Friday, December 14, 2018

चंदर - (बालकुमार कादंबरी ) क्रमश : भाग - ५ वा

,#चंदर-  ( बालकुमार कादंबरी)
क्रमश: भाग - ५ वा
---------------------------
आपल्या घरातल्यापेक्षा जास्त वेळ गुरुजींसोबत राहणाऱ्या चंदरच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात खूपच फरक पडल्याचे जाणवत होते.
चंदरबद्दलचं बोलत असताना एक दिवस बापू म्हणाला -
गिरिजे, आपल्या चंदरच कामच लै वेगळ हाय गं, त्याच बोलणं, चालणं पाहून तर वाटतंय, चंदर आपल्या घरातच शोभत नाही ',
हे गुरुजी भेटल्यापासून आपल्या चंदरच डोकं लै चालताय, जसं बंद पडलेलं घड्याळ,  चाबी दिल्यावर पुन्हा सुरु झालंय.

' धनी, मी तर सारखी म्हणत राहाते की,आपला चंदर म्हणजे ज्ञानेशरच हाय, याच्या लहानश्या डोसक्यात लई अक्कल भरलीया !",
चंदर विषयीचे कौतुक गिरिजेच्या शब्दा-शब्दातून व्यक्त होत होते. तिच्या बोलण्यावर मान डोलवत बापू सांगू लागला -
गिरिजे, आपला चंदर हायेच लई हुषार,
गुरुजींनी एकदा का काही सांगितले की याला तर समद एका झटक्यात पाठ बी होऊन जातंय,
मी तर ठरवलंय , चंदरला घरच्या कामाला जुपायचं नाही,त्याला गुरुजींच्या हवाली करून टाकायचं आपण.
बापूच हे बोलणं ऐकून गिरीजा म्हणाली,
" तुमच्या बोलण्याच्या बाहीर मी न्हाई, आता शिकून मोठा होईस्तोवर आपला चंदर ,गुरुजींचा.'

एक दिवस बापू चंदरला म्हणाला-
'तुझ्या गुरुजीला आपल्या घरी घेऊन ये की ",
बापुची ही इच्छा ऐकून चंदरला वाटले,
"आपल्या बापूच्या मनात  शाळेबद्दल राग नाही ,हे किती चांगलं झालय !',

गुरुजींची भेट झाल्यावर चंदर म्हणाला,
" सांजच्या वेळी फिरायला जातांना, आमच्या घरी जायचं का ? बापूंनी बोलावलंय तुम्हाला.
हे ऐकून गुरुजी म्हणाले-
अगदी जरूर जाऊ,
माझं काम आहेच बापूशी, शाळेबद्दल थोडं बोलायचं आहे,
आपण आज जाऊया तुझ्या घराकडे. ! गुरुजींनी कबुल केल्याचा चंदरला आनंद झाला , मग दुपारभर त्याने गुरुजींनी शिकवलेले धडे पाठ केले .
"पहिली-दुसरीच्या पुस्तकातील सगळे धडे चंदरला पाठ होते, त्याची अशी प्रगती पाहून गुरुजींना वाटायचे , " मनाची ओढ ज्या कामात असते  
तेच काम करायला मिळते तेंव्हा त्यात खूप प्रगती होते !  ह्या चंदरच नेमके तेच होते आहे.
"वाडीसारख्या आडवळणाच्या  गावात चंदरच्या रुपात ते एका हिऱ्याला पहात होते. कचऱ्यात असला म्हणून काय झाले ?, 
हिरा हा शेवटी हिराच असतो.",
त्याचे तेज लपून रहात नाही.
चंदरच्या बुद्धीच्या तेजाने गुरुजींना दिपवून टाकले, या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम गुरुजींना करावे लागणार होते.
 "योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो 
पुढे खूप शिकेल. ही जाणीव गुरुजींना झाली . "योग्य शिष्य ",मिळण्यासारखा आनंद एखाद्या गुरूला मोलाचाच असतो. 
चंदरच्या घराकडे जातांना 
गुरुजींच्या मनात हे विचारचक्र सुरूच होते.

गेल्या दोन-चार महिन्यात वातावरणात बराच पडत होता. आता गुरुजींच्या खोलीवर चंदर सोबत इतर अनेक मुले येऊ लागली होती . 
पंढरी, गणेश , प्रकाश , पांडुरंग , व्यंकटी अशी काही पोरं नेमाने खोलीवर येत असणारी .चंदर सारखी फार हुशार नसली तरीही शिकावे , पुढे जावे ही 
जिद्द या पोरांच्या मनामध्ये आहे जाणवत होते.
वेळेवर शाळेत गेली असती तर ही पोरं आज सातवीत किंवा आठवीच्या वर्गाचे विद्यार्थी राहिले असते , आता उशीर झालाय हे खरं असलं ,तरी वेळ 
गेलेली नव्हती. ही गोष्ट गुरुजींना समाधान द्यायची.
आपण या पोरांची तयारी करून घेतली आणि साऱ्यांना एकदम चौथी बोर्डाच्या परीक्षेला बसवले तर ?

ही कल्पना गुरुजीना अचानक सुचली, आणि प्रत्यक्षात ही कल्पना आणण्यास अवघड काही नाही नव्हते . वार्षिक परीक्षेला अजून चार-पाच महिने बाकी होते ,
आणि ही पोरं मेहनतीला मागे हाटणारी नाहीत. , तेंव्हा प्रयत्न करून पहायला काय हरकत आहे ?"
"झाले तर ही पोरं पासच होतील . नाही झाली तर पुन्हा अभ्यास करता येतो की ", ! आणि ,
ही पोरं खरोखरचं पास झाली तर पुढच्या वर्षी एकदम पाचवी पर्यंत शाळा सुरु करता येईल, म्हणजे या पोरांना बाहेरगावी जायचे कामच पडणार नाही.
सुचलेल्या या कल्पने मुळे गुरुजींच्या मनाला खूप बरे वाटत होते, त्यांच्या मनात उत्साहाला उधाण आले. आता शाळेला विद्यार्थी मिळतील , आपली 
नोकरी चालू राहील. इतक्या दूरगावी आल्याचे चीज होईल.

विचारांच्या नादात गुरुजी चालत राहिले असते पण त्यांना चंदरने थांबवत म्हटले -
गुरुजी , आमचं घर आलं की !,
बापूने गुरुजींचे स्वागत केले . अंगणात बाज टाकलेली होती. गुरुजी बाजेवर बसले, समोर बापू होता, बाजूला चंदर उभा होता.
सामन्य परिस्थितीत राहणाऱ्या शेतकऱ्याचं घर असतं ,तसच बापुचं  घर दिसत होतं.
 चंदर ने पाण्याचा तांब्या गुरुजी समोर ठेवला. ग्लासमध्ये पाणी ओतून घेत, घोटभर पाणी घेऊन गुरुजी म्हणाले -
बापू, सहा महिन्यांनी शाळा सुरु होणार आहे , अजून गावातून मात्र लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीये.
"गुरुजी , तुम्हाला खरं सांगू का ..! आमच्या गावावर भरवसा ठेवून काम करू नका, तुमी आजूबाजूच्या गावातही एक-दोनदा जाऊन या, तुमाला लई पोरं  मिळतील .

गिरीजा चहाचा कप घेऊन आली. चहा ठेवत ती म्हणाली -
"गुरुजी , काय म्हणतो आमचा चंदर ? घरात असला की नुंस्ता  शाळा -शाळाच करीत असतो बगा ह्यो  पोरगा ,
त्याला काही येतं का वो ?

गिरीजा विचारीत होती , तिच्या शब्दात चंदरचे कौतुकच आहे हे गुरुजीना जाणवत होते.
चंदर कडे पाहत गुरुजी म्हणाले ,
"बापू , या गावातील सर्व पोरात हुशार असणारा फक्त एकटा चंदरच आहे.

पुढच्या चार महिन्यासाठी तुम्ही चंदरला माझ्या हवाली करून टाकायचं. चंदरला माझ्या सोबत राहायचं आहे , गावात असून चंदर बाहेरगावी असल्यासारखा समजायचं तुम्ही .

गुरुजींनी असं म्हटल्यावर , आपण काय बोलावं ? हे दोघांना समजेना, क्षणभर दोघेही गप्पच झाले.
ते पाहून चंदर म्हणू लागला -
"आये , गुरुजींच्या घरी राहू दे ना !, मी रोज एक टाईम येऊन तुम्हाला भेटत जाईन. बाहेरगावी गेलो असतो तर काय केलं असतं तुम्ही ?
शेवटी चंदरच्या हट्टापुढे अखेर बापूला
 "होय ", असेच म्हणावे लागले.

बापू म्हणाला - गुरुजी , आता इथचं जेवून जावा , गरीबाची मीठ-भाकरी आहे, ती गोड मानून घ्या.
हे ऐकून गुरुजी म्हणाले - बापू , मी कुठं आहे पैशेवाला , तुमच्यासारखाच मी गरीब माणूस आहे.. अहो, चंदरला तुम्ही आहात ,
गिरीजासारखी माया करणारी आई आहे , मला तर असे कुणीच नव्हतं .
मी वाढलोय ते दुसऱ्याच्या घरी , पानात शिळे तुकडे पडायचे , ते देखील गोड मानून खात होतो मी ,
बापू , खाल्लेल्या अन्नची किमत फार मोठी असते . हे लहानपणा पासून शिकत आलो मी .
मला कुणी परका समजू नका, तुमच्यातलाच एक समजत जा. !
गुरुजी हे बोलत असतांना चंदर मात्र एकटक पणे त्यांच्या चेहेऱ्याकडे पहात होता, आपले गुरुजी लई वेगळ्या मनाचे आहेत , ही कल्पना त्याच्या ठसत होती.

गीरिजेचे मन तिला समजावत होते -
"वेडे , माया कमी कर , या गुरुजींच्या हाताखाली तुझा चंदर राहिला तर , कल्याण त्याचेच होणार आहे !".

जेवण झाल्यावर गुरुजी परत निघतांना म्हणाले - 
बापू, उद्यापासून चंदर माझ्या खोलीवर, माझ्या सोबत राहील. त्याला माझ्याकडे आणून सोडा, आणि यापुढे तुमच्या पोराची काळजी तुम्ही अजिबात करायची नाही.
गुरुजींच्या बोलण्यावर बापू आणि गिरीजा मान डोलवित होती. "आपल्या चंदरचं नवं आयुष्य उद्यापासून सुरु होणार ...
एव्हढच त्यांना कळत होतं ......

क्रमश : पुढे सुरु .......
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चंदर (बालकुमार कादंबरी )
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342 
------------------------------------

No comments:

Post a Comment