Monday, February 12, 2018

मिशी "उपक्रमात प्रसिद्ध झालेली कथा - दि-१८-०१-२०१८

मिशीची गोष्ट
लेखक - श्री.अरुण वि.देशपांडे
-------------------
रंगाने गोरेगोमटे, गुळगुळीत चेहेर्याचे ,राजस व्यक्तिमत्व लाभलेले पाहून त्यांना " सेम सिनेमातल्या हिरो सारखा दिसतो " अशी कौतुकाची पावती देतो . एक नूर आदमी- दस नूर-कपडा ", हे अशा माणसांनी सार्थ करून दाखवलेले असते , साधारण व्यक्तिमत्व लाभलेली माणसं.आपण कसे दिसतो या फंदात पडत नसावीत ,त्यांना मनातून हे पक्के समजलेले असते की आपण "हिरो सारखे राहिलो तर अधिकच बावळट दिसुत."
यांच्या उलट दाढी -मिशी ,किंवा नुसती मिशी बाळगून असलेल्या माणसांची मिजास लगेच आपल्या नजरेत पडते ,या माणसांना " आपले जरा हटके असे दिसणे ..ते समोरच्यांना थोडे थोडे का होईना आवडते हे ठाऊक असणे "याची पुरेपूर खात्री असते.
मला माझे लहानपण आठवते ..त्या दिवसातील आठवणीं आता ६० वर्षे इतक्या जुन्या झाल्या आहेत , मराठवाड्यातील ती वर्षे मोगलाई जमान्यातील होती .. मुसलमानी अंमलाखाली असलेल्या या भागात ..दाढी -मिशा , नुसत्या मिशा असणारेच सरसकट दिसत असत . " मिशा नसलेलेला सफाचट चेहेरा दिसला के समजावे ..याच्या घरी काही तरी दुर्दैवी प्रसंग घडला आहे " , कारण, या शिवाय मुंडन आणि मिशा अशा स्थितीत पुरुष मंडळी दिसत नसत , फिरत नसत " अशा अपवादात्मक परिस्थिती व्यतिरिक्त ..मिशा नसलेले चेहेरे अजिबातच दिसत नसत असे म्हटले तरी चालेल .
मिशा आणि त्याचे प्रकार व्यक्ती गणिक वेगवेगळ्या असत ..त्यात ही - पल्लेदार मिशा ,भरघोस मिशा ,तलवार कट मिशा , हिटलरी -मिशा , आणि ओठांवर महिरप वाटावी , रांगोळीची बारीक रेघ वाटावी अशी रेषेदार मिशा , यात एक गोष्ट साध्य होते असे ती म्हणजे ..मिशा नसल्याचा फील , आणि बारीक का होईन पण मिशा आहेत, हे समोरच्याला दिसण्याची खात्री .
नोकरी करणारी माणसे , व्यावसायिक माणसे ..अशी सर्व माणसे निगुतीने मिशा राखीत ...त्यामुळे ..पोरगेल्या वयात जर मिसुरडे फुटायला उशीर होऊ लागला तर तो पोरगा ..भेदरून गेलेल्या अवस्थेत वावरत असे ..असा या मिशांचा सार्वजनिक धाक आणि दरारा होता . आपल्या पोराच्या ओठावर केसाची कोवळी लव..उमटते आहे हे पाहून, " पोरगा हाताला येतय बरं का " याची चाहूल लागल्याने त्या पिढीतले बाप आनंदित होत असत.
श्रमिक -जगतातल्या गडी- माणसांना मिशी नसणे ही कल्पने पलीकडली गोष्ट होती , या मजबूत माणसांचे चेहरे त्यावर असणार्या मिशी मुळे अधिक गूढ -गंभीर वाटत असत.
दिलखुलास स्वभावाची माणसे त्यांच्या मिशी -प्रभावामुळे हसत असत त्यावेळी त्यांच्या मिशा मिश्कील वाटू लागत. तसे तर गालातल्या गालात हसणे " हे नेहमीच दिसणारे दृश्य , पण " हे मिशीतल्या मिशीत हसणे " किती पहानेबल असते , त्यासाठी एखादा मिशाळ -मिशीवाला आपल्या समोर असायला हवा .
आजोळच्या गावी गेल्यावर ..त्या दिवसात .खूप मजा येत असे ..त्या छोट्या खेडेगावात बाहेर पडले की आजूबाजूला अनेक मिशीवाले मामा ,आजोबा ,घर बाहेर असलेल्या ओट्यावर, मंदिराच्या पारावर , आरामात गप्पांचा फड रंगवतांना दिसत, अशा ठिकाणी , तरुण मिशा , अक्कडबाज मिशा , अनुभवी गंभीर मिशा , पिकलेल्या मिशा ..जणू मिशी रुपात जीवन -दर्शन घडत असे.
काल बदलला , पिढी बदलली , माणसे आली -गेली .. खूपशा जुन्या गोष्टी मनाला चटका लावून गेल्या , नव्या वाजत गाजत आल्या , या प्रवाहात मिशा आणि दाढी ..टिकून राहिल्या आहेत ..आपल्या आजूबाजूला ..दाढीवाले -मिशीवाले अगदी सहजतेने वावरतांना दिसतात , आजची युवा -पिढी ..देखील दाढी-मिशा कुरवाळीत विचारमग्न पोझ मध्ये चर्चा -सत्र गंभीरपणे करतांना पाहून खूप छान वाटते .
मी नोकरीच्या निमित्ताने अनेक गावी फिरलो .. अशाच एका गावी असतांनाची ही गोष्ट ..माझा एक सहकारी मित्र ..अव्वल -दर्जाचा मिशीवाला असामी होता , या मिशीवर आशिक झालेल्या त्याच्या प्रेयसीने ..त्याची पत्नी होण्याचे कबूल केले , या मिशी -जादू मुळे साहजिकच ..बायकोवर आणि मिशीवर त्याचे अपार प्रेम होते .. उंचापुरा तगडा गडी ..मिशी मुळे फारच रुबाबदार दिसत असे , कधी कधी वाटायचे ..याच्या मिशीला किती धन्य वाटत असेल .की आपण याच्या ओठावर आहोत ..
एकदा सुट्टी घेऊन मी काही कामा निमित्ताने गावाकडे गेलो होतो ,साधारण दोन-तीन आठवड्याने ..मी परत रुजू झालो .. ऑफिस मध्ये गेलो तर माझा मिशीवाला दोस्त नजरेस पडला नाही .. मी त्याची चौकशी केली .. आणि त्याच्यावार कोसळलेल्या दु:खाची बातमी कळाली ..एकाएकी उद्भवलेल्या आजार झाल्याचे निमित्त होऊन ..त्याची प्रिय पत्नी त्याला कायमची सोडून गेली होती ..
मी संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी म्हणून गेलो ..त्याचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे ,कसे करावे ? मोठो नाजूक गंभीर परिस्थिती होती .. काही न बोलता ....आम्ही एकमेकांकडे पहात राहिलो ..जणू त्याला माझ्या धीराच्या भावना समजत होत्या ..मोठ्या जड मनाने तिथून निघालो.
यथावकाश तो सावरला, कामावर आला .त्याच्या बिना -मिशीच्या चेहेरयाकडे पाहवत नव्हते ,न राहवून एकदा मी त्याला सुचवले ही ..त्यावर तो म्हणाला ..
"साहेब , माझ्या मिशीवर जिचे प्रेम होते ..तीच आम्हाला सोडून गेली ..आता मन धजावत नाही माझे .. मी पोरका झालो आणि माझी मिशी पण पोरकी झाली."
-------------------------------------------------------
धन्यवाद - "मिशी " उपक्रम -संयोजक .
कथा प्रसिध्द दिनांक- १८-०१-२०१८ 

No comments:

Post a Comment