Tuesday, December 5, 2017

लेख- आठवणीतली गावं - माझे आजोळ - वसमत .

लेख-
आठवणीतली गावं -
माझे आजोळ - वसमत 
----------------------------------------------
आठवणी या नेहमीच  आपल्या मनाला फार मोठा भावनिक आधार देत असतात , आठवणींच्या खजिन्यात .काय नसते ?.इथे खूप काही असते ..माणसांच्या आठवणी, सुख अनुभवले ते क्षण , दुख: भोगले ते क्षण , नशिबाचे बरे-वाईट फेरे , असे सगळे काही  आठवणीच्या खाजान्यात साठून राहिलेले असते...एका अर्थाने आपण "विस्मरणाचे - स्मरण -करतो " हे असे करणे म्हणजे- आठवणी ",अशी व्याख्या या निमित्ताने करावीशी वाटते .

अशा या  दिवसात हरवून जाण्याचे निमित होते ..ती.मातोश्रींचे श्रावण - महिन्याच्या निमित्ताने , औरंगाबाद हून  पुण्याला माझ्याकडे येणे.. .या मुकामात आमच्या  बोलण्याचा-गप्पांचा  विषयच  होता तो .तिचे माहेर ,आणि जुन्या आठवणी ..या ओघात ..मलाही  माझ्या आठवणी पुन्हा नव्याने आठवल्या ..आणि मातोश्रींच्या सोबतीने गहिवरल्या आठवणीत मी भिजून निघालो ..न्हाऊन निघालो ....

माझ्या आईचे वयमान -आज ८८ वर्षे आहे आणि माझे ६६ , तिच्याशी बोलतांना मला जाणवले की ..म्हातारपण म्हणजे- आठवणीत हरवून जाण्याचे ,आणि  त्या आठवणीत विरघळून जाण्याचे वय असते .. नकोश्या झालेल्या वर्तमानातून सुटका नाही हे माहिती असते  मग .यातून स्वतःला अलग करून नक्कीच घेता येते ,मग  आपण पुन्हा हव्याश्या वाटणार्या त्या गत-काळात आणि आठवणीत रमून जातो ....

आमच्या गप्पांच्या निमित्ताने ..मी माझे लहानपण अनुभवले.. ते दिवस ..त्या आठवणी..नव्या पिढीची शेअर कराव्या वाटल्या म्हणून हा लेखन -प्रपंच ..
आईचे नाव - इकडचे - रुक्मिणी विठ्ठल देशपांडे - लोहगावकर - परभणी ..
आणि माहेरचे - द्वारकाबाई  नागोराव देशपांडे -वसेकर - --वसा - जिंतूर 
गेल्या पिढीतील जिंतूर आणि मराठवाड्यातील एक सर्वपरिचित व्यक्तिमत्व -  ज्यांची ओळख - सलग दोन दशके -जिंतूरचे नगराध्यक्ष " अशीच होती - असे - पांडुरंगराव नागोराव वसेकर -त्यांचे मित्र त्यांना प्रेमाने  पीएन .असेही म्हणत - हे पांडुरंगराव वसेकर - हे आईचे मोठे बंधू ,माझे मोठे मामा , 
श्रीधर उर्फ राजाभाऊ वसेकर हे लहाने मामा ,
जिंतूर आणि वसा तसे म्हटले तर लौकिक अर्थाने माझी आजोळ -म्हणवी अशी गावं , पण, याही पेक्षा आणखी एक गावं .माझे आजोळ म्हणून मला प्रिय आहे .. ते गाव- आणि त्याचे नाव आहे- वसमत .-अगोदर जिल्हा-परभणी ,आणि आताचा जिल्हा - हिंगोली .
वसुमतीनगर - वसमतनगर - वसमत ..असेही या गावाची ओळख आहे.

वसमतला -आईची मावशी - ती. कौसल्याबाई -लोहरेकर-देशमुख यांचे वास्तव्य होते .आईचे मावसबंधु - अंबादासराव लोहरेकर-देशमुख - यांचा पत्ता ..लोहरेकर यांचा वाडा  बोधानंद -मठाजवळ, वसमत इतका सोप्पा होता.,पोस्ट-कार्डवर कित्येक वर्षे मी हा पत्ता लिहून खुशाली कळवीत असे. आता तर हे पत्र लेखन कमी कमी झाले आहे.
वसमतला -या मावशीकडे आईचे लहानपण गेलेले त्यामुळे साहजिकच तिच्या मनात या गावाविषयी भावनिक जिव्हाळा -ओढ आहे ..,ती आवर्जून या सर्वांच्या भेटीला येत असे आणि भरपूर दिवस मुकाम करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असुत ., .
आणखी एक खास गोष्ट - वसमत हे माझे जन्मगाव आहे...
अम्बादासराव  लोहरेकर-मामा यांच्या घरात ८ ऑगस्ट १९५१ ला माझा जन्म झाला , आणि याच महिन्यात -याच वर्षी ..म्हणजे २६ ऑगस्ट १९५१ ला मामांच्या मोठ्या मुलीचा -प्रभाचा जन्म झाला ..एकाच पाळण्यात आम्हे दोन शहाणी  बाळं छान राहिलो आहोत , ही प्रभा .आता प्रसिद्ध वकिलीणबाई आणि सामाजिक 
कार्यात सदैव पुढे असणारी एक सर्वपरिचित  व्यक्ती झाली आहे..प्रभा प्रकाश कात्नेश्वारकर " ही तिची आजची ओळख आहे..
१९५० ते १९७५ .हा पंचवीस वर्षांचा काल माझ्या मते तरी खूप सुखाचा आणि परस्पर नाते संबंध अतिशय आपलेपणाचा असणारा असाच होता , जाणे-येणे , कार्य-प्रसंगाला आवर्जून जाणे असे.कालानुरूप -आणि पिढी-दर-पिढी याचे प्रमाण कुठे कमी कुठे जास्त असणार आहे " ते स्वीकारणे हेच उत्तम.

लहानपणापासून ते पदवीधर होई पर्यंत ..दरवर्षी सुट्टीचे दिवस वसमतला जाणे असायचे . मामा -अंबादासराव लोहरेकर-हे मोठ्या उमद्या आणि रसिक-कलावंत  मनाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या वाड्याच्या बाजूला ..बोधानंद मठ आहे. 
त्यावेळी या मठात एका बाजूला खूप छान असा गायन-वादन क्लास चालत असे. इथेच त्यावेळी प्रकाश धर्माधिकारी यांच्यातील ..कसबी  तबलावादक होण्याची ..झलक पाहिल्याचे आठवते , मी मोठ्या आपुर्वाईने क्लास मध्ये बसून रहायचो .ऐकायचो ,पाहायचो -.तबला ,हार्मोनियम - पेटी , तंबोरा , बुलबुल -तरंग .अशी अनेक वाद्यांना इथेच हात लावून पाह्यला मिळाला , 
वसमतचे आणखी एक मामा .प्रल्हादराव दुधगावकर हे कलारसिक आणि हर-फन मे माहीर असे व्यक्तिमत्व ,या दोन मामांच्या सहवासात ..संगीत आणि कला यांची आवड माझ्यात रुजत गेली .अशी   माझी भावना आहे.त्यावेळेसचा -
प्रभाकर दुधगावकर ..पेटीवर सफाईदार वादन करून .गोड आवाजात .भावगीत म्हणायचा .ते सूर बहार गाणे अजूनही रेंगाळते आहे. आता हाच  .डॉ.प्रभाकर .दुधगावकर .पुण्यातच वास्तव्यास असतो .आम्ही भेटलो म्हणजे या आठवणी निघत असतात .,सोबत त्याची पेटी आणि  गाणे .मैफिल आपोआप रंगते.

सुट्टीच्या दिवसात वसमतला मामाच्या घरी पाहुण्यांचा सतत राबता असायचा ..पण. यातले कुणीच पाहुणे म्हणून न वावरता .घरातील एक माणूस होऊन जायचे .इतका साधेपणा आणि सरलपणा .हे त्या वाड्यातील लोकांना लाभलेला लोभस गुण होता ..मामा आणि मामी दोघेही खूप शांत .सहनशील आणि सोशिक स्वभाव असलेले जोडपे , त्यांच्या सहवासात आलोत की आम्ही जमलेले पोरं -टोर..धिंगाणा करीत असलो तरी. मारामारी .करीत नव्हतो , मामांना त्रास होऊ नये "हे आमच्या मनात नक्कीच असावे..

त्यावेळी सुट्टीच्या दिवसात करमणूक करवून घायची पद्धत असे. जसे..रेडीओ अखंडपणे चालू ठेवून गाणी म्हणायची , पत्ते खेळायचे , भेंड्या खेळायच्या ..या खेळात .सोबत खाऊ असायचा . तो मुर्मुर्याचा खमंग चिवडा , रवा -बेसन लाडू , बाजरीच्या खारोड्या आणि कच्चे शेंगदाणे , किंवा तेल-मेतकुट लावून .मुरमुरे , या सोबत बुक्कीने फोडलेले कांदे , असा सगळा मेड इन होम खाऊ, हॉटेलातले खाण्याची पद्धत त्या घरात त्यावेळी बिलकुल नव्हती.

त्या वेळच्या आम्हा सारख्या समवयस्क मुलांवर  अशा एकत्र राहण्यातून ..आणि सहवासातून एक खूप मोठा संस्कार झाला .तो म्हणजे - " आपले -माझे " असे न करता .नेहमीच -आपण , आपले ,सर्वांचे " असा विचार करून .सर्वाना सामवून घेत ,मिळाले  त्यात आनंद मानायचा असतो " ,..१९६० ते १९७० या दहा वर्षांच्या काळात .अंबादासराव मामांच्या  वाड्यात जी मुलं-मुली सुट्टीत राहून गेली असतील , त्यातील पत्येकाला माझे हे आठवणीतले सांगणे पटेल.
१९५० ते १९७५ .हा पंचवीस वर्षांचा काल माझ्या मते तरी खूप सुखाचा आणि परस्पर नाते संबंध अतिशय आपलेपणाचा असणारा असाच होता , जाणे-येणे , कार्य-प्रसंगाला आवर्जून जाणे असे.हेच आम्ही पाहिले आहे, अनुभवले आहे , हे सारे कमी कमी होत जाताना पाहणे अतिशय वाईट वाटायला लावणारे आहे.

मामांचा वाडा खूप मोठा होता पण तो  .मामांच्या मोठ्या मना पेक्षा नक्कीच छोटा  होता. वाड्याला एक उंच गच्ची होती ..रात्री चांदण्यात आमच्या पोरांच्या गाण्यांच्या भेंड्या मस्त चालायच्या . त्या काळी सकाळी आणि रात्री अशी दोन वेळा जाणारी एक रेल-गाडी  असे .पूर्णा -खांडवा अशी जाणारी ही  आगीनगाडी पाहण्यासाठी अगदी भल्या पहाटे आम्ही गच्चीवर धावत जायचो ..ती निरव आणि प्रसन्न पहाट- वेळ .आणि दूरवरून धुरांच्या रेघा सोडीत जाणारी ती झुक झुक आगीनगाडी : अप्रतिम दृश्य होते ते. ..पुन्हा लहान होऊन हे पाहण्याची इच्छा झाली तरी आता उपयोग नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीतला  आमचा मुकाम महिनाभर असे..या दरम्यान लग्नकार्य , मुंजी ..असे कार्य प्रसंगाच्या निमित्ताने वसमत मधील इतर अनेक स्नेही-आणि नातेसंबंध असलेल्या घरी आई सोबत आम्ही मुलं जात असुत. माहेरपणाला आलेल्या आईचे या सर्व घरात अतिशय जिव्हाळ्याने स्वागत होत असे .. मामांच्या घराजवळ असलेल्या .डॉ- आगलावे, कोटीखाने, कुरुंदकर , देशपांडे , संगवई , धर्माधिकारी , चौधरी , द्न्नक ,आबू मेथेकर., खारकर -" .या सर्वांच्या घरी गेल्याचे मला आठवते .
कालाय तस्मै नमः  म्हणयचे आणि नव्या वळणावरील आयुष्याला सामोरे जात राहायचे .हे आपल्या हातात असते ,,
अंबादासराव मामांची पुढची पिढी .आता या लोहरेकर वाड्यात असते.. माझे मामेभाऊ - विनोद- बालासाहेब,व  गणपत आणि वसंत , धाकटी मामेबहीण .सौ.विजया बारडकर .जी कवयित्री आहे. आता नांदेडला असेते , तिने तिचा कविता प्रवास चालू ठेवला असेल अशी आशा मी टिकवून ठेवली आहे ..आता अलीकडे  भेटी अभावी .माहिती अभावी मजला फार काही माहिती नाहीये. 
प्रभा  देखील पारिवारिक जीवनात ..औरंगाबादला .शैलेश ..या वकिली करणार्या मुलासोबत .नातवंडात रमलेली आहे..

वसमतला  या अगोदर जाऊन मला आता २० वर्षे सहज झाली असतील  ..पण मनाने मात्र मी अजून ही माझ्या लहानपणीच्या  दिवसात - वसमत च्या लोहरेकर मामांच्या वाड्यात असतो.. सोबत तेच सखे सोबती असतात  ,आंब्याचे दिवस असतात .घरचे आंबे .भरपेट रस खाणे आणि बैठकीच्या खाली असलेल्या  थंडगार लाद्नीत उबदार सुताड्या अंथरून ढाराढूर झोपण्याचे स्वप्न  पहात असतो.
मित्रांनो या आठवणी मनाला खूप उभारी देतात 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- आठवणीतली गावं -
माझे आजोळ - वसमत .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-----------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment