Monday, February 5, 2018

आठवणीतलं गाव- परभणी - लेख-१८ वा - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .

लेख- १८ वा -  - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .
--------------------------------------------------------------
मनात नवी उमेद , काही तरी करून दाखवण्याची आतुरता , त्या साठी व्यासपीठ मिळवण्याची धडपड आणि खटपट 
सर्व काळातील तरुण पिढीला करावी लागते, करवून दाखवावी लागत असते , कला आणि साहित्य क्षेत्रात व्यासपीठ मिळणे ,ते मिळवणे ..हे लेखनापेक्षा कठीण आहे ..अर्थात "आपल्या कार्याची दाखल घेतली जावी , कवी, लेखक म्हणून लोकांनी ,वाचकांनी आपल्याला ओळखावे हा हेतू या सर्व कार्यामागे असतो ,हे लक्षात घेतले पाहिजे.
वरील प्रकारचे धडपड -कार्य  मी परभणीला आलो त्यावर्षी सुरु झाले .

औरंगाबाद, जालना , सेलू , परभणी , नांदेड ..हा नुसता एक रेल्वे -मार्ग नाही  की रेल्वे -स्टेशनची नावं नाहीत तर या गावांची ओळख खूप वेगळी आहे कारण - मराठवाड्यातील "नामवंत लेखक-कवी -साहित्यिक या गावात वास्तव्यास आहेत , आणि ही सगळी साहित्यिक मंडळी ..सतत लिहिती असणारी आहेत, मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी साहित्य क्षेत्रात यांच्या साहित्याने नाव-लौकिक मिळवलेला आहे.

तर अशा एक मोठ्या साहित्यिक -क्षेत्री म्हणजे परभणीला ..मी माझा लेखन प्रवास सुरु केला , एक कथा लेखक म्हणून मी  लेखन करीत होतो , माझ्या नव्या कथा नियमितपणे विविध मासिकातून आणि रविवार साहित्य पुरवणीतून येऊ लागल्या , तसे .परभणीतील लेखक -कवी ..माझ्या लेखनाची थोडी थोडी का होईना दाखल ग्फ्हेत आहेत " ही जाणीव माझ्यातील लेखकाला लेखन -बळ देण्यास पुरेशी होती.

मी नवीन होतो ,अश्या त्या ८०- ९० च्या दशकातील परभणीच्या साहित्य-जगतातील जेष्ठ -साहित्यिकांची पिढी निष्ठेने लेखन करीत होती , त्यांचा लेखन-प्रवास , लेखन -क्षेत्रातील त्यांचे कार्य, त्यांचा नाव-लौकिक ..हे सर्व काही माझ्या सारख्या नवख्या लेखकासाठी  अप्रूप होते , आदरयुक्त भीती आणि दरारा " दोन्ही भावना मनात असायच्या .असे असले तरी ..सहवासाने हे दडपण कमी होते गेले , भीड चेपत गेली .." हे सगळे होण्याचे कारण माझ्यात लेखन -गुण " आहेत याची खात्री पटल्यावर ..मात्र नंतर मला या जेष्ठ पिढीने कायम प्रोत्साहन दिले.
आजच्या या लेखात मला लेखन प्रोत्साहन देणाऱ्या वडीलधार्यांची स्मरण-भेट करून देतो आहे.

डॉ.धुंडिराज कहाळेकर - शंकर महाराज सदन -नानलपेठ -परभणी .. हा पत्ता माझ्यासाठी "साहित्य-सल्ला -केंद्र झाले ",
निष्णात वैद्यराज " इतकीच त्यांची ओळख  नाहीये , ते काव्य शास्त्र प्रवीण असे रसिक -लेखक-कवी - बाल-साहित्यकार आहेत ..हे हळू हळू त्यांच्या भेटीतून उमजत गेले .. . ""अचूक नाडी-निदान  " हे त्यांचे वैद्यकीय कौशल्य साहित्यात ही उपयोगी पडत असे  कारण माझ्या लेखनातील दोष ..त्यांनी अचूकपणे दाखवत मला कायम "गुणकारी सल्ले देत " चांगल्या लेख्नासाठीच्या  "शुगर कोटेड - गोळ्या ..अगदी निर्व्याज्ज्य प्रेमापोटी दिल्या आहेत ,
एक अर्थाने माझा चालू असलेला लेखन प्रवास डॉक्टर - कहाळेकर यांनी दिलेल्या आरोग्य-रसपूर्ण गुणकारी गुटी "चा मोठा औषधी -प्रयोगाने सिद्ध होतो आहे.
शनिवारी -दुपारी अडीच पर्यंत बँक असे .. त्यामुळे ..बहुदा शनिवारी त्यांच्या दवाखान्यात ..आमची भेट ..म्हणजे साहित्य गप्पा , लेखन दुरुस्ती -चर्चा ..होत असे ..त्यांनी केलेल्या सूचना , लेखनासाठी सुचवलेले विषय ..या मध्ये वेळ सत्कारणी लागला "याचेच मोठे समाधान मिळत असे.
त्यांच्याकडे रविवारचे बहुतेक सर्व पेपर येत असत ( सध्या कोल्हापूरला सुद्धा असेच असणार ), आणि रविवार साहित्य पुरवणीत  परभणीतील किमान ४-५ लेखक-कवीचे साहित्य प्रकाशित होत असे ..या ४-५- जनातलं मी एक होतो ..ही आठवण आज सुद्धा खूप सुखद वाटणारी आहे. तर..ज्याचे साहित्य आले असेल त्या त्या कवीला -लेखकाला आवर्जून फोन येणार तो असा असायचा ..
डॉ. कहाळेकर बोलतोय , त्रास देतोय तुम्हाला ,,
तुमची कविता , लेख ..आज वाचलीय या पेपरमध्ये , 
छान , आनंद वाटला ...शुभेच्छा ...
त्यांची ही प्रशंसा -पावती आली की खूप छान वाटे ...
परिवर्तन प्रकाशन "वसमत नगर - या त्यांच्या प्रकाशनाकडून अनेक साहित्यिकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलीत , साधी -सुबक स्वरूपातली ही छान पुस्तके ..त्यातील "वाचनीय साहित्यामुळे "आज ही लक्षात आहेत.
कहाळेकर यांचे कडे साहित्यिक -उपक्रमांचे आयोजन होत असे .. मराठवाड्यातील अनेक साहित्यिक यासाठी परभणीला येत , 
प्रसिध्द लेखिका -रेखा बैजल  यांची साहित्यिक भेट अशाच एक निमीतने डॉ.कहाळेकर यांनी आयोजित केली होती 
साहित्य सम्मेलन -आणि डॉ.कहाळेकर  म्हणजे  पंढरी आणि वारकरी " असे भक्तिरूप नाते आहे , समेलन स्थळी डॉकटर असणार ,त्यांची भेट होणार " हा क्रम कधीच चुकलेला नाही.
पुस्तक -प्रकाशन 'समारंभ ..यात प्रकाशित पुस्तकाची पहिली प्रत -  पैसे देऊन लेखकाच्या हातून खरेदी करणारे डॉक्टर -कहाळेकर ..एक दुर्मिळ वाचक आहेत ..त्याच्या या भाव-वृत्तीस मनोमन कायम सलाम .
२००३ साली परभणीला रौप्य महोत्सवी मराठवाडा साहित्य सम्मेलन झाले , याच सम्मेलनात माझा पहिला कविता संग्रह - गाणे दिवाणे प्रकाशित झाला ,
यातील प्रेम-कविता वाचून त्यांनी माझ्या कविता संग्रहात  शुभेच्छा -कविता दिली ..
ती आठवण म्हणून देतो आहे..

"स्वागत रसिकांचे -
शृंगार साज अवघा , लेवून सखी आली 
गाणे असे दिवाणे, नव गातसे  सहेली 
उधळित रंग नवखे , ही अरुणप्रभागाली
सांभाळ हृद्य रसिका , प्रतिभा स्वये प्रगटली 
                     
                   -धुंडीराज कहाळेकर 
-------------------------------------------------------------

माझ्या बाल-साहित्य लेखनाकडे देखील त्यांचे बारीक लक्ष असते , कथा, ललित लेख या स्वरूपातील माझ्या लेखनास तर त्यांची पावती मिळते , कविता "त्यांच्या समोर आली की मात्र त्यांच्यातील "आग्रही कवी जागृत होतो "आणि मग कविता आणि स्वरूप यावर त्यांच्याकडून खर्या अर्थाने .बुस्टर-डोस " मिळतो .
आजच्या मुक्तछंद लेखनाच्या प्रव्हात असतांना ..मन अजून ही ओढ घेत असते  ते कवितेच्या ..गेय आणि लयबद्ध ,आलंकृत अशा सुबक रेखीव रुपाकडे . याचे श्रेय मी डॉ.कहाळेकर यांनाच देईल त्यांच्या सांगण्यामुळे या कवितेचा मनातून मोह होत असतो.

डॉक्टरकडे होणाऱ्या साहित्यिक चर्चात ..अधून मधून ..येणारे साहित्यिक व त्यांची भेट म्हणजे आमच्या साठी बोनस असायचा .. मला आठवते की..
वि. शं.गौतम , गंगाधर जयपूरकर , रे.रा.सनपूरकर , हे जेष्ठ साहित्यिक हजेरी लावीत असत ,

दिवाळी अंक ..आणि त्यातील प्रसिद्ध झालेल्या साहित्याचा आढावा अशा चर्चा करण्यासाठी .. दिवाकर खोडवे , हमखास असायचे , त्यांच्या सोबत विनोदी कविता , चारोळ्या ,किस्से ..यांची मेजवानी असे.
जुन्या पिढीचा आणि नव्या पिढीचा असा मनोहर संगम ...दोन्हीतील साहित्यिक -संवाद , असे विधायक कार्य " हे माझ्या दृष्टीनी डॉ.कहाळेकर यांनी माझ्यासाठी  आणि  त्यावेळच्या साहित्यिकांच्या नव्या पिढीसाठी केलेले बह्मोल असे वाण्ग्मयीन संस्कार -कार्य ठरावे.

परभणी -साहित्यिक नगरीत आता डॉ.कहाळेकर नाहीत , आणि मी पण नाहीये ..पण ..गेल्या अनेक वर्षा पासूनचा आमचा  स्नेह आणि संपर्क कायम आहे , गेल्या  २-३- वर्ष मध्येच त्यांचे पुण्यास येणे कमी झाले , त्या अगोदर ..किमान ५-६ वर्ष तरी  ते कोथरूडलात्यांच्या लेकीकडे (वर्षा कडे ) येत, त्यावेळी त्यांचा फोन आला की ..आमची भेट व्हायची   परभणीच्या आठवणीत गप्पा निघायच्या आणि मन भरून यायचे .

सध्या डॉ.कहाळेकर कोल्हापूरला त्यांच्या मुलाकडे असतात , दूर राहून ही त्यांचे लक्ष त्यांच्या मित्र परिवारातील साहित्यिकाकडे असते .
 मधूनच फोन येतो ..
डॉ.कहाळेकर त्रास देत आहेत ...आज तुमची कविता वाचली..छान .
, प्रेमाने- मायेने भरलेले त्यांचे कौतुक शब्द "कानावर पडतात आणि लेखनास नवे बल मिळते 
डॉक्टर साहेब ..तुमच्या या शब्दांचे पाठबळ आशीर्वाद म्हणून नेहमीच लाभू द्या . 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखमाला - आठवणीतलं गाव -परभणी - 
लेख- १८ वा -  - डॉ. धुंडीराज कहाळेकर - वडिलधारे माणूस .
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment