लेखमाला -आठवणीतलं गाव -परभणी .
लेख -१७ वा -
साहित्यिक -कलावंत -बँक कर्मचारी ..!
------------------------------ ----------------------------
परभणी शहरात बहुतेक सर्व नामवंत बँकेच्या शाखा कार्यरत आहेत हैद्राबाद बँकेच्या परभणी मुख्य शाखेत सर्व बँकांचे आपसातील होणार्या व्यवहारासाठी एक स्वतंत्र विभाग होता ..त्याला क्लीयारिंग हाऊस " असे म्हणत ,मी २००३-च्या दरम्यान मुख्य शाखेत काम करीत असतांना अनेक वेळा क्लीयारिंग हाऊस मधली वर्दळ पाहत असे .. त्यावेळच्या क्लीयारिंग शेड्यूल लिस्ट वर मेंबर असलेल्या बँक आणि त्यांच्या शाखांची संख्या अंदाजे २०-२५ असल्याचे आठवते ,
१०.३० म्हणजे बँक कामकाज सुरु होण्याची वेळ , कोणत्याही बँकेत जा..कस्टमर ने भरलेली बँक दिसत असे ,हे सगळे पाहून वाटायचे रुक्ष आकड्याच्या जगात वावरणारे बँक कर्मचारी .यांना बेरीज, आणि गणित , नोटांची मोजणी ,कर्ज आणि ठेवी ..अर्जदार आणि कर्जदार .याशिवाय दुसरे काही करण्यास वेळच मिळत नसेल ,
पण असे मुळीच नव्हते ..उलट या ८०- ९० च्या दशकात ..म्हणजे मी परभणीला असण्याच्या काळात ..परभणीच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या सहभाग कार्याने प्रभाव पाडणारी अनेक व्यक्ती विविध बँकेत-शाखेत कार्यरत होत्या ,आजच्या लेखात अशाच काही मित्रांची आठवणी सांगाव्याश्या वाटतात . परभणीच्या नव्या पिढीला माझ्या आठवणी नक्कीच आवडतील
आज यातील बहुतेक कर्मचारी बँक -सेवेतून निवृत्त झालेले आहेत आणि आता जेष्ठ साहित्यिक व कलावंत म्हणून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत
त्या वेळी स्टेट बँक ऑफ इंडिया परभणी शाखेत - - रेणू पाचपोर ,हे कार्यरत असणारे लेखक-कवी ..
कविता , ललित लेखन या साहित्य प्रकारात प्रभावी कामगिरी करून साहित्य लेखन क्षेत्रातले एक ठळक नाव राहिलेले आहे . यांच्या साहित्यास शासनाचे राज्य पुरस्कार प्राप्त कविसंमेलनात निमंत्रित कवी असल्यामुळे नामवंत संस्थांच्या व्यासपीठावरून कविता सादर करण्यात आघाडीवर असत. परभणीतील साहित्यिक उपक्रमाच्या निमित्ताने आमच्या नियमित संवाद-भेटी होत ..परभणी वास्तव्यात ..यांचे बहुतेक सर्व साहित्य माझ्या वाचनात येत असे.. अलीकडे दिवाळी अंकातून कवितेमुळे भेट होते ....परभणीतील माझ्या साहित्यिक -मित्र यादीतले मोठे व प्रसिध्द म्हणून कवी-लेखक रेणू पाचपोर हे नाव कायम आहे.
याच इंडिया बँकेत ..आणखी एक लेखक आहेत बा.बा.कोटम्बें.., नियमित संपर्कात असणारे कोटम्बे आपल्या लेखनात कायम व्यस्त असतात , कथा आणि कादंबरी, आणि ललित लेखन हे कोटम्बे यांचे साहित्य लेखन प्रकार आहेत , सहज सुंदर लेखन शैली ,ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही भाषा त्यांच्या लेखनात आहेत ..
आजच्या काळात महत्वाचे साहित्यिक व बँक कर्मचारी म्हणून बा.बा.कोटम्बे प्रसिद्ध आहेत.
इंडिया बँकेतील एक सर्व परिचित कलावंत व्यक्तिमत्व ..रंगभूमी वरील जेष्ठ कलावंत ..दिग्दर्शक विजय करभाजन
आपल्या कार्याने सर्वोतोदूर लौकिक प्राप्त करून नाट्य-क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.विभागीय नाट्यस्पर्धा , विजय करभाजन - आणि परभणीचे नाटक " म्हणजे आमच्या काळात सगळीकडे पुरस्कार मिळवणारे एक फेमस नाव झाले होते ..
शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपले योगदान देणारे माझे मित्र .श्रीकांत देशपांडे , हसतमुख तबला वादक शशांक शहाणे, संगीत विषयक कार्यक्रमात आवर्जून या दोन मित्रांना मी आवर्जून भेटत असे.
- कथा आणि ललित लेखन करणारे मंगेश उदगीरकर हे महाराष्ट्र बँकेत कार्यरत होते , साहित्य बरोबर बँक कर्मचारी संघटनेतील एक प्रभावी कार्यकर्ते ही त्यांची आणखी एक ठळक ओळख , परभणी मुख्य शाखेच्या गेट समोर शहरातील बँक कर्मचारी निदर्शनं करीत ..त्यावेळी एआयबीईए- झिंदाबाद " अशा गर्जना -घोषणा देणारे कॉम्रेड -मंगेश उदगीरकर मला अजून आठवतात .
आम्ही दोघे जरी वेगवेगळ्या बँकेत होतो ..तरी ..परभणी वास्तव्यात मला सर्वात जास्त साहित्य-सहवास घडलय तो मंगेश उदगीरकर या हरहुन्नरी व्यक्तीचा .. त्या काळात आमचे लेखन एकमेकांच्या प्रोत्साहनाने होत असे ..परभणीत संपन्न झालेल्या सर्वच साहित्य संमेलन आयोजनात मंगेश उदगीरकर यांच्या सोबतचा कार्यकर्ता म्हणून मी असे. मसाप परभणी आणि अक्षर प्रतिष्ठा -परभणी या दोन्ही संस्था कार्यात मंगेश उदगीरकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.. परभणी पीपल्स बँकेच्या परिसरात साहित्य संमेलन संदर्भात चर्चा आणि बैठकी होत असत , त्यावेळी मंगेश उदगीरकर सोबत आम्ही मित्रांनी मस्त "गप्पाष्टक " रंगवले आहे .खरेच ते दिवस कधीही विसरले जाणारे नाहीत.
महाराष्ट्र बँकेतील एक सर्वपरिचित आदरणीय असे व्यक्तिमत्व - .अध्यात्म आणि संत वांग्मय अभ्यासक आणि , उत्तम कीर्तनकार म्हणून ख्यातीप्रात असे माधवराव आजेगावकर , , संतकवी दासगणू महाराज वांग्मय दर्शन " हे माझे संत-साहित्य लेखन पुस्तक रूपाने आले ते माधवराव अजेगावकर यांच्या मित्र-कृपेच्या योगाने ..या निमित्ताने माधवराव यांच्या प्रतिभेचे अलौकिक असे दर्शन अनेकवेळा घडण्याचा योग माझ्या वाट्याला आला , माझ्या लेखन-प्रवासातील हा एक बहुमोल असा पुण्यकारक भाग्ययोग आहे असे म्हणावेसे वाटते.
आमच्या हैद्राबाद बँकेत ..नाट्य-कलावंत गिरीश कऱ्हाडे हे प्रसिध्द नाव ,
त्यावेळी परभणीला नसलेले पण आता एक परभणीकर साहित्यिक असलेले तुकाराम खिल्लारे . हे माझे बँकेतील अधिकारी असलेले .सहकारी मित्र .. खिल्लारे यांचे सोबत मी कृषी विद्यापीठ शाखेत काम केले ..त्यांच्या सहवासातील दिवस माझ्या साठी ..काव्य-लेखनाची .कार्यशाळा होती.
आज ही फेसबुक आणि इंटरनेटवर तुकाराम खिलारे कविता विषयक आणि हायकू विषयक असे मोठे वाण्ग्मयीन कार्य करीत आहेत ", मराठीतील एक महत्वाचे हायकू रचनाकार म्हणून त्यांच्या कार्याची व लेखनाची नोंद होते आहे ..हे या निमित्ताने सांगण्यास मला विशेष आनंद वाटतो . तुकराम खिल्लारे सध्या कार्यरत असलेले बँकेतील अधिकारी तर आहेतच त्या सोबत कविता क्षेत्रातील एक महत्वाचे कवी आहेत.
कवी म्हणून विशेष प्रसिध्द असलेले उद्धव भयवाल यांनी परभणीच्या हैद्राबाद बँकेत काही वर्षे काम केले ,त्या वर्षात परभणीत झालेल्या अनेक कवी संमेलनात उद्धव भयवाल यांच्या कवितांनी मोठी बहार उडवून दिली होती , सेवा निवृत्ती नंतर भयवाल..औरंगाबाद मुक्कामी असून आता कविता व लेखन क्षेत्रात भरीव अशी लेखन कामगिरी करणारे मराठवाड्यातील जेष्ठ कवी -लेखक आहेत.
परभणी मध्यवर्ती बँकेच्या हेड ऑफिस मध्ये कार्यरत असणारे ..नाट्यकलावंत , वक्ते आणि संत-साहित्य अभ्यासक देविदास वझे यांच्या मैत्रीचा लाभ झाला ..त्याचे निमित्त होते ..आखाडा बाळापुर येथे झालेले मराठवाडा साहित्य सम्मेलन.,
परभणी पीपल्स बँकेत असलेल्या कवयित्री प्रणिता रायखेलकर ..आता लेखिका आणि कवयित्री आहेत प्रणिता देशपांडे -रायखेलकर या नावाने त्यांचे लेखन फेसबुकवर नियमित वाचण्यात येत असते.
मराठवाडा ग्रामीण बँक आणि देविदास कुलकर्णी ..या नवा शिवाय लेख पूर्ण होऊच शकत नाही . वसमत रोड वरील ग्रामीण बँकेच्या शाखेत देविदास कुलकर्णी शाखाधिकारी होते .. त्यांच्या काळात ही शाखा एक बँक म्हणून आघाडीवर होतीच होती ...
त्यात भर पडली ती देविदास कुलकर्णी हे स्वतहा एक लेखक आणि कवी असण्याची .. त्यामुळे ग्रामीण बँकेची ही शाखा ..अनेक वेळा साहित्यिक भेटण्याची एक आपलेपणाची जागा झाली .. साहित्य चळवळ असो, साहित्य लेखन असो , साहित्य विषयक उपक्रम असो ..या संदर्भात येथे ज्या चर्चा होत, कल्पना मांडल्या जात असत .त्या सर्व स्वप्नवत उपक्रमांना प्रत्यक्ष्यात आणण्याची अजोड कामगिरी करून दाखवली ती देविदास कुलकर्णी या कुशल संघटक मित्राने ...
समेलन आयोजक , नियोजक , व समेलन नगरी म्हणजे परभणी " अशी ओळख निर्माण करण्यात देविदास कुलकर्णी यांचे साहित्यिक कार्य मोलाचे आहे .मसाप परभणी..अक्षर प्रतिष्ठा परभणी आणि देविदास कुलकर्णी ..ही नावं एकाच आहेत ..कसे ही घ्या क्रम तोच असेल.
याच ग्रामीण बँकेच्या शाखेत .मराठवाड्यातील एक महत्वाच्या कवयित्री कार्यरत होत्या ..वसुधा देव.. परभणीतील या कवयित्रीने आपल्या काव्य लेखनाने ..आजच्या मराठी कवितेत एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे .. सेवा निवृत्ती नंतर ..समक्ष भेटी नाहीत ..पण अधून मधून इंटरनेटवर वसुधा देव यांची भेट होत असते.
मित्र हो .. इतक्या संपन्न अशा साहित्यिक वातावरणात राहण्याचा योग माझ्या वाटायला आला तो मी परभणीला असल्यामुळे , त्या काळात " सातत्याने लेखन करणारे विपुल असे लिहिते असणारे लेखक-कवी परभणी शहरात असत " हे आज आठवते तेंव्हा खरेच खूप आनंद वाटत असतो ..माझ्या या सर्व साहित्यिक मित्रांना त्यांच्या लेखन सेवे बद्दलचा माझा हा आठवणीचा नमस्कार.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------
लेखमाला -आठवणीतलं गाव -परभणी .
लेख -१७ वा -
साहित्यिक -कलावंत -बँक कर्मचारी ..!
- अरुण वि.देशपांडे - पुणे.
मो -९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ --------------
No comments:
Post a Comment