Tuesday, December 5, 2017

लेखमाला -आठवणीतील गाव - परभणी - लेख- ५ वा एका कासवाची तीर्थ -यात्रा ..! ले- अरुण वि.देशपांडे . -----------------------------------------------------------------

लेखमाला -आठवणीतील गाव -
परभणी -
लेख- ५ वा 
एका कासवाची तीर्थ -यात्रा ..! 
ले- अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------
नमस्कार मित्र हो ,
जुन्या दिवसांची आठवण तुमच्या सोबत शेअर करण्याचे हे क्षण खूप मोलाचे आहे,भावनिक नाते अधिक दृढ करणारे हे लेखन आवडल्याचे तुमच्या प्रतिक्रियेतून कळते ,हा आनंद कित वेगळा आहे, तुम्हीच हे समजू शकता ..
गेल्या लेखात आपण माझ्या १९६४ या वर्षा पर्यंतच्या आठवणी जाणून घेतल्यात .. या नंतर १९६५ ते १९८६ ..अशी २१ वर्ष मी आणि आमचा सर्व परिवार परभणीला -येथील वास्त्ब्याला दुरावलो होतो .याचे कारण ..वडिलांची प्रमोशन वर ऑफिसर म्हणून बदली झाली ती हैद्राबाद बँकेच्या हेड ऑफिसमध्ये..आणि मग पुढचे दोन दशके हा दीर्घ कालावधी जीवनाला अनेक अर्थाने संपन्न करणारा असाच आहे..या काळातील प्रवासाविषयी या वेळी नेमक्या काय भावना आहेत..हा आजच्या लेखाचा विषय आहे..
अलीकडे मनाला एक मोठा खुळा-नाद लागला आहे बघा .. थोडासा एकांत आणि निवांत वेळ मिळाला की.. मनाने मी पार लहानपणाच्या दिवसात जाऊन लहानपण अनुभवतो, तर कधी .शाळा -कोलेजच्या दिवसात भटकून येतो ..तर कधी ..ज्या बँकेत ३३ वर्षे नोकरीच्या निमित्ताने होतो ..त्या बँकेच्या आठवणीत रमून जातो ..पारिवारिक आठवणी तर ,लडिवाळपणाने  मनाला कायम बिलगुनी असतात ... असे कातर -विव्हळ  होणे -हे म्हातारपणाचे  प्रमुख असे भावनिक  लक्षण आहे  असे माझे मत झाले आहे ..

माझा हा आयुष्य प्रवास -एक तिर्थ- यात्रा आहे असे मानतो.. आणि "कासव " हे रूपक मला माझ्यासाठी सर्वाथाने योग्य वाटण्याचे कारण- असे आहे ..
कासव स्वतःच्या ..मर्यादा ओळखून .... स्वतःला भोवतालीच्या घाई-गर्दीपासून वेगळे ठेवत .जी काय ध्येयपूर्ती मनाशी ठरवली असेल ..त्या पूर्तीसाठी ..पुढे पुढे चालतच जात असते  तसेच आपण आपल्या मार्गाने चालत राहावे . . कासवाने माघार घेतलीय ? असे कुणी सांगितल्याचे मला तरी आठवत नाही  ..गती कासवाची ..आणि मती  सुद्धा त्याच्या सारखीच .अविचल असावी असे मला वाटत आले आहे.

. मंदिरातील .दर्शनासाठी गेलो की ..भगवंताच्या दर्शन सोबत  मी कासव..दर्शन पण घेत असतो .किती छान योग आहे न कासवाला लाभलेला - .." त्याला .मंदिराच्या निरामय वातावरणात सत्संग आणि संतसंग दोन्ही घडत असतात ..त्याच्या सारखाच सत्संग आपल्यालाघडावा  राहावा -कारण - कानावर पडत गेले की आपोआपच ते मनापर्यंत झिरपत जाते , आपल्याला ..त्यासाठी ."माणसातले देव भेटायला  हवेत..
माझ्यातल्या "कासवाची  तिर्थ- यात्रा " ही त्रिगुणात्मक- तीन-व्यक्ती स्वरूपातील आहे. आहे.. श्री दत्तगुरूंच्या कृपादृष्टीची ही प्रचीती आहे.
हे त्रिगुण - तीन-रूप.--- एक- मी-एक -प्रापंचिक -गृहस्थ आणि माणूस ,
 दोन- पोटा -पाण्यासाठी नोकरी करणारा माणूस ,
 तीन- कलागुण लाभलेला - एक साहित्यक, संगीताची -कलांची आवड असणारा एक रसिक..

माझ्यातील  तीन स्वतंत्र प्रवाह आहेत ..तरी ते एकरूप आहेत ..वेगवेगळे करता येणार नाहीत असे हे तीन प्रवाह , रंग वेगवेगळे ...त्यामुळे ..
एक - 
घरातील वावर - पती- पिता - आजोबा - , संसार -प्रपंच दोन्ही यथाशक्ती छानच पार पाडलेत 
दोन -
. बँकेत  असतांना -   नोकरी आणि कामाला कायम प्राधान्य दिले शिवाय , - कुशल कामगार श्रेणीत होतो मी,   नेहमीच सगळ्या पेक्षा चार टोपली जास्तीचीच टाकली ..याचे समाधान मला आहे.
-तीन -
-साहित्यिक -म्हणून वावरतांना - सर्वात मिसळून जात आनंद देणे आणि घेणे .. साहित्य क्षेत्रात - आधी कार्यकर्ता ..मग  लेखक-कवी वगेरे ..,
यांची कधीही गल्लत होऊन  " एक-ना धड -भराभर चिंध्या " अशी अवस्था होणार नाही ..याची काळजी घेत आलो आहे.
 माझ्या आता पर्यंतच्या तीर्थ-यात्रेत .विविध .गाव ..त्यातली काही माझ्यासाठी माझी कर्म-मंदिरा सारखी आहेत , काही गाव- माझ्यासाठी .गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींची म्हणून -.श्री-सद्गुरूंची निवासस्थानं आहेत , आणि काही गावांनी ..तिथल्या मोठ्या मनाच्या मित्रांनी मला घडवल ,
या सर्व ठिकाणी .सर्व गावी स्नेहीजनांचा ..आपल्या माणसांचा मायाबाजार कायम भरलेला असतो ..तो किती ही काल जावो जसाच्या तसा भरलेला असणार आहे.

माझे वडील ती.विठ्ठलराव हनुमंतराव देशपांडे -लोहगावकर ..परभणी ..हे आणि मी एकाच बँकेत नोकरीला होतो ,
त्यांच्या बदली मुळे, आणि नंतर माझ्या स्वतहाच्या नोकरीत झालेल्या माझ्या बदल्यामुळे ..अनेक गावाला आम्ही राहिलो ..ही सर्व गाव माझ्यासाठी तीर्थ-क्षेत्र आहेत..
या २१ वर्षातील प्रवासाचा हा अल्पसा उल्लेख करतोय ..कारण प्रत्येक गावातील वास्तव्य आणि काळ.हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
 १९६५ ते  १९६७ - हैद्राबाद .इथे  एच एस सी झालो आणि बालपण सरले ..
१९६७ इये १९७१ - आष्टी -जी. बीड- याच काळात अंबाजोगाई च्या योगेश्वरी महाविद्यालयात शिकलो ,बी.काम चा विद्यार्थी होऊन मी होस्टेलमध्ये राहत असे.

आपल्याला सामुहिक आणि सार्वजनिक जगण्यात मनभेद आणि मतभेद " आता जितके जाणवतात ते इतके तीव्रतेने कधी जाणवत नव्हते ,
पारिवारिक आणि कौटुंबिक जीवन आर्थिक -दृष्ट्या भले ही संपन्न नव्हते ..पण.माणसांची मनं खूप मोठी आणि आणि श्रीमंत होती . वाड्यात आणि चाळीत रहाणारी  माणसे ..भक्कम मनाची होती ..त्यांच्या आधारामुळे साधी सुधी माणसे त्यांच्या भावनिक जगात सुखी आणि समाधानी होती . आपलेपणाच्या  भावनेमुळे ..प्रेमाचा हक्क गृहीत धरला जात असे.  आजूबाजूच्या परिवारातील मुलं -मुली सुद्धा कधी परकी नव्हती-..दुसर्याची नव्हती .तर आपलीच सगळ्यांची लेकरं असायची ..

मी हे सगळं अनुभवलंय ..ज्या ज्या गावी मी राहिलो .त्यातले .हैद्रबाद सोडून ..बाकी सर्व लहान गाव होती पण.या सर्व ठिकाणी मला  माणुसकीची चाड असलेली माणसं दिसली ,भेटली ." .ज्यांना इतर  माणसांची काळजी होती ,त्याच्या साठी खूप काही  तरी करीत राहण्याची त्यांची धडपड असायची..लष्कराच्या भाकरी भाजणारे " निस्वार्थी लोक..या पिढीतच सर्रास आजुबाजू वावरतांना दिसत असत .
आष्टी नंतर ..अहमदपूर , मग परळी वैजनाथ , उदगीर ,ही गाव झाली ..

दरम्यान १९७३ मी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये नोकरीला लागलो .. मग माझ्या बदल्या झाल्या .. १९७६ ला लग्न झाले .. आणि आमच्या तीर्थ-यात्रेत एका मोठ्या क्षेत्राची भर  पडली .ते गाव आहे- हिंगोली .
. हिंगोलीच्या  ..बसोले परिवारातील  -मीनाक्षी , आमच्या देशपांडे परिवारातील नव्या पिढीतील मोठी सुनबाई म्हणून प्रवेशली .त्याला  आता ४१ वर्षे झालीत .. मोठ्या चतुरतेने आणि कुशलतेने सर्व कारभार आणि सूत्र ती सांभाळते आहे .

१९७६ साली कर्नाटक बिदर जिल्ह्यातील कमाल नगर आणि  औराद -संतपुर या दोन गावी काम केले . नंतर बदली होऊन ३ वर्ष नंतर मी पुन्हा मराठवाड्यात आलो ते जिंतूर ला .. हे माझे आजोळ गाव. त्यामुळे बँकेत काय आणि नंतर काय .आजोळच्या गावातील माणसांचे प्रेम मी मनोसक्त अनुभवले.

१९८० -छावणी शाखा औरंगाबाद ला बदली झाली आणि मी आमच्या पूर्ण परिवारा सोबत राहिलो ..खूप छान वर्षं होती ही. पुन्हा बदली .
.१९८२ ..गंगाखेड. इथल्या ३ वर्षांच्या वास्तव्यात ..संतजनाबाई च्या  गंगाखेड मध्ये माझ्या साहित्य लेखनास सुरुवात झाली ..ती गेली ३५ वर्षा पासून सातत्याने -अखंड चालू आहे.. गोदावरीच्या निर्मल प्रवाहाने ..माझ्या लिखाणाला एक निर्मल आणि संस्कारी रूप दिले आहे असे मी मानतो.

१९८६ ते २००६ ..ही वीस वर्ष ..दोन दशके ..परभणीला माझ्याच गावी नोकरीला होतो. इथेच कार्यकर्ता आणि साहित्यिक म्हणून मी घडलो .. दुनिया मे जर्मनी -भारत मे परभणी " हे आता सर्व परिचित आहे. त्याच माझ्या गावात मी लिहिता साहित्यिक झालो .. तिथे मला काय काय करायला मिळाले ..हा विषय एका स्वतन्त्र पुस्तकाचा आहे..
माझ्या आयुष्य आणि लेखन प्रवासातील ही सुवर्ण -पानं आहेत ..ते या नंतरच्या अनेक लेखातून सविस्तरपणे येणारच आहे.

..मित्रांनो  माझ्या तीर्थ- यात्रेतला हा पाडाव आणि तुम्हा सर्वांच्या स्नेहाची शिदोरी .मला नवी उभारी देणारे आहे. माझ्यातल्या कासवाची ही तीर्थ - यात्रा आपल्या सर्वांच्या स्नेह-बळावर अशीच चालू राहावी ही इच्छा आणि विनंती.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------लेख- आठवणीतील गावं 
एका कासवाची तीर्थ-यात्रा ..! 
ले- अरुण वि.देशपांडे .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment