Monday, April 23, 2018

-आठवणीतलं गाव परभणी - लेख क्र- २३ - बीबीके सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .
-----------------------------------------------------------------------
परभणीच्या वास्तव्यात ..माझ्या वैयक्तिक जीवनात , नोकरीच्या म्हणजे बँकेतील कार्यालयीन जीवनात , आणि साहित्यिक म्हणून वावरतांना नित्यनेमाने खूप काही घडत असे , हे सर्वच दिवस उत्साहाने भरलेले होते ..रोज काही नवे घडे .ज्याने मनास उमेदीचे नवे बळ मिळत असे.
परभणीच्या साहित्यिक जगतात वडीलधार्या मंडळींचे मोलाचे मार्गदर्शन मला नेहमीच मिळत गेले , त्यांचे प्रेमाचे शब्द मला घडवीत होते ..त्यातूनच आजचा मी आहे" अशी  माझी भावना आहे.

१९९८- १९९९ .दरम्यानची ही एक स्मरण- कथा आहे, वीस वर्ष होत आली  आहेत आता या प्रसंगाला , पण आठवणीच्या रूपाने मनात अजून जशाचा तसा आहे हा प्रसंग  ,
१९९८  या वर्षा पर्यंत माझे ..१.कुरूप रंग , २.रंग तरंग , ३,नवर्यांची चाळ( विनोदी कथा )  असे तीन कथा - संग्रह प्रकाशित झालेले होते . या नंतर एक नव्या कथा संग्रहाची तयारी सुरु केली होती ..त्याच वेळी संग्रहाची प्रकाशन तारीख ठरवली होती .."बी.रघुनाथ स्मृतिदिन - दि. ०७ सप्टेंबर, वर्ष होते १९९९ . प्रकाशक ही मिळाले होते .संजय सप्लायर्स (प्रकाशन ) पुणे .
कथा -संग्रहाचे नाव होते  "अनुपमा ", 
या संग्रहाला एका कथा - लेखकाची प्रस्तावना घायची "अशी माझ्या मनात खूप इच्छा होती , असे साहित्यिक बाहेरगावचे कशाला ? असा प्रश्न मी स्वतःलाच विचारून त्यावर उपाय शोधला , आपल्या परभणीच्या साहित्यिक परिवारातील एका जेष्ठ साहित्यिकांना विचारू या , त्यांचा होकार सहज मिळेल 'अशी खात्री होती.

त्या दिवसात एकदा औरंगाबादला जाण्यासाठी मी परभणी रेल्वे स्टेशनवर आलेलो होतो , वीस वर्षापूर्वी परभणी स्टेशनवर येणाऱ्या रेल- गाड्यांची संख्या तशी मोजकीच होती ..,आणि वेळेवर येणे " हा नियम तेंव्हा तितका कडक नव्हता असे आता आठवते . वेळापत्रकानुसार गाडी येणे " तशी एक नवलाची गोष्ट "असे " , असे म्हटले तरी चालण्यासारखे होते , अशा वातावरणात एक घंटा देरीसे चलनेवाली गाडी " अजून किती उशिरा येते ? या काळजीत असतांना ,माझ्या सोबत रेल- गाडीची वाट पहाणाऱ्यात  एका स्नेह्याची भर पडली होती ..

माझ्या बाजूला उभे होते .मराठवाड्यातील विनोदी  कथा लेखन करणाऱ्या मोजक्याच साहित्यिकात  ज्यांचा उल्लेख केला जात असे ते .प्रा.भास्कर कुलकर्णीसर. ज्यांना त्यांचा परभणी-  मित्र परिवार ..बीबीके या नावाने ही बोलवत असे .
त्यांनापाहून मला अतिशय आनंद झाला होता ..कारण माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवण्याचा योग मोठ्या अनपेक्षितपणे माझ्या वाटयाला आला होता.. 

त्या दिवशी बीबीके सर औरंगाबादला  निघाले होते , मी पण औरंगाबाद पर्यंत आहे म्हटल्यावर त्यांना बरे वाटले 
एक तासा पेक्षा अधिक उशीर न लावता त्या दिवशी आमची रेलगाडी आली .
गर्दीतून वाट काढीत बसण्यासाठी जागा मिळवणे " हे प्रवासी -कौशल्य परभणीकरांना उपजतच लाभेली देणगी आहे ,त्यामुळे आम्हाला बसण्यास जागा लगेच मिळवता आली.
गप्पा सहजपणे सुरु झाल्या  साहित्यिक घडामोडींवर सरांचे लक्ष असते ." हे त्यंच्या बोलण्यातून जाणवत होते .ते .म्हणाले .तुमच्या सारख्या नव्या साहित्यिक मित्राशी बोलून ,नवी माहिती तरी मिळेल आम्हाला .
 . आम्ही गेल्या पिढीतले म्हणजे जेष्ठ साहित्यिक झालो , कुणे असे म्हणू लागले की आम्हाला उगीचच भीती वाटते हो देशपांडे ,-
 वाटते -  यापुढे आपल्याला  मान्यवर उपस्थित म्हणून खुर्चीवर बसवले जाईल , काय सांगावे -  आजकाल कशाचा भरवसा नाही राहिला बघा , तुम्हाला म्हणून सांगितले..
नाही हो सर , असे काही होणार नाही , कथा लेखन ते ही .विनोदी ..तुम्ही अगदी निष्ठेने हा लेखन प्रकार लिहिता आहात , याकडे कसे दुर्लक्ष करता येईल ? तुमच्या मनात असे विचार ही येऊ नयेत असे मला वाटते.
थोड्या वेळाने मी त्यांना म्हणालो .. सर , मी एक कथा लेखक आहे, माझा विनोदी कथा संग्रह देखील प्रसिद्ध झाला आहे ",
त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकी देत म्हटले .तुमच्या लेखनाकडे माझे लक्ष आहेच अरुणराव , बँकेतला माणूस लेखन करतो याचे कौतुक आहे मला . सरांच्या या कौतुकांच्या शब्दाने मी भारावून गेलो , सर, एक विनंती आहे आणि इच्छा सुद्धा , ती तुम्ही पूर्ण करावी ..,
सर म्हणाले ..आधी सांगा तर खर , मग ठरवू .काय करायचे ते .
लगेच मी म्हणालो .., असे काही करू नका सर, मला माझ्या नव्या कथा संग्रहासाठी तुमची प्रस्तावना हवी आहे,
 एका विनोदी कथा लेखकाची प्रस्तावना गंभीर कथांच्या संग्रहाला असावी " हे माझी कल्पना सरांना ऐकून पटली नसावी अशी भीती मनात होती ...पण, सर म्हणाले .. , मी तुमच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो ,काळजी करू नका .
अरुणराव, बाहेरगावचे मोठे मोठे साहित्यिक तुमच्या ओळखीचे असतांना , तुम्ही मलाच कसे काय विचारताय ? हे मात्र विचारतो तुम्हाला ..
सर, तो प्रश्नच नाही .. माझ्या नित्य परिचयाच्या वडीलधार्या साहित्यिकाची प्रस्तावना घ्यायची  हे मी मनोमन ठरवले होते ..,हे पक्के झाल्यावर  तुमच्याशिवाय अन्य कुणाचाही विचार केला नाही ,त्यांमुळे अनेकांना विचारून शेवटी तुमच्याकडे आलो असे मुळीच नाहीये .फक्त आणि फक्त तुम्हालाच या संदर्भात बोलतो आहे मी.
माझ्या सांगण्यातला खरेपणा सरंना जाणवला असेल , ते म्हणाले..
ठीक  आहे , तुमच्या कथांची फाईल माझ्याकडे आणून द्या ,वाचून प्रस्तावना देतो.
सरांच्या या एका वाक्याने माझा तो प्रवास सार्थकी लागल्याचे समाधान मनाशी बाळगून ,दोन चार दिवसांनी मी परभणीला परतलो.
लगेच माझ्या नव्या संग्रहाच्या कथा अनुक्रमणिके नुसार लावून .१५ कथांची फाईल घेऊन सरांच्या शास्त्रीनगर येथील घरी गेलो . अत्यंत भक्तिभावाने ती फाईल श्री गुरुचरणी ठेवतो आहे अशी भावना त्यावेळी माझ्या मनात होती .सरांचे त्या वेळी दिवाळी अंकासाठीचे कथा लेखन चालू होते , त्यांच्या लेखनात अडथला आणला कि काय ? ही माझी भीती सरांनी ओळखली असावी .म्हणाले ..
असे अवघडून बसू नका , आपल्या परभणीला मोकळं वातावरण आहे ,बाहेरच्या सारखं नाही इथे, ही फार चांगली गोष्ट आहे अरुणराव.
हो सर , हे मात्र खरे  आहे , आपल्या परभणी सारखे साहित्यिक वातावरण बाहेर कुठेच नाहीये " असे बाहेरगावाहून आलेले आपले साहित्यिक मित्र सांगत असतात..
सरांना फाईल देत म्हटले ..केंव्हा येऊ मी प्रस्त्वाना घेण्यसाठी ? लास्ट-वीक मध्ये प्रकाशकांना पोंचली पाहिजे .बाकी सगळं तयार आहे .
सर म्हणाले .१५ तारखेला या तुम्ही आणि प्रस्तावना घेऊन जा .
विनोदी कथा लेखक प्रा.भास्कर कुलकर्णी यांनी बरोबर १५ दिवसांनी त्यांची प्रस्तावना मला दिली , अतिशय अनुरूप अशी प्रस्त्वाना सरांनी लिहिली होती . या प्रस्तावनेतील निवडक ओळी .ब्लर्ब " वर सुद्धा छापल्या .
त्यातील मोजक्या ओळी इथे देण्याचा मोह टाळणे कठीण आहे..
" अरुण वि.देशपांडे यांच्या कथा मानवी जीवनाच्या निरनिराळ्या संघर्षाचा शोध घेणाऱ्या आणि विविध भूमिकातून माणसे कसे जीवन जगतात याचा प्रत्यय आणून देणाऱ्या आहेत.
" नियतीशरण जीवन हे या संग्रहातील कथांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणवे लागेल .आकर्षक आणि लक्षवेधी कथा वाचकांच्या पसंतीस उतरतील असा विस्वास वाटतो .
त्यांच्या साहित्य प्रवासास आशीर्वाद व हार्दिक शुभेच्छा.
- प्रा.भास्कर कुलकर्णी 
" क्षितीज ", शास्त्रीनगर ,
परभणी .

मित्रहो बीबीके  उर्फ प्रा.भास्कर कुलकर्णी सरांच्या आशीर्वादाने माझे साहित्य लेखनाचे क्षितीज आता तर या इंटरनेटवर खरोखरच विस्तारत जाते आहे. .

सरांच्या शास्त्रीनगरच्या घरी  अनेक वेळा मी गेलो आहे , साहित्य विषयक गप्पा करीत त्यांच्यातील लेखक अनुभवला आहे . अनेक साहित्य संमेलनात त्यांचा कथा कथन सत्रात सहभाग हा ठरलेला असे. मी माझे कथा कथन पहिल्यांदा सादर केले ते  वसमतला झालेल्या पहिल्या परभणी जिल्हा साहित्य संमेलनात . 
या संमेलनाचे अध्यक्ष होते कथाकार प्रा. तू.शं,कुलकर्णी सर.

या समेलनात झालेल्या  कथा-कथन सत्रात प्रा.भास्कर कुलकर्णीसरांनी देखील त्यांची विनोदी कथा सादर  केली होती. सरांच्या बरोबर माझा असाच आणखी एक सहभाग योग - आखाडा बाळापुर ला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील कथा -कथन कार्यकमात आला .

प्रा.भास्कर कुलकर्णीच्या विनोदी कथा लेखनाचे विश्व एका अर्थाने मर्यादित होते .  आपल्या अवतीभवतीच्या सध्या -सरळ आणि मानवी प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा वाचकांना भावणार्या होत्या "भाम्पास " नावाची व्यक्ती -रेखा त्यांच्या कथेचे मध्यवर्ती पात्र असे. सरांचे हे विनोदी लेखन मनाला एक वेगळा आनंद देणारे होते.असे मी आवर्जून म्हणेन.

सरांचे अचानक जाणे ", हा सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धक्का होता , एका अबोल मनोवृत्तीच्या सृजनशील साहित्यिक व्यक्तीमात्वाचे जाणे साहित्यिक क्षेत्राला  मोठीच हानी पोन्च्व्णारे  होते.

या लेखाच्या निमिताने बीबीके सरांच्या चिरंजीव यांना  एक सुचवावेसे वाटते की. प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या साहित्याचा ब्लोग तयार करून इंटरनेट वरील वाचकांना प्रा.भास्कर कुलकर्णी या विनोदी कथा लेखकाचे साहित्यिक कार्य नव्या पिढीसाठी उपलब्ध करून द्यावे . सरांच्या वाण्ग्मयीन कार्याची   दखल घेतली जाईल ,
प्रा.भास्कर कुलकर्णी यांच्या स्मृतीस व साहित्यिक लेखन कार्यास हे शब्दरूप अभिवादन अर्पण करतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- लेखमाला 
-आठवणीतलं गाव परभणी -
 लेख क्र- २३ - 
बीबीके  सर - प्रा.भास्कर कुलकर्णी .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment