Friday, December 15, 2017

लेखमाला - हितगुज - लेख-क्र-१७ आपले बोलणे .



लेखमाला -
हितगुज -
लेख-क्र-१७ 
आपले बोलणे 
------------------------------------------
आपले बोलणे नेहमीच महत्वाचे असते , याचे बरे-वाईट परिणाम होत असतात  , त्याचे  परिणाम वाईट झाले की निमुटपणे  ते आपल्याला स्वतहाला भोगावे लागतात . आपल्यातल्या  .."मी " .यावर जर आपले  नियंत्रण नसले तर केवळ बोलण्याने किती परिणाम होतात हे आपण सर्वांनी अनुभवलेले ,पाहिलेले आणि ऐकलेले असते.

 "बोलणे आणि ऐकणे "यांचा अतिशय जवळचा संबंध  आहे ..  बहुतेक वेळा ."कुणी सांगितलेले , कुणाकडून कळालेले ". कधी कधी तर ,निव्वळ अफवा ऐकून बोललेले  सुद्धा .आपण खातरजमा न करता विचार न करता मत देतो ..ते व्यक्त करतो .जे वाटले ते बोलून टाकतो ..अर्थातच स्वतःला "गोत्यात आणून टाकतो .
म्हणूनच एखादी गोष्ट कोण सांगतोय..बोलतोय याला अतिशय महत्व दिले जाते ..कारण बोलणाऱ्याच्या शब्दावर विस्वास ठेवायचा की नाही ? हे कोण बोलतो आहे यावर अवलंबून आहे.

बोलणे .हे जसे दोन वक्ती मध्ये असते, तसेच ते सामूहिक स्वरूपाचे असते ..दोन्ही प्रकारात ..बोलण्याचे परिणाम होतच असतात .किंबहुना .."बोलणाऱ्याच्या बोलण्याचे अनुकूल व प्रतिकूल ..असे दोन्ही ही परिणाम इथे अपेक्षित असतात , म्हणूनच ..सर्वांना रुचेल, पचेल आणि पटेल .असे बोलणारी व्यक्ती .आपल्या बोलण्याने प्रभाव पाडून ..कित्येकदा ..विरोधात गेलेली परिस्थिती पुन्हा फेवर" मध्ये आणू शकते .

आपल्या मनाचे आणि विचारांचे संतुलन ढळू न देता ..आपल्या  बोलण्यावर ठाम असणारे " नक्कीच कौतुकास्पद वाटावेत अशी माणसे असतात . ही माणसे कुणाला खुश करण्यासाठी किंवा कुणाला वाईट वाटेल म्हणून कसे बोलायचे ? असा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत ..कारण  त्यांच्या बोलण्याने-सांगण्याने ..एखादी जनहिताची गोष्ट पूर्ण व्हावे असा प्रयत्न असतो .

काही माणसे स्वतहाचे मत सांगतांना .असे बोलत असतात की त्यांचे बोलणे ऐकल्यावर महाशय .- नम्र -जाणकार कमी ."  आणि ते  "उद्धट फटकळच  जास्त " वाटू लागतात , त्यांच्या  बोलण्यातून  अचूक व माहितीपूर्ण असे काही आलेले नसते   , या उलट .काही न करता .मी यंव केले असते त्यंव केले असते .अशी   स्वतःची टिमकी वाजवून -काम करणार्यांबद्दल कौतुकाने बोलण्या ऐवजी  तुच्छतेने बोलत बसणार त्यामुळे  तर ..असे  बोलणे अहं- चा दर्प "जाणवणारे असते.व या  बोलण्याला काहीच किंमत देत नाहीत.

इतकेच कशाला .आपल्या पारिवारिक - कौटुंबिक जीवनातील काही उदाहरणे घेऊ या ..म्हणजे ..माणसं आणि त्यांचे बोलणे " दोन्ही बद्दल अधिक जाणवू लागेल. बोलण्याच्या प्रकारची ,शैलीची इतके प्रकार आहेत की. बस रे बस.. आपणच म्हणू .व्यक्ती तितके बोलण्याचे प्रकार आहेत की आजूबाजूला .

उदा- निर्मल -स्वच्छ हेतूने प्रांजल बोलणे , सहज आणि आडपडदा न ठेवता मोकळे बोलणे , ओठावर एक आणि मनात दुसरे असे कावेबाज बोलणे ", स्वार्थी हेतूने .-कामापुरते गोड गोड- मधाळ बोलणे,लेकी बोले सुने लागे " ,अशा पद्धतीने कार्यभाग साधण्य साठीचे बोलणे , कुजके आणि मनाला दुखावणारे मुद्दाम घालून पाडून बोलणे , चार-चौघात एखादयाची मानहानी व्हावी  या हेतूने मस्करीचे बोलणे . टिंगल-टवाळी  करून एखदयाला अपमानकारक वागणूक देणारे बोलणे हे तर इतके  कॉमन आहे की ..त्याचे कुणाला काहीच वाटत नाहीये " अशी परिस्थती आहे.

जुन्या काळातील दिवस लक्षात असणार्या आजच्या मोठ्या माणसांना आजही अशी माणसे कायमची लक्षात असतील , एकमेकांना पाण्यात पहाणे , कुणाचे सुख न पहावणे ", मीच तो काय मोठा ", मीच एक लायक .बाकिंच्याची काय लायकी हो ? , असे वाक्य आणि उद्गार ..बोलण्यातून सहज येत असे. आता हे वाचून असेहे वाटू लागेल की. खरचं - धड बोलणारी माणसे नव्हती की काय ?  नव्हती असे नाही ..पण.. त्यावेळी खूप नसायची आणि आता तरी कुठे फारशी आहेत का ?  

बहुतेक वेळा तर समोरचा मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही , त्याची काय लायकी ?मी ओळखून आहे " अशा थाटात माणसे समोरच्याला गृहीत धरून त्याला वाटेल तसे बोलत असतात . आपण किती ही म्हणू- जीभ गोड तर सगळे गोड " पण वास्तवात असे नाहीये म्हणून  तर ..आपल्या बोलण्यावर संस्कार झाले पाहिजेत " असा भावर्थ असणारे सुविचार आणि वाक्य -प्रचार आपल्याला शिकवावे लागतात ..हे किती वाईट आहे 

जिभेवर ताबा असावा .., या जिभेचा आपल्या चवीशी आणि खाण्याशी जितका संबंध आहे ,तितकाच आपल्या बोलण्याशी आहे .. गोड खाणाऱ्या जिभेला - गोड बोलण्याची  का अलर्जी असते ? हे एक न उमजणारे कोडेच आहे.
तीळ-गुळ घेऊन क्षणापुरते गोड हसले के कोटा संपला .पुन्हा जिभेचा पट्टा सुरु .

आपण कितीक जनाब्द्द्ल आपले मत एका शब्दात सांगून मोकळे होत असतो .. माणूस तसा चांगला आहे ..पण, बोलू लागला की खैर नाही , सगळं घालवून बसतो बघा केवळ बोलण्यापायी " ,असे अनुभव येऊन ही आपल्यात बदल व्हावा असे माणसांना कधीच वाटत नाही.. त्याचे समर्थन  असे केले जाते ..आता या वयात काय अपेक्षा करायची याच्या कडून चांगल्या बोलण्याची ?  लोक चांगले म्हणून निभावलं याचं .

पती-पत्नी , नवरा-बायको - स्त्री-पुरुष .. यांच्यातील बोलणे , त्यांचे संवाद , आणि ते एकमेकांशी कसे बोलत असतात आठवून पाहावे  त्यात .किती दुरावे , किती असमंजसपणा , किती कोरडेपणा ,बापरे.. तरी यालाच सह-जीवन "म्हणायचे असते . ..ज्यात सहजपणा नाही  त्याला काय म्हणावे ...सांगा बारा आता 

मित्रांनो  तुम्ही आम्ही मग ते ..माणूस आणि व्यक्ती म्हणून असो की  -.मग ती स्त्री असो वा पुरुष , तरुण असो वा -तरुणी, मुलगा-असो वा मुलगी , मोठी पिढी  असो की नवी पिढी .. शब्द आणि परस्पर बोलणे हे मना मनाला सांधणारे सेतू असावे " अशी साधी अपेक्षा सुद्धा कधी पूर्ण होईल का ? असे विचारावे वाटते.
तरी पण निराश होण्या पेक्षा सगळे काही छान होईल अशी अशा करणेच योग्य.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हितगुज 
लेख- १७ वा -
आपले बोलणे 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment