे विचारले तुम्हाला  ....

त्या दिवशी काय बिनसलं होतं माझं , कुणास ठाऊक ?
सगळा राग मी माझ्या कुहूराणीवर काढला ,
बिचारी एवढी छोटीशी पोरगी - तिला कळेचना .आपली आई 
असे का रागावली आहे अचानक ..
माझा आवाज आणि कुहुराणीचे रडणे तुमच्या कानावर आले  ,
आणि तुम्ही आमच्या घरात आलात ..
कुहुरांणीला जवळ घेतले , तिला शांत करीत समजावले ..
मग मला म्हणलात ..
तुला एक कळतंय का ?
ती केवळ लहान आहे..म्हणून तुला काही प्रतिउत्तर देऊ शकली नाही ,
पण ,तू तर मोठी आहेस, समजदार आहेस , तिची आई आहेस..
मग ..असे वागून ,बोलून तू काय मिळवले ?
मुलीला दुखावलेस ..हे बरोबर नाही..खूप चुकीचे वागलीस ..

तुम्हा आजच्या आई-बाबांना ..धड पालक  होता येत नाही आणि आई-बाबा होणे 
तर मुळीच जमत नाही ..
अगोदर स्वतहा चांगले आई-बाबा होण्याचा प्रयत्न करा ..मग शिकवा पोरांना ..!

डोकं शांत झालं , मन शांत झाल ..मग ,तुमचे बोलणे आठवले ..
आबा ..खूप खजील झाल्या सारख वाट्य मला ..
म्हणून तर ..तुमच्याशी बोलायला आले आहे ..ऐकून घ्या प्लीज...

आबा ..तसे तर आपण एकमेकाचे कुणीच नाही , पण बघा ना ,
शेजारी झालोत ,आणि सहवासाने नाते जुळले ..
माझ्या मुलांनी तुम्हाला प्रेमाने आणि हक्काने ..
ज्या दिवसापासून तुम्हाला  " आमचे आबा " म्हटले ..
त्या दिवसापासून ..तुम्ही सगळ्या सोसायटीचे आबा " झालात ..
लहानच मुलं काय, आम्ही मोठी माणसे सुद्धा तुम्हाला 
"आमचे आबा म्हणू लागलो ..

तुम्ही आपल्या वागण्याने , बोलण्याने सगळ्यांना आपलेसे केले ,
हे नाते प्रेमाचे आहे , मैत्रीचे आहे, विश्वासाचे आहे ..
खरं सांगू का आबा - आमच्यासाठी खूप छान अनुभव आहे हा ..

आम्ही आमच्याच कोशात स्वतःला अडकून घेतलय ..सर्वांची आमचे स्नेह-बंध 
तुटले आहेत , माणसे दुरावली आहेत .आमची .
याचे काहीच दुखः आम्हाला होत नाहीत 
इतके आम्ही कोरड्या मनाची माणसे झालो आहोत ..

पण आमच्या या स्वभावाला , आमच्या वागण्याला तुम्हीच वठणीवर आणण्याचा 
प्रयत्न केलात , आमच्या मुलांना तुम्ही आपले मानलेत  ,आम्हाला आपले मानलेत ",
आपापल्या आई-बाबांना फक्त सुट्टीच्या दिवशी भेटणार्या आमच्या मुलांना तुमच्यासारख्या 
वडीलधार्या माणसाकडून काळजी , माया , म्हणजे काय असते हे कळू लागले ..

आबा तुम्हाला तर माहितीच आहे की -
आजकाल आहे ती नाती ..मानायची नाहीत ,"  नात्यांना जोडून ठेवणे दूरच ,
ती तोडता कशी येतील ?'हे डावपेच लढवण्यात गुंतून गेलीय आजची पिढी ,
आपली माणसे परकी करून टाकायची ..आणि परक्यांना -आपले मानायचे ..!
आजच्या नात्यांची अशी दयनीय अवस्था होऊन बसलीय ...!

अशा वेळी आम्हाला तुम्ही भेटलात आबा ..
तुमची गरज आहे आम्हाला , तुमचा आधार , तुमचे शब्द आम्हाला सैरभैर होऊ देणार नाहीत .
याची खात्री आहे आम्हाला ..
आबा ,तुम्ही जीवन अनुभवलंय , माणसाना आजमावून पाहिलंय ..
आम्ही तर अजून कच्ची मडकी आहोत .. आम्हाला थापट्या मारून पक्के घडवा हो..

मी खूप चुकीचे बोलले ,चुकीचे वागले त्या दिवशी ..मनापासून चूक काबुल करते आबा ..
पुन्हा असे वागणार नाही ..प्रोमीस ..
आबा - माफ करा हो मला  ..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा - आबा -माफ करा हो मला ..!
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment