Thursday, May 24, 2018

मिशी -उपक्रमात प्रकाशित माझी कथा - तो दिसला की ..!

मिशी उपक्रमात प्रकाशित कथा -
धन्यवाद - संयोजक - मिशी 
---------------------------------------------------------


१.


कथा -
तो दिसला की ..
-अरुण वि.देशपांडे -पुणे.



मेघनाथ हे नाव होत , चांगल्या मोठ्या घरातली व्यक्ती अशी त्याला एक ओळख होती ..सगळं काही होत .सगळ्यांना तो जवळचा माणूस वाटायचा ,म्हणून त्याला सगळेच वाड्यातला नाथा “  असे म्हणायचे .
अरे तो नाथा नाही का .तो " 
.तो नाथा ..रे ...
असे म्हटले की त्याच्याशिवाय दुसरा कुणी नाथा नावाचा माणूस नाही याची ऐकणार्याची  खात्री पटायची 

हा "नाथा ", गावातील एका श्रीमंत घराण्याचा कुलदीपक होता , अफाट संपत्तीचा मालक होता ..त्याचा हातगुण आणि पायगुण दोन्ही नशीबवान माणसाचे आहेत “ हे - तो पाळण्यात असल्या पासून सर्वांनी पाहिले होते . आज ना उद्या तोच या घराचा मालक  गावातील मोठी असामी , असे सगळे काही होणार हे पक्के होते ,आता ..हे होण्यासाठी ..तो वयाने मोठा होण्याची वाट पाहणे सुरु होते .
राजयोग नशिबी घेऊन आलेला "नाथा  मोठा होऊ लागला ..

नाथा आमच्या पेक्षा थोडा वर्षांनी मोठा , , शाळेतला सगळ्यात श्रीमंत मुलगा “,आमच्या पुढच्या वर्गात होता तो . सगळ्यांशी बोलणारा हा मुलगा मित्र म्हणून खूप छान होता., श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता त्याला . त्याच्या साठी स्वतन्त्र गाडी होती , तो एकटा कधीच येत नसे , रस्त्याने जो मित्र भेटेल त्याला गाडीत बसवून आणायचा , शाळा सुटल्यावर परत मुलांना बसवत असे गाडी मध्ये .
त्याचा वाढदिवस शाळेत आणि त्याच्या घरी ..मोठ्या वाड्यात साजरा होत असे , त्यादिवशी सगळ्या पोरांच्यासोबत आमची दोस्त कंपनी वाड्यावर जाऊन मज्जा करून यायची.

दिवस असेच मस्त चालले होते ..आणि अचानक .. नाथाची “आई “गेली , तीर्थयात्रेला गेलेल्या त्यांच्या बसला अपघात झाला आणि त्यात ..नाथाची आई त्यांच्या परिवारातील ,तसेच त्यांच्या वाड्यातील अनेकजन गेले ,
वाड्यावर , गावावर शोककळा पसरली, नाथाचे वडील तीर्थयात्रेला गेले नव्हते म्हणून ते बचावले ..हे त्यातल्या त्यात बरे म्हणयचे.

पुढे काही महिन्यात .. परिवारातील लोकांच्या सांगण्यावरून ..त्यांनी दुसरे लग्न केले , वाड्याला नव्या मालकीणबाई मिळाल्या , सामन्य घरातील त्या बाई वाड्यातील वैभवाने दिपून गेल्या ,अचानक लाभलेल्या अधिकाराने मालकीणबाई लगेच बदलून गेल्या ..आणि नाथाचे “ दिवस फिरले .. असेच सारेजण म्हणू लागले .
आज न उद्या नाथा “वारसदार म्हणून हे वैभव संभाळणार हे सर्वांना माहिती होते , सगळ्यांची याला संमती होती..नेमके हे एकमत आणि बहुमत“या दोन्ही गोष्टी नाथाच्या नव्या आईसाहेबंना खटकू लागल्या कारण त्यांच्या जवळच्या माणसांनी .हा .नाथा पुढे त्यांच्यासाठी किती अडचणीचा ठरणार आहे हे पटवून दिले , आणि हा काटा काढणे किती गरजेचे आहे हे नव्या मालकीणबाईंना पटले आणि समजले ..

एका रात्रीची गोष्ट आहे, आम्ही पोर पोर आमच्या गल्ली जवळच्या चौकात बोलत उभे होतो , समोरून जीवाच्या आकांताने ओरडत आमच्या दिशेने येणारा नाथा “ दिसला , आमच्या जवळ येऊन तो थांबला , धावत आल्यामुळे दम लागलेला नाथा बोलू शकत नव्हता , फक्त भेदरलेल्या नजरेने तो मागे वळून पाहत होता ,
एक गाडी आमच्या समोरून वेगाने निघून गेली , त्या बंद गाडीत अंधार होता, आत कोण आहेत ? हे कळाले नाही ..

आम्ही नाथाला पाणी दिले , शांत झाल्यावर त्याला विचारले ..
काय झाल नाथा ? कोण लोक होते हे ? का असे मागे लागले ? तुला मारणार होते की काय ?
नाथा सांगू लागला ..
तुम्हाला कसे सांगू ,काय सांगू ?
गेल्या काही महिन्या पासून ..वाड्यात आलेल्या नव्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली आहे ,
सगळ्या समोर गोड बोलतात , छान वागतात , आणि माझे बाबा बाहेगावी गेले की, मात्र माझा छळ करतात ,







---२---




नाथा मोठा होऊ लागला त्या दिवसात  ..त्याच्या पेक्षा आम्ही तसे लहान पोरं होतो ,..
आमच्या टोळीतील एकाने हुंगेगिरी करीत असतांना ऐकलेली बातमी ..एक दिवस आम्हाला सांगून टाकली ...त्याने आणलेली बातमी .आम्हाला धक्का देणारी होती ..
आमचा दोस्त  सांगू लागला अरे , तो  नाथा त्या वाड्यातला .. नाथा “ म्हणे ..पुरुष नाहीये ..!

सगळ्या पोरांनी दोस्ताला म्हटले.. 
काही पण .बोलत जाऊन ने बे असे कुणाबद्दल ..तुला काय माहिती रे ....
शप्पत बे .खरं सांगतोय .. तो " नाथा अगदी तसाच आहे ", हे त्याच्या जवळच्या माणसाने एकाला सांगतांना ऐकले मी ..
अन आलो की लगेच पळत तुम्हाला सांगायला .

असे ऐकल्या पासून  “नाथा “कडे पाहण्याची आमची नजर बदलून गेली ..त्याच्या जाण्या येण्याकडे , बोलण्याकडे ,दिसण्याकडे ..आम्ही बारीक नजरेने ,शोधक नजरेने पाहू लागलो ..तसे पाहिले  तर." .पुरुष नाहीये ", असा ठपका बसलेले अनेक जण गावात होते ..ते आम्हाला माहिती  होते ..पण अशा लोकांच्या कडे पाहिलं की  लगेचकळायचे ..अरे..कूच तो गडबड है,
अशी  माणसं आणि ,त्यांच्या बद्दल , समोर कमी ,माघारी मात्र नेहमीच मस्करीने बोलले जात होते , त्यातले शब्द , आमच्या सारख्या पोरांना पूर्ण समजत नसे..पण..हे नक्कीच चांगले बोलत नाहीत ..हे मात्र जाणवत असायचे.
आता यात "नाथाची  ची भर पडली ..असेच म्हणावे लागेल .

काय असते ..काही व्यक्ती ,काही माणसे ..अख्या गावाला माहिती  असतात .ती त्यांच्या समाजातील स्थानामुळे , करीत असलेल्या कार्यामुळे ..वगेरे वगेरे ..
असेच काहीसे नाथ बद्दल बद्दल येईल .
 दिसायला राजबिंडा , कोणता ही ड्रेस मध्ये तो खूप छान दिसायचा , आव्वाज एकदम भारदस्त ..फेमस फिल्मी हिरो सारखा , बोलायला लागला की ऐकत राहावे असे छान बोलायचा .थोडक्यात काय नाथा मध्ये काही प्रोब्लेम असेल अशी शंका सुद्धा कुणाला येत नसेल ..
आमच्या दोस्ताची बातमी खरी निघते की काय अशी भीती वाटू लागले ..कारण .."नाथाच्या वाड्यातून अश्या अर्थाच्या बातम्या ..पिल्लू सोडून दिल्या सारख्या .अधून मधून ..गावभर फिरू लागल्या ..


अलीकडे आमच्या गप्पात आम्ही नाथ " बद्दल बरेच बोलत होतो , कुणाला त्याच्याबद्दल काय वाटतंय याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नव्हते , आमच्या मनात नाथा बद्दल एक प्रकारचा आपलेपणा  कसा काय वाटत होता ? ..हे आम्हालाच कळत नव्हते . म्हणतात ना ..एखादा आपला कुणी नसतो ..पण..त्याच्या बद्दल आपल्याला विनाकारण आपलेपणा  वाटत असतो , त्याचे कारण पण काही देता येत नसते ..बस,आम्हाला पण नाथ बद्दल अगदी असेच  वाटते म्हणजे वाटते.

त्या दिवशीची गोष्ट ..रात्रीची वेळ .. आमच्या घराच्या ओट्यावर .बाबा आणि त्यांचे मित्र बसले होते ..त्या दिवसात ..टी व्ही आणि सिरीयल चे दिवस अजून सुरु होण्यास खूप वर्ष उजडायचे होते , लोकांना वेळ होता ..गप्पांच्या निमित्ताने का होईन ..लोक एकत्र बसत,बोलत ..भले ही त्याला ही नावं ठेवली जायची .
.
तर त्या गप्पात .अचानक  नाथा चा उल्लेख माझ्या कानावर पडला ..आणि मी सावध होऊन ..बोलणे ऐकू लागलो ..
एक काका म्हणाले .. काय म्हणावे लोकांना ..किती नीच आणि कारस्थानी , अरे केवळ पैश्या साठी ..एखाद्याला आयुष्यातून उठवत आहेत हे लोक, बघा ना .. नाथा ला काही मिळू नये..त्याचा काटा काढला  पाहिजे , या हेतूने त्याच्या बद्दल मनाला येईल ते बोलतात , बातम्या पसरवित आहेत.. पण..लोकांना खरे काय हे चांगले माहिती असते ..
नाथाच कुणी काही बिघडवू शकत नाही .
















---३---




म्हणजे ..आम्हाला ज्याच्या बद्दल आपलेपणा वाटत होता ..तो" नाथा खरेच खूप छान माणूस आहे.
पण, आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही..

अशीच मध्यरात्रीची वेळ असेल.. बाहेर मोठ्यांने आवाज ऐकू आला , दरवाजे उघडून आम्ही बाहेर रस्त्यावर आलो .. जमलेल्या लोकांमध्ये बोलणे सुरु होते
त्यावरून समजले की .. थोड्यावेला पूर्वी .. एक गाडी आली, आणि आतल्या माणसांनी ..नाथाला गाडीतून बाहेर रस्त्यवर टाकून दिले आणि पळून गेले ,
नाथाला बराच मार लागलेला दिसत होता ,

लोकांनी त्याला बसवले , पाणी दिले , धीर देत म्हणाले ..छोटे मालक ..घाबरू नका ..तुम्ही आमच्या सोबत आहेत ..काय झालं ते सांगा आम्हाला ..

नाथा सांगू लागला ..
नेहमीचाच प्रकार ..मोठे मालक बाहेरगावी गेलेत ४-५- दिवसासाठी .. मग, सगळे मिळून माझा छळ करतात , मारझोड करतात ,
आईसाहेब पहात असतात सगळा प्रकार , त्यांची संमती असते या सगळ्या गोष्टींना ..
त्या नेहमी म्हणतात मला –
नाथा नीट समजून घे .
.. हे बघ .. तू माझा कुणीही नाहीस आणि होणार ही नाही , हे सर्व माझं आहे .तुला हे कधीच काही मिळणार नाही

आमचं हे वागणे तुझ्या बाबांना हे कधीच दिसू देणार नाही , त्यांच्या समोर आम्ही तुझ्याशी आम्ही इतके चांगले वागून दाखवतो की ..त्यांना आमच्या वाईट वागण्याची शंका कधीच येणार नाही.. कुणी कितीही सांगो आमच्या बद्दल ..त्यांचा विस्वास कधीच बसणार नाही, याची काळजी आम्ही घेत राहू.
तुला मारून आम्ही मोकळे होणार नाही ..कारण असे केले तर तुझ्या बाबांना सोडून इतर सगळ्यांना हे आम्ही केलें याची पक्की खात्री असेल.
म्हणून ..तुला मरू तर देणारच नाही आणि नीट जगू पण देणार नाही .. “

तुम्हाला तर माहितीच आहे.. मोठे मालक ..त्यांना धक्का बसेल असे काही कळता कामा नये , दोन ऑपरेशन झालीत त्यांची , काळजी घेतली नाही तर ,जीवाला मोठाच धोका आहे त्यांच्या . आणि मला या सगळ्या लोकांनी देत असलेल्या त्रासाबद्दल कळाले तर त्यांच्या मनाला खूपच मोठा धक्का बसेल या भीतीमुळे सहन करण्याशिवाय माझ्या हातात काही नाहीये.
नाथाच्या स्वभाचा आणि चांगले असण्याचा मोठाच गैरफायदा त्याचीच आई घेत होती . केवळ पैसा आणि संपत्तीच्या लोभापायी नाथाच्या वाट्यास हे दिवस आले होते .या कुटील हेतूने ..नाथा “पुरुषच “नाहीये ..ही गोष्ट सगळीकडे ठरवून पसरवली जात होती , ज्यामुळे नाथाचे लग्न होणार नाही “,आणि तो एकटाच असला की त्याला त्रास देणे ,सहज सोपे होते.

नाथाची गोष्ट ऐकून सर्वांना त्याच्याबद्दल सहानुभूती होती , त्याच्या मदतीला दरवेळी कुणीतरी येत होते , पण ,वाड्यात असतांना मात्र तो नेहमीच एकटा असायचा , इतर कुणाला प्रवेश नव्हता .


अचानक –एक दिवस ..
गावात बातमी येऊन धडकली की  काल-परवा ..नाथा  " सहजपणे  वाड्याच्या गच्ची वर गेला होता  , पायर्या उतरतांना ..त्याचा कसा काय तोल गेला .कळालेच नाही ..
तो . थेट खाली आला ..
आता नेलंय मोठ्या गावाच्या दवाखान्यात कळेल लवकरच.

ही बातमी ऐकून सारे गाव हळहळत होते , लोक आपसात कुजबुजत होते ..अरे आपला नाथा पडला नाही..त्याला नक्कीच ढकलून दिले असेल ..त्या शिवाय असे होणार नाही..
आमच्या सारख्यांच्या बोलण्याला काय आणि कोण किंमत देणार ..?













---४----




बरेच दिवस झाले होते आता या गोष्टीला पण या अपघातातून नाथा " कधीच बरा होणार नाही..याची पूर्ण काळजी घेतली जाते आहे .असेच लोकांना वाटू लागले ..आणि काही महिन्यात तसेच झाले ..
वाड्यातील लोकांनी गावातील लोकांना सांगण्यास सुरुवात केली ..
पडण्याच निम्मित्त झालं , बघा ना, काय होऊन बसलाय , मेंदूला इजा झाली म्हणतात नाथाच्या .
मोठे मालक स्वतहा लेकाचं निदान करून आलेत , खूप धक्का बसलाय त्यांना तर ..हाय खाली जणू त्यांनी.

 नाथा वेडा झालाय “,त्याला काहीच समजत नाही ,काही करता येत नाही
 डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या ", आता आम्हीच सांभाळू कसे तरी त्याला . 
वेडा झाला म्हणून सोडून कसे देता येईल , त्याचे दुश्मन नाहीत आम्ही ..
असे म्हणणारे कसे आहेत ?  हे सगळ्यांना माहिती होते ..

चार दिवस लोक बोलत होते ..काही दिवसांनी  आपोआप  तेही बंद झाले ..
वाड्या समोरून जातांना .नजर वर जातेच ...वरच्या माडीवर.ग्यालरीत ..बसलेला ..तो "दिसतो .. पंख छाटूनटाकलेला जायबंदी - दिमाखदार गरुड "..इकडे तिकडे भिरभिरत असते त्याची नजर ..पण त्यात भावनाच नाहीये असे वाटते .तसे तर जो कुणी या रस्त्याने जातो, तो क्षणभ थांबून वर पाहिल्या शिवाय पुढे जात नाही, ग्यालरीत बसून असलेला नाथा दिसतो , पाहणारा मनोमन पुटपुटत पुढे जातो..”पैश्या साठी माणूस काय काय करील,? भरवसा नाही उरला रे बाबा कुणाचाच

..तो " दिसला की ..त्याला पाहून घशात हुंदका अडकल्या सारखे वाटते .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - तो दिसला की .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment